क्रूझ वरची एक सुंदर सकाळ. नाईलच्या पात्रातून वर येणारे सूर्यबिंब फारच छान. अजून आमची क्रूझ आस्वान मधेच होती. सकाळच्या सेशनमध्ये साईट सिईंगचा काही प्रोग्रॅम नव्हता

आमची कॉन्फरन्स संपेतो लंच टाइम झाला होता. मग सगळेच डायनिंग हॉल कडे गेलो. जाताने बघितलं तर क्रूझ अजून जागेवरच होते पण जेवण करून बाहेर आलो तेंव्हा बाहेरचा नजारा बदललेला होता. क्रूझ कधी सुरु झाले ते कळले सुद्धा नाही. अगदी टेबलावरचा ज्युसचा ग्लास सुद्धा हलला नाही. पाण्याचा मुद्दाम म्हणालो नाही ते यासाठीच कि इथे जेवताने पाणी दिले जात नाही. एवढे पैसे घेतलेले असतात. फाईव्ह स्टार सुविधा असतात. खायला शेकडो पदार्थ असतात, पण पाणी मात्र हवे असल्यास विकत घ्यावे लागते. आपले स्वतःकडचे पाणी न्यायलाही परवानगी नसते. इथली पाण्याची बाटली २५०-३०० रुपयाला पडते. ही चिंधीगिरी का करतात हे काही कळले नाही. सकाळच्या ब्रेकफासाच्या वेळी मात्र चहा कॉफी साठी गरम पाणी ठेवलेले असायचे. आम्ही मग ते पाणी घेऊन आमच्याकडचे रेडीमिक्स चहाचे पॅकेट वापरून चहा करून प्यायचो. आमच्या टूर पॅकेज मध्ये प्रत्येकी दीड लिटरच्या दोन पाण्याच्या बाटल्या रोज दिल्या जायच्या. तेवढ्या आम्हाला पुरेशा होत्या.

जेवणानंतर आम्ही सर्वजण डेकवर गेलो. नाईलच्या पात्रातून क्रूझचा प्रवास सुरु होता. मध्ये मध्ये काही छोट्या यॉटस, मच्छीमार बोटी आणि दुसऱ्या क्रूझ सुद्धा पास होत होत्या. नाईलचे पात्र खूपच मोठे आहे. दोन्ही कडेला हिरवीगार शेतं आहेत. पण त्यांची कक्षा फार मोठी नाही. खरेतर एवढे मुबलक पाणी असूनही इथल्या राज्यकर्त्यांना त्याचा चांगला वापर करण्याचे जमलेले नाही. पाणी असेल तर त्या वाळवंटातही नंदनवन फुलवता येईल. यासाठी दुबई किंवा इझराईल चा आदर्श घ्यायला हवा. याच नाईलच्या कडेने रेल्वेलाईन आणि हायवे पण गेलेला आहे. बहुतांशी वेळा हे तीनही बरोबरच जात असतात. आणि तसे होणारच, कारण इजिप्तचे जे काही मानवी जीवन अस्तित्वात आहे ते केवळ या नाईलच्या किनाऱ्यावरच. विमानातून हि नाही नदी वाळूतून एखाद्या सापासारखी वाकडी तिकडी वळवळत जाताने दिसते. मध्ये एक खूप लांबीचा टेंसाईल स्ट्रक्चरचा मोठा आणि उंच पूल लागला. याच्या फक्त दोन्ही किनाऱ्यावर तीन तीन कॉलम होते, बाकी मधला सर्व भाग हा कॉलम विरहित हँगिंग होता. या पुलाच्या खालून आमचे चार मजली क्रूझ आरामात गेले. दुसरी एक आवर्जून सांगावीशी वाटणारी गोष्ट म्हणजे चालत्या क्रूझमधून शॉपिंग. अनेकदा छोट्या नावेतून काही फिरते विक्रेते यायचे आणि ते त्यांची नाव आकडा टाकून बरोबर क्रूझला आडकवायचे आणि डेकवर उभे असलेल्या लोकांना होडीतुनच टॉवेल, शाल आणि इतर कपडे दाखवायचे. कुणी इंटरेस्ट दाखवला कि त्या टॉवेलचा बोळा करून बरोबर नेम धरून डेकवर फेकायचे. पसंत पडले तर क्रूझमधल्या एखाद्या वेटर्सशी त्यांचे संधान असायचे, त्याला पैसे द्यायचे. वस्तूंपेक्षा हा व्यापार बघणं नक्कीच आनंददायी होते. तीन दिवसाच्या प्रवासात किमान दहा वेळा तरी असे चालू विक्रेते क्रूझला चिकटले असतील. असो.

काही वेळाने आम्ही रूम मध्ये परतलो. काहींनी पुन्हा आजही स्वीमीन्गचा आनंद घेतला. दुपारी एकला निघालेल्या क्रूझचा प्रवास संध्याकाळ झाली तरी चालू होता. इथे पाच साडेपाचलाच दिवस मावळतो. आणि अंधार पसरतो. सात वाजता क्रूझ 'कॉम-ओम्बो' इथे थांबले. गाईडने अगोदरच सांगितल्यानुसार आम्ही सर्व मेन लॉबीत येऊन थांबलो होतो. आम्ही जरी क्रूझ वरील १००-१५० लोकांबरोबर प्रवास करत होतो, तरीही प्रत्येक ठिकाणी आमच्या ११ जणांच्या ग्रुपसाठी आमचा गाईड आमच्या बरोबरच होता. बोर्डिंग पास घेऊन आम्ही बाहेर पडलो. चालतच जवळच्या कॉम-ओम्बो या मंदिरात गेलो. या मंदिराची मूळ निर्मिती ख्रिस्तपूर्व काळातील म्हणजे २००० ते ३००० वर्षांपूर्वीची. नंतर रोमन साम्राज्य काळात या मंदिरात काही बांधकाम केले गेले. आमचा गाईड माहिती सांगताने 'टेम्पल ऑफ गुद गाद अँड बॅद गाद' असे म्हणत होता. बऱ्याच वेळाने लिंक लागली कि त्याला 'गुड गॉड आणि बॅड गॉड' असे म्हणायचे आहे. म्हणजे आपली देव आणि राक्षस हीच कथा. हे मंदिर दोन्हीही शक्तींचे एकत्र अनुष्ठान असे आहे. फाल्कन पक्षाच्या रूपातील देव 'हेरॉईस' आणि क्रोकोडाईलच्या रूपातील राक्षस म्हणजे 'सोबेक' अशा दोन्हींचे एकत्र बांधलेले हे एकमेव मंदिर. दोन्हीही बाजू अगदी सेम सेम. तळातून या दोन्हींना जोडणारे भुयार देखील होते. या भव्य मंदिराचे बांधकाम पाहून आपण नक्कीच आश्चर्य चकित होतो कि एवढी प्रचंड बांधकामे फक्त मनुष्य बळावर कशी केली असतील. आताची या मंदिराची अवस्था मात्र फारच खराब आहे. पूर्वीच्या अनेक पिढ्यांनी या मंदिरांचे दगड चोरून नेले आणि अलीकडच्या काही वर्षात जसा या अमूल्य ठेवायचे महत्व समजले तेंव्हापासून काही आधुनिक चोरांनीही इथे भरपूर लूट केलीय. अनेक ठिकाणी अक्षरशः कोरीव काम असलेले दगड कापून नेलेत. नंतरच्या अनेक आक्रमनांच्या काळातही इथल्या मंदिरांचे अतोनात नुकसान करण्यात आले.

इथे एक गोष्ट मुद्दामहून सांगावीशी वाटते. इजिप्त हा आज जरी एक मुस्लिम राष्ट्र म्हणून गणला जात असला तरी दोन तीन हजार वर्षांपासून अगदी अलीकडच्या चार पाचशे वर्षेपर्यंत इथे कोणीही मुस्लिम शासक नव्हते. इथले राजे हे नेहमीच सूर्योपासक राहिलेले आहेत. अगदी त्यांना हिंदू म्हणण्याचा आततायीपणा नाही करणार मी पण जे कोणी होते ते आर्य- द्रविड या संस्कृतींशी साम्य असणारे होते. त्यांनी मंदिरेच बांधली, मशिदी किंवा चर्चेस नव्हे. आपल्या प्राचीन भारतात देखील सुरवातीला द्रविड आणि त्यानंतर आर्य वंशीयांनीच राज्यकारभार चालवलेत. त्यामुळे प्राचीन भारत आणि इजिप्त यांचा पूर्वी संबंध असावा असे म्हणता येईल. इजिप्तमध्ये या प्राचीन संस्कृतीनंतर ग्रीक आणि रोमन संस्कृतीचाही पगडा राहिलेला आहे. आज मात्र बहुतांशी अरेबिक, काही ग्रीक आणि रोमन्स आणि अजूनही काही जातीचे लोक इथे राहतात. संपूर्ण ढाचा मात्र मोमेडियन संस्कृती.

मंदिर बघून बाहेर आलो तिथे एक क्रोकोडाईल म्युझियम होते. त्यात अनेक क्रोकोडाईल ममी स्वरूपात प्रिझर्व करून ठेवलेले होते. नंतर पुन्हा क्रूझवर आलो. उतरल्यापासून परत येईपर्यंत फिरत्या विक्रेत्यांचा ससेमिरा पाठीमागे होता. सहज एकाद्या वस्तूला हात लावला कि ते मागेच लागायचे. त्यात आम्ही इंडियन म्हणून अनेक जण इंडिया, इंडिया, अमिताबच्चन म्हणत कौतुकाने आमच्या मागे फिरायचे.

क्रूझवर आज इजिप्टीशियन थीम ड्रेसिंग आणि हौस वॉर्मिंग कॉकटेल पार्टी होती. कॉकटेल म्हणजे साधे ज्यूसच होते, त्यात कसले कसले फ्लेवर घातलेले होते. आम्ही जरा उशिराच यात सामील झालो. यात अनेक छोटे छोटे गेम्स होते. आपल्या संगीत खुर्चीसारखे. यात सर्वात शेवटी केतकीच जिंकली. यानंतर मुख्य कार्यक्रम संपला असला तरी डान्स फ्लोअर मात्र सुरु होता आणि म्युझिक/ डिस्को लाईट चालू होते. अनेकजण डान्स करत होते. आम्हीही एकेक करत सामील झालो आणि सगळा फ्लोअरच ताब्यात घेतला. खास आमच्यासाठी म्हणून डी.जे. ने भारतीय संगीत लावले. पण ती गाणी डान्स करण्याच्या पलीकडली होती. मग काय, काहींच्या मोबाईल मधील गाणी लावत आमचा डान्स कम दंगा सुरु झाला. आमच्याबरोबर काही विदेशीही नाचत होते आणि बरेच जण टाळ्या वाजवत आम्हाला चीअर करत होते. आणि मग काय प्रथेप्रमाणे या कार्यक्रमाची सांगता आम्ही 'झिंग झिंग झिंगाट' या गाण्याने करत क्रूझ दणाणून सोडले. अनेक विदेशीही आमच्याबरोबर 'झिंगाट' वर थिरकले. आणि आजचा हा दिवस आनंदाने संपवत आम्ही आपापल्या रूममध्ये परतलो.

( बाकी पुढील भागात- क्रमश:)
..........

अनिल दातीर.
(९४२०४८७४१०)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel