धामधूम ... जगरहाटी सुरू होती..प्रगती, अच्छे दिन.. कुणाचं काय तर कुणाचं काय चालू होतं...निसर्ग सहनशील...कोपला की काय?  कोण जाणे! सगळं ठप्प!

डिसेंबर महिना २०१९.... जगातला पहिला कोविड19 पॉझिटिव्ह  रूग्ण  सापडला.  जगाच्या कुठल्याशा कोप-यात.....नाव ऐकूनच हसायला आलं..आणि टीव्हीवरचं त्याचं रुपडं.. प्रत्येक चॅनेलवर..रंग वेगळा ..आकार वेगळा..पाहून तर हसून लोटपोट झाले.. .आपल्यापासून कोसों दूर तो...मस्त निसर्गाच्या कुशीत आहोत आपण..सुरक्षित...

फेब्रुवारी २०२० ... आता रुग्ण आपल्या देशात सापडला..तोही तसा दूरवरच...आपल्यापर्यंत सावटसुद्धा नाहीच पोचणार या  विषाणूचं...असं ठाम मत होतं माझं...आणि आलाच तर खिशात घालून  मिरवू, असा माज!

भीतभीतच नव्या वर्षाने मार्चमध्ये पाऊल टाकलं..सगळीकडे

फिरत फिरत बहाद्दर पोचला महाराष्ट्रात..आपल्या जिल्ह्यात ..आता मात्र लांब दणाणलं होतंच..टीव्हीवर रोज दर्शन देणारा हा अदृश्य शत्रू कधीही  माझ्या अंगणात येऊन ठेपेल अशी अवस्था झाली...सॅनिटायझरचे कॅन्स आणले..ड्रेसेस,  साड्यांच्या संख्येपेक्षा मास्कस्ची संख्या वाढली..घरातून बाहेर पडणं बंद..गरजेलाही नाही...अहोंनीच गरजेचे सामान आणायचं तेही ऑफिसला जाता-येता...त्यासाठी वेगळा हेलपाटा नाहीच नाही...

बेट्याचा तामझाम वाढला...सॅनिटायझेशन..वाफारा..काढे..आलं..दूध..हळद..आणि बरंच काही..

घरात बसून केकच्या नानाविध प्रकारांपासून कढईतल्या पावापर्यंत सगळं यशस्वीरित्या करून झालं... कथास्पर्धेत बक्षीसं मिळवून झाली..कविता करून झाल्या..ललित लेखांची संख्या वाढली..वक्तृत्व स्पर्धा गाजवल्या..पुस्तक परीक्षणं लिहून त्यातही बक्षीस मिळवून झालं.... मुलांमध्ये मूल होऊन खेळून झालं..बागकाम झालं..साठवणीचे वाळवणाचे सगळे प्रकार करून झाले...बेटा काही जायचं नाव घेईना...

अहो दिवसेंदिवस वाढत्या आकडेवारीच्या गुंत्यात अडकत होते आणि मी ..त्याच्या सूचना नाईलाजाने पाळत होते..करोनाची खिल्ली उडवत होते..लाॅकडाऊनचे नियम अतिशय संयमाने पाळले..पोर्चमधून खालीसुद्धा उतरलो नाही आम्ही तिघं..मुलं वैतागली..चिडली..पण तेवढंच...पुढं गप्प बसणंच फक्त हातात होतं...

बाबा घरी आले की त्यांना आपापल्या मित्रमैत्रिणीचे फोटोज् दाखवणं सुरू व्हायचं..हे पहा..अमकीढमकी इकडे फिरायला गेलेली..तो पहा..सोम्यागोम्या तिकडे फिरायला गेला..पण बाबा ढिम्म..नाही म्हणजे नाहीच...

करत करत जुलै उजाडला...आता मात्र पेशन्स संपले...वैष्णवीला तिच्या आवडीच्या क्षेत्रात नोकरी मिळाली...लाख खटपटी करून ती पुण्याला निघून गेली..सोबत बाबांच्या सूचनांचं भलंमोठं गाठोडं घेऊनच..
आता तिच्या नोकरीची बातमी सर्वांना सांगूच..पण ती स्थिरस्थावर झाल्यावरच..जरा पंधरा दिवस जाऊ दे..असं ठरवलं...

तोवर अहोंची वाईला बदली झाली...त्यांनीही आनंदाने स्वीकारली...आता रोजचा सत्तर किमीचा प्रवास..आता प्रिकाॅशन्स वाढल्या..दि.पाच ऑगस्टला ते वाईला हजर झाले..नवे सहकारी..नवीन बाॅस..नवं काम..आनंदीआनंद!

आता नव्या जोमाने नवे काम...घरात ही परत नवे नियम...
आठवडा उलटला आणि नव्या ऑफिसमधे नवे सहकारी कोविड19 पॉझिटिव्ह असल्याचे समजले..आता मात्र आमचं धाबं दणाणलं..तरीही अंतर्मन सांगत होतंच..छे..डोळ्याना न दिसणारा हा शत्रू आमच्या जवळपासही फिरकणार नाहीच.
मी अतिआत्मविश्वासाने ( की फाजील आत्मविश्वासाने) वावरत होते..पण सर्व काळजी घेणं डोळ्यात तेल घालून चालूच होतं...

उद्या चौदा ऑगस्ट...माॅर्निंग ड्यूटी..पण ऑफिसला जाण्यासाठी वाहनांची सोय नाही हे रात्री आठ वा समजलं..पाऊस पडत होता..धो धो..मनात घालमेल चालू होती..अहो तर ड्यूटी कॅन्सल करून घे असाच सल्ला देत होते..पण मी ठाम...जाणारच..पहाटे पाच वा अकरा नंबरच्या गाडीने प्रवास सुरू केला..न घाबरता पोचले ...ड्यूटी संपवून परत अकरा नंबरच्या गाडीने घरात परत..सकाळचे अकरा वाजलेले...

आल्यापावली समजलं..अहोंची आजच कोविड19 टेस्ट करून घ्यायची आहे म्हणून ते वाईला गेलेत...जरासं धस्स् झालं..पण विचार झटकला...रात्री साडेदहा वा तपासणी अहवाल मिळणार होता...अहो दुपारी तीन वाजता च घरी आले..

त्यानंतरचा वेळ मात्र जाता जाईना...अगदी साठ मिनिटांचा एक सेकंद झाला होता..करता करता अकरा वाजले...आता काही अहवाल येत नाही..बघू सकाळी ..असा विचार करून आम्ही अंग टाकलं.

.तितक्यात फोन रिंगला....तिकडचा मित्र कसंनुसं बोलला आणि ..अहोंनी आवंढा गिळलेला मी पाहिला आणि काय ते ओळखलं...

अरे मित्रा..तू पॉझिटिव्ह आहेस...असाच तो निरोप होता.

उद्या पंधरा ऑगस्ट...स्वातंत्र्यदिन..
कसा साजरा होईल? नक्की काय होणारे उद्या? आपली भूमिका काय असेल? ....

सगळा अंधारच....

क्रमशः

सविता कारंजकर

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel