दुपारच्या जेवणानंतर आम्ही कैरो शहर बघण्यासाठी बाहेर पडलो. जवळच एक 'पॅपायरस' म्युझियम किंवा वर्कशॉप होते. इजिप्त आणि पॅपायरस यांचा फार जुना संबंध आहे. पॅपायरस नावाच्या वनस्पतीपासून नैसर्गिक पेपर तयार केला जातो. आपल्या कोरफड किंवा लव्हाळ्यासारखी पण त्यापेक्षा जरा जाड अशी ही वनस्पती पाण्यात आणि काही केमिकल मध्ये अनेक दिवस भिजवत ठेवली जाते आणि दोन लाकडांच्या ओंडक्यांमधून दाबून काढून ती सपाट आणि पातळ पेपरसारखी होते. या पेपरवर नैसर्गिक रंगात चित्र काढण्याची परंपरा फार जुनी आहे. फार पूर्वी आपल्याकडेही 'भूर्जपत्र' हा प्रकार अस्तित्वात होता. इथल्या चित्रांच्या किमती मात्र डोळे फिरतील अशाच होत्या. कुलकर्णी सरांनी मात्र दोन अँटिक चित्रं खरेदी केली.
हे म्युझियम बघून आम्ही पोहोचलो ते 'बेन इझ्रा सिनेगॉग' म्हणजेच ज्यू लोकांच्या प्रार्थनास्थळावर. शेकडो वर्षाचा इतिहास असलेली ही वास्तू सुबक होती. त्यापुढे 'बच्चूस कॉप्टिक चर्च' होते. कॉप्टिक म्हणजे ओल्ड ईजिप्शियन वास्तू. या चर्चला हजारो वर्षाचा इतिहास आहे. मदर मेरी, संत जोसेफ आणि स्वतः येशू ख्रिस्त काही दिवस इथे आश्रयाला होते असे गाईडने सांगितले. हे आमचे गाईड महाशय 'अशरफ' फार हुशार होते. इतिहासाचे त्यांचे नॉलेज दाद देण्यासारखे होते. जुन्या काळच्या विटांमधील ही वास्तूही खूप सुंदर होती. त्यानंतर जवळच एक हँगिंग चर्च होते. हँगिंग अशासाठी कि हे एका जुन्या इमारतीच्या खांबांवर उभे केलेले होते. काही ठिकाणी खालची ३०-४० फूट खोल असलेली जमीन दिसत होती. हे बघून बाहेर येताने तिथेच एक जुन्या दुर्मिळ वस्तूंचे दुकान होते. त्यातील काही वस्तू शेकडो वर्षांपूर्वीच्या होत्या.
या तीन वास्तू बघून बाहेर निघालो. बाहेर सगळीकडे एक विशिष्ट उग्र वास सारखा जाणवत होता. तसा प्रत्येक शहराला खास त्याचाच म्हणून एक वास असतो. मुंबईत तो प्रकर्षाने जाणवतो. तसा या कैरोला सगळीकडे सिगारेटच्या धुराचा वास होता. इथे कोणीही, कुठेही, कधीही सिगारेट ओढताने दिसेल. प्रचंड लोक सिगारेट ओढत असतात. दुकानदार सिगारेट ओढतोय, ग्राहक सिगारेट ओढतोय, ड्राइव्हर, रस्त्याने जाणारे लोक, प्रत्येक हेरिटेज इमारतींबाहेरील गार्ड एवढेच काय सगळॆ पोलिसही इथे सर्रास सिगारेट ओढतात. इथे म्हणे बंदिस्त जागेत सिगारेट ओढायला बंदी आहे. इथे दारूला बंदी आहे. फक्त एअरपोर्ट, फाईव्ह स्टार हॉटेल्स आणि प्रवासी क्रूज बोट्स इथेच अल्कोहोल ला परमिशन आहे. पण त्यांच्या किमती मात्र भरमसाठ आहेत. कैरोत संध्याकाळी तर रस्त्या कडेचे सगळे फूटपाथ हुक्का पार्लर बनतात. समोर एक गोल टेबल, बाजूला हुक्का किंवा हातात सिगारेट आणि चांगला ग्लासभर काळा चहा किंवा कॉफी. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर धूर सोडत अनेक लोक बसलेले असतात. आम्ही 'रामसेस-हिल्टन' या पंचतारांकित हॉटेलवर पोहोचलो आणि रूम ताब्यात घेतल्या. (रामसेस हे तिथल्या राज घराण्याचे नाव आहे). थोडेसे आवरून पुन्हा शॉपिंगला आणि फेरफटका बाहेर पडलो. हा चौक चांगलाच गजबजलेला होता, आणि आडव्या तिडव्या घुसणाऱ्या वाहनांनी भरून गेलेला होता. बरीचशी दुकाने अँटिक वस्तूंनी/ सोव्हेनियर नि भरलेली होती. त्यात पिरॅमिड्स, स्पिंक्स, तुतन खामेनचे मुखवटे, अनेक प्राणी, क्लीओपात्राचे मुखवटे, जुन्या काळातील शस्त्र, सुगंधी अत्तर आणि पॅपायर्सच्या पेंटिंग्स, ममीच्या मूर्ती असा सगळा माल होता. आम्हीही काही वस्तू खरेदी केल्या आणि मग जेवायला गेलो. यावेळी एक लोकल इजिप्शियन रेस्टोरेंट बघितले होते. तीन मजली 'अबू तारेक' या रेस्टोरंट मध्ये फक्त एकच पदार्थ विकला जात होता तो म्हणजे 'कोशेरी' आणि त्याबरोबर कोल्ड ड्रिंक्स. कोशेरी म्हणजे आपण त्याला भेळ किंवा मिसळ म्हणू शकतो. मका आणि इतर काही लोकल पदार्थ टाकून केला जाणारा हा पदार्थ इथे बराच फेमस आहे. अनेक जण वाडगा भर भरून ही कोशरी खाताना दिसत होते. पदार्थाची क्वांटिटी या बाबतीत मी असे म्हणेल कि एक डिश किती असावी असा विचार केला तर त्या शहरातील सामान्य माणूस एका वेळी संपवू शकेल एवढी क्वांटिटी असते. ही डिश आमच्या मात्र संपवण्यापलीकडील होती. जेवण सम्पुन आम्ही हॉटेल गाठले आणि निद्राधीन झालो.
कैरो मधील दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली ती 'ईजिप्शियन म्युझियम' च्या भेटीने. हे अवाढव्य म्युझियम व्यवस्थित बघायचे म्हणाल तर आठवडा पुरणार नाही. आमच्याकडे मोजके तीन तास होते. त्यात आम्ही या म्युझियमची धावती सफर केली. इथे अनेक मम्मीज, पुतळे, उत्खननात सापडलेले अनेक शिलालेख, अनेक टुम्ब (थडगी) मध्ये सापडलेल्या वस्तूंचा खजिनाच होता. इजिप्तचा सर्वात चर्चित सम्राट तुतनखामेन याच्या टुम्ब मध्ये मिळालेले जडजवाहीर, त्याच्या वापरातील वस्तू हे विशेष बघण्यासारखे होते. ईजिप्तमधील अनेक टुम्ब (थडगी) खोदून जगातल्या अनेक संशोधकांनी, चोरांनी इथे अक्षरशः लूट केलीय. तुतांखामेनचे टुम्ब मात्र कुणाला सापडले नव्हते. ते नंतर इजिप्त सरकारने शोधून त्यातील सगळा खजिना या म्युझियम मध्ये आणून ठेवलाय. तुतांखामेनच्या तुंबा मध्ये एकात एक असे चार बॉक्स होते आणि त्यातील शेवटच्या बॉक्स मध्ये त्याची ममी ठेवलेली होती. हजारो वर्षांपूर्वीच्या राजघराण्यातील ममी हाही इथला अनमोल खजिनाच म्हणावा लागेल.
म्युझियम सफर संपवून आम्ही पिरॅमिड बघायला निघालो. वाटेत एका हॉटेल मध्ये आमच्यासाठी इजिप्शिअन पद्धतीचे जेवण ठेवले होते. इथे वांग्यापासून बनवलेला 'बाबा-गनुष' हा पदार्थ खायला मिळाला. जेवणातील इतर पदार्थांची नावे लक्षात नसली तरी जे काही होते ते अप्रतिम होते. जेवणानंतर बाहेर पडून गाडीत बसलो तेंव्हाच पिरॅमिड चे दर्शन झाले. त्याच्या आकारामुळे ते अगदी जवळ आहेत असे वाटत होते पण प्रत्यक्ष पोहोचायला चांगला अर्धा तास लागला. हे पिरॅमिड असलेले शहर म्हणजे 'गिझा' गिझाचे पिरॅमिड म्ह्णूनच जगाला यांची ओळख आहे. जवळ गेलो तेंव्हा या पिरॅमिड चा अवाढव्य आकार बघून अक्षरशः थक्क झालो. माझ्या एका सुद्न्य मित्राने पिरॅमिड चा उल्लेख 'डबराचा ढिगारा' असा केला होता. पण यावर मी म्हणेन कि 'दगडाला इतिहास चिकटला कि त्याचे मॉन्युमेंट (स्मारक) होते. त्यामुळे या दगडाच्या ढिगार्यालाही एक गूढ अर्थ आहे. या पिरॅमिडच्या अंतर्भागात एका अरुंद बोगद्यातून वाकून जावे लागते. इथे आत एक २० बाय ३० फुटाची खोली आहे. फक्त एका खोलीच्या वापरासाठी ही एवढी अवाढव्य वास्तू का उभारली गेली असेल हे एक न उलगडणारे कोडं आहे. सॅण्ड स्टोन मध्ये बांधलेला हा पिरामिड म्हणजे जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. आणि त्यात काहीही अतिशयोक्ती नाही हे बघितल्यानंतर नक्कीच पटते. या संपूर्ण पिरॅमिड वर बाहेरून ब्लॅक ग्रॅनाइटच्या शिलाखंडांचे आवरण सुद्धा होते पूर्वी. आणि त्यावरून ८० टक्के चांदी व २० टक्के सोने वापरून तयार केलेला पत्रा लावलेला होता असे गाईड सांगत होता. या ग्रॅनाइटची एक एक शिळा एवढी मोठी आहे कि आजकालच्या आधुनिक मशिनरी वापरूनही ती एवढ्या उंचीवर नेता येईल कि नाही ही शंकाच आहे, पण हजारो वर्षांपूर्वी लोकांनी हे काम कसे केले असेल या बद्दल अजूनही बरीच अनभिज्ञता आहे. सॅण्ड स्टोन हा जरी जवळच्या खाणीतून घेतलेला असला तरी वरच्या ब्लॅक ग्रॅनाईटचा थर मात्र ४५० किलोमीटर अंतरवरून आणला होता. कसा आणला असेल ते त्यांनाच माहित.
इथे एकंदर तीन पिरॅमिड आहेत. शेकडो वर्षांपासून हे पिरॅमिड म्हणजे दगडाच्या खाणीसारखे वापरले गेलेत आणि नेता येण्यासारखे दगड लोकांनी घरे बांधण्यासाठी नेलेत हे ऐकून फार वाईट वाटले. आता मात्र उर्वरित जे काही शिल्लक आहे त्याचा अमूल्य ठेवा जतन करण्याचा इजिप्त सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. सर्वात मोठ्या पिरॅमिडजवळ एक जहाज देखील ठेवलेले आहे. या वाळवंटात हे जहाज काय करतंय असा प्रश्न नक्की पडेल. पण कधी काळी या पिरॅमिडच्या पायथ्यापर्यंत वाहणारी नाईलची एक शाखा होती. चवथ्या शतकातील ग्रीक राजा 'खुफू' याने हा पिरॅमिड स्वतःसाठी बनवून घेतला होता. तो शेकडो वर्षानंतर जिवंत झाला तर त्याला जायला म्हणून हे जहाज या महाराजांनी आपल्या बरोबरच ठेऊन घेतले होते. प्रत्येक माणसाला पुनर्जन्म मिळतो अशी इजिप्तमध्ये श्रद्धा आहे. आणि त्यासाठीच या ममी तयार करून ठेवल्या जायच्या. याच पिरॅमिडच्या समोर दगडात कोरलेला 'स्फिन्क्स' हा सुप्रसिद्ध चेहरा आहे. त्याची आताची अवस्था मात्र फारच खराब आहे.
रात्री इथेच साऊंड अँड लाईट शो बघणार होतो. पण त्याची वेळ होती सात वाजताची. इजिप्तला सूर्य साडेपाचलाच मावळतो. उर्वरित वेळ आम्ही तेथल्या मार्केट मध्ये फिरत घालवला. फुटपाथ हुक्का पार्लरच्या गर्दीने गजबजल्याने चालणेही मुश्किल होत होते. मार्केट मात्र पर्यटकांना लुटण्याचंच उद्दिष्ट ठेऊन उभे होते. मला एका दुकानातून साधी टूथ पेस्टची किंमत ४० इजिप्शिअन पौंड म्हणजे आपले १८० रुपये सांगितले गेले. बाहेर पडताने दुकानदार ३०...२०...१०...५ असे म्हणत होता. वेळ होताच साउंड अँड लाईट शोला जाऊन बसलो. स्पिंक्सच्या समोर आणि बॅकग्राऊंडला तिन्ही पिरॅमिड असा लाईट शो होता. पाठीमागे संपूर्ण वाळवंट असूनही संध्याछायेसारखा प्रकाश त्या पिरॅमिडच्या मागे कसा जाणवत होता हे काही कळले नाही. हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास या शोमधून दाखवला गेला. आमच्याकडे थंडी साठी काहीच कपडे नव्हते, आणि इथे प्रचंड थंडी होती. शो संपल्यानंतर थंडीने कुडकुडत गाडीत जाऊन बसलो आणि गिझाच्या रस्त्यांचे नजारे बघत एक रेस्टोरंट गाठले आणि रात्रीचे जेवण करून पुन्हा हॉटेलवर आलो. आणि आमचा कैरोमधील दुसरा दिवस संपला.
(क्रमश:)
............
अनिल दातीर. (९४२०४८७४१०)