भारताच्या इतिहासात डोकावून पाहिले असता आपणास अनेक राजांची गौरवशाली कारकीर्द दिसून येते. त्यात सम्राट अशोक यांचे नाव प्राधान्याने घ्यावे लागेल. एक चक्रवर्ती सम्राट , कुशल राज्यकर्ता आणि उत्तरार्धात अहिंसेचा पुरस्कर्ता असे चित्रण असलेला सम्राट अशोक एक महान राज्यकर्ता होता.
    सम्राट अशोक म्हणजेच चंद्रगुप्त मौर्य यांचे नातू. राजा बिंबिसारचा मुलगा.  लहानपणापासूनच त्यांच्यात सेनानीची गुण पावलोपावली दिसून येत होते. परंतु सम्राट अशोक बिंबिसारा चे ज्येष्ठ पुत्र नव्हते,  त्यामुळे कुणी विचारही केला नसेल की पुढे जाऊन अशोक भारताचा चक्रवर्ती सम्राट बनेल . परंतु ज्याच्या दैवी जे असते त्यानुसारच पुढे घटना घडतात.
     बिंबिसाराचा ज्येष्ठ पुत्र सुसीम अशोकास नेहमीच पाण्यात पाहत असे. कारण अशोकात सेनानी होण्याचे सर्व गुण होते. बिंबिसाराने एकदा अशोकास अवंतीचा उठाव मोडून काढण्यास पाठवले,  तेव्हा अशोकाने तो उठाव मोडून काढला. त्यामुळे त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. नंतर सुसीमने बिंबिसाराच्या मनात अशोकाविरूद्ध विष कालवले, ज्यामुळे बिंबिसाराने अशोकास अज्ञातवास स्वीकारायची आज्ञा दिली. अशोक अज्ञातवासात राहिले.
  बिंबिसाराच्या निधनानंतर अशोकाला मारण्यासाठी सुसीमने प्रयत्न चालू केले. प्राणघातक हल्ले झाले , यात अशोकाची आई मरण पावली. त्यामुळे चिडलेल्या अशोकाने पाटलीपुत्रवर हल्ला केला. त्यात त्याने सर्व भावांची कत्तल केली आणि पाटलीपुत्र जिंकून घेतले. अशोक आता मौर्य साम्राज्याचा सम्राट बनला होता . त्याने एक एक करून सर्व प्रदेश जिंकायला सुरुवात केली . त्यामुळे लोक त्याला चंड-अशोक असे म्हणू लागले.
      राज्यारोहण झाल्यावर अशोकाने बरेच प्रांत आपल्या राज्याला जोडले,  तेही केवळ आठ वर्षात. मौर्य साम्राज्याचा विस्तार पूर्वेस ब्रम्हदेशाच्या सीमेपर्यंत तर पश्चिमेकडे बलुचिस्तान-इराणच्या सीमेपर्यंत, उत्तरेस अफगाणिस्तान व दक्षिणेस केरळ पर्यंत वाढवला. जवळपास सर्व भारत त्याने एका साम्राज्याच्या छायेत आणला व आपली एकछत्री सत्ता लागू केली. 
      त्यानंतर आला अशोकाच्या आयुष्याला किंबहुना इतिहासाला कलाटणी देणारा प्रसंग.... कलिंगचे युद्ध.. अशोकाची प्रतिमा आता युद्धखोर बनली होती. अशातच त्याने कलिंग देशावर स्वारी केली. प्रचंड नरसंहार झाला . त्यात जवळपास एक लाख लोक मारले गेले . अशोकाने विजय मिळवला. अशोकाने ते पाहिले आणि त्याचे मन द्रवले. त्यास घृणा वाटू लागली.
     सर्वत्र पडलेले प्रेतांचे ठीक , ओसाड पडलेली घरे,  गावे , मेलेली जनावरे हे सगळे बघून अशोकाच्या मनात उदासीनता निर्माण झाली. हा विजय नसून पराजय आहे,  असे त्याने स्वतः समजावले. तो स्वतःला या युद्धाचा दोषी मानू लागला.ह्या विनाशकारी युद्धानंतर शांती, अहिंसा, प्रेम, दया ही मूलभूत तत्त्वे असलेला बौद्ध धर्मीयांचा मार्ग अशोकाने अवलंबायचे ठरवले. त्याने स्वतः बौद्ध धर्माचा प्रचारक  म्हणूनही काम करायचे ठरवले. यानंतर अशोकाने केलेले कार्य त्याला इतर कोणत्याही महान सम्राटांपेक्षा वेगळे ठरते. ज्यात क्रूरकर्मा राज्यकर्त्याचे महान दयाळू सम्राटात रूपांतर झाले.
   बौद्ध धर्माचा प्रमुख प्रचारक म्हणून आजही अशोकाचे नाव आदराने घेतले जाते. त्याने मुलगा महेन्द्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेत बौद्ध धर्माच्या प्रचारार्थ पाठवले. भारतात धर्म परिषद भरवली. अनेक स्तूप, विहार यांची रचना आणि बांधणी केली. लोककल्याणावर भर दिला.माणसांना तसेच पशूंना मोफत औषध उपचार मिळावे याची त्यांनी सोय केली होती. अनेक नवे रस्ते बांधले,  प्रवासामध्ये लोकांना सावली मिळावी यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली . नव्या धर्मशाळा बांधल्या,  विहिरी खोदल्या . अशा प्रकारे त्याने अनेक लोकोपयोगी आणि कल्याणकारी कार्ये केली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel