आमच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात होणार होती 'आस्वान' या शहरामधून. कैरो ते आस्वान हे अंतर ८५० कि.मी. वेळ वाचवण्यासाठी म्हणून आम्ही या प्रवासासाठीही फ्लाईट बुक केली होती. आमची फ्लाईट सकाळी ७ ची असल्याने चार वाजताच हॊटेल चेक आऊट करून कैरो डोमेस्टिक विमानतळ गाठले. तिथेच चहा नास्ता आवरून चेकइन, इमिग्रेशन हे सोपस्कार पार पाडत लाउंज मध्ये येऊन बसलो. सात वाजले तरी गेटवर कोणीही नव्हते. थोड्या वेळात एकदाचे बोर्डिंग सुरु झाले आणि आम्ही विमानात जाऊन बसलो. डोमेस्टिक फ्लाईटला वेळेचे फार कौतुक नसावे. जशी आपली एसटी हो, १५-२० मिनिटे इकडे तिकडे, चालायचंच. मला तर वाटले, पायलट येऊन आता विचारणार कि 'आले का सगळे? निघायचं का आता? विमान प्रवास एक तास वीस मिनिटाचा. पण तेवढ्या प्रवासात कैरो सोडल्यापासून नाईल नदी दिसेपर्यंत वाळवंटाव्यतिरिक्त काहीही दिसले नाही.
आस्वानच्या विमानतळावर सिंड्रेला टुरचा माणूस बोर्ड घेऊन उभा होता. त्यातही एक गम्मत झाली. दुसरा एक गाईड 'मि. कुलकर्णी फॅमिली' असा बोर्ड घेऊन उभा होता. आमच्याकडेही कुलकर्णी असल्याने आमच्यातील काही जण त्याच्या जवळ जाऊन थांबले पण तो 'सिक्स पिपल' असे ओरडत होता. मग रॉन्ग नंबर लक्षात घेऊन सगळे सिंड्रेला टूर वाल्याकडे आले. विमानतळाबाहेर आमच्यासाठी एक १८ सीटर बस आणि गाईड 'शोनूदा' उभे होते. आमच्या टूरची सुरुवात साईट सिईंग ने होणार होती. अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आम्ही 'हाय डॅम' या स्पॉटवर पोहोचलो. आपल्याकडे अनेक डॅम आहेत त्यामुळे आपल्याला याचे फार कौतुक नसले तरी इजिप्त साठी मात्र या डॅमला खूपच महत्व आहे. अनेक वर्षे इजिप्त हा नेहमीच पूर आणि दुष्काळ या चक्रात भरडला जात होता. कधी कधी पूर इतका प्रचंड असायचा कि नाईलच्या आजूबाजूची अनेक भव्य मंदिरं पाण्याखाली आणि पर्यायाने मातीखाली गाडली जायची. १९९५० ला इजिप्तचे हुकूमशहा 'गमाल अब्देल नासेर' यांनीं या डॅमची कल्पना मांडली.
सुरुवातीला या प्रचंड खर्चसाठी इंग्लंड आणि अमेरिका यांनी आर्थिक मदत देऊ केली पण नंतर मात्र नकार दिला. मग उर्वरित काम रशियाच्या मदतीवर पूर्ण झाले. अर्थात गोष्टी एवढ्या सोप्या नव्हत्या. इजिप्तने सुवेझ कालवा अडवला, त्यावर प्रचंड टोल लावला. इंग्लंड अमेरिकेने हल्ला करून हा सुवेझ कालवा मुक्त केला असे बरेच काही इतिहासात नोंदविले आहे. असो.
नाईल या नदीला इजिप्तची जीवन रेखा म्हणतात. जगातील ही एक नंबरची नदी. इथिओपिया मधून येणारी ब्लू नाईल आणि युगांडा मधून येणारी नदी म्हणजे व्हाईट नाईल. पुढे सुदान या देशातील 'खार्टूम' इथे या एकत्र येतात आणि येथून पुढे या नदीला तिच्या अंतापर्यंत 'नाईल' याच नावाने ओळखले जाते. नाईलचा हा एकूण प्रवास ६९९५ किमी चा. इजिप्त हा आकाराने भारताच्या १/३ असेल, पण लोकसंख्या आहे फक्त १० कोटी. आणि यातील ८० % लोक नाईलच्या किनाऱ्यावरच राहतात. नाईल सोडली तर बाकीचा इजिप्त म्हणजे मृत वाळवंट. म्ह्णूनच इजिप्तची ही नाईल नदी आणि पुरापासून/ दुष्काळापासून वाचवणारा 'हाय डॅम' ईजिप्शियन लोकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा. या डॅम मुळे तयार झालेल्या 'नासेर-लेक' तलावाचा आकार १० किमी रुंद आणि ३०० किमी लांब असा आहे. आणि याच डॅमच्या पाण्यावर तयार होणाऱ्या विजेवर अख्खा इजिप्त चालतो. नाईलच्या आजूबाजूचा परिसर अगदी आपल्या पश्चिम महाराष्ट्रासारख्या सुजलाम सुफलाम आहे. पण तरीही सगळ्या पाण्याचा म्हणावा असा वापर झालेला दिसत नाही. कैरो पासून अवघ्या ९० किमी अंतरावरील अलेक्झांड्रीया येथे हा प्रचंड पाणीसाठा समुद्र अर्पण होतो. आज भलेही असे होत असेल पण जगात जेंव्हा गोड्या पाण्यावरून युद्ध करण्याची वेळ येईल तेंव्हा हा पाणीसाठा इजिप्त साठी मोठा खजिना ठरेल.
हाय डॅम ची भेट संपवून आम्ही निघालो ते 'अनफिनिश्ड ओबिलिस्क' ला भेट देण्यासाठी. रस्त्यात एके ठिकाणी एक गाव दिसले त्याला 'न्यूबियन व्हिलेज' म्हणतात असे गाईड ने सांगितले. न्यूबियन ही ईजिप्तमधील आदिवासी, जंगली जमात. अशाच एका न्यूबियन खेड्याला भेट हाही आमच्याकडे एक ऑपश्नल पर्याय होता. पण जावेसे काही वाटले नाही आणि तेवढा वेळही नव्हता.
'अनफिनिश्ड ओबिलिस्क' म्हणजे अर्धवट काम राहिलेला स्तंभ. इथल्या पुराणकालीन मंदिरांच्या बाहेर असे दोन किंवा चार ओबिलिस्क उभे असतात. साधारण ७५ ते १०० फूट उंचीचा हा अखंड दगडात कोरलेला ओबिलिस्क तळामध्ये ९ बाय ९ फूट आणि वरच्या टोकाला पाच बाय पाच फूट असतो. हा शेकडो टन वजन असलेला स्तंभ खाणीत अखंड दगडात कोरला जायचा आणि शेकडो किलोमीटरवर वाहून नेला जायचा. त्यासाठी पुराची वाट पाहिली जायची. एका पुरात मोठे जहाज या खाणीजवळ उभे केले जायचे. पूर ओसरला कि जहाज तळाच्या जमिनीवर टेकायचे. मग हा कोरलेला अजस्त्र स्तंभ या जहाजावर शेकडो माणसे आणि हत्ती यांच्या मदतीने चढवला जायचा. पुन्हा पूर आला कि जहाज वर उचलले जायचे आणि मग त्याचा प्रवास इच्छित ठिकाणापर्यंत व्हायचा. तिथे पुन्हा मानवी ताकतीने तो उतरवून घेऊन हव्या त्या ठिकाणी उभा केला जायचा. हे काम खरंच आजच्या आधुनिक जगालाही अजब वाटेल असेच होते. एवढा अजस्त्र स्तंभ कोरायचा, वाहून न्यायचा आणि उभा करायचा म्हणजे आश्चर्यच. 'बाहुबली' या सिनेमात भल्लाल देव चा पुतळा उभा करतानाचा प्रसंग डोळ्यासमोर आणा म्हणजे थोडीशी कल्पना येईल.
आम्ही भेट दिली ती एक ग्रॅनाईट ची खान होती. इथे हा ओबिलिस्क खोदण्याचे काम हजारो वर्षांपूर्वी चालू होते. बरचस काम झाल्यानंतर या ओबिलिस्कला तडे गेले आणि सगळी मेहनत वाया गेली. आणि हा अर्धवट खोदलेला ओबिलिस्क इतिहास जमा झाला. एकाच खाणीत निघालेला एखादा दगड जमिनीत गाडला जाऊन पायासाठी वापरला जातो, दुसरा पायरीसाठी वापरला जातो तर तिसरा मात्र कळसाला वापरला जातो. तसा हा 'अनफिनिश्ड ओबिलिस्क' कुठेही वापरला न जाता सुद्धा एक इतिहास बनून गेलाय. नशीब आपापले ...........
हे बघून बाहेर पडताने बरेच मोठे मार्केट होते. सगळेजण मार्केट मध्ये गेले. गाईड मात्र चला चला करत घाई करत होता. आम्ही इथूनच 'क्रूझ' वर जाणार होतो. शेवटी गाईडने अल्टिमेटम दिला कि 'क्रूझ' वरील लंच टाइम २ ला संपतो म्हंटल्यावर घाई करत आम्ही बस गाठली. आणि जवळच असलेल्या नाईल नदीच्या किनाऱ्यावरील 'क्राऊन एम्परर' या चार मजली फाईव्ह स्टार क्रूझ बोटीवर पाय ठेवला. रूम ताब्यात घेण्याऐवजी आणि क्रूझ बघणे दूर सारत आम्ही पहिले रेस्टोरेंट गाठले. तिथे अनेक प्रकारचे ईजिप्शियन पदार्थ बुफे मांडून ठेवले होते. जेवण चांगले होते. आणि एकंदरीत क्रूझ सुद्धा जसे वेबसाईटवर दाखवले आणि लिहिलेले होते तसेच होते. टायटॅनिक सिनेमा आठवतोय, त्यातला तो गोल जिना. इथेही तसाच दोन्ही बाजूने जाणारा गोल जिना, पायाखाली मखमली कार्पेट, चकाचक चमकणारे पॉलिश केलेले ब्रासचे रेलिंग. प्रशस्त डायनिंग हॉल, दुसऱ्या मजल्यावर कॉकटेल बार, राहायच्या खोल्याना बाहेरच्या बाजूला असलेली संपूर्ण ग्लास, त्यातून दिसणारे नाईलच्या काठावरील नजारे, सर्वात वरच्या मजल्यावरील ओपन डेक, स्वीमीन्ग पूल, सर्वत्र ठेवलेल्या पूल चेअर्स, एकदम मस्त. आपला पुढचा बराचसा वेळ या डेकवरच जाणार हे नक्की वाटत होते.
रूम ताब्यात घेऊन आम्ही विसावलो पण थोड्या वेळाने सगळेच हळू हळू बाहेर पडून डेकवर पोहोचले आणि मग पोहण्याची आयडिया मनावर घेत सगळ्यांनीच बरोबर आणलेले स्विमिंग ड्रेस घालत पूल वर आक्रमण केले. आमच्या अगोदर काही फॉरेनर्स पूल मध्ये पोहत होते पण हळू हळू ते बाहेर पडले आणि पूल आमच्या ताब्यात आला. अर्थात पूल काही फार मोठा नव्हता. पण एन्जॉय करायला पुरेसा होता. एक मूळची पाकिस्तानी पण सध्या कॅनडाला राहणारी आमच्याकडे आनंदाने बघत होती. आमच्या दंग्यात भाग घ्यावासा तिला वाटत असेल. नंतर ती पूल मध्ये पाय सोडून बसली पण तिच्या नवऱ्याने मात्र तिला लगेच तिथून उठवले. पाणी मात्र फारच थंड असल्याने जास्त वेळ न थांबता आम्ही रूम गाठली. त्यादिवशी क्रूझचा मुक्काम आस्वान मधेच होता. विश्रांतीनंतर संध्याकाळी आम्ही सर्व आस्वान शहर आणि मार्केट बघायला बाहेर पडलो. कैरोच्या मानाने आस्वान शहर खूपच छान आहे. पर्यटक हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन सजलेले भव्य मार्केट मस्त आहे. संपूर्ण इजिप्त टूर मधील आवर्जून सांगावी अशी गोष्ट म्हणजे आपल्या भारतीयांना इजिप्तमध्ये खूप मान दिला जातो. अनेकजण आमच्याकडे बघून इंडिया इंडिया असे ओरडत होते. अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांची नावेही घेत होते. अनेक शाळकरी मुले आमच्याबरोबर फोटो ही काढून घेत होते, विशेषतः अनेक मुलींनी वंदना, केतकी अभया,क्षितिजा, निकिता, लीना बरोबर फोटो काढले. त्यांच्या दृष्टीने आम्हीही फॉरेनरच ना? भारतीयांना मान द्यायला अजूनही एक कारण आहे. २००९- ते २०१३ या दरम्यान इजिप्तमध्ये राजकीय अस्थिरता असल्याने अमेरिका, युरोप आणि रशिया मधील पर्यटक इकडे येत नव्हते पण आपले भारतीय मात्र इजिप्तला भेट देत होते त्यामुळे पडत्या काळात भारतीय पर्यटकांनी दिलेली साथ ही त्यांना मोलाची वाटते. एक माणूस तर मला म्हणाला 'से हाय टू अभिताबच्चन! जसा काही अमिताभ आमच्या शेजारीच राहतोय. पण छान अनुभव. सगळेचजण शॉपिंग मध्ये मग्न होते पण मी मात्र संपूर्ण वेळ मी सर्वांवर लक्ष ठेऊन कोण कुठे जातंय हे पाहत होतो. मार्केट मधून बाहेर पडताने मात्र गाईडच्या चुकीच्या निर्णयाने लौकिक आणि आकाश आल्या रस्त्याने गेले आणि गाईडने आम्हाला दुसऱ्या रस्त्याने बाहेर काढले. मग काय, चुकामुक, शोध, अस्वस्थता यात चांगला तासभर गेला. ते दोघे लहान नसले तरीही त्यांना आम्ही घेऊन गेलो होतो, म्हटल्यावर जबाबदारी आमची होतीच. तासा-दीड तासाच्या गोंधळानंतर क्रूझ वर पोहोचलो तेंव्हा हे दोघेही आम्हाला शोधत क्रूझवर येऊन पोहोचले होते. सगळ्यांची भेट झाल्यावर मी निश्वास सोडला.
जेवण करून काहींनी डेक वर जाणे पसंत केले. मी मात्र चालून चालून थकल्याने रूम कडे वळलो आणि क्रुझवरचा पहिला दिवस आनंदात संपला. बाकी पुढील भागात.
(क्रमश:)
..............
अनिल दातीर. (९४२०४८७४१०)