जगातील सर्वात जास्त पाच लोकप्रिय खेळांत लॉन टेनिसचा समावेश होतो आणि जगभरात जवळपास १०० करोड लोक या खेळाचे चाहते आहेत. अमेरिकासहीत युरोप, आशिया आणि ऑस्ट्रेलिया खंडातही हा खेळ मोठ्या प्रमाणावर खेळला जातो. आपल्या देशातही क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, बॅडमिंटन पाठोपाठ टेनिसचे असंख्य दिवाने असून भारतीय टेनिसपटूसुद्धा टेनिसचे कोर्ट गाजवत आहेत. रामनाथन कृष्णन आणि विजय अमृतराज यांनी तर विम्बलडनच्या उपांत्य फेरी पर्यंत मजल मारलेली होती. तर आधुनिक काळात लिएंडर पेस, महेश भुपती, सोमदेव देववर्मन आणि साकेत मायनी यांनी आपल्या टेनिस कामगिरीने देशाचे नाव उज्ज्वल करत टेनिसची परंपरा कायम राखलेली आहे. मात्र भारतात टेनिसला खऱ्याखुऱ्या अर्थाने जनसामान्यात लोकप्रिय करण्याचे कार्य केले आहे हैदराबादच्या सानिया मिर्झाने. आपल्या ग्लॅमरस अंदाज आणि धडाकेबाज खेळीने तिने जागतिक पटलावर आपल्या नावाचा डंका वाजवलेला आहे. विम्बल्डनसोबतच  इतरही ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकत भारतीय खेळाडू विदेशी खेळाडूंपेक्षा कुठेही कमी नाहीत हे तिने आपल्या खेळाने दाखवून दिले आहे.

हैदराबाद म्हटले की चटकन डोळ्यासमोर येते ऐतिहासिक चारमिनार, शैलीदार फलंदाज मो. अझरुद्दीन, फुलराणी साईना नेहवाल आणि टेनिस सेंसेशन सानिया मिर्झा. खरेतर सानियाला बालपणापासून टेनिसचे आकर्षण होते आणि ती अवघ्या सहा वर्षाची असताना आईसोबत टेनिस कोर्टवर पोहोचली होती. मात्र सानियाचे कमी वय पाहता प्रशिक्षकांनी तिला नकार दिला होता परंतु सानियाची जिद्द पाहता त्यांनी तिला सराव शिबिरात सहभागी केले होते. एका महिन्यातच सानियाच्या कामगिरीने ते प्रभावित झाले आणि ही मुलगी भविष्यात नक्कीच मोठी स्टार खेळाडू होईल हे त्यांनी तिच्या आईला सांगितले होते. इथुनच सानियाचा खडतर प्रवास सुरू झाला आणि एक अव्वल टेनिसपटू म्हणून तिने नाव कमावले आहे. सानियाला तिचे वडील, राॅजर अॅंडरसन आणि सी.के. भुपती यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

सानियाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात १९९९ च्या विश्व ज्युनिअर चॅम्पियनशिपमध्ये झाली असली तरी तिला पहिले यश मिळाले ते २००३ च्या विम्बल्डन स्पर्धेत. अवघ्या सतरा वर्षांची असताना तिला वाईल्ड कार्ड द्वारे विम्बल्डनला प्रवेश मिळाला होता आणि सानियाने या संधीचे अक्षरशः सोने करत गर्ल्स डबल्समध्ये विजेतेपद पटकावले होते. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर असलेल्या सानियाने यानंतर मागे वळून बघितले नाही. ज्युनिअर खेळाडू म्हणून खेळताना सानियाने १० एकेरीचे तर १३ दुहेरी टायटल्स जिंकले होते. ऑस्ट्रेलियन ओपन, विम्बल्डन, फ्रेंच ओपन, अमेरिकन ओपन यासारख्या जागतिक स्पर्धां गाजवतांना ३ एकेरी तर ३ मिक्स दुहेरी असे एकंदरीत ६ ग्रॅंड स्लॅम विजेतेपद मिळविले आहे. आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा आणि आफ्रो आशियाई स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करत सानियाने ६ सुवर्णपदकांसहीत १४ पदकांची कमाई केलेली आहे.

ऑफेंसिव्ह बेसलाईनर खेळाडू असलेली सानिया आपल्या पॉवरफुल ग्राऊंडस्ट्रोकसाठी ओळखली जाते. तिच्या आक्रमक खेळासोबतच ताकदवर फोरहॅंड, व्हॉली स्किल आणि सर्व्हिस परतवण्याच्या अद्भुत कलेने तिची तुलना रोमानियाचा ग्रेट खेळाडू इली नेस्टेससोबत केली जाते. टेनिस कोर्टवर सानिया फारशी चपळ नसली तरी तिच्या खेळातील गुणवत्ता, जबरदस्त फोरहॅंडने ती प्रतिस्पर्ध्यांना चांगलीच जेरीस आणायची. २००३ पासून ती सतत डब्ल्यूटीए मानांकनात भारताची नंबर १ खेळाडू राहिली आहे. टेनिसमध्ये भारताची सर्वाधिक सफल खेळाडू म्हणून ती ओळखली जाते. सानियाच्या टेनिस कोर्टवरील कामगिरीची दखल घेत तिला २००४ ला अर्जुन पुरस्कार, २००६ ला पद्मश्री पुरस्कार, २०१५ ला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार तर २०१६ ला पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. यासोबतच डब्ल्युटीए तर्फे २००५ ला सर्वोत्तम नवोदित खेळाडूचा पुरस्कार मिळाला होता तसेच फिफ्टी हिरोज ऑफ एशिया मध्ये तिला मानांकन मिळाले होते. २०१० ला इकाॅनॉमीक टाईम्सने भारताच्या ३३ प्रभावी महिलांत सानियाला स्थान दिले होते.  २०१३ ला सानिया युएनच्या दक्षिण आशिया विभागासाठी सदिच्छा दुत म्हणून निवडली गेली होती.  २०१५ ला बीबीसीतर्फे जाहीर झालेल्या १०० इन्स्पायरींग वुमन मध्ये तिला समाविष्ट करण्यात आले होते. २०१६ ला टाईम्स मासिकाने प्रसिद्ध केलेल्या  १०० प्रभावी व्यक्तींमध्ये ती सामील होती.

आपल्या कारकीर्दीत स्वेतलाना कुझ्नेस्त्वोवा, मरियन बार्टोली, मार्टीना हिंगीस, दिनारा साफिया आणि व्हिक्टोरिया अझारेन्का सारख्या दिग्गज महिला खेळाडूंना धुळ चारणाऱ्या सानियाने ऑगस्ट २००७ ला आपले सर्वोत्तम मानांकन (२७) प्राप्त केले होते. मात्र तिचा खेळ बहरत असतांनाच उजव्या मनगटाच्या दुखापतीने तिला ग्रासले होते आणि २००९ ला मनगटावर  शस्त्रक्रिया करावी लागली होती. यामुळे तिला एकेरी स्पर्धांमधून माघार घ्यावी लागली होती. सानियाने यापुढे आपले सर्व लक्ष दुहेरी स्पर्धांवर केंद्रीत केले आणि यात सहा ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या. इकडे टेनिसचे कोर्ट गाजवत असतानाच तिकडे सानिया आणि विवादाचे सख्खे नाते तयार झाले होते. कधी तिच्या पेहेरावावरून वादळ उठायचे तर कधी तिच्या खेळण्यावरून. इजरायलची खेळाडू शहर पिर सोबत खेळण्यावरून वादंग तर कधी लिएंडर पेस व महेश भुपती यांच्या कटूतेचा फटका सानियाला बसायचा. २०१० ला सानियाने पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक सोबत विवाह केला आणि यावेळी बराच वाद गाजला होता. मात्र टेनिस कोर्टची अस्सल लढवय्यी असलेल्या सानियाने तेवढ्याच ताकदीने या विवादांना पुरून उरत आपण रिअल लाईफमध्येही चॅम्पियन असल्याचे सर्वांना दाखवून दिले आहे.

सानियाच्या जडणघडणीत तिच्या आईवडीलांसोबतच प्रशिक्षकांचाही मोलाचा वाटा आहे. सानियाच्या प्रशिक्षणादरम्यान बरेचदा तिच्या पालकांना आर्थिक अडचणी आल्या मात्र मित्रपरिवाराकडून मदत घेत त्यांनी सानियाच्या टेनिस प्रवासात खंड पडू दिला नाही. सानियाने शारिरीक फिटनेस राखताना मानसिकदृष्ट्या सक्षम होत टेनिसकोर्ट आणि बाहेरही अनेक वादळांना सहज तोंड दिले. मनगटाच्या दुखापतीने एकेरी स्पर्धांमध्ये माघारली असतानाही हिंमत न हारता दुहेरीत आपली जादू दाखवून दिली. बिनधास्त खेळ, ग्लॅमरस लूक आणि आपल्या स्टाईलने सानियाने टेनिसला देशभरात प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. एवढ्या सर्व धावपळीत तिने सामाजिक उपक्रमातही आपले योगदान देत हैदराबादला नवोदित खेळाडूंसाठी टेनिस अकॅडमी उघडली. सध्या तेलंगणा राज्याची ती ब्रॅंड अॅम्बॅसेडर असून कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी तिने सव्वा करोड रुपयांची राशी जमा केलेली आहे. हजारो परिवारांना जेवन आणि इतर मदत कार्यासाठी तिची धावपळ सुरूच आहे. २०१६ ला तिचे आत्मचरित्र " "ऐस अगेन्स्ट ऑड्स" प्रसिद्ध झाले असून यात तिच्या काटेरी जिवनप्रवासाचा आलेख मांडण्यात आलेला आहे. टेनिस सारख्या खेळात एक महिला म्हणून येणाऱ्या शारिरीक, मानसिक आणि सामाजिक संकटांना पुरुन उरत सानियाने टेनिस मध्ये जी उंची गाठली आहे ती नक्कीच कौतुकास्पद आहे, शिवाय नवोदित खेळाडूंना प्रेरणादायी पण आहे.

दि. ३० मे २०२०

डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel