सर्व ऑफिस स्टाफला स्पेशल स्पेशल ट्रीट म्हणून एक फॉरेन ट्रिप करायची असे आम्ही तिघा पार्टनर्सनी मिळून ठरवले आणि आम्ही तयारीला लागलो. स्टाफला फॉरेन टुर ला घेऊन जाणारे आमचे किमान साताऱ्यातील तरी एकमेव ऑफिस असेल. कुठे जायचे यावर विचार केला तेंव्हा सरळ सोपे `दुबई' डोळयासमोर आले. पण दुबईला आम्ही तिघंही जाऊन आलेले असल्याने दुबई ऐवजी काय पर्याय आहेत ते शोधू लागलो. मलेशिया, थायलंड, बाली, सिंगापूर असे पर्याय शोधताना त्यातल्या त्यात सिंगापूर बरे वाटले. त्यानुसार मी ग्लोबल हॉलीडेजच्या अल्ताफ भाईंना संपर्क केला. त्यांनी सिंगापूरचे फोर नाईट फाईव्ह डेज चे पॅकेज करून दिले. त्यानुसार बुकिंगचा विचारही सुरु झाला. पण त्याचवेळी तिकडे नितीन कुलकर्णीनी जेंव्हा त्यांच्या फ्लाईटची चोकशी केली त्यावेळी असे लक्षात आले कि सिंगापूर आणि ते रहात असलेले रिचमंड ही जगाची दोन टोकं आहेत. त्यांना प्रवासालाच ३० तास लागणार होते. अर्ध्या जगाचा प्रवास करत जाऊन येऊन अडीच-तीन दिवस त्यांचे प्रवासातच जाणार होते.
मग परत विचार बदलत पूर्वेकडे जाण्याऐवजी पश्चिमेकडे काय पर्याय आहेत हे शोधू लागलो. आशिया खंड आणि अमेरिका या दोहोंच्या मध्ये संपूर्ण युरोप आणि आफ्रिका खंड. माझ्या युरोपच्या दोन ट्रिप आणि ५ देश बघून झालेत. अजूनही भरपूर देश आहेत, पण युरोप म्हणजे खूपच खर्चिक. शिवाय ऑफिस स्टाफ पैकी सगळ्यांचीच पहिलीच फॉरेन ट्रिप असल्याने आणि इन्कम टॅक्स रिटर्न्स नसल्याने युरोपचा शेन्जेन व्हिसा मिळणे मुश्किल होते. मग त्याच्या अलीकडे काय पर्याय तर युरोप, आफ्रिका आणि आशिया यांना जोडणारा `टर्की' हा देश. त्याची राजधानी इस्तंबूल हे छान शहर आहे. कालच इस्तंबूल ला जगातील सर्वात मोठ्या विमानतळाचे उदघाटन झाले. माझ्या स्पेन-पोर्तुगालच्या ट्रीपच्या वेळी या इस्तंबूल ला मी विमान बदलण्यासाठी उतरलो होतो. विमानातून हे इस्तंबूल खूपच मोहक दिसले होते. पण सध्या टर्की आणि अमेरिका यांचे राजनैतिक संबंध बिघडलेले आहेत त्यामुळे अमेरिकेने त्यांच्या नागरिकांसाठी `श्यक्यतो जाऊ नये' अशा देशांच्या यादीत टर्कीचा समावेश केलेला आहे. शिवाय टर्कीचे लिरा हे चलन बरेच घसरल्याने टर्की सध्या फायनान्सियल क्राइसिस मधून जात आहे. त्यामुळे तिथे महागाई बरीच वाढली आहे. याही गोष्टी इग्नोर करून जाता येणे शक्य होते पण टर्कीचा व्हिसा मिळवणे हि प्रोसेसही शेन्जेन इतकी नसली तरी बरीच किचकट आहेच. त्यातील `मंत्रालयात जाऊन ऍफिडेव्हिट करणे' हे कलम वाचून टर्कीचा विचार सोडून दिला.
गाडी पुन्हा दुबईवरच येत होती. दुबईचा विचार फायनल करत होतो. तिकडे नितीनने त्याच्या फ्लाईट बघितल्या त्यात कैरो मध्ये ट्रान्झिट होते. ते म्हणाले कि मग मी दोन दिवस अगोदर निघून दोन दिवस कैरो मध्ये फिरतो आणि दुबईला येतो. आणि अचानक मला क्लिक झाले कि मग आपणच कैरो म्हणजे `इजिप्त' ला जायला काय हरकत आहे. उपेंद्रनेही हि कल्पना उचलून धरली. इजिप्त चे नाव अगदी शालेय अभ्यासात इतिहास नावाचे पहिले पुस्तक आले असेल त्यातच आले असेल. जगातल्या सात आश्चर्यापैकी एक असलेले `इजिप्तचे पिरॅमिड' बघणे हा नक्कीच एक अविस्मरणिय अनुभव ठरणार होता. आमच्या आर्किटेक्चर अँगल मधूनही इजिप्त हा ऑफिस स्टाफ साठीही चांगला पर्याय ठरत होता. मग त्याच शोधाला लागलो. कैरोच्या आसपास बरेच काही बघण्यासारखे आहे. पण `बघायलाच हवे' या लिस्ट मध्ये इजिप्तच्या तीन शहरांचा उल्लेख येतो. कैरो, आस्वान आणि लक्झर. इजिप्तच्या जगप्रसिद्ध नाईल नदीमधील क्रूझ हेही एक प्रमुख आकर्षण आहे. तशी चौकशी केली असता, या क्रूझ लक्झर वरून निघतात आणि आस्वानला येतात. पण कैरो ते आस्वान हे अंतर ८५० किमी. इजिप्त तसा वाळवंटी प्रदेश आणि अशा ठिकाणी ८५० किलोमीटरचा प्रवास बाय रोड करणे म्हणजे प्रचंड वेळखाऊ. दुसरा पर्याय होता तो ओव्हर नाईट ट्रेन. पण त्या ट्रेन लाही १२ तास लागत होते. तिसरा पर्याय म्हणजे कैरो ते लक्झर आणि पुन्हा आस्वान ते कैरो अंतर्गत विमान सेवा. पण ही विमानसेवा बरीच महाग आहे. या विमानप्रवासाचेच प्रत्येकी अठरा हजार वाढले. पण `होऊ दे खर्च' असे म्हणत हा विमानप्रवास फायनल केला. खरेतर कैरो मधेच तीन चार दिवस द्यायला हवेत. पण क्रूझ ही मिनिमम तीन रात्री आणि चार दिवस अशी आहे. त्यात काही कर्टेल करणे शक्य नसल्याने मग कैरो मधील मुक्काम कमी करून दोनच दिवसांवर आणला आणि फाईव्ह नाईट सिक्स डेज असा प्रोग्रॅम फायनल केला. मग हॉटेल बुकिंग. घ्यायचं तर सर्वोत्तम पाहिजेच म्हणून मग कैरो मधील फाईव्ह स्टार, चाळीस मजली `रामसेस हिल्टन' बुक केले. नाईल मध्ये चाळीस ते पन्नास क्रूझ आहेत. क्रूझ निवडताने सुद्धा फाईव्ह स्टार `क्राऊन एम्परर' ही नाईलमधील सेकंड लार्जेस्ट क्रूझ निवडली. ग्लोबल हॉलीडेजच्या अल्ताफ पठाण यांनी मला हवी तशी ट्रिप अरेंज करून दिली.
इजिप्तला फार पुरातन इतिहास आहे. पूर्वकालीन अनेक राजांनी इथे खूप मोठमोठी मॉन्यूमेन्ट्स बांधून ठेवलीत, आणि संपूर्ण जगाला या वाळवंटाचं आकर्षण वाटेल आणि जगभरातून पर्यटक इथे येतील याची सोय करून ठेवलीय. पिरॅमिड्स हे कैरो च्या आसपास आहेत. पण लक्झर ते आस्वान या अडीचशे किलोमीटर मध्ये नाईल नदीच्या कडेने अशी खुप पर्यटन स्थळे आहेत. त्या राजांचे खरेच कौतुक करायला हवे.
वर्षातून एक परदेश प्रवास करायचा असे ठरवले होते पण सुदैवाने याच वर्षातील माझी ही सेकण्ड फॉरेन टूर ठरणार आहे. याच फेब्रवारीत मी स्पेन-पोर्तुगाल ट्रिप केली होती. यावेळी माझी पत्नी वंदना सुद्धा सोबत आहे. तिचा अंदमानला जाताने विमानप्रवास झालाय, पण परदेश दौरा हा पहिलाच. आजच माझे सर्व हॉटेल, क्रूझ, विमान बुकिंग आणि महत्वाचा म्हणजे सर्वांचा व्हिसा हातात आला. आणि कधी एकदा २३ नोव्हेंबर उगवतोय आणि कधी एकदा विमानात बसून `इजिप्त' च्या धरणीवर पाय ठेवतोय, यासाठी आमच्या ऑफिस स्टाफ इतकाच मीही आतुर झालोय. मग भेटूच इजिप्तमध्ये ................
अनिल दातीर. सातारा.