क्रुझवरचा शेवटचा दिवस आणि आमच्या इजिप्त टूरचाही शेवटचा दिवस उगवला. आजच्या दिवसात आमची तीन ठिकाणांना भेट नियोजित होती, त्यामुळे आम्ही सकाळी आठलाच क्रूझ सोडले. सर्वांच्या बॅगा बाहेर उभ्या असलेल्या बस मध्ये टाकल्या. आता त्या भारतात परत गेल्यानंतरच उघडल्या जाणार होत्या. बसने आम्ही निघालो ते नाईलच्या वेस्ट बँकला भेट देण्यासाठी. आमचे टार्गेट होते 'व्हॅली ऑफ किंग्ज' नाईल नदीची रुंदी फारच असल्याने इथे पूल बांधणे अतिशय खर्चिक आहे. त्यामुळे इथे पूल फार कमी आहेत. त्यामुळे बराच लांबचा वळसा घालून आम्हाला पलीकडच्या तीरावर जाता आले. मधला एक पॅच मिलिटरी एरिया होता. तिथे अगदी मशिनगन घेऊन टेहळणी करणारे सैनिक दिसत होते. हा तासाभराचा प्रवास इतका भारतातल्या, त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्रासारखाच वाटत होता कि आम्ही साताऱ्याहून कोल्हापूर किंवा सांगलीला जातोय असे वाटत होते. सगळीकडे हिरवीगार शेते होती. त्यात केळीच्या बागा, कोबी, फ्लॉवर, गहू अशी पिकं होती. ऊस प्रत्यक्षात दिसला नाही पण पिकत असणार नक्की कारण आस्वान आणि लक्झरच्या मार्केट मध्ये उसाच्या रसाची दुकाने दिसली होती. दूरवर डोंगरांची उजाड रांग दिसत होती. इथल्या डोंगरांचा रंग हा भुरकट पांढुरका असल्याने ते डोंगर म्हणजे आपल्याकडच्या मातीच्या टेकड्यांसारखे वाटतात, पण हे डोंगर लाईम स्टोन आणि ब्राऊन ग्रॅनाइटचे असल्याने तसे खूपच कठीण असतात. किंबहुना म्हणूनच या डोंगरांच्या पोटात अनेक खोदकामे करून ठेवलेली आहेत. पण हे डोंगर पूर्ण उजाड, एकाही ठिकाणी साधे काटेरी झुडूप पण उगवलेले दिसत नव्हते.
एक तासाच्या प्रवासानंतर आम्ही 'व्हॅली ऑफ किंग्ज' ला पोहोचलो. तिकिटे घेऊन आम्ही इलेकट्रीक कार्टने स्पॉटवर पोहोचलो. या डोंगर रांगांमध्ये हजारो वर्षांपासून राज परिवारातील व्यक्तींना दफन केले जायचे. पण हे अगदी गुप्तपणे केले जायचे. त्यामुळे मी तर या ठिकाणाला राज परिवाराचे (मेल्यानंतर पुणर्जन्म मिळेपर्यंत) लपून राहायचे ठिकाण म्हणेल. इथे डोंगरांमध्ये आत खोलवर गुहा खोदून त्यात मेलेल्या व्यक्तीच्या 'ममी' करून त्यांना आतल्या खोलीत बंदिस्त केले जायचे आणि नंतर या गुहा बाहेरून बंद केल्या जायच्या, अशारितीने कि त्या कोणालाही सापडू नयेत. याला 'टुम्ब' म्हटले जाते. याचे खोदकाम म्हणजे वास्तुशास्त्रातील एक बेजोड नमुना ठरावा असे केले जायचे. अगदी आखीव रेखीव काटकोनात कोरलेला रुंद पॅसेज खाली उतरत उतरत दोन तीन मजले खाली गेलेला असायचा. आणि आत मध्ये एक भव्य हॉल करून त्यात मध्ये एका बंदिस्त थडग्यात या ममी ठेवल्या जायच्या. मला आश्चर्य वाटले कि ही बांधकामे कधीही कोणीही बघू नयेत अशी अपेक्षा ठेऊन गुप्त ठेवले जायचे तर मग त्यात एवढी कलाकारी करून कोरीव काम करवून त्या व्यक्तीच्या जीवनातील अनेक प्रसंग चित्रित करून कशासाठी ठेवले जायचे. (कदाचित तिथली ममी थडग्यातून उठून आत फिरत असेल असा समज असावा).
इथे शेकडो असे गुप्त टुम्ब असावेत असा अंदाज आहे. त्यातील अनेक इतिहासकारांनी आणि त्यांच्यातील चोरांनी शोधून खोदून त्यातील खजिन्याची लूट करून नेलीय. आता मात्र इजिप्त सरकार जागे झालेय. आता इथे फक्त शासकीय खोदकाम चालू असते. सोनार सारखे अत्याधुनिक उपकरन वापरून इथे शोध घेतला जातोय. आतापर्यंत असे बासष्ट टुम्ब खोदून ते पर्यटकांच्या सोयीसाठी खुले केलेत. आमच्याकडे वेळ कमी होता त्यामुळे सगळ्याच टुम्बना भेट देणे शक्य नव्हते. आम्ही मोजक्या तीन टुम्ब ला आत जाऊन आलो. यातील एक 'राजा रामसेस तिसरा' याचंही होतं.
तिथून बाहेर पडून आम्ही निघालो ते 'हॅतशेपसूत' मंदिर बघण्यासाठी. तिथे जायलाही छोटी इलेक्ट्रिक कार्ट होती. हे मंदिर १२ व्या शतकात 'गॉड अमौन रा' साठी बनवले गेले. त्यानंतर सतराव्या शतकात राणी 'हॅतशेपसूत' ने इथे स्वतःचे समाधीस्थळ केले. तसेही इजिप्त मधील मंदिरे ही कधी लोकांच्या पूजेअर्चेसाठी नव्हतीच. इथे फक्त राजा आणि पुजारी किंवा प्रिस्ट जात असे. फक्त फेस्टिव्हलच्या वेळी सामान्य जनतेला इथे जायची परवानगी असायची. कदाचित राजांच्या मनःस्वास्थ्यासाठी, गुप्त खलबतांसाठी ही बांधली गेली असावीत. पण खरेतर आपणही काही तरी भव्य दिव्य करून ठेवावे, आपले नाव इतिहासात कोरले जावे आणि जगाला आपली ताकत दिसावी हा हेतू ठेऊन बांधली जात असावीत. यासाठी लाखो लोकांच्या अनेक पिढ्या या वास्तू बांधण्यातच खर्ची पडल्या असतील. 'हॅतशेपसूत' हे तीन मजली भव्य मंदिर लाईम स्टोन मध्ये बांधले गेलेय. इथेही अनेक ठिकाणी तोडफोड केली गेलीय. मंदिराच्या समोरच्या मोकळ्या आवारात शेकडो तुटलेले भाग गोळा करून ठेवलेत आणि त्यावर डागडुजी करून रेस्टोरेशन टीम तीच भव्यता पुन्हा आकारात आणण्याच्या प्रयत्नात आहे. एक आर्टिस्ट एका स्पिंक्स च्या पुतळ्यावर काम करत होता.
इथून परत फिरताने 'कलोंजी ऑफ मेम्नॉन' म्हणून एक ठिकाण होते. तिथे दगडात तयार केलेले दोन भव्य पुतळे होते. त्यांची उंची किमान ७०-८० फूट असेल, पण काळाच्या थपडा खाऊन या पुतळ्यांची सध्याची अवस्था फारच दयनीय झालीय. हे पुतळे गाडीतूनच बघून आम्ही परत फिरलो. एव्हाना जेवणाची वेळ होत आली होती. परतीच्या प्रवासात ट्रीपमधील अत्यावश्यक कार्यक्रम म्हणजे गाण्याच्या भेंड्या पण खेळून झाल्या. एका छानशा रेस्टोरेंट मध्ये जेवणाची व्यवस्था होती. त्यात ईजिप्शियन प्रकारचेच पण बरेचसे आपल्या जेवनाशी जुळणारे मस्त जेवण करून आम्ही बाहेर पडून पुन्हा कालच्या लक्झर टेम्पलला वळसा घालत 'कर्नाक टेम्पल' इथे पोहोचलो. मागच्या भागात म्हटल्याप्रमाणे लक्झर टेम्पल आणि हे कर्नाक टेम्पल एकमेसमोर असून त्यांच्यात २.५ किलोमीटर अंतर आहे. आणि हा दोन किलोमीटरचा भाग एका भव्य राजमार्गाने जोडलेला होता. याच्या दोन्ही कडेस स्पिंक्सच्या (सिंहाच्या) हजारो दगडी प्रतिमा होत्या. आत प्रवेश केला तेंव्हा मधल्या हॉल मध्ये एक भव्य मॉडेल ठेवलेले होते. हे मॉडेल बघून त्या वास्तूच्या भव्यतेची कल्पना आली. एक संपूर्ण उपनगर बसेल एवढा त्या मंदिराचा परिसर होता. आत अनेक वेगवेगळ्या वास्तू अनेक राज्यांनी वेगवेगळ्या काळात बांधलेल्या आहेत. इथलें भव्य गोल खांब आणि चार ओबिलिस्क बऱ्यापैकी टिकून आहेत. एका ओबिलिस्क चा तुटलेला वरचा भागही इथे जतन करून ठेवलेला आहे. हे सगळं एके काळी भव्य असेलही पण सध्या मात्र फारच वाईट अवस्थेत आहेत. खरेतर या कर्णाकला सध्या टूर कंपन्या टेम्पल म्हणत असल्या तरी हा एक भव्य राजवाडा म्हणता येईल. इथे गॉड अमौन रा चा एक भाग आहे, पण इतरही इमारती पूजे पेक्षा राजकारभाराची सत्तास्थाने म्हणून वापरात असाव्यात अशा आहेत. खरोखर जेंव्हा हा भाग पूर्ण अस्तित्वात असेल आणि वापरात असेल तेंव्हा त्याच्या भव्यतेची कल्पना थक्क करणारी आहे. इजिप्त मधील हे सत्ताकेंद्र नक्कीच जगातील इतर देशांवरही वर्चस्व राखून असेल असे वाटते. कधीतरी सवडीने हा इतिहासही वाचायला पाहिजे.
येथून बाहेर पडलो आणि एअरपोर्ट गाठले. लक्झर हे इंटरनॅशनल एअरपोर्ट असले तरी अगदीच छोटेसे आपल्या पुणे एअरपोर्टसारखे होते. यथावकाश छोट्या विमानाने कैरो गाठले. इथे आमच्या फ्लाईट मध्ये आणि अमेरिकेच्या फ्लाईट मध्ये बराच गॅप असल्याने नितीन आणि अभयाने इथे आमचा निरोप घेतला आणि आम्ही नेहमीचे सोपस्कार पार पाडत बोर्डिंग गेट गाठले. खरेतर इथून पुढचा प्रवास रुटीनली व्हायला हरकत नव्हती. पण कैरो वरून सुटणारे विमानच एक तास उशिरा सुटले. कुवैत एअर पोर्टवर ट्रान्झिट पिरियड फक्त एक तासाचाच होता. त्यामुळे आम्ही कुवेतला पोहोचलो तेंव्हा आम्हाला मुंबईला घेऊन जाणारे विमान अगोदरच निघून गेलेले होते. मनात धाकधूक होती, आता पुढे काय? पण आम्ही अगोदरच दोन्हीकडचे बोर्डिंग पास घेतले असल्याने आणि दोनीही फ्लाईट कुवेत एअरलाईन्सच्या असल्याने आम्हाला दुसऱ्या विमानाने पाठवले जाईल असे सांगण्यात आले. पण आमची अगोदरची फ्लाईट सकाळी सातची होती, आणि पर्यायी दुसरी फ्लाईट रात्री ९ वाजता होती. पण कुवेत एरपोर्टने आमची दिवसभरासाठी एका छानशा हॉटेल मध्ये सोय केली. ते पाच मजली भव्य हॉटेल एअर पोर्टच्याच कॅंपस मध्ये असल्याने बाहेर जायची परवानगी नव्हती, पण हॉटेल मध्ये व्यवस्था मात्र फारच उत्तम होती. आम्ही इंडियन्स म्हणून त्यांनी आमचा सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचेही जेवण शुद्ध भारतीय प्रकारचे केले होते. इतके दिवस जेवणाची थोडीशी हेळसांड झालेल्यांनी या जेवणावर मात्र यथेच्छ ताव मारला. आणि दिवसभर आराम केला. रात्री ७ ला आम्हाला पुन्हा एरपोर्टवर आणून सोडण्यात आले आणि नवीन बोर्डिंग पास दिले गेले. विमानाला वेळ असल्याने इथल्या ड्युटी फ्री शॉपमधून सर्वांनीच मनसोक्त चॉकलेटची खरेदी केली. आणि पहाटे तीन वाजता मुंबईच्या विमानतळावर पायउतार झालो. अशाप्रकारे आमची हि इजिप्तची सफर अतिशय आनंदात, कुठलीही अडचण न येता पार पडली. पुढची अनेक वर्ष ही ट्रिप आठवणीत राहील हे नक्की. साताऱ्यातील ग्लोबल हॉलिडेज चे अल्ताफ पठण यांचे आभार मानायला हवेत. त्यांनी मला हवी तशी ट्रिप अरेंज करून दिली आणि कुठेही प्रॉब्लेम येणार नाही याची योग्य तजवीज केली. इजिप्तमध्ये अनेकदा ऐकायला आलेला, गमतीने वापरलेला, मनापासून आवडलेला आणि आठवणीतला एक शब्द म्हणजेच 'शुक्राण'.....................
अनिल दातीर. ९४२०४८७४१०