सन १९३६! दिल्लीच्या विमानतळावर जिप्सी मोथ नावाचे टू-सीटर विमान डौलाने उभे होते. निरभ्र वातावरणाच्या छायेत, स्वच्छ सूर्यप्रकाशात सुती साडी नेसलेली एक युवती जिप्सी मोथच्या दिशेने चालत आली. तिने विमानाच्या कॉकपिटचा ताबा घेतला. आणि इतिहासाचे नवे पान रंगवत तिने आकाशात भरारी मारली. भरतभूमीच्या नभंगणावर पहिली भारतीय महिला वैमानिक म्हणून आपले नाव कोरले!! ती युवती होती सरला ठकराल! स्त्रियांच्या कल्पनेला सुद्धा जेव्हा भरारी मारण्याची परवानगी नव्हती तेव्हा खरीखुरी आकाशभरारी मारून आल्या होत्या सरलाजी!! गगन भरारी घेणे प्रत्येकाचेच स्वप्न असते. पण प्रत्येकाचे आकाश वेगळे असते. त्या आकाशात मुक्त विहार करण्यासाठी पंखांपेक्षा अनेकदा धैर्याची गरज असते. एकदा धैर्य गाठीशी असले की आकाश बदलले तरी झेप तशीच कणखर राहते... अगदी आयुष्यभर!! सरला यांचे आयुष्य याचे सुंदर उदाहरण होते. अनेक स्थित्यंतरे पहिली पण आपली भरारी मारणे त्यांनी थांबवली नाही. कालानुरूप स्वरूप बदलले तरी त्यांनी निर्माण केलेला आदर्श सदोदित वाखाणला जावा असाच होता.
सरला ठाकराल! १९१४ साली दिल्ली येथे त्यांचा जन्म झाला. स्वातंत्र्यपूर्व काळ होता तो. आजूबाजूच्या चार मुलींसारखेच त्यांचेही आयुष्य होते. सोळाव्या वर्षी पालकांच्या संमतीने पी. डी. शर्मा यांच्याशी त्यांचे लग्न झाले. आणि मग सरलाचे क्षितिज विस्तारले, नभंगणावर झेपावले!! त्या काळात विमानसेवा नवीनच सुरू झाली होती. तोपर्यंत आकाश ही केवळ पक्ष्यांचीच मक्तेदारी होती. आकाशात उडणारे मशीन बघून लोकांना अप्रूप वाटे आणि भीतीही!! विज्ञान क्षेत्रात तर त्याकडे चमत्कार म्हणून पाहिले जात होते. त्यामुळे आपला जीव धोक्यात घालून विमानात बसायला लवकर कोणी धजावत नसे. संपूर्ण देशभरातून मूठभर लोकांना वैमानिक म्हणून मान्यता मिळाली होती. त्या मूठभर लोकांमधील तब्बल आठ जण सरला यांच्या सासरी होते. त्यांचे पती पी. डी. शर्मा यांचाही त्यात समावेश होता. सुरुवातीच्या काळात भारतात विमानसेवा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पत्रव्यवहार जलद करण्यासाठी सुरू करण्यात आली होती. त्या वेळी एयरमेल पायलट म्हणून परवाना मिळवणारे पी. डी. शर्मा हे पहिले भारतीय व्यक्ती होते. आपल्याला असलेले भरारीचे वेड शर्मा यांना आपल्या पत्नीलाही द्यावे वाटले. विशेष म्हणजे यात त्यांना पाठिंबा मिळाला तो त्यांच्या वडिलांचा! महिलांनी घराबाहेर पडले तरी खूप मोठे स्वप्न पूर्ण केले अशी मानसिकता होती त्या काळात सरला यांना पतीने संपूर्ण आकाश देऊ केले विहरायला. नक्कीच भीती वाटली असणार सरलाजीना. पण पती आणि सासाऱ्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे त्यांनी हिम्मत केली. त्यावेळी त्यांना कल्पनाही नव्हती की त्या एक इतिहास घडवण्याची तयारी करत आहेत. अखंड भारतात क्रांतीचे एक प्रचंड मोठे वादळ सुरू असणारा काळ होता तो! महिला सशक्तीकरणासाठी केल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रयत्नाला सनातनी लोकांच्या प्रचंड विरोध आणि टीकेला सामोरे जावे लागायचे. सरला आणि त्यांच्या पतीलाही त्याचा थोडाफार सामना करावा लागला. पण घरातून असणाऱ्या खंबीर पाठिंब्यामुळे फारसे अशक्य नाही वाटले काही.
सरला यांच्या प्रशिक्षणानंतर त्यांनी एकटीने भरारी मारली आणि त्या पहिल्या भारतीय महिला वैमानिक झाल्या. काही तासापूर्वी पर्यंत विरोध करणारे आता त्यांना ही आपल्याच राज्याची कन्या म्हणून घोषित करण्याची चढाओढ करू लागले होते. सारेच काही बदलले होते! एक हजार तासांचा सराव पूर्ण केल्यानंतर त्यांना 'ए' परवाना मिळाला. त्या नंतर सरलाजींच्या आकांक्षा वाढू लागल्या. ग्रुप 'बी' परवाना प्राप्तीनंतर त्यांना अधिकृत वैमानिक म्हणून मान्यता मिळाली असती. ते उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून त्यांनी प्रशिक्षित होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान १९३९मध्ये त्यांचे पती पी. डी. शर्मा यांचा एका दुर्घटनेत मृत्यू झाला. स्वप्न दाखवणारे आकाशच कोसळले तरी सरला डगमगल्या नाहीत. आपल्या पतीचे स्वप्न पूर्ण करावे अशी मनीषा त्यांनी बाळगली आणि जोधपूर येथे ग्रुप 'बी'च्या परवान्यासाठी त्या प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाल्या. एक एक दिवसाने स्वप्नपूर्ती जवळ येत होती. त्याची आठवणही सरलाजींना प्रफुल्लीत करत होती. उत्साह त्यांच्या नसानसांत संचारला होता. आनंदाला तर परिसीमाच उरली नव्हती. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. दुसऱ्या महायुद्धाचे रणशिंग फुंकले गेले आणि सरला यांचे प्रशिक्षण बंद पडले. पुढे काय होणार, कसे होणार कोणीच सांगू शकत नव्हते. त्यामुळे नाईलाजाने स्वप्न पोतडीत गुंडाळून त्या लाहोरला आपल्या आई-वडिलांकडे आल्या.
भरारीचे वेड फार सुंदर असते! एकदा ते लागले की मन स्वस्थ बसू देत नाही. स्वप्नांच्या पंखांवर बसून त्याला सतत विहार करायचा असतो... अखंड क्षितिजावर! सरलाजींची अवस्था काही वेगळी नव्हती. लाहोरमधील मेयो स्कूल ऑफ आर्टमध्ये त्या प्रविष्ट झाल्या. तिथून त्यांनी बंगाल स्कूल ऑफ पेंटिंगमधून ललित कलेत डिप्लोमा मिळवला. लवकरच भारतात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले. आणि फाळणीच्या काळात सरला आपल्या कुटुंबियांसोबत पुन्हा दिल्लीत आल्या. सरलाजी आर्य समाजाच्या होत्या. त्या काळातही विधवा पुनर्विवाहाला त्या समाजात मान्यता होती. त्यामुळे सुयोग्य स्थळ बघून घरच्यांनी त्याचा पुनर्विवाह करून दिला. पी पी ठकराल यांच्याशी विवाह झाल्यानंतर सरलाजींनी नवे आकाश शोधले भरारी करण्याकरीता!! आपल्या ललित कलेतील पदविकेचा उपयोग करून त्यांनी व्यवसायिकरित्या चित्रकला सुरू केली. दिल्लीमध्ये यशस्वीरित्या स्वतःच्या अनेक चित्रांचे प्रदर्शन त्यांनी भरवले. बंगाली स्कूल ऑफ आर्टचा त्यांच्या चित्रांवर विशेष प्रभाव होता. महिलांच्या चित्रणावर त्यांच्या चित्रांत अधिक भर दिसायचा. स्वातंत्र्योत्तर काळात एक व्यावसायिका म्हणून अल्पावधीत त्यांनी नाव लौकिक मिळवला होता. वीस वर्षाहून अधिक काळ त्यांनी कापड आणि दागिने यांच्या कलाकृतीपूर्ण निर्मितीत घालवला. त्यांनी विणलेल्या डिझायनर साड्या, कपडे यांना दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या विद्यार्थ्यांकडून प्रचंड मागणी असे. कला क्षेत्राला आपले नवे आकाश मानले आणि दोन दशकांहून अधिक काळ त्या आकाशात मुक्त विहार केला त्यांनी!! वयाची नव्वदी पार झाल्यावरही त्या थांबल्या नाहीत अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. भरारीचे वेड आयुष्यभर जपणारी अशी होती एक विहंगिनी... दुर्गा भरतभूमीची!!
~ मैत्रेयी पंडित