आधुनिक काळात ऑलिम्पिकची सुरुवात १८९६ च्या ग्रीस ऑलिम्पिक पासून झाली आणि आपला देश अधिकृतपणे १९२० पासून यात सहभागी होत आहे. तसे पाहिले तर १९०० साली भारतातर्फे ब्रिटिश नागरिक नॉर्मन प्रिचर्डने सहभागी होऊन २०० मिटर धावण्याच्या शर्यतीत आणि २०० मिटर हर्डलमध्ये दोन पदके मिळवली होती परंतु खऱ्या अर्थाने भारतातर्फे ऑलिम्पिकमध्ये पदकाचे खाते १९२८ अॅमस्टरडॅमला हॉकीमध्ये उघडले गेले होते. जयपाल सिंग मुंडा यांच्या नेतृत्वात खेळलेल्या हॉकी संघाने हॉकीचे जादुगार ध्यानचंद यांच्या हॅटट्रीकसह सुवर्णपदक पटकावत ऑलिम्पिकमध्ये भारताची सुवर्णमेढ रोवलेली होती. मात्र ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक मिळविण्यासाठी आपल्याला १९५२ पर्यंत वाट बघावी लागली आणि हेलसिंकी ५२ मध्ये कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी कांस्यपदक मिळविले होते. भारतातर्फे आतापर्यंत पाच महिलांनी ऑलिम्पिकमध्ये पदके मिळवली असून पहिले ऑलिम्पिक पदक जिंकण्याचा मान आयरन लेडी अर्थातच कर्नम मल्लेश्वरीला मिळतो.

०१ जुन १९७५ ला आंध्रप्रदेशात जन्मलेल्या मल्लेश्वरीने आपल्या कर्तृत्वाने भारतीय महिलांसाठी ऑलिम्पिकचे आकाश मोकळं केलं. खरेतर १९९६ अटलांटा ऑलिम्पिकमध्ये लिऐंडर पेसने टेनिसमध्ये कांस्यपदक मिळवत देशाला पदकाविना परतण्याच्या नामुष्की पासून वाचविले होते‌. अगदी तशीच परिस्थिती सिडनी २००० ऑलिम्पिकमध्ये आली होती परंतु मल्लेश्वरीच्या साहसी खेळाने देशाची इभ्रत वाचली होती. मल्लेश्वरीने लावलेल्या पदक रोपट्याला पुढे मेरी कोम, साईना नेहवाल, साक्षी मलिक आणि पी सिंधूने आणखी फुलवत भारतीयांसाठी मानाची कामगिरी केली आहे. अर्थातच याकरिता मल्लेश्वरीने उपसलेले कष्ट, गाळलेला घाम, जीवनातल्या इतर सुखसुविधांचा केलेला त्याग आणि इथपर्यंतचा खडतर प्रवास नवोदित खेळाडूंसाठी निश्र्चितच प्रेरणादायी आहे.

मल्लेश्वरीचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला असून तिचे वडील रेल्वे सुरक्षा दलात कॉंन्स्टेबल तर आई गृहिणी होती. बालपणी मल्लेश्वरीच्या घराजवळच जिम (व्यायामशाळा) होते आणि तिथे येणाऱ्या एका वेटलिफ्टींग प्रशिक्षकाची पारखी नजर  गुटगुटीत मल्लेश्वरी आणि तिच्या भावंडांवर पडली. या बालकांकडे असलेली *गुड क्वालिटी मसल्स* भविष्यात वेटलिफ्टींगमध्ये नक्किच पदके मिळवू शकते हे त्यांनी ताडले आणि लगेच मल्लेश्वरीचे घर गाठले. मात्र वेटलिफ्टींगचा खेळ म्हणजे येरागबाळ्याच काम नव्हे शिवाय सांधे आणि शारीरिक इजा पाचवीला पुजल्याच असतात. मात्र या खेळात उज्ज्वल भविष्य आहे, पैसा, प्रतिष्ठा आहे, नोकरीच्या संधी आहेत हे समजावून देण्यात वेटलिफ्टींगचे प्रशिक्षक यशस्वी झाले. तरीपण वडील आणि नातेवाईक फारसे उत्सुक नव्हते. अखेर मल्लेश्वरीच्या आईने व्हिटो पॉवर वापरत आपल्या मुलींना वेटलिफ्टींग करीता तयार केले आणि त्याच क्षणी भारतासाठी एक ऑलिम्पिक पदक निश्चित झाले होते. आईच्या खंबिर पाठिंब्याने मल्लेश्वरी आणि तिच्या भगिनींनी हे क्षेत्र निवडले आणि *जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी* असे का म्हटले जाते याची प्रचिती आली.

मल्लेश्वरीने निवडलेला मार्ग खडतर जरूर होता, याकरिता तिने वयाच्या नवव्या वर्षांपासून जिमला सुरुवात केली तर बाराव्या वर्षापासून वेटलिफ्टींगचे धडे गिरवायला सुरुवात केली. दररोज १० ते १२ तास कठीण प्रशिक्षण, वजन उचलणे आणि फेकणे हा तिचा नित्यक्रम होऊन बसला होता. ना कधी सुट्टी ना कधी विरंगुळा. उच्च प्रशिक्षणासाठी तिने आपल्या बहिणीसोबत दिल्ली गाठले आणि इथे स्पोर्ट्स ऑथॉरीटी ऑफ इंडियाच्या नजरेत तिची कामगिरी पडली. १९९० ला ती नॅशनल कॅम्पला दाखल झाली आणि इथुनच मग तिची खरी कामगिरी जगासमोर येऊ लागली. १९९० ला ती ५२ किलो गटात राष्ट्रीय विजेती ठरली तर १९९२ ते १९९८ पर्यंत तिने ५४ किलो गटात राष्ट्रीय विजेतेपद स्वत:कडे राखले. जागतिक स्पर्धेत आपला दबदबा दाखवत मल्लेश्वरीने १९९३, १९९६ ला कांस्यपदक, १९९४,१९९५ ला सुवर्णपदक तर आशियाई स्पर्धेत १९९४,१९९८ ला रजतपदक कमावले होते. एवढी भरगच्च कामगिरी करूनही ती ऑलिम्पिक पदापासून वंचितच होती. अखेर २००० साल उजाडले आणि मल्लेश्वरीच्या ऑलिम्पिक स्वप्नांना धुमारे फुटायला लागले होते.

वास्तविकत: सिडनी ऑलिम्पिक गाठायच्या पहिले मल्लेश्वरीने वेटलिफ्टींगमध्ये जागतिक पातळीवर ११ सुवर्णपदकांसह २९ पदकांची लयलूट केली होती. मात्र ऑलिम्पिकमध्ये आजपर्यंत कोणत्याही भारतीय महिलेने एकही पदक मिळवलेले नव्हते. भलेही बचेंद्रीपाल १९८४, डिकी डोल्मा १९९३ यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केलेले होते, महिलांनी वायुदलात हेलिकॉप्टर उडवणे सुरू केले होते तर देशाचे पंतप्रधानपद एका महिलेने भुषवलेले होते. यामुळेच मल्लेश्वरीला इतिहास रचायची सुवर्णसंधी होती आणि ती याकरीता तयार होती. अर्थातच स्पर्धा म्हटले की तनाव येणारच आणि स्पर्धेपुर्वीची रात्र मल्लेश्वरीने जागून काढली. सकाळी देवपुजा आटोपताच ती नास्ता न करता स्पर्धेकरता तयार झाली कारण एरवी ६३ किलो गटात भाग घेणारी, ती यावेळी ६९ किलो गटात उतरली होती. स्पर्धा सुरू होताच तिने स्नॅचमध्ये ११० किलो तर क्लिन अॅंड जर्कमध्ये १३० किलो म्हणजे स्वत:पेक्षा दुप्पट वजन उचलत आपले पदक सुनिश्चित केले.  सुवर्णपदकासाठी तिला अंतिम फेरीत खरेतर १३२ किलो वजन उचलणे पुरेसे ठरले असते परंतु इथेच तिच्या प्रशिक्षकांचा वजनाचे गणित करतांना ताळमेळ चुकला आणि तिला १३७ किलो वजन उचलायला लावले ज्यात ती अपयशी ठरली आणि तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

मल्लेश्वरीच्या या ऐतिहासिक कामगिरीला बोटावर मोजण्याइतकेच भारतीय पाठीराखे,पत्रकार उपस्थित होते कारण त्यादिवशी भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान हॉकी सामन्याला बहुतेकांनी हजेरी लावली होती. इकडे मल्लेश्वरीने कांस्यपदक जिंकताच भारतीय गटात आनंदाला पारावार उरला नव्हता. ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये भारतीय ध्वज फडकताच धनराज पिल्ले सहित सर्वांनी मल्लेश्वरीवर कौतुकाचा वर्षाव केला. एरवी दुर्लक्षित असणारी मल्लेश्वरी कांस्यपदक जिंकताच एकदम प्रकाशझोतात आली आणि सर्वत्र तिचे नाव झळकू लागले. खरोखरच *चमत्काराशिवाय नमस्कार नाही* म्हणतात ते याचकरीता.

सिडनी ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकताच भारतातर्फे ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी मल्लेश्वरी पहिली महिला खेळाडू ठरली होती. मल्लेश्वरीच्या रूपाने भारतीय महिला खेळाडूंना आपणही ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकू शकतो हा आत्मविश्वास निर्माण झाला. यानंतर क्रिडा क्षेत्रात महिला खेळाडूंच्या सहभागात लक्षणिय वाढ झाली. यानंतर मल्लेश्वरीने २००२ ला राष्ट्रकुल स्पर्धा आणि २००४ ऑलिम्पिकसाठी जोरदार तयारी सुरू केली परंतु खेळात ती सातत्य राखू शकली नाही आणि अखेर तिने निवृत्ती पत्करली. मात्र तिच्या वेटलिफ्टींगच्या अनुभवाचा फायदा पुढच्या पिढीला देण्यासाठी तिने वेटलिफ्टींग अकॅडमी उघडली आणि १२,१४,१६ वयोगटातील मुलांना प्रशिक्षण देणे सुरू केले. २०२८ ऑलिम्पिकसाठी जवळपास ३०० मुलांना प्रशिक्षण देऊन देशासाठी पदक मिळवण्याचा तिचा मानस आहे आणि याची जबाबदारी तिने आपल्या खांद्यावर घेतली आहे.

मल्लेश्वरीच्या मते तिच्या कारकिर्दीत तिला जो संघर्ष करावा लागला त्याची झळ नवीन पिढीला बसू नये म्हणून देशभरात वेटलिफ्टींग अकॅडमी उघडण्यावर तिचा भर आहे. मल्लेश्वरीच्या या दैदिप्यमान कामगिरीसाठी तिला क्रिडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तसेच आपल्या खेळाने देशाचा मान वाढविण्यासाठी अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. उदयोन्मुख खेळाडूंसाठी मल्लेश्वरीने आपल्या खेळतपस्येने वेटलिफ्टींगसारख्या खेळातही महिला कारकिर्द गाजवू शकते हे दाखवून दिले आहे. घरच्या साधारण परिस्थितीतून संघर्ष करत आपल्या कर्तृत्वाने जगभरात आपला दरारा निर्माण करणारी मल्लेश्वरी नवोदित खेळाडूंची आयकॉन असून सध्या ती ज्याप्रकारे नवीन खेळाडूंची मशागत करत आहे त्यानुसार भविष्यात आपल्याला वेटलिफ्टींगमध्ये आणखी पदके मिळण्याची आशा निर्माण झालेली आहे. सध्या मल्लेश्वरी यमुनानगर, हरियाणाची रहिवासी असून फुड कार्पोरेशन ऑफ इंडियाला चिफ जनरल मॅनेजर या पदावर कार्यरत आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel