सर्वात कठीण गेलं म्हणजे कारंजकर पॉझिटिव्ह आहेत हे समजल्यावर येणारे फोनकाॅल्स रिसीव्ह करणं..त्याच त्या प्रश्नांची उत्तरं..त्याच त्या सूचना आणिअमक्याचं असं झालं..तमक्याचं तसं..अशी उदाहरणं ऐकणं.. मग मी असं ठरवलं..या फोनकाॅल्सवर नियंत्रण ठेवायचं...चौकशीसाठी आलेले फोन उचलायचेच नाहीत
.फोन बंद करून चालणारच नव्हते..खूप कठोर होऊन हा निर्णय अंमलात आणला.
दरम्यान पंधरा ऑगस्ट ला आम्ही एक निर्णय घेतला त्याचा उल्लेख राहिला...पंधरा ऑगस्टलाच आम्ही ठरवलं की हे पॉझिटिव्ह आहेत म्हणून आणि मी आणि कृष्णा पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कात आहोत म्हणून ..तिघांनाही वैद्य संतोष महाडिक ( एम्.डी.आयुर्वेद) यांची औषधं घ्यायची...डाॅ नी सांगितलंबरहुकूम औषधोपचार, तेल, तूप, मध यांचा वापर..आहार..अगदी तसेच्या तसे...ही औषधं आमच्या वतीनं माझे मेहुणे जयवंत पोरे यांनी डाॅ कडे जाऊन घरपोच देण्याचं काम केलं (आणि अगदी काल पर्यंत म्हणजे दहा सप्टेंबरपर्यंत केलं)
प्रत्यक्ष माझ्या आणि कृष्णाच्या तपासणीचा दिवस जवळ आला..मी मनाने अत्यंत खंबीर होते... टेस्टरिपोर्ट पॉझिटिव्ह येणार अशी खात्री झालीच होती जवळपास. .. ये करोना ये..तुझेही स्वागत आहे मी घाबरत नाही आणि घाबरणारही नाही असं मी स्वतःला आणि कोविड19 ला बजावत होते...
अठरा ता ला माझी टेस्ट पॉझिटिव्ह आणि कृष्णाची निगेटिव्ह..
माझ्या हातचे खाद्यपदार्थ त्याला देऊन कसं चालेल? आणि नाही म्हटलं तरी माझी घाबरगुंडी उडाली होतीच..
अशा संकटकाळी माझी बहीण ( जीविता पोरे) भाऊजी (जयवंत पोरे) आणि तिचा मुलगा पीयूष यांचा रोल सुरू झाला...खाण्यापिण्याची व्यवस्था बहिणीने स्वतःच्या ताब्यात घेतली...डबे आणून देणं सुरू झालं..कृष्णा अंगणात ठेवलेले डबे ताब्यात घ्यायचा...त्याचं नाव असलेले डबे आधी काढून घ्यायचा आणि मग आम्हाला आत आणून ठेवायचा...यूज अॅण्ड थ्रोच्या पॅकिंगमधे आलेला आयता..गरमागरम, ताजा, स्वच्छ खात्रीचा आणि भरपूर व्हरायटी( शिवाय पथ्याचा ) असलेला आहार घेताना खरंचच उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ..असं का म्हटलंय हे ख-या अर्थाने समजलं...
त्या तिघांची त्रेधातिरपीट मला समजत होती पण पर्याय नव्हता..
एकोणीस ऑगस्ट..
आज माझा आणि माझ्या आईचा वाढदिवस..सकाळी सहा पासून फोन सुरू झाले..भावंडांचे, मित्रमैत्रिणींचे...
सर्वांशी अत्यंत संयमाने बोलले..तो दिवस यथातथाच गेला.
अहोंना खोकला , थोडा ताप अशी सौम्य स्वरूपाची लक्षणं होतीच..न चुकता पल्स ऑक्सीमीटरवर ऑक्सिजनलेवल आणि थर्मामीटरवर ताप पाहून ती नोंद ठेवणं चालू होतं. त्यांना वास येत नव्हता कसलाच आणि तोंडाला चवही नव्हती..सुदैवाने कृष्णाला कोणतंही लक्षण नव्हतं..तो हसतखेळत होता आणि आम्हा दोघांपासून स्वतःचा बचावही करत होता...त्याच्या मनात किती खळबळ उडाली असेल याची कल्पना न केलेलीच बरी!
याच दिवशी संध्याकाळी माझी आई वडूजहून सातारला माझ्या बहिणीच्या घरी आली..तिला मदत आणि आमची सेवा करायला..ती स्वतः सत्तरीत असताना...
आई या प्राण्याला कुठून बळ येतं अशावेळी? देवच जाणे!
कदाचित आजतागायत सर्वांचीच सेवा करण्यातच तिचा जन्म गेला असल्याने ती भक्कमपणे पदर खोचून उभी राहत असावी.
आता माझी बाजू भक्कम होत होती..आमच्या बरोबरीने माझी आई माझी बहीण आणि तिचं कुटुंब करोनाविरूद्ध उभं ठाकलं होतं..मी आश्वस्त होत गेले...आता लवकरच आम्ही शत्रूपक्षाला नामोहरम करणारच ...
वीस ऑगस्ट
सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सतत स्वतःशी सुसंवाद साधणं सुरूच होतं.. आपल्याला काहीच होणार नाही, हे सतत स्वतःला आणि दोघांनाही सांगत होते..घाबरायचं नाही आणि कोणताही त्रास , लक्षण लपवायचं नाही..दुर्लक्षित करायचं नाही हेच बोलायचो आम्ही..
डबे वेळच्या वेळी येत होते..औषधोपचार, गरम पाणी, वाफारा , काढे यात चुकूनही खंड पडला नाही...असाच एकवीस ऑगस्टही साशंक अवस्थेत गेला.
क्रमशः
सविता कारंजकर