महिलांबाबत फार पूर्वीपासून *चुल आणि मुल* अशी धारणा चालत आलेली होती. त्यातच पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना दुय्यम स्थान मिळत असायचे. मात्र हळूहळू काळाने कुस बदलल्याने ऑफिस असो वा ऑलिम्पिक महिलांनी आपल्या कर्तृत्वाने घर आणि मैदानातही दमदार कामगिरी करत आपण पुरुषांपेक्षा कोणत्याही क्षेत्रात कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. सामाजिक रितीरिवाज, कुप्रथा, अंधविश्वास यावर मात करत महिलांनी क्रिडाविश्वालाही व्यापुन टाकले असून कुस्ती, बॉक्सिंग सारख्या खेळातही आपले प्राविण्य दाखवले आहे. मुख्य म्हणजे लग्न,संतती, करिअर या त्रिकोणाला आपल्या प्रचंड जिद्दीने आणि आत्मविश्वासाने भेदत सर्वत्र आपला ठसा उमटवला आहे. अशाच एका सुपरमॉमचा आपण आढावा घेत आहे जिने घर, बॉक्सिंग आणि करिअरला यशस्वीपणे सांभाळत आपले आणि आपल्या देशाचे नाव सातासमुद्रापार पोहचवले आहे. ती सुपरमॉम म्हणजेच मेरी कोम ही होय.

राज्यसभा खासदार, कर्तव्यदक्ष पत्नी, प्रेमळ आई, जागतिक बॉक्सिंग, ऑलिम्पिक चॅम्पियन, एका बॉक्सिंग अकॅडमीची मालक अशा विविध भुमिका सहजतेने निभावणारी आयरन लेडी अर्थातच मेरी कोम *मॅग्निफिशीऐंट मेरी* या नावाने सुप्रसिद्ध आहे. १ मार्च १९८३, मणिपुरला एका अत्यंत गरिब कुटुंबात जन्मलेल्या मेरी कोमने हलाखीच्या परिस्थितीतही आपल्या स्वप्नांना प्रचंड मेहनतीने फुलवत ठेवत यशाची एकेक शिखरे पादाक्रांत केलेली आहे. आपल्या कर्तृत्वाने तिने आपल्या राज्याचेच नव्हें होते तर देशाचे ही नाव बॉक्सिंग जगतातील प्रकाशमान केलेले आहे. एखाद्याला जर चित्रपटाला शोभुन दिसेल असा तिचा जिवनप्रवास असून तिच्या त्यागाला कधी हार न मानण्याच्या प्रवृत्तीला सलाम करावासा वाटतो. मेरी कोमचे वडील जरी उत्तम कुस्तीपटू असले तरी आपल्या मुलीने कधीच बॉक्सिंगमध्ये करिअर करू नये असे त्यांना वाटायचे. कारण एकतर घरी पैशांची चणचण, त्यातच मुलीला खेळताना इजा झाली तर पैशावाचून इलाज कसा करायचा हा मोठा यक्षप्रश्नच होता. शिवाय खेळताना चेहऱ्याला काही इजा झालीच तर मुलीशी कोण लग्न करणार ही भिती वारंवार भेसडवत होती.

मात्र मेरीच्या दृष्टीने हे प्रश्न गौण होते कारण तिचे स्वप्न आभाळाऐवढे उंच होते तर गाठीशी फक्त दुर्दम्य इच्छाशक्तीची शिदोरी होती. तशीही बालपणी मैदानी खेळात तिची विशेष रुची असायची आणि फुटबॉल खेळण्यात रमून जायची. साधारणतः आठवीत असताना मेरीने भालाफेक, ४०० मिटर धावण्याच्या स्पर्धेत चांगले प्रदर्शन केले होते परंतु १९९८ उजाडले आणि एका घटनेने तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. १९९८ ला बॅंकॉकला झालेल्या आशियाई स्पर्धेत मणिपुरच्या डिंको सिंगने बॉक्सिंग मध्ये सुवर्णपदक पटकावले आणि त्याचक्षणी मेरी कोमला आपल्या स्वप्नाची दिशा उमगली. इथेच तिने बॉक्सिंगचा ध्यास घेतला, बॉक्सिंग साठी वाट्टेल ते परिश्रम करायची तिने मनोमन गाठ बांधली आणि बॉक्सिंग जगतात एका अनोख्या चॅम्पियनचा उदय झाला.

मैदानात चॅम्पियन असलेल्या मेरीचे अभ्यासात फारसे लक्ष लागत नसायचे परंतु आपले लक्ष्य गाठण्यासाठी शिक्षण सुरू ठेवणे गरजेचे आहे हे लक्षात येताच तिने २००० ला घर सोडून इम्फाळ अकॅडमीत प्रवेश घेतला. पदार्पणातच मेरीने राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा जिंकत सर्वांना आश्र्चर्यचकित केले. जेंव्हा मेरीच्या यशाची बातमी वर्तमानपत्रात छापून आली तेव्हा कुठे तिच्या वडीलांना मेरीच्या पराक्रमाची माहिती मिळाली आणि हळूहळू त्यांचा मेरीच्या बॉक्सिंगला विरोध मावळू लागला होता. दरम्यान दिवसेंदिवस मेरी कोमचा खेळ बहरत होता आणि २००१ ला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत तिने रजतपदक कमावले होते तर २००२ ला याच स्पर्धेत पहिल्यांदाच सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती. स्पर्धेकरिता मेरी कोमला वारंवार देशविदेशात भ्रमण करावे लागत होते आणि अशातच तिची फुटबॉलपटू आणि नॉर्थ ईस्ट विद्यार्थी संघाचा अध्यक्ष असलेल्या ऑनलर कोमशी ओळख झाली.

तसे पाहता २००० सालीच या दोघांची तोंडओळख झाली आणि हळूहळू या मैत्रीचे प्रेमात रुपांतर होऊ लागले होते तसेच दोघांनी लग्नाचा निर्णय पण घेतला होता. मात्र इथे कहाणीत ट्विस्ट येणे बाकी होते. दोघांच्याही घरातून आणि विशेषत: मेरीच्या प्रशिक्षकांचा या लग्नाला कडाडून विरोध होता कारण लग्नामुळे तिच्या बॉक्सिंग कारकिर्दीवर गदा येण्याची शक्यता होती. मात्र *मियां बिबी राजी तो क्या करेगा काझी* अशी स्थिती झाली आणि हे दोघेही २००५ ला लग्नाच्या बेडीत अडकले. लग्नानंतर रशियात झालेल्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवून बॉक्सिंगमधला आपला धडाडा कायम ठेवला आणि २००६ ला पुन्हा एकदा सुवर्णपदकाची कमाई करत बॉक्सिंग तिच्या रक्तात किती भिनलेले आहे याचा पुरावा सादर केला. सोबतच घर आणि बॉक्सिंगची रिंग यात उत्तम ताळमेळ साधत तिची बॉक्सिंगमधली घोडदौड सुरू होती. २००७ ला तिने जुळ्या मुलांना जन्म दिला आणि काही काळाकरीता बाळांच्या संगोपनासाठी बॉक्सिंगमधून ब्रेक घेतला.

यानंतर दोन बाळांची आई असलेल्या मेरी कोमचा बॉक्सिंगचा पुढील प्रवास नक्की कसा असेल याची सर्वांनाच उत्सुकता होती परंतु मातृत्वाला कमजोरी नव्हे तर आव्हान समजत मेरीने २००८, २०१० आणि २०१८ ला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक हस्तगत करत आपल्या टिकाकारांचे तोंड बंद केले. अर्थातच या धावपळीत तिला अनेक कटू प्रसंगांना सामोरे जावे लागले परंतु मेरीच्या जिद्दीपुढे सर्व समस्यांनी हार मानली होती. २०११ ला मेरी चिनमध्ये होणाऱ्या आशिया चषकासाठी तयारी करत होती तर त्याच वेळी तिच्या साडेतिन वर्षांच्या छोट्या बाळाच्या ह्रुदयावर शस्त्रक्रिया करायची होती. इकडे काळजाचा तुकडा आजारी तर तिकडे देशाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर मातृत्वाला  समजवत, तिरंग्यासाठी काळजावर दगड ठेवून मेरीने चिनला जाण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या जबरदस्त खेळाने आशिया चषकात सुवर्णाची कमाई केली. तसेच मेरीने तिसऱ्यांदा जागतिक बॉक्सिंग स्पर्धा जिंकल्यानंतर तिच्या सासऱ्याची हत्या झाली होती मात्र हे सर्व आघात सहन करत ती बॉक्सिंगच्या रिंगणात खंबीरपणे उभी होती.

महिला बॉक्सिंगचा पर्यायवाची शब्द बनलेल्या मेरीची रिंगणातील कामगिरी डोळे दिपवून टाकणारी आहे. जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत ६ विजेतेपद मिळवणारी ती एकमेव खेळाडू आहे, तसेच राष्ट्रकुल आणि आशियाई खेळात सुवर्णपदक मिळवणारी ती एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे. आपल्या आतापर्यंतच्या वाटचालीत एकंदर १३ सुवर्ण, २ रजत तर ३ कांस्यपदकाची कमाई करत मेरी कोमने बॉक्सिंगवर आपले अधिराज्य गाजवले आहे. असे असले तरी मेरीला आॉलिम्पिकमध्ये अजुनही सुवर्णपदक मिळवता आलेले नाही. ५ फुट २ इंच उंचीची मेरी कोम पिन वेट आणि फ्लायवेट गटात स्पर्धा खेळते आणि २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये ती ग्रेट ब्रिटनच्या निकोल एडम्ससोबत झुंजली होती. मात्र साडेपाच फुट उंचीच्या, चपळ आणि मजबूत निकोल्सपुढे मेरीचा निभाव लागला नाही आणि तिला केवळ कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले होते. मात्र अपयशाने खचून न जाता आजही ती २०२० ला अपेक्षित टोकीयो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची आशा बाळगून आहे.

एवढी भरगच्च कामगिरी करणाऱ्या मेरी कोमवर पुरस्कारांची अगदी लयलूट झालेली आहे. २००३ ला अर्जुन पुरस्कार, २००६ ला खेळात प्राविण्यासाठी पद्मश्री, २००९ ला सर्वोच्च खेळ पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, २०१६ ला राज्यसभेचे खासदारपद तर २०२० ला पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे. याशिवाय आणखी दहा प्रतिष्ठित पुरस्कारांची मेरी कोम धनी असून २०१३ ला अनब्रेकेबल हे  तिच्या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले होते. २०१४ ला मेरी कोमच्या जिवनावर आधारित आणि प्रियंका चोप्राची प्रमुख भुमिका असलेला हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता.

बॉक्सिंग रिंगण गाजवत असतांनाच मेरी कोमने रिंगणाबाहेरही आपल्या गुणांची चुणूक दाखवली आहे. तिने मणिपुरला बॉक्सिंग अकॅडमीची स्थापना करून नवोदितांसाठी बॉक्सिंग जगताचे द्वार उघडून दिलेले आहे. तर २००७ ला इंफाळला विमेन्स ओन्ली फाईट क्लब स्थापन करून गरिब मुलींना स्वयंसंरक्षणाचे धडे दिल्या जात आहेत. प्राण्यांसाठी कार्यरत पेटा संस्थेची ती सदस्य असून सर्कसमध्ये प्राण्यांचा छळ आणि शोषणाविरुद्ध विशेषतः हत्तींसाठी तिने अनेकदा आवाज उठवला आहे. खरोखरच मेरी कोमचे आयुष्य आपण सर्वांसाठी निश्र्चितच प्रेरणादायी आहे. घरातून फारसे पाठबळ नसतांनाही ती आपल्या स्वप्नांवर ठाम राहिली. गरिबी, साधनांचा अभाव, राजकारण अशा अडथळ्यांना पार करत तिने बॉक्सिंगच्या जगावर आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरलेले आहे. बॉक्सिंग सारख्या खेळात भविष्य नाही, जोखीम जास्त आहे, दुखापती टाळू शकत नाही अशा एक ना अनेक कारणांना आपल्या धिरोदात्त खेळीने पराभूत करत नवोदितांसाठी एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे. या वाटचालीत तिला अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले मात्र बॉक्सिंगच्या प्रेमाने ती कधीच डगमगली नाही उलट संकटांचा सामना करत आणखी हिमतीने पुढे गेली, त्यामुळेच आज तिने बॉक्सिंगमध्ये अढळपद कमावले आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel