भारतात दीर्घकाळापासून होतं असलेल्या परकीय आक्रमणांमुळे भूतकाळात आणि आजतागायत स्वकियांकडून आपल्यावर झालेल्या सेक्युलरिझमच्या प्रयोगामुळे वर्तमान काळात आपण आत्मविस्मृतीच्या दरीत अधिकाधिक खोलवर जात आहोत. या आत्मविस्मृतीमुळे आपण फक्त नावापुरते हिंदू राहिलो आहोत. आज हिंदूंना आपल्या हिंदुत्वाची म्हणजेच भारतीयांना भारतीयत्वाची ओळख नाही हीच आपल्या राष्ट्रासमोरील मोठी समस्या आहे. हिंदुस्थान 'हिंदू राष्ट्र' आहे की नाही याचाही अजून जनमानसात संभ्रम आहे. बहुसंख्य भारतीय आपली प्राचीन हिंदू संस्कृतीच विसरून गेलेले आहेत. आपल्या देशावर सत्ता गाजवण्यासाठी पूर्वापार विदेशी आक्रमक येत राहिले, आपल्या देशातील प्राचीन शास्त्रांचा, विद्यांचा, तंत्रज्ञाचा स्वतःच्या विकासासाठी उपयोग करून, आपल्या साधन संपत्तीची लूटमार करुन, आपल्याला दारिद्र्यात टाकून स्वतः मात्र आपल्या साधन-सामग्रीचा उपभोग करु लागले, आपले साम्राज्य वाढवता-वाढवता आपल्या जीवावर मोठे होऊन आपल्याविरुद्धच षड्यंत्र रचू लागले, त्यांचा धर्म, त्यांचे विचार, त्यांची संस्कृती आपल्यावर लादू लागले, या-ना त्या कारणाने आपल्यावर अन्याय-अत्याचार करू लागले. आपल्या भोळेपणाचा फायदा उचलून, एकात्मतेत मानवता पहाणारी, सर्वांच्या सुखाचा विचार करायला शिकवणारी, सर्वांना सामावून घेणारी हिंदू संस्कृती विसरायला लावून, आपल्यात मत-भेद निर्माण करुन, आपल्याच देशात आपल्यालाच गुलाम बनवून आपल्यावर सत्ता गाजवत राहिले. इतके सर्व होऊन सुद्धा पूर्वजांच्या पुण्याईने आजही आपली सनातन संस्कृती टिकून आहे. परंतु परकीय आक्रमकांच्या प्रभावामुळे काळाच्या ओघात तिच्यात काही दोष निर्माण झाले हे देखील तितकेच खरे!
आज बहुसंख्य भारतीय समाजावर पाश्चिमात्य विचारांचा प्रभाव दिसतो. त्याचे कारण आत्मविस्मृत हिंदू समाज! आपला गौरवशाली इतिहास माहित नसल्याने पर्यायाने भविष्याकडे बघण्याची दृष्टी हरवल्याने वर्तमानातील संभ्रमित भारतीय, पाश्चिमात्य संस्कृतीकडे आकर्षित होत आहेत. काळानुसार बदलत्या जीवनशैलीमुळे समाजाची खाजगी जीवनातील व्यस्तता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. व्यक्तीक स्वार्थ डोळ्यासमोर असल्याने सामाज हिताचा विचार मागे पडू लागला आहे. व्यक्तिगत स्वार्थाने ग्रासलेल्या ध्येयहीन, दिशाहीन, सामर्थ्यहीन, असंघटित हिंदूं समाजाला आजही 'आसिंधुसिंधुपर्यंता यस्य भारतभूमिका पितृभू: पुण्यभूश्वैव स वै हिंदुरितिस्मृत:' याचा अर्थ लक्षात आलेला नाही. राष्ट्राला एक सूत्रात बांधून ठेवणाऱ्या आपल्या राष्ट्रीयत्वाचा आधार असलेल्या हिंदुत्वाचा हिंदू समाजाला विसर पडला आहे. म्हणूनच समाजाचे व पर्यायाने राष्ट्राचे पतन थांबवण्यासाठी या आत्मविस्मृत समाजास अज्ञानाच्या निद्रेतून बाहेर काढले पाहीजे. राष्ट्राचे राष्ट्रीयत्व टिकवून ठेवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी केलेल्या संघर्षाचा, त्याग-तपस्येचा गौरवशाली इतिहास समाजाच्या नजरेसमोर आणला गेला पाहिजे. त्याशिवाय हिंदूंना खऱ्या अर्थाने आपल्या पराक्रमाची, पुरुषार्थाची जाणीवच होऊ शकत नाही!
जगात भारताची ओळख भारताच्या आध्यात्मिकतेमुळे पर्यायाने हिंदू संस्कृती-तत्वज्ञानामुळे आहे. आपले अध्यात्म 'एकम् सत् विप्रा बहुधा वदन्ति' अर्थात एकाच सत्याला शोधण्याचे भिन्न मार्ग असतात हे मानते. म्हणूनच भारतीयांनी कधीही कोणाच्या धर्मावर, संस्कृतीवर आक्रमण केले नाही की आपला धर्म, आपला ईश्वर इतरांवर लादण्याचा प्रयत्न केला नाही. याउलट भारताबाहेरील इतर धर्म-संस्कृतीच्या अनुयायांनी केवळ आमचे तेच सत्य मानून स्वतःच्या धर्माचा-संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी इतर धर्म-संस्कृतीवर हल्ले चढवले. याउलट भारतीय तत्वज्ञानाने, चराचरात ईश्वराचे अस्तित्व मानून विविधतेतील एकता स्वीकारल्यामुळे भारतीयांना कधीच इतरांचे मत बदलण्याची, बळाने वा प्रेमाने धर्मपरिवर्तन करण्याची आवश्यकताच वाटली नाही. ईश्वर प्राप्तीच्या मार्गावर, वर-वर पहाता कितीही भिन्नता असली, तरी सर्वांच्या मुळात एकच सत्य विद्यमान आहे; त्यामुळे माझे सत्य तेच सत्य असा आग्रह भारतीय संस्कृतीत आढळत नाही. भारतीय संस्कृतीने नेहमीच समस्त विश्वाच्या कल्याणाची मंगल कामना केलेली आहे. परंतु केवळ अशी कामना करून समाजाचे हित होत नसते. त्यासाठी तसे कर्मही करावे लागतात. आपल्या पूर्वजांनी या मंगल कामनेला कर्तृत्वाची जोड देऊन आपल्या पूर्वजांनी मानवजातीला, स्वतःच्या आचरणातून धर्माचरण शिकविले. हे धर्माचरण म्हणजेच सत्याचरण! म्हणूनच 'हिंदू' ही धर्मावर आधारित जीवनपद्धती असल्याने आपण त्यास धर्म देखील म्हणतो. या धर्माच्या रक्षणकर्त्या आपल्या पूर्वजांनी, परकीय आक्रमकांनी निर्माण केलेल्या संघर्षमय परिस्थितीवर मात करून, जगातील सर्वांत प्राचीन संस्कृतीचा अमूल्य वारसा आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. तेव्हा एक हिंदू म्हणून फक्त स्वतःच्या नव्हे, तर सकल मानव जातीस कल्याणकारी असलेल्या हिंदू संस्कृतीची मूळ तत्वे समजून घेऊन त्यानुसार कालसुसंगत आचरण करणे आपले कर्तव्य ठरते. ज्यावेळी आपल्याला आपण हिंदू आहोत, म्हणजे नेमके काय आहोत? याचा अर्थबोध होतो, त्यावेळी आपण फक्त स्वतः पुरता मर्यादित विचार करणे सोडून आपल्या पूर्वजांनी दाखवलेल्या मार्गानुसार सकल मानव जातीच्या हिताचा विचार आपोआपच करू लागतो. त्यामुळे ज्यावेळी आत्मविस्मृत हिंदू समाजात चेतना जागृत होईल त्यावेळी आपोआपच सकल विश्वाच्या कल्याणाचा मार्ग प्रशस्त होईल.
आज भारतातील, आत्मविस्मृतीने ग्रासलेल्या समाजाला जागृत करून, जात-पात, भाषा-प्रांत, पंथ-संप्रदाय असे सर्व भेद मिटवून खऱ्या अर्थाने सुसंघटीत हिंदू समाजाची निर्मिती करणे राष्ट्रहितासाठी आवश्यक आहे. हिंदुत्व हा समाजातील सर्व भेद नाहिसे करून राष्ट्राला एकात्म ठेवणारा समान धागा आहे. यासाठीच हिंदूंचे संघटन महत्त्वाचे! नानाविध कारणांमुळे, स्वतःच्या मूळ अस्तित्वाचा बोध नसल्यामुळे एकमेकांत भेद-भाव करणाऱ्या असंघटित असलेल्या हिंदु समाजाला दिर्घ काळ पारतंत्र्यात राहून आपल्या चुकांचे प्रायश्चित्त करावे लागले. या इतिहासापासून आपण बोध घेऊ शकलो नाही, तर सेक्युलरिझम सारख्या भ्रामक संकल्पनेच्या जाळ्यात अडकून, शरीराने स्वतंत्र असूनही मानसिक पारतंत्र्यात आयुष्यभर खितपत राहू. या पारतंत्र्याचे वर्तमान काळातील दुर्दैवी उदाहरण म्हणजे भारतातील मुस्लिम व ख्रिस्ती धर्मिय! जन्मापासून झालेल्या धार्मिक संस्कारांमुळे, आजच्या भारतातील मुस्लिम व ख्रिस्ती धर्मियांचे पूर्वज हिंदूच होते; हे इतिहासातुन स्पष्ट होत असले तरी देखील आपल्या धर्माप्रति कट्टर असल्यामुळे मुस्लिम व ख्रिस्ती धर्मीय या सत्याचा स्वीकार करायला तयार होत नाहीत. या धर्मांध कट्टर पंथीयांच्या डोळ्यावरील कट्टरतेची पट्टी गळून पडल्या शिवाय जगात शांतता नांदूच शकत नाही. म्हणूनच विश्व मंगलासासाठी, मानव जातीस परम कल्याणकारी असलेल्या हिंदू संस्कृतिवाचून पर्याय नाही!
सेक्युलरिझमच्या प्रयोगाच्या प्रभावामुळे भ्रमित होऊन, आत्मतेज गमावून मेंढराप्रमाणे जीवन जगणाऱ्या हिंदूंनी स्वत:च्या मूळ अस्तित्वाचा बोध करून घेऊन आपल्यातील हिंदू चेतना जागृत करून जगाला आपल्या तेजस्वितेचा परिचय करून द्यावा. आपल्या पूर्वजांनी दाखवलेल्या मार्गावर स्वत: चालून, दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥ या उक्तीप्रमाणे धर्माचरण करून मानवजातीला परोपकाराने कृतकृत्य करावे!