- दीपाली थेटे- राव
आताशा सतत कानावर बातम्या यायला लागल्यात.
या कोरोना लॉकडाऊन संकटानंतर कदाचित आर्थिक संकट येऊ शकते.... लोकांच्या नोकर्या जातील.... आर्थिक मंदी येईल...
बरेचजण धास्तावलेत.
काय करणार? कसं जगणार?
हफ्ते? त्यांचं काय?
प्रश्न... प्रश्न... आणि प्रश्न च समोर आहेत.
लोकहो,
'चिंता' चितेपेक्षा जास्त वेगाने जाळते.
आपण सर्वच या आर्थिक संकटाचे बळी होऊ शकतो... कदाचित नाही ही... .
मग यासाठी चिंता करण्यापलिकडे आणखी काय करू शकतो?
मी कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू मांडणार नाहीये इथे.
पण सरकारने मदत करावी म्हणजे नक्की काय करावे ? आणि किती जणांना?
याचा अंदाज आहे का? आणि सरकार म्हणजे शेवटी कोण हो? आपणच की सगळे.
कोणतेही सरकार कुठे आणि किती जणांना पुरे पडू शकेल?.....
मग अशा वेळी फक्त आणि फक्त स्वत:च्या मनाचे ऐकायचे आणि योग्य अयोग्य ठरवायचे...
बघा कदाचित मला जो मार्ग सुचतो आहे तो पटतोय का तुम्हाला....
कोणाला कधी जाणवलं आहे...
बऱ्याच वर्षांच्या काळात...
छोटी मोठी लाकडी सामानाची डागडुजी करणारे कारागीर.....काही छोट्या घरगुती इलेक्ट्रिक उपकरणांची दुरुस्ती अथवा वायरिंग मधील बिघाड दुरुस्त करणारे वायरमन... ...घरातील नळ किंवा पाईप लिक झाल्यानंतर दुरुस्तीसाठी लागणारे प्लंबर.....तुटलेली चप्पल शिवणारे चांभार... छत्र्या रिपेअर करणारे.....मातीच्या किंवा लाकडाच्या शोभेच्या वस्तू तयार करून विकणारे....दररोज देवाला लागणाऱ्या फुलांचा फुलपुडा घरोघरी पोहोचवणारे... अनेकांच्या घरी ज्येष्ठ मंडळी आजारी असताना डेली बेसिस वर त्यांच्या बरोबर राहण्याची जबाबदारी घेणारे... जुन्या वह्यांच्या कोर् या पानांना बाईंडींग करून नवी वही बनविणारे... खूप मोठी यादी तयार होईल....
अशी अनेक लोकं, कामं या युज अँड थ्रो च्या जमान्यात लोप पावली.
मग ही अशी कितीतरी कामं पेंडिंग राहिली किंवा अतिरिक्त खर्च देऊन दुरुस्ती होऊ लागली. कधी-कधी तर एखादी गोष्ट दुरुस्तीसाठी इतका पैसा लागतो की असं वाटतं त्यापेक्षा नवीन घेणे सोपे होईल... मग कल नवनविन गोष्टी विकत घेण्याकडे वाढू लागला
आत्ताच हे सांगायचं काय कारण?
मित्र-मैत्रिणींनो अशी कितीतरी विस्मृतीत गेलेली कामं पुन्हा नव्याने चालू करू शकतो, ज्यायोगे छोटंसं का होईना पण अर्थार्जनाचं साधन सापडेल. एखादा आशेचा किरण हाती येईल.
या सगळ्या गोष्टींसाठी सगळ्यांनी शहरांकडे धाव घेण्याची गरज नाही..
गावांमध्ये राहूनही बरेच छोटे छोटे उद्योग चालू करता येतील.
या परिस्थितीमुळे आतापर्यंत माझ्याप्रमाणेच कितीतरी जणांचे 'आदर्श ' बदलले असतील... आधीच्यांची जागा आता पोलीस, मिलिटरीमन, अत्यावश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणारे... सफाई कामगार, अन्नधान्य-भाजी पुरविणारे...अशांनी घेतली असेल. या अनेक सेवांच्या प्रवेश संधीही उपलब्ध होऊ शकतील.
एखादा इंजिनियर असेल...त्याला वाटेल माझी नोकरी गेली पण छोटी छोटी फालतू काम करण्यासाठी का मी एवढं शिक्षण घेतलं? मग त्या शिक्षणाचा काय उपयोग?
लोकहो! शिक्षण कधीच वाया जात नसतं.
एक हाडाचा इंजिनियर जे काम करेल, त्यामध्ये काहीतरी नाविन्य घडवून आणण्याची.... काहीतरी सृजनात्मक बदल करण्याची ताकद ठेवतो. इंजिनियरिंग म्हणजे नवनिर्मिती.
जे असेल ते अजून चांगले कसे करता येईल याचा विचार
यासाठी छोटस उदाहरण देते.
लॉकडाऊनच्या काळातच नेमका माझ्या घरी बेसिनचा आऊटलेट पाईप लिक झाला.
आता नविन कसा बसवणार? मग पाईप ओपन केला आणि सुचलेली आईडिया म्हणजे.. दुधी भोपळा विकत घेताना तो ज्या लांबड्या प्लॅस्टिक पिशवीतून मिळतो ती त्या पाईप मधे आतून लावली.
लिकेज तात्पुरते का होईना बंद आहे. परिस्थिती निवळल्यावर पाईप बदलता येईलही पण आत्ताच्या घडीला मार्ग सापडला.... हेच कदाचित इंजिनिअरिंग..
कसलीही असू दे. छोटी का होईना पण नवी संकल्पना आणि त्यातून प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न....
असच बाकीच्या क्षेत्रांना ही लागू पडू शकते....
म्हणूनच म्हणते...खचून जाण्याऐवजी ठामपणे उभं राहून परिस्थितीशी दोन हात कसे करता येतील ते बघायला हवे.
मान्य आहे आपल्या जगण्याचा स्तर थोडा खालावेल...पण ही परिस्थिती सगळ्या जगात आहे.
फक्त भारतातच आहे असं नाही.
सर्वदूर सगळेचजण यातून सफर होणार आहेत...मग रडण्यात काय अर्थ आहे.
जातील....हेही दिवस जातील.
आज प्रत्येक जण धावतोय जीव घेऊन. कुठल्याशा अमर्याद वेगाने...
अंत माहीत नसलेल्या अजाण स्पर्धेत...
या स्पर्धेची सांगता रेषा माहित नाही. याला काही नियम नाही. याबद्दलची कोणतीच कल्पना कोणालाही नाही. फक्त प्रत्येक जण पळतो आहे कारण दुसरा पळतो आहे.
मग यामुळे येणारी निराशा, ताण...
तो ताण असह्य झाल्यावर स्वतःशीच सुरू होणारा जीवघेणा संघर्ष....
का करतो आहे आपण हे सगळं? का धावतो आहे उगाच? कोणत्या अज्ञात सुखाच्या मागे पळतोय?
जसजसं पुढे पुढे जातो आहे तसतसं सुखाच्या संकल्पना पण बदलत चालल्यात.आजच्या काळात आपण आपल्या सुखाला पैसा,वस्तू आणि काही फॉरेन टूर यामध्ये बांधून टाकलंय. एक स्पर्धाच जणू सुरू केलीये...इतरांशी आणि स्वतःशीही..
बरोबरीच्या कोणी अँड्रॉइड घेतला की आपण आयफोन घेणार. कोणी फ्रिज घेतला की आपण त्याहून मोठा घेण्यासाठी धडपडणार. याच्याकडे मोठा बंगला आहे, माझ्याकडेही असला पाहिजे. अशीच कार, तसेच महागड्या हॉटेलमध्ये जेवण...सारं सारं काही मिळवायचं पण कशासाठी? तेही भलेमोठे हफ्ते भरून?
फक्त या वेड्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी?
आणि स्पर्धा तरी कोणाशी?
आपणच ठरवतोय मनात आणि दुसऱ्याशी स्पर्धा करतोय.
गमावतोय आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपला आनंद...
आनंद कशातही मिळतो हो.....उन्हातुन चालताना दाट गुलमोहराच्या सावलीत, घशाला कोरड पडली असताना मिळणाऱ्या थंडगार पाण्यात, एखाद्या गोष्टीत छोटंसं यश मिळालं तरीही तो आनंद सापडतो आई वडिलांच्या डोळ्यात..बायकोच्या प्रेमात..आणि मुलांच्या मिठीत..
आताच्या परिस्थितीत घरच्यांच्याबरोबर वेळ घालवण्यात....
आजकाल हे सगळं आपण हरवून टाकलं आहे. आपण घड्याळाच्या मागे पळतोय अन आपल्याबरोबर फरफटतयं ते आपलं घर..
खूप पैसा कमावून सुद्धा सुख नाही. त्याचा उपभोग घेण्याइतका वेळ नाही. आणि ज्यांच्यासाठी कमावतो आहे त्यांच्यासाठी तरी वेळ आहे का आपल्याला?
मग त्यांना त्या पैशांची सवय लागते आणि हो तुमच्या नसण्याची सुद्धा...
या सगळ्यातून निर्माण होतात बीपी, डायबेटिस सारखे आजार, तेही कमी वयात अन् मग गोळ्या घेत घेत पस्तिशी तच माणसं ' साठीत ' असल्यासारखी दिसू लागतात.
ज्यांच्या साठी आपण करतो आहे हे सगळं ती आपली पुढची पिढी एकटेपणामुळे मोबाईल मध्ये रमते आहे, व्हर्च्युअल जगात स्वतःला हरवून टाकते आहे.
नोकरी गेली तर कदाचित हप्ते बरणं कठीण होईल... पण मग नाही मिळालं खूप मोठं घर, नाही मिळाली मोठी गाडी, खूप सुखसोयींनी समृद्ध असलेली एखादी ट्रिप तरी काही बिघडत नाही हो आयुष्यात.. जगणं थांबत नसतं....
आपल्याला काय हवयं हे नेमकं जाणवून त्यासाठी उपाययोजना करणं हे फार थोड्या लोकांना जमतं.
या कोरोना संकटामुळे का होईना
माझ्या आयुष्याची किंमत मला समजली आहे...
माझ्या खर्याखुर्या गरजा.. निकड.. यांचाही साधारण अंदाज आलाच आहे की आताशा.....
स्पर्धा, टेक्नॉलॉजी.....या सगळ्या गोष्टी आपल्याला उन्नत करतात हो..त्याचबरोबर देशालाही समृद्ध आणि संपन्न करतात.
पण या गोष्टींमुळे तर माणसाची हानी होत असेल तर तो देश संपन्न कसा होईल? एक समृद्ध देश बनतो तो त्यात राहणाऱ्या समृद्ध, उन्नत, परिपूर्ण,आरोग्यदायी आणि विवेकी माणसांमुळे...
चला तर मग मित्र-मैत्रिणींनो आपण आता सुरुवात करायलाच हवी.स्वतःला आणि देशालाही आरोग्यसंपन्न आणि सुखी ठेवण्याची...
बरोबर आहे तुमचं...
तुम्ही म्हणाल..बोलणं सोप्पय हो!
करणं आणि निभावणं फार कठीण असतं.
पण मग मला वाटतं परिस्थितीने गांजून जाण्यापेक्षा दोन हात करणं जास्त संयुक्तिक ठरेल. आणखी पर्याय आहे का काही?
जेव्हा जीवावर बेततं तेव्हा शेवटच्या श्वासापर्यंत आपण लढत राहतो...
मग या जगण्याच्या लढाईत अशी हार का पत्करायची?
एकत्रितपणे या ही संकटाचा सामना करायचा.
एक पॉझिटिव्ह विचार सतत मनात बिंबवत ठेवायचा... सगळ्या गोष्टींवरचा एक रामबाण उपाय आहे... "काळ"
काळ बदलेल अन् जग पूर्वीपेक्षा जास्त सुखाने श्वास घेईल.
मी जगणार... ..
जसं जमेल तसं... ... शर्थीने... नेटाने.....
पण लढण्याआधी शस्त्र खाली टाकणार नाही कारण हार आधी मनात होते मग रणांगणात.
मी मनाला हारू च देणार नाही
माझा विश्वास आहे...
या जगात एक शक्ति अस्तित्वात आहे...
कोणी तिला भगवंत.. कोणी अल्लाह.. तर कोणी जिजस.. कोणी आणखी काही म्हणतं... .
पण प्रत्येकाकडे ही विश्वासाच्या आधारावर जग बदलून टाकणारी जादूची कांडी आहेच... मग मी ही तिच फिरवणार.....