चार बहिणींपैकी ती दुसरी!! पण मुलगी म्हणून दुय्यम स्थान न मिळालेल्या कुटुंबातली. वयाच्या नवव्या वर्षी तिने आवड म्हणून लॉन टेनिस खेळायला सुरुवात केली. बहुधा तिच्या कोचिंग सेंटरमधील एकमेव मुलगी. चौदाव्या वर्षी तिने हौशी टेनिसपटू म्हणून स्पर्धा करण्यास सुरवात केली. संपूर्ण देशभर प्रवास केला. १९६५ ते १९७८ दरम्यान तिने संपूर्ण भारतभर क्षेत्र व राज्य लॉन टेनिस स्पर्धा जिंकल्या. बहिणीसोबत तिने सलग तीन वर्ष धावण्याच्या अखिल भारतीय आंतर-विश्व स्पर्धा जिंकली. १९६६ मध्ये ज्युनियर नॅशनल लॉन टेनिस स्पर्धा जिंकली तर १९७२ मध्ये ती आशियाची आंतरराष्ट्रीय महिला लॉन टेनिस चॅम्पियन बनली. १९७४ मध्ये अखिल भारतीय राष्ट्रीय हार्ड कोर्ट महिला टेनिस स्पर्धा, १९७५ मध्ये दिल्लीसाठी अखिल भारतीय आंतरराज्यीय महिला लॉन टेनिस आणि राष्ट्रीय महिला लॉन टेनिस स्पर्धेची विजेती झाली. १९७६ मध्ये दोन वेळा श्रीलंकेविरूद्ध भारताचे प्रतिनिधित्व करून ती विजेतेपदाची मानकरी ठरली. इतकेच नव्हे तर तिची बहीण अनुबरोबर तिने १९७६ मध्ये तीन सुवर्ण व दोन रौप्य पदके मिळवत दिल्लीसाठी प्रथम महिला महोत्सवाचे क्रीडापदक पटकावले. अतिशय महत्वाकांक्षी, उत्साही वाटचाल होती ही! कट्टर राष्ट्रवादी संस्कारात वाढलेल्या तिला देशसेवेत स्वतःला वाहून देणे हेच जीवनाचे ध्येय वाटायचे. तेच सत्यात उतरवण्याचा तिने ध्यास घेतला. अखिल भारतीय इंडियन पोलीस सर्व्हिससाठीच्या परीक्षा दिल्या, आणि ती झाली भरतभूमीची पहिली महिला आयपीएस अधिकारी!! यशस्वी कामांचा चढता आलेख आजतागायत कायम ठेवणाऱ्या त्या अधिकारी म्हणजे पूर्वाश्रमीच्या किरण पेशावरीया अर्थात किरण बेदी!!
९ जून १९४९, फाळणीनंतर अवघ्या काही काळात किरण यांचा जन्म झाला. घरामध्ये खूप धार्मिक वातावरण नसले तरी त्यांची आई शीख आणि वडील हिंदू असल्यामुळे तसे संमिश्र संस्कार बालपणी त्यांच्यावर नकळत होत होते. ज्या प्रकारचे संस्कार आणि वागणूक त्यांना घरात मिळाली, त्यावरून आपण किती नशीबवान आहोत याची जाणीव त्यांना कायम असे. किरण आणि त्यांच्या तीन बहिणी म्हणजे 'कन्या ते धन दुसरियांचे' असे कधीच त्यांच्या वडिलांना वाटले नाही. मुलींना चांगले शिक्षण द्यावे, यशाच्या शिखरावर त्यांनी जाऊन बसावे यासाठी ते सतत प्रयत्नशील असत. किरण यांच्या आजोबांना हे आवडत नसे. त्यामुळे त्यांच्या वडिलांना राहते घर सोडावे लागले. मात्र मुलींना उत्तम शिक्षण देण्याची जिद्द त्यांनी सोडली नाही. कदाचित याची जाणीव असल्यामुळेच असेल पण किरण यांचे पालकच त्यांचे आदर्श होते. आणि त्यांच्या अपेक्षांना आपण खरे उतरावे, अदम्य काही असे त्यांना मनापासून वाटे.
१९५४ मध्ये किरण यांनी अमृतसरमधील सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूलमध्ये औपचारिक अभ्यास सुरू केला. नागरिकशास्त्र, सामाजिक विज्ञान आणि इतिहास हे त्यांचे सर्वोत्कृष्ट विषय होते. शाळेनंतर थेट टेनिस कोचिंग सेंटरमध्ये जाण्याचा शिरस्ता किरण यांनी अनेक वर्षे नियमितपणे पळाला. त्याचीच परिणीती आंतरराष्ट्रीय खेळाडू बनवण्यात झाली. जिद्द आणि चिकाटीची सवय त्यांना यातूनच जडली. यात त्यांना अँथलेटिक्स सारख्या खेळांचीही साथ मिळाली. त्याशिवाय अधिक तंदुरुस्त होण्यास मदत करण्यासाठी आवश्यक असलेले अनेक उपक्रम-अडथळे, लाँग जंप, मॅरेथॉन धावणे यात त्या हिरीरीने सहभागी होत. किरणसाठी अमृतसर येथील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे राष्ट्रीय कॅडेट कोर्प्स (एनसीसी). एनसीसीने त्यांना “खाकीचा पहिला स्वाद” दिला. त्या पहिल्याच दिवसापासून खूप उत्साही कॅडेट होत्या. गणवेश, शस्त्रास्त्र गोळीबार करणे आणि पलटन नेते आणि प्रभावी अधिकारी होण्यास त्यांना इथे शिकावयास मिळाले. वेगवेगळ्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये तिने ट्रेक करणे आणि प्रतिकूल परिस्थितीत जगणे शिकले गेले इथे!! अखेरीस, एनसीसीमधील सर्वात तरुण प्लॅटून कमांडरपैकी एक होऊन १९६८ मध्ये त्या एनसीसी कॅडेट अधिकारी म्हणून नावाजलेल्या गेल्या.
शासकीय महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर किरण यांचे पुढील शिक्षण चंदीगडच्या पंजाब विद्यापीठात झाले. १९७०मध्ये त्यांनी राज्यशास्त्र विषयात सर्वाधिक गुणांसह पदव्युत्तर पदवी संपादन केली. पुढील दोन वर्षे अमृतसरमधील खालसा कॉलेज फॉर वुमन येथे प्राध्यापक म्हणून किरण कार्यरत राहिल्या. सरकार, नागरीक, परदेशी संबंध आणि प्रशासकीय यंत्रणेसारख्या सामान्य राजकारणाचे अभ्यासक्रम शिकवत असत. किरणजी अतिशय महत्वाकांक्षी होत्या. आपल्या लग्नाचा खर्च आपणच करावा ही त्यांची जिद्द होती. त्याशिवाय आपल्या महत्वाकांक्षी स्वभावाशी मिळते-जुळते घेणारा, प्रगतीसाठी सहाय्य करणारा जोडीदार त्यांना हवा होता. तो आपला आपणच निवडावा यावरही त्या ठाम होत्या. टेनिसशी त्यांची नाळ अगदी बालपणापासून जुळली होतीच, त्याच टेनिस कोर्टने त्यांचे मनही जुळवले. कापड मशीन निर्माता असणारे ब्रिज बेदी यांच्याशी टेनिस खेळता खेळता अलगद मन जुळले. ते वर्ष होते १९७२! किरण पेशावरीया तेव्हा किरण बेदी झाल्या. आणि तेच वर्ष होते जेव्हा भरतभूमीची लाडकी टेनिसपटू देशातील पहिली महिला आयपीएस म्हणून प्रकाशझोतात आली. त्यांची पोलीस अधिकारी म्हणून पहिली नेमणूक दिल्लीच्या चाणक्यपुरीत झाली. पुढे त्या उत्तर आणि पश्चिम दिल्लीच्या पोलीस आयुक्त झाल्या. ब्रिज बेदी आपल्या पत्नीला सरकारी नोकरीसाठी प्रोत्साहित करीत पाठींबा देत राहिले. आणि म्हणूनच एक उत्तुंग आलेख असणारी कामगिरी किरण यांच्याकडून घडली. जगातील एका प्रचंड मोठ्या तुरुंगाचा कायापालट करण्याचे काम त्या करू शकल्या त्या उगीच नाही!
किरण बेदी यांना जागतिक स्तरावर ज्यामुळे नवी ओळख मिळाली ते तिहार कारागृह!! भारतातील सर्वात कठोर कारागृह म्हणून त्याची खास ओळख आहे. मादक द्रव्ये, टोळीयुद्ध, कर्मचाऱ्यांचा भ्रष्टाचार, पहारेकऱ्यांची तसेच गुंड कैद्यांची दादागिरी यांचा बुजबुजाट असलेला हा तुरुंग... तिहार कारागृहात बदली होणं म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा अशी भावना जेव्हा तिथल्या अधिकाऱ्यांचेही धाबे दणकवत असे त्या काळात एका महिलेची कारागृहाच्या आय. जी. (प्रिझन्स) पदी नियुक्ती होणे म्हणजे तर दिव्य होते!! सन १९९३मध्ये किरण बेदींची अशा भयाण तिहार कारागृहात बदली झाली. आपली कर्तव्ये पार पाडून, त्याही पलीकडे जाऊन मानवजातीची सेवा करण्यासाठी झटणारी माणसे फार वेगळी असतात. किरण बेदी देखील अशाच माणसांपैकी एक!! जेव्हा अथकपणे, सातत्याने, निःस्वार्थपणे आणि कळकळीने सुसंवाद प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा त्याला नक्की यश मिळते यावर किरण पूर्ण विश्वास ठेवत. या सच्च्या भावनांच्या जोरावरच तर त्यांनी निर्ढावलेल्या अट्टल गुन्हेगारांना चांगल्या मार्गाला लावून त्यांचे पुनर्वसन केले. नकारात्मकतेने संपूर्ण भरलेल्या एका तुरुंगाच्या पटांगणातून हजारो तुरुंगवासी प्रार्थना व ध्यानधारणेसाठी जमलेले दिसू लागले. तुरुंगाला जणू आश्रम किंवा मंदिराचे स्वरूप आले. मारहाणीचा आवाज येणाऱ्या वाँर्डमधून भजनाचे मधून स्वर उमटू लागले. साहजिकच तुरुंगातील तणावपूर्ण परिस्थिती निवळली. याचे संपूर्ण श्रेय होते किरण बेदी यांना!! त्यांच्या या कामाची आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद घेतली गेली आणि १९९४च्या रेमन मॅगसेसे पुरस्काराच्या त्या मानकरी ठरल्या. त्याचप्रमाणे नोबेल प्राईझ ऑफ एशिया आणि जोसेफ बॉईज फाऊंडेशनतर्फे जोसेफ बॉईज पुरस्कार १९९७ साली स्वित्झर्लंड इथे प्राप्त झाला.
किरण बेदींची कारकीर्द इथेच संपत नाही. त्यांनी महिलांवरील गुन्हे कमी करून दाखवले. त्यानंतर एक ट्रॅफिक पोलिस अधिकारी म्हणून त्यांनी १९८२ आशियाई गेम्ससाठी दिल्लीत आणि १९८३ मध्ये गोव्यात भरलेल्या सीएचओजीएम बैठकीसाठी (The Commonwealth Heads of Government Meeting) रहदारी व्यवस्था पाहिली. किरण बेदी यांनी उत्तर दिल्लीच्या डीसीपी असताना ड्रग्जचा दुरूपयोग करण्याऱ्यांविरुद्धच्या मोहिमेची सुरुवात केली. ही मोहीम पुढे नवज्योती दिल्ली पोलीस फाऊंडेशनमध्ये विकसित झाली. २००३मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव होऊन पोलीस सल्लागार म्हणून बेदींनी काम केले. सामाजिक कार्य आणि लेखन यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी २००७मध्ये पोलीस खात्याचा राजीनामा दिला. विविध क्षेत्रात सामाजिक आंदोलनांमध्ये त्यांचा त्या नंतरही सक्रिय सहभाग होता. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. २०१६ मध्ये बेदी यांना पॉंडिचेरीच्या लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नेमण्यात आले. इतके मोठे कार्य करूनही त्या मात्र अत्यंत विनम्र होत्या. भारतीयांचा अहिंसा, क्षमा, करूणा, स्वार्थत्याग, बलिदान, निस्वार्थी वृत्ती अशा अनेक मूलभूत तत्वांवर जो दृढविश्वास आहे त्यामुळे हे शक्य झाले असे त्यांना मनोमन वाटते. कारण कैदी असो की अधिकारी प्रत्येक भारतीयांमध्ये ही मूल्ये कमी-अधिक प्रमाणात रुजलेली आहेतच!! १९८८ मध्ये स्थापित नवं ज्योती आणि १९९४ मध्ये स्थापित इंडिया व्हिजन फाऊंडशन या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आजही त्या सक्रिय समाजकार्य करीत आहेत. सांगावे तेवढे कमी असा प्रचंड आलेख!! पण एक मात्र खरे स्वाभाविक चांगुलपणा, माणुसकी आणि सामूहिक निर्धार यांच्या जोरावर.... काहीही शक्य आहे असे नुसते म्हणून न दाखवता त्यांनी करून दाखवले, आजही दाखवत आहेत... आणि म्हणून अभिमानाने सलाम करावा वाटतो या पहिल्या महिला आयपीएस अधिकारीला.... भरतभूमीच्या या दुर्गेला!!
~ मैत्रेयी पंडित