पाचव्या भागाला  जास्तच उशीर झालाय...अनेक स्नेह्यांचे फोन- मेसेजैस आले ...वाट पहात असल्याचं त्यांनी कळवलं...
खरंतर लिहिताना खूप इमोशनल व्हायला होतंय..म्हणून लिखाण रेंगाळलं ...अजून एक भीती वाटत होती..लिखाणातून वाचकांच्या मनात भीती तर निर्माण होत नसेल ना?...

आणि म्हणूनच आज थोडी वेगळी  बाजू मांडण्याचा प्रयत्न करते..

लक्षणं ओळखून योग्य वेळी हाॅस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आम्ही....तिथं ओळखीचा एकही चेहरा दिसेना...मग जे चेहरे दिसत होते त्यांचीच ओळख झाली..थोडं बरं वाटलं..औषधोपचार काम करत होते.. घरी परतण्याची ओढ होतीच...योग्य आहार मिळत होता..तोही वेळच्या वेळी..

आता खात्री झाली की आपण मरणाला स्पर्श करून आलोय..मग इतर प्रश्न पडू लागले...इतकं चवदार जेवण करताना  बहिणाबाईला किती त्रास होत असेल? तिला मदत करणारी माझी आई किती थकत असेल? तिला झेपत असेल? तिची मनस्थिती कशी असेल? पाऊस कोसळतोय..डबे घरून हाॅस्पिटलमध्ये आणणारे मेहुणे आणि भाचा..त्यांना कंटाळा आला असेल? फक्त डबे पोचवायचे नव्हते त्यांना..तर रोज औषधांची भलीथोरली यादी ..आणून द्यायची..शिवाय त्यांना कुणालाही मी दिसत नव्हते..तीही काळजी असेलच की त्यांना...

आठवडाभरात च घरी आले..तो क्षण अविस्मरणीय ..कृष्णाला झालेला आनंद तो लपवू पहात होता त्याला अजूनही असंख्य प्रश्न होतेच...आई पूर्ववत कधी दिसणार?आईला स्पर्श कधी करायचा? तो आईच्या स्पर्शाचा भुकेला झाला होता आणि मीही..मला कृष्णाला घट्ट कुशीत घ्यायची तीव्र इच्छा झालेली..पण मनात  भीती  दाटलेली होतीच..तासाभराने त्याने चुकून हाताला हात लागल्याचं नाटक केलं..."ओह आई..चुकून झालं गं..तुला त्रास झाला का?" असं त्यानं विचारताच मात्र माझा बांध फुटला...होती नव्हती ती सगळी ताकद पणाला लावत मी उठले आणि त्याला जवळ घेतलं...तो स्पर्श कृष्णासाठी खूप उबदार, वात्सल्याचा आणि आश्वासक होता..त्याला खूप काही समजलं असावं त्या वेळी..नंतर तो जे वागला माझ्यासोबत...त्याचं वर्णन करायला नवी बाराखडी तयार करावी लागेल...आठच दिवस..पण खूप खोलवर परिणाम झाला होता त्याच्या मनावर...

त्याचाच विचार करत आठवडा गेला..मला खरंतर खूप उत्सुकता होती की मी अॅडमिट असताना आईच्या आणि बहिणीच्या काय भावना असतील? त्या दोघी घाबरल्या होत्या की खंबीर मनाने सगळं करत होत्या? काय विचार होते त्यांच्या मनात? हे सगळं जाणून घ्यायला बहिणीला फोन केला..मला सगळं जाणून घ्यायचं म्हटल्यावर आता तिचा संयम संपला..
"केवळ आईमुळे तू वाचलीस.."

या वाक्याने तिने सुरुवात केली..

स्वयंपाक करणं..डबे भरणं..हे काम तर ती करतच होती पण त्याचबरोबर अहोरात्र आईनं तुझ्यासाठी नामस्मरण करीत रात्री जागवल्यात... डोळ्यातून अखंड गंगाजमुना वाहत होत्या ..मन तुझ्याकडे धाव घेत होतं तिचं तर तोंडाने जप...

आईची  लेकरासाठी केलेली प्रार्थना  देव ऐकत नाही असं होतच नाही...डाॅ , सिस्टर्स, ब्रदर्स आया मामा..हे जे कोण झटले तुझ्यासाठी...ते सगळे आई साठी देवाने धाडलेले त्याचे दूतच होते...

तिचे हे शब्द ऐकून क्षणभर माझ्या काळजाचा ठोका चुकला..   
माझ्याकडचे शब्द संपले....

आईचे हे ऋण मी कसे फेडणार आहे? आई..खरंच
.मी काय लिहू आई साठी?
जगन्नियंत्याचे आभार मानले की त्याने मला अशी आई दिली..

खूप वेळ सुन्न होऊन बसले होते...
जरा सावरल्यावर मनाचा हिय्या करून आईला फोन केला..

ती बहुतेक वाटच पहात होती..
मी आज बरीच बरी आहे कालपेक्षा ..अशी अडखळत सुरुवात मी केली आणि आता तिचाबांध फुटला...

आक्कीमुळं    तू आज उभी आहेस...( आम्ही दोघं भावंडं आमच्या  मोठ्या बहिणीला "आक्की" म्हणतो.. ताई, दीदी म्हणायचा अनेकदा प्रयत्न केला पण आक्की कधीच ताई किंवा दीदी होऊच शकत नाही)

मला काय बोलावं सुचेना..खूप वेळ निःशब्द होतो आम्ही..आईनेच शांततेचा भंग केला..

आक्कीनं खूप केलं तुझं ..असं बहिणीबहिणींचं प्रेम खूप दुर्मिळ आहे गं!
सगळं श्रेय आई आक्कीला देत होती..
मला काय बोलावं सुचेना..

आई आक्कीबद्दल बरंच काही सांगत होती..मला ते शब्द ऐकूच येत नव्हते ..मी माझी श्रीमंती ह्रदयात साठवून घेत होते..

फोन ठेवला...दोघीही कसलं श्रेय स्वतः कडे घेत नव्हत्या..त्यांच्या समोर एकच ध्येय होतं...मला पूर्वीसारखी ठणठणीत बघणं...

राजकिरण शक्य तितकी मदत करत होता..त्याच्याशी बोललं की मला धीर येत होता..जगण्याचं बळ मिळत होतं...माझ्या मनात नकारात्मक विचार  येऊ न देण्याचा चंगच जणू त्यानं बांधला होता..असा भाऊ प्रत्येक बहिणीला मिळावा...

नाना अडचणींना तोंड देत देत माझी माणसं माझ्यासाठी झटली .. ..
मी हाॅस्पिटलमध्ये असताना घरी कृष्णा आणि त्याचे बाबा होते..त्या दोघांना डबे देण्याची जबाबदारी माझ्या  दीरांनी कुमारभाऊजीनी आणि ताईंनी घेतली..जावा-जावा उभा दावा..कधीच नव्हता आमच्यात आणि नसेलही..त्या दोघांना काय हवं नको ते बघण्याची सगळी जबाबदारी कुमारभाऊजीनी घेतली..

अनेक मित्रमैत्रिणींनी या कालावधीत फोन्स केले..मेसेजैस केले..ब-याच जणांना मी उत्तर दिलं नाही..तरीही कुणी गैरसमज करून घेतला नाही..मला खात्री आहे की माझे सगळे स्नेही माझ्यासाठी प्रार्थना करत होते..

आता माझ्या अवतीभवती माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी माणसं आहेत या कल्पनेनंच मला भरून आलं ..खरंतर या प्रेमाची आधीही खात्री होतीच..फक्त परत एकदा प्रत्यय आला..
अनप्रेडिक्टेबल असा हा वाईट्ट अदृश्य शत्रू यमासोबत मला घ्यायला आला होता पण माझी टीम  इतकी बलशाली आहे की त्याला नामोहरम व्हावंच लागलं...

या सगळ्या प्रेमळ माणसांच्या ऋणात राहणं आणि त्या सगळ्यांवर प्रेम करत राहणं हेच आता माझं ध्येय..

खूप काही लिहायचं होतं...अनेक दिवस रखडलेलं हे लिखाण अखेर अर्धवटच राहिलं..आईची माया कशातच तोलता येत नाही..बहिणीचं प्रेम शब्दात बांधता येत नाही..

खरंतर उगीचच मी हा  लिखाणाचा आटापिटा केला!

आता सर्वांच्या कष्टाला फळ तर आलंच पाहिजे..ते येणारच..  
कारण हाॅस्पिटलमधून घरी आल्यावर  माझ्यासाठी नव्हे तर माझ्यावर प्रेम करणा-या प्रत्येक माणसासाठी मी स्वतःला जपलं ..जपतेय आणि जपणार आहेच...

सकारात्मकता टिकवून ठेवणं आणि शारीरिक आरोग्य जपणं आपल्याच हातात आहे..मी काय केलं त्यासाठी...ते पुढील भागात लिहीणारच...
आता डोळ्यांना जो पूर आलाय त्यात चिंब भिजते...

क्रमशः

सविता कारंजकर

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to केअरटेकर टू पॉझिटिव्ह


आपणच विजयी होऊया
केअरटेकर टू पॉझिटिव्ह
लॉकडाऊन , मी आणि माझं मनस्वास्थ्य
लॉकडाऊन लेखन स्पर्धा विशेषांक
कोरोना व्हायरसचा सामना कसा कराल?