सध्याच्या इस्रायल देशातील पॅलेस्टाईन या ठिकाणी ख्रिस्ती धर्मसंस्थापक येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांपैकीं १२ शिष्यांना ख्रिस्ती धर्माचा प्रचार करून, जे लोकं ख्रिस्ती धर्माच्या शिकवणीवर विश्वास ठेवतील त्यांना बाप्तिस्मा देऊन ख्रिस्ती बनवण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार ख्रिस्ती धर्माचा प्रचार व त्यातून इतर धर्मियांचे धर्मपरिवर्तन करणाऱ्या ख्रिस्ती मिशनऱ्यांनी संपूर्ण जगभरात ख्रिस्ती धर्म पसरविला. १४९८ मध्ये वास्को-द-गामा हा पोर्तुगीज खलाशी व्यापाराच्या निमित्ताने भारतात आल्यानंतर. १५१० मध्ये गोवा हे आपले राज्य स्थापन करून ख्रिस्ती मिशनऱ्यांनी तेथील हिंदूंचे धर्मांतरण करण्यास सुरुवात केली. हिंदूंना धर्मांतरित करण्यासाठी या मिशनऱ्यांनी हिंदूंची मंदिरे तोडली, निरपराध हिंदूंची हत्या केली, लहान मुलांना देखील सोडले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी, हिंदूंवर होणारे हे अत्याचार रोखण्यासाठी मोलाचे कार्य केले आहे. 'यापुढे हिंदूंवरील अत्याचार सहन केले जाणार नाहीत!' हा संदेश पोर्तुगीजांना देण्यासाठी शिवाजी महाराजांनी, चार पाद्र्यांची मुंडकी उडवली होती. त्याचप्रमाणे यापुढे हिंदूंचे बळजबरीने धर्मांतरण केले जाऊ नये याकरिता कडक निर्बंध घातले होते. त्यानंतर पेशवाईच्या शेवटानंतर, भारतात इंग्रजांचे साम्राज्य स्थापन झाल्याने, ख्रिस्ती मिशनऱ्यांनी भारतात मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती धर्माचा प्रसार केला.
१८१३ मध्ये इंग्रजांनी भारतात सनदी कायदा करून ख्रिस्ती मिशनऱ्यांना पाश्चिमात्य विचारांचा व ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्याची परवानगी दिली. सुरुवातीच्या काळात ख्रिस्ती मिशनऱ्यांनी स्वतःच्या शाळा सुरू करून त्याद्वारे धर्मप्रसार करण्यास सुरुवात केली. १८१५ मध्ये मुंबई येथे हिंदू मुलांना शिक्षण देण्यासाठी अमेरिकन मिशनऱ्यांनी शाळा सुरू केली. त्याचबरोबर कोकणातील हर्णे, बाणकोट या ठिकाणी देखील मिशनऱ्यांनी आपल्या शाळा सुरू केल्या. या शाळांच्या माध्यमातून भारतीयांच्या मनात ख्रिस्ती धर्माविषयी आपुलकी व प्रेम निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. १८१३ मध्ये अमेरिकन मिशनने ख्रिस्ती धर्माचा पुस्तकांमार्फत प्रसार करण्यासाठी, मुंबईतील भेंडी बाजार येथे प्रिंटिंग प्रेस सुरू केली. त्याचप्रमाणे हर्णे, बाणकोट या ठिकाणी लिथ्रो प्रेस सुरू केली. या प्रिंटिंग प्रेस मध्ये ख्रिस्ती साहित्य मराठी, गुजराती भाषांमध्ये छापले जाऊ लागले. हे साहित्य मिशनरी जागो-जागी हिंडून वाटू लागले. त्याचप्रमाणे घरोघरी जाऊन ख्रिस्ती धर्माची तत्वे लोकांच्या मनावर बिंबवू लागले. ख्रिस्ती धर्मप्रसार वेगाने व्हावा याकरिता १८५० मध्ये विशेष कायदा करण्यात आला. या कायद्यानुसार ख्रिस्ती धर्म स्वीकारणाऱ्या भारतीयांना त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेचा अधिकार दिला जाणार होता. १८३४ मध्ये लॉर्ड मेकॉलेची भारताच्या गव्हर्नर जनरल कौन्सिलच्या कायदेविषयक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. या मेकॉलेने भारतातील गुरुकुल शिक्षण पद्धतीचा आणि तिचा भारतीयांच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा सखोल अभ्यास केला. या अभ्यासाअंती त्याने भारतीयांवर दीर्घकाळ सत्ता गाजवण्यासाठी 'भारतीय संस्कृतीचा कणा असलेली गुरुकुल शिक्षण पद्धती संपवली पाहिजे!' हे विचार ब्रिटिश संसदेत मांडले होते. मेकॉलेनी भारतातील गुरुकुल शिक्षण पद्धती संपवून, भारतीयांना त्यांच्या गुलामगिरीत ठेवून दीर्घकाळ शासन करण्यासाठी पाश्चिमात्य शिक्षण पद्धती भारतात राबवली. या शिक्षण पद्धतीतून इंग्रजांना त्यांचे सरकार चालविण्यासाठी अपेक्षित असा फक्त कारकुनी करणारा नोकरवर्ग तयार करता आला. इंग्रजांच्या शिक्षण पध्दतीतुन शिक्षण घेतलेल्या तथाकथित सुशिक्षित वर्गावर पाश्चिमात्य विचारांचा पगडा बसवण्यात इंग्रजांना यश आल्याने, या काळात अनेक हिंदूंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. याच काळात समाजसुधारणेच्या नावाखाली ख्रिस्ती मिशनऱ्यांनी हिंदू धर्मावर टीका करून हिंदूंच्या धार्मिक बाबींमध्ये ढवळाढवळ करण्यास सुरुवात केली. सनातन धर्म, भारतीय संस्कृती कशी वाईट? मागासलेली? हे भारतीयांच्या मनावर बिंबवण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यामुळे पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीने प्रभावित झालेल्या भारतीयांमध्ये न्यूनगंडाची भावना वाढीस लागली. परिणामस्वरूप 'आपले ते सर्व वाईट, पाश्चिमात्त्य ते सर्व चांगले' अशाप्रकारची मनोवृत्ती तथाकथित सुशिक्षित भारतीयांमध्ये विकसित होऊ लागली. भारताला गुलामगिरीत खितपत ठेवण्यासाठी इंग्रजांनी रचलेल्या षड्यंत्राच्या जाळ्यात भारतीय अडकू लागले.
परकीय देशातून व्यापाराच्या निमित्ताने साम्राज्यवादी धोरण डोळ्यासमोर ठेऊन आलेले इंग्रज शिक्षणाच्या माध्यमातून ख्रिस्ती धर्माचा प्रसार करून भारतीय संस्कृती विकृत करण्याचे कुटील कारस्थान करत आहेत, ही बाब फक्त त्यावेळेस नव्हे तर आजही पाश्चिमात्त्य विचारांनी प्रभावित झाल्यामुळे, आत्महीनतेने ग्रासलेल्या समाजाच्या ध्यानीमनी आलेली नाही. या विचारांचा प्रभाव तथाकथित पुरोगामी मंडळींवर इतका खोलवर झालेला आहे की, त्यांना पाश्चिमात्त्य तत्वज्ञान म्हणजेच काय ते पुढारलेले असे वाटते. परंतु या तथाकथित पुरोगामी मंडळींना कधीही तटस्थ दृष्टीने भारतीय तत्वज्ञानाकडे पहाता आले नाही की जे बुद्धीला पटणारे नाही त्याची चिकित्सा करता आली नाही. याउलट या मंडळींनी पाश्चिमात्य विचारांना जसेच्या तसे स्वीकारून स्वतःचा मूळ स्वभावच गमावला आहे. अर्थात इंग्रजांना देखील हेच हवे होते! असे झाल्याशिवाय भारतीयांनी त्यांचा ख्रिस्ती धर्म स्वीकारला नसता किंवा त्याचे गोडवे गायले नसते. ज्याप्रमाणे इंग्रजांना हिंदू समाजातील, चाली-रीती, त्यामागचे विज्ञान न समजून घेता, काळाच्या ओघात आलेल्या कुरितींची चिकित्सा करण्यापेक्षा त्यांना कालबाह्य व निकृष्ट ठरवण्यातच जास्त रस होता. त्याप्रमाणे आजही पाश्चिमात्य विचारांच्या जाळ्यात अडकलेल्या तथाकथित भारतीय पुरोगामी मंडळींना फक्त आणि फक्त हिंदू समाजातील दोष शोधून काढण्यात धन्यता वाटते. याउलट या मंडळींनी चिकित्सक बुद्धीने हिंदू समाजातील दोष दूर करण्यासाठी प्रयत्न केले असते, तर सकल हिंदू समाजाचे भले झाले असते. या बाबतीत आजची स्थिती फार काही वेगळी नाही. स्वातंत्र्य प्राप्तीच्या ७० वर्षांनंतरही हिंदू समाजपुढील समस्या त्याच स्वरूपातील आहेत. आजही आपल्या देशात मेकॉले प्रणित शिक्षण पद्धती, नैतिकताहीन पाश्चिमात्त्य विचार, पाश्चिमात्त्य विचारांवर आधारित शासन प्रणाली राबवली जात आहे. इतकेच नव्हे तर देशातील राज्यांच्या स्थानिक भाषेत शिक्षण देण्याऱ्या शाळा बंद पडत जाऊन त्याजागी ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या कॉन्व्हेंट शाळा जागो-जागी दिसू लागल्या आहेत. या शाळांमधून शिक्षण घेतलेल्या बहुसंख्य भारतीयांना भारतीय संस्कृती, सनातन धर्माचा बोधच नसतो. या शाळांमध्ये जाऊन ते पाश्चिमात्त्य विचारांना आपले मानू लागतात उदा. अज्ञानापोटी भारतीय सण-उत्सवांकडे पाठ फिरवून फ्रेंडशिप डे, वलेन्टाईन डे, साजरे करणे. ख्रिसमस साजरा करणे वैगैरे-वैगैरे. अलीकडे अशाप्रकारचे आचरण करणे मॉर्डन असण्याचे लक्षण समजले जाते. भारतीय संस्कृती समजून न घेता 'आम्ही पुढारलेलो आहोत' या अविर्भावातून पाश्चिमात्यांचे सण साजरे करणे त्यांच्या संकल्पनांना आपलेसे मानणे हे भारतीय संस्कृती समजून घेतल्यावर, वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण असल्याचे लक्षात येईल. परंतु आपल्याकडे हे सर्व करायला वेळ कुठे आहे? अनेकांनी स्वीकारल्यामुळे आज देशात जे काही चालले आहे ते चांगले चालले आहे; अशी स्वतःच्या मनाची समजूत करून घ्यायची आपल्याला सवय लागली आहे. या सवयीमुळेच आपण ख्रिस्ती किंवा मुस्लिम अशा इतर धर्मियांना आपल्याप्रमाणे समजतो. परंतु त्यामागील वास्तव फारच वेगळे आहे. परदेशातुन आलेल्या या परकीय धर्मांची शिकवण सनातन धर्माप्रमाणे सहिष्णू नाही. तर ती फक्त आणि फक्त स्वतःच्याच तत्वज्ञानाचा उदो-उदो करणारी असून. धर्मांतरणाला खतपाणी देणारी आहे. त्यासाठी या परकीय धर्मांच्या अनुयायांची वाटेल त्या थराला जायची तयारी असते. म्हणूनच ते जगभरात आपापले धर्म पसरविण्यात यशस्वी झाले. याउलट सनातन धर्माला मानणाऱ्या आपल्या पूर्वजांनी तसे कधीही केले नाही. आपल्यालाही तसे काही करण्याची गरज नाही. इतरांना धर्मांतरित करून आपला धर्म वाढवणे हा आपल्या राष्ट्राचा स्वभावच नाही. परंतु बाहेरून आलेल्या आक्रमणकारी इतर धर्मियांना तसे करण्यापासून रोखणे ही देखील एक भारतीय आणि सनातनी म्हणून आपलीच जबाबदारी आहे.