बावीस ऑगस्ट

गणेश चतुर्थी...कसलीच गडबड नाही..उत्साह नाही...कुणाची अंघोळ नाही ..अरे साधं दारही उघडलं गेलं नाही...
सूर्य उदयाला येऊन पाच तास उलटले तरीही घरात मिट्ट अंधार !
विजेच्या उपकरणांनीही जणू संप पुकारला होता!

अहोंचा त्रास कमी होत होता...कृष्णा आनंदाने आयसोलेट राहिला होता...मीच नरमगरम होते..कदाचित नैराश्य आलं असावं..

दिवस कलला... आणि मला ताप आला...लक्षणं दिसायला सुरुवात झाली..ताबडतोब वैद्यांना फोन करून तशी कल्पना दिली..त्यांच्या सूचनेबरहुकूम औषधाची मात्रा वाढवली...

जेवणाच्या डब्याची वाट बघत होते..माझे सर्वात जास्त आवडते मोदक येणार होते डब्यात...आले डझनभर..पण खाल्ला कसाबसा एकच..चवच लागली नाही..तेव्हाच लक्षात आलं की दिवेलागणीला धूप लावलेला ..वास नाही आला..मग कापराची वडी हुंगून पाहिली...छे..वास नाहीच..चंदनाची उदबत्ती लावली..छे..
घाबरून झोपी गेले..गाढ झोप ही लागली..जाग आली ती प्रचंड डोकेदुखीने...मेंदूतील शीरा तटतट आवाज करत होत्या..डोळे उघडले तरी समोर अंधार पसरलेला..धडपडत लाईट लावला..काही दिसेना...पाय आहेत की नाही मला?
बापरे..चाचपडत ऑक्सिमीटर शोधला..अहोंना उठवलं...

ऑक्सिजनलेवल 72..वीज कडाडली...लगेचच दवाखान्यात जायला हवं..घड्याळ पाहिलं..पहाटेचे तीन वाजलेले...

वाट पहात बसण्याखेरीज ऑप्शन नव्हता...धीर संपत चाललेला..कारण श्वास घेताना त्रास व्हायला लागलेला..
देवा गणराया .. सोसायला बळ दे..म्हणत अडीच तास काढले...साडेपाच वा  राजकिरणला ( माझ्याभावाला ) फोन करून वस्तुस्थिती सांगितली...तो फार्मासिस्ट असल्याने मेडिकल फिल्डमध्ये त्याच्या  भरपूर  ओळखी आहेत..योग्य सल्ला देऊन प्रत्यक्ष मदत करणारे डाॅक्टर्स त्याच्या अवतीभवती...

त्याने वडूजमधून फोन फिरवले...माझी बहीण आणि तिच्या कुटुंबाने धावपळ केली..डाॅक्टर आणि बेड मिळवलं...

दरम्यान मी जवळपास बेशुद्ध असल्यासारखीच पडून होते..वेदना असह्य ..

आता मी घरातून हाॅस्पिटलमध्ये जाणार कसं?

अॅम्ब्युलन्स...

आली..

मी बाहेर पडले घरातून..
एव्हाना खात्री झालेली..आता काही आपण परत येत नाही..

पण तितक्यात माझं लक्ष कृष्णाकडे गेलं..तो केविलवाणा चेहरा करून माझ्याकडे  पाहत होता..त्याच्या चेह-यावर असंख्य प्रश्न होते...

त्याक्षणी मी स्वतःला सावरलं..

लहान लेकरं किती बळ देतात याची कल्पना त्याही स्थितीत मला आली..

मी निश्चय केला...मला जगायचंय..आणि चांगलंच जगायचंय...या निरागस मुलासाठी..

धडपडत अॅम्ब्युलन्सजवळ आले....आता तर माझी एक नाकपुडी पूर्ण बंद पडलेली...

दहा मि त दवाखान्यात पोचलो...वेळेवर मला दवाखान्यात पोचवल्याबद्दल अॅम्ब्युलन्स चालकाला हात जोडले...काहीतरी पुटपुटले..आभार मानायला शब्द कमी पडले की माझी ताकद!

.सुदैवाने डाॅ. संग्राम देशमुख  दवाखान्यातच गणरायाची आरती करत होते..

सगळं सुदैवाने जुळून आलेलं..वेळेत बेड मिळणं..अॅम्ब्युलन्स मिळणं( अॅम्ब्युलन्स मिळणं ही कठीण गोष्ट आहे) डाॅ हजर असणं...

अर्ध्या तासातच औपचारिकता पूर्ण करून उपचार सुरू झालेले..

बेडवर पडून आयसीयूतली मोठमोठी उपकरणं, त्यातून बाहेर पडणारे रंगीबेरंगी लाईटस् , त्यावर पळणारे कसलेतरी  ( जीवघेणे) आकडे..आणि टुकटुकपुकपुक येणारा आवाज...
आसपास खोकणारे..ओरडणारे आणि तळमळणारे  माझ्यासारखे पेशंटस् आणि देवदूत भासणारे..नव्हे असणारे नर्सेस, ब्रदर्स..आया.. डाॅक्टर्स ...पण सगळे अनोळखी चेहरे..
आपली माणसं आठवू लागली..

मला वेळेवर औषधोपचार मिळण्यासाठी धडपडणारी माझी माणसं... झेपत नसताना माझ्यासाठी जेवण बनवणारी आणि माझ्यासाठी देवाकडे रात्रंदिवस धावा करणारी माझी आई...

किती  किती माझ्यावरी
माझ्या माणसांची आभाळमाया
आभाळ आणूनी धरतीवरी
केली माझ्यासाठी छाया

ओळी गुणगुणत असतानाच ग्लानी आली...औषधं काम करू लागली..अर्ध्यामिटल्या डोळ्यांना आशेचा किरण दिसू लागला..

क्रमशः

सविता कारंजकर

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel