मध्यरात्रीपासून टांगणीला लागलेला जीव पहाटेच्या वेळी टाहो ऐकताच सुखावला. चौदा वर्षाच्या तिच्या अल्लड मनाला मातृत्वाची पोक्त किनार चढली! आकाशही ठेंगणे वाटावे असा आनंद होता तो... उत्सव होता... मातृत्वाचा! मुलगा झाला आणि दहा दिवसातच तापाने फणफणला. वैद्यास बोलावणे गरजेचे होते. मात्र वैद्याने घरी येणे, नाडीपरीक्षा करणे तिच्या नवऱ्याला बावळटपणाचे वाटत होते. गावात इंग्रजी वैद्यक जाणणारा एक डॉक्टर होता... तो दारुतली भडक औषधे द्यायचा असे सगळे म्हणत. त्याला घरात आणायचे.... बाळंतीणीच्या खोलीत न्यायचे.... मुलाला तपासायला सांगायचे हे तर निव्वळ अशक्यच होते. योग्य उपचार मिळाले नाहीत त्यामुळे बाळाला बरे वाटलेच नाही.... एका पहाटे त्याने आपले रडणे थांबवले आणि चिरनिद्रिस्त झाले. अशा वेळी गावात एखादी महिला डॉक्टर असती तर!! त्या कोवळ्या आईच्या मनात या विचाराने घर केले ते कायमचेच!! चार दिवसाच्या पाहुण्यासारखा बाळ आला.... पण महिला डॉक्टरची देशात असणारी गरज दाखवून गेला. आपल्या आईच्या मनात जगण्याचा नवा अंकुर रुजवून गेला. याच अंकुराला शिक्षणाचे खतपाणी घालून समाज विरोधाचा ऊन-वारा सोसून वैद्यकीय शिक्षणाचे बी भारतभूमीत रुजवणारी ती पहिली महिला होती - डॉ. आनंदी गोपाळ जोशी!
श्री गोपाळराव जोशी यांची पत्नी असलेली आनंदी म्हणजे पूर्वाश्रमीची यमुना. तिचा जन्म कल्याणचा. ३१ मार्च १८६५ साली जन्मलेल्या यमुनेचा वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी गोपाळरावांशी विवाह झाला. घरची जेमतेम आर्थिक परिस्थिती आणि आनंदीचा सावळा वर्ण यामुळे पदरी पडले ते पवित्र मानून वीस वर्षांनी मोठ्या असणाऱ्या गोपालरावांशी वडिलांनी सोयरीक नक्की केली. महिलांच्या शिक्षणाचे फारसे महत्व नसणारा काळ होता तो. अशा काळात 'लग्नानंतर मी मुलीला शिक्षण घ्यायला लावेल आणि त्यात कोणीही आडकाठी आणायची नाही' या गोपालरावांच्या अटीवर हा विवाह जमला. त्या वेळी गोपाळराव कल्याणला पोस्ट ऑफिसमध्ये कारकून होते. लग्नाच्या अगदी दुसऱ्या दिवसापासून आनंदीच्या मागे त्यांनी शिकण्यासाठी तगादा लावला. पण हूड वयाच्या आनंदीला सुरुवातीला त्यात राम वाटत नसे. इतर मुलींसारखे नटणे-मुरडणे, खेळणे-बागडणे यातच ती वेळ घालावी. मग वेळ प्रसंगी नवऱ्याच्या हातचा धम्मक लाडू खाई. ज्या काळात सामान्य घरातील बायका स्वयंपाक केला नाही, किंवा करायला उशीर झाला म्हणून आपल्या पतीचा मार खात असत, त्या काळात स्वयंपाक का केला म्हणून गोपाळराव आनंदीला रागे भरत किंवा मारत असत. कारण चुलीजवळ बसण्यापेक्षा आनंदीने चार पुस्तके वाचावीत असे त्यांना मनोमन वाटे. हळू हळू फिरायला नेण्याचे, लुगडे आणण्याचे असे छोटे छोटे आमिष दाखवून गोपालरावांनी आनंदीचे मन अभ्यासात रमवायला सुरुवात केली. तिच्या शिक्षणासाठी त्यांनी स्वतःची बदली कल्याणहुन अलिबाग व पुढे कोल्हापूरमध्ये करवून घेतली. आपल्या पत्नीला खूप शिकवायचे हे एकच जीवनध्येय बाळगून चालणारे पुरोगामी पती होते गोपाळराव! त्यांच्या या तळमळीची हळूहळू आनंदीला जाणीव झाली. ती हुशार होती. अभ्यासात तिला गती होती.
पुढे उपाचार न मिळाल्याने आपले मूल दगावले याची आनंदीबाईंच्या मनाला चांगलीच बोचणी लागली. आपण वैद्यकीय शिक्षण घ्यावे. आपल्या देशातल्या महिलांना साह्यभूत व्हावे, अडचणीतून सोडवावे या भावनेने त्यांना जगण्याची नवी उमेद दिली. जीवनाला अर्थ दिला. मनाला पंख फुटले. स्वप्न गवसले. गोपाळरावांमध्ये असणारी स्त्री-शिक्षण विषयक जिद्द आनंदीबाईंना खूप सहाय्यभूत ठरली. आपल्या पत्नीची ही जिद्द बघून त्यांनी अमेरिकेत पत्र धाडले. आनंदीबाईंच्या शिक्षणाविषयी लिहिले. त्यांना काही नौकरी–काम मिळू शकते का याबद्दलही विचारले.
उलट टपाली उत्तर आले पण त्यात धर्मांतराची अट होती. गोपालरावांना ती साफ अमान्य होती. असे म्हणतात की विधिलिखित गोष्ट घडायची असेल तर त्यासाठी आवश्यक योग कोणत्या ना कोणत्या मार्गाने जुळून येतातच. गोपाळराव आणि आनंदीच्या बाबतीतही असेच घडले. गोपालरावांनी ज्यांना पत्र पाठविले होते त्यांनी त्यांच्या मासिकात हिंदुस्थानातून आलेल्या या पत्राचा उल्लेख केला. त्या गोष्टीने जणू आनंदीच्या जीवनालाच नव्हे तर जणू इतिहासालाच कलाटणी दिली...!
दूर देशी. सात समुद्रापार अमेरिकेत कोणी मिसेस. कार्पेंटर यांना दाताचे दुखणे आले. त्या त्यांच्या डेन्टीस्टकडे गेल्या. डॉक्टर दुसरे पेशंट तपासात होते. कार्पेंटरबाईनी मेजावरचे पुस्तक उचलले. वाचू लागल्या. त्यांची नजर हिंदुस्थानातून आलेल्या पत्रातील मजकुरावर गेली. त्यांनी मनोमन गोपाळराव आणि आनंदीबाई जोशी यांना मदत करण्याचे ठरवले. त्यांनी तसे पत्र पाठविले. हा पत्रव्यवहार म्हणजे जणू आनंदीबाईंच्या वैद्यकीय शिक्षणाचा पाया म्हटले तरी वावगे ठरू नये!! यथावकाश वैद्यकीय शिक्षणासाठी आनंदीचे अमेरिकेला जाणे निश्चित झाले. पण गोपाळरावांच्या नोकरीचे काही जमत नव्हते. भारतातून त्यांना रजादेखील मंजूर होत नव्हती. तेव्हा आनंदीने एकटेच अमेरिकेस जावे असे ठरले. आज अमेरिकेला जाणे म्हणजे केवळ बारा ते चौदा तासांचा विमानप्रवास इतकाच उरला आहे. मात्र ज्या काळात आनंदीबाई जाण्यास निघाल्या तो काळ सोपा नव्हता. त्या काळी बोटीचा प्रवास असे... तो देखील काही महिन्यांचा! समुद्र ओलांडून जाणे म्हणजे पाताळात जाणे अश्या कर्मठ मनोवृत्तीची माणसे ज्या काळात सर्वत्र होती, त्या काळात महिला सातासमुद्रापार जाणार, तेही एकटी म्हणजे तर महाकठीण होते. खूप कडवा विरोध झाला आनंदी-गोपाळ यांच्या निर्णयाला त्या काळात. अगदी त्यांच्या घरातूनही!! त्यावेळी आनंदीबाईंनी कोलकाता येथे केलेल्या एका भाषणात भारतामध्ये महिला डॉक्टरांची किती आवश्यकता आहे हे पटवून दिले. त्यांनी स्पष्ट सांगितले की, "मला यासाठी धर्मांतर वगैरे करण्याची काही गरज नाही. मी माझा हिंदु धर्म व संस्कृती यांचा कदापि त्याग करणार नाही. मला माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात येऊन महिलांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे आहे." आनंदीबाईंचे हे भाषण लोकांना खूप आवडले. त्यामुळे त्यांना होणारा विरोध तर कमी झालाच पण त्यांना या कार्यात हातभार म्हणून सबंध भारतातून आर्थिक मदत जमा झाली. भारताचे तत्कालीन व्हाइसरॉय यांनी पण २०० रुपयांचा फंड जाहीर केला.
५५ दिवसांच्या बोटीच्या प्रवासानंतर आनंदीबाई एकट्या अमेरिकेस पोहोचल्या. आपल्या वैद्यकीय शिक्षणाची पायाभरणी करणाऱ्या देवदूतासारख्या कार्पेन्टर मावशींना उराउरी भेटल्या. मनोमन आनंदल्या. आनंदीबाईंची तळमळ आणि गोपाळरावांची चिकाटी यांचे फलित म्हणजे आनंदीबाईंना ख्रिस्ती धर्म न स्वीकारता १८८३मध्ये, 'विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हानिया'मध्ये प्रवेश मिळाला. वुमन्स मेडिकल कॉलेज जणू त्यांचे तीर्थक्षेत्रच झाले. अभ्यासाचा त्यांना ध्यास लागला. स्वप्नपूर्तीची साधना सुरु झाली. अवघी सतरा-अठरा वर्षाची पोर ती; कधी कधी घराच्या आठवणीने कावरी-बावरी होत असे. पण लाडक्या कार्पेन्टर मावशीचा खूप खूप आधार मिळाला या काळात. घराची उणीव कधी भासू नाही दिली त्यांनी तिला. तीन वर्षांच्या अथक परिश्रमाचे चीज आता होणार होते. एम.डी.साठी ‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र’ या विषयावर आनंदीबाईंनी प्रबंध सादर केला. परीक्षा झाली. यथावकाश निकाल लागला. आनंदीबाई पास झाल्या. हिंदुस्थानातील पहिल्या महिला डॉक्टर झाल्या!! ११ मार्च १८८६ !! आनंदीबाईंचा पदवीदान समारंभ झाला. त्याच्या सोबत खंबीर साथ देणारे त्यांचे पती गोपाळराव समारंभास आले होते. पंडिता रमाबाई होत्या. वर्तमानपत्रांनी खूप खूप दखल घेतली. जिकडे तिकडे बोलावणे आणि कार्यक्रम सुरु झाले. कॉलेजातील काही मंडळीनी सत्कार सोहळा घडवून आणला. व्हिक्टोरिया राणीकडूनसुद्धा त्यांचे अभिनंदन झाले.
एक वर्षाचा अनुभव घ्यावा. आणि मायदेशी निघावे. असे आनंदीबाईंनी मनोमन ठरवले. एकीकडे त्या अनुभवाने सिद्ध होत होत्या तर दुसरीकडे अमेरिकेतील अतिथंड वातावरणाचा सामना करताना त्यांचे शरीर क्षीण होत होते. तब्येत साथ देत नव्हती. पण ध्येय मात्र स्वस्थ बसू देत नव्हते. अशातच दुधात साखर पडावी तसे कोल्हापूर संस्थांनात वैद्यकीय अधिकारी म्हणून रूजू होण्याबाबत आनंदीबाईंना आग्रहाचे पत्र आले. सोबत पहिल्या वर्गाची दोन तिकिटे पाठविली गेली. पण ती तिकिटे कारणी आली नाहीत. पाश्चात्य लोकांच्या दृष्टीने भारतीय लोक कृष्णवर्णीय असल्यामुळे पहिल्या वर्गातून तर नाहीच पण या बोटीनेच प्रवास करण्यास त्यांना परवानगी नाकारली गेली. गोपालरावांनी प्रयत्नपूर्वक दुस-या बोटीची व्यवस्था केली.
परतीचा प्रवास सुरु झाला. कॉलेज मधील प्राध्यापक आणि मैत्रिणी यांनी शुभ-भावनांचा वर्षाव केला. या सर्व गलबलाटात आनंदीबाई आणि तिची लाडकी मावशी मावशी.... कार्पेंटरबाई हेलावली. मनातून त्यांच्या विरहाची जाणीव तिला होवू लागली. अस्वस्थता त्यांच्या देहबोलीवर दाटून आली. पण ध्येयपूर्ती साद घालत होती. आनंदीचे मन तिथेही ओढ घेत होते. आपल्या मायभूमीचा पदस्पर्श होताच आनंदी धन्य धन्य झाली. मात्र स्वदेशी पोहोचेपर्यंत तब्येतीच्या अनेक कुरबुरी वाढल्या होत्या. क्षयरोगाने त्यांना ग्रासले होते. भारतातील कर्मठ वृत्तीच्या लोकांनी परदेशातून डॉक्टर होऊन आलेल्या आनंदीबाई आणि गोपालरावांची अवहेलना सुरू केली. कोणताही वैद्य आनंदीबाईंवर उपचार करण्यास तयार नव्हता. आनंदीबाईंना जणू सरण शय्येचे वेध लागले. शरीर सुटण्याचा काळ जवळ येऊ लागला. शरीराचा तर पिंजरा झाला होता उपचाराअभावी! डॉक्टर होऊनही मनात रुजवलेले सेवा व्रत पूर्ण करता येत नसल्याची खंत त्यांचे मन पोखरत होती. आपल्या अपार जिद्दीने लाखो भारतीय महिलांसमोर प्रेरणादायी जीवनादर्श उभा करणाऱ्या आनंदीची ज्योत २६ फेब्रुवारी १८८७ रोजी अलगद मालवली. भारतीयांचे दुर्दैव होते की त्यांना अश्या ज्ञानी स्त्रीच्या बुद्धिमत्तेचा फायदा होऊ शकला नाही. ज्या काळात सावित्रीबाई व ज्योतिबा फुले स्त्रियांना चूल आणि मूल या बंधनातून बाहेर काढण्यासाठी झटत होते, त्याच काळात आनंदी-गोपाळ या जोडप्याने एक अद्वितीय स्वप्न बघितले, देशाला दाखवले आणि जिद्दीने ते पूर्ण केले. जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही याचा आदर्श जणू उभा केला डॉ. आनंदी गोपाळ जोशी या अवघ्या एकवीस वर्षाच्या युवतीने! आज काळ बदलला आहे. मुलींनी डॉक्टर होणे किंवा अमेरिकेस जाणे आज नवे नाही. कधीतरी केलेल्या संघर्षामुळे आज हे सहजसाध्य होते आहे. म्हणूनच अविश्रांत परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि ध्येयवेडेपणासाठी युगायुगांपर्यंत नेहमीच कृतज्ञतेने स्मरली जाईल ही दुर्गा भरतभूमीची!!
~ मैत्रेयी पंडित