इ. स. १९६४, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवा या उद्देशाने न्यूयॉर्कमध्ये पहिल्यांदाच वैज्ञानिक आणि अभियंता महिलांसाठी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. देशविदेशातील महिलांना यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. तसे निमंत्रण पत्र भारतातही आले होते. त्या वेळी प्रकाशझोतात आले एक नाव... पहिल्या वहिल्या भारतीय स्त्री अभियंता ए ललिथा यांचे! या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी जाणारी भारतातील एकमेव महिला, पहिली महिला अभियंता आणि पुरुषसत्ताक क्षेत्रात उत्तुंग कार्य करणारी महिला या पैलूंमुळे ए. ललिथा एक आदर्श उदाहरण होत्या.

संकटे माणसाला जगायला शिकवतात, खंबीर बनवतात. ज्यांच्या अंगी धाडस असते त्यांना अनवट वाटा चोखाळायला उद्युक्त करतात. आणि मग घडतात उत्तुंग कारकीर्द घडवणारी व्यक्तिमत्त्व!! ए ललिथा यांचा जीवनपट याहून वेगळा नाही. १९१९ मध्ये जन्मलेल्या ए ललिथा यांचा तत्कालीन पध्दतीने वयाच्या पंधराव्या वर्षी विवाह झाला. यथावकाश संसारवेलीवर पहिले फुल उमलले आणि अवघ्या चार महिन्यात ललिथा यांना वैधव्य आले. चार महिन्याच्या आई झालेल्या ललिथा तेव्हा केवळ अठरा वर्षांच्या होत्या. समोर अख्खे आयुष्य असताना अकस्मात आलेल्या अशा संकटाने डगमगणे साहजिक असते. पण संकटाला संधी समजून ललिथा यांनी पाऊल टाकले आणि इतिहासाच्या पुस्तकावर स्वतःचे नाव कोरले. पुनर्विवाह करणे किंवा कोणावर तरी विसंबून राहून दिवस कंठणे यापेक्षा ललिथा यांना शिक्षण घ्यावे वाटले. त्यांचे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण लग्नापूर्वीच झालेले होते. त्यापुढे उच्च शिक्षण घ्यावे अशी मनीषा त्यांच्या मनात निर्माण झाली. आपल्या मुलीला आपण आत्मसन्मानाने वाढवावे आणि त्यासोबतच तिला पालक म्हणून योग्य वेळ देता यावा याकरिता ठराविक वेळेचे बंधन असणारी नोकरी करणे त्यांना योग्य वाटले. त्या काळात महिलांचा वैद्यकीय क्षेत्राकडे जाण्याचा कल होता. पण त्या कामात काळ-वेळेचे बंधन नसल्यामुळे ललिथा यांनी तो पर्याय टाळला.

ललिथा यांचे वडील आणि भाऊ अभियंते होते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आपणही इंजिनिअर व्हावे असे ललिथा यांनी ठरवले. त्या काळात अभियांत्रिकी क्षेत्र ही केवळ पुरुषांचीच मक्तेदारी होती. स्त्रियांना हे झेपवणे शक्य नाही असे अव्यक्तपणे समाजमान्य होते. अशा काळात अभियंता होण्याचा निर्णय घेणे म्हणजे प्रत्यक्ष काळाला आव्हान करण्यासारखे होते. वडील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक असल्याचा काही अंशी ललिथा यांना फायदा मिळाला आणि त्यांनी हे शिवधनुष्य लीलया पेलले. कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, गिंडी या तत्कालीन मद्रास म्हणजे आजच्या चेन्नई येथील महाविद्यालयात विद्युत अभियांत्रिकीसाठी त्यांनी प्रवेश मिळवला. संपूर्ण महाविद्यालयात एकमेव महिला विद्यार्थी असल्या तरी त्यांना सुरक्षित वाटेल आणि कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी त्यांचे सह अध्यायी देखील घेत असत. त्यामुळे कॉलेजमध्ये त्यांना कधी एकटेपणा जाणवला नाही. ललिथा यांच्या प्रवेशाला पर्वणी मानून कॉलेजच्या पदाधिकाऱ्यानी आणखी महिलांनी प्रवेश घ्यावे यासाठी प्रयत्न केले. पुढच्या शैक्षणिक वर्षात आणखी दोन विद्यार्थिनीनी स्थापत्य अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेतला. त्यामुळे वसतिगृहात ललिथा यांना वाटणारा एकटेपणा साहजिकच कमी झाला.

१९४४मध्ये आपले पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही काळ त्यांनी शिमला येथे सेंट्रल स्टॅंडर्ड ऑर्गनायझेशन येथे काम केले. त्याच दरम्यान इलेक्ट्रिकल इंजिनिअर, लंडन इन्स्टिट्यूशनच्या ग्रॅज्युएशनशिपची परीक्षा दिली. तसेच वडिलांसोबत त्यांच्या संशोधन कार्यात साहाय्यक म्हणून काम केले. स्वतःची ओळख बनवण्याचे ध्येय मनात बाळगून असणाऱ्या ललिथा यांनी लवकरच कोलकाता येथील असोसिएट इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीमध्ये नोकरी मिळवली. आपल्या भावाच्या परिवारासोबत त्या आपल्या मुलीसमवेत कोलकाता येथे राहू लागल्या. तिथे त्यांनी इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन लाईन्सचे डिझाइन, सबस्टेशनचे लेआउट बनवणे त्याची अंमलबजावणी करणे हे सांभाळले. भाकरा नांगल बांध परियोजनेवर त्यांनी उल्लेखनीय काम केले. असोसिएट इलेक्ट्रिकल इंडस्ट्री पुढे जनरल इलेक्ट्रिक कंपनी म्हणून ओळखली जाऊ लागली. तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी या क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. सन १९५३मध्ये लंडन येथील इन्स्टिट्युशन ऑफ इलेक्ट्रिक इंजिनिअर्स परिषदेत सहयोगी सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. पुढे १९६६ मध्ये त्यांना पूर्ण सदस्य म्हणून मान्यता मिळाली. १९६४मध्ये न्यूयॉर्क येथे भरवण्यात आलेल्या पहिल्या महिला वैज्ञानिक आणि इंजिनिअर्स (ICWES) परिषदेत भारताची पहिली महिला इंजिनिअर आणि एकमेव प्रतिनिधी म्हणून त्यांनी स्थान मिळवले. पुढील वर्षी म्हणजे १९६५मध्ये लंडनच्या महिला इंजिनिअर सोसायटीच्या त्या पूर्ण सदस्य झाल्या आणि शेवटपर्यंत त्यासाठी कार्य करत राहिल्या. एकल पालकत्व निभावताना आपल्याला मुलीला वडील नसल्याची खंत जाणवायला नको यासाठी त्या सतत प्रयत्नवादी असत. मुलीला त्यांनी विज्ञान शाखेतच उच्च शिक्षित केले. परिवार आणि नोकरी याचा उत्तम समतोल त्यांनी आयुष्यभर सांभाळला.

ए ललिथा यांनी केवळ भारतातील पहिली महिला अभियंता होण्याचा मान पटकावला नाही, तर भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करून देशाला सन्मान मिळवून दिला. यात त्यांना काय अडचणी आल्या असतील अन् किती खस्ता खाव्या लागल्या असतील याचीही आपल्याला कल्पना नाही. पण कृतज्ञ जाणीव मात्र असायला हवी. आज आपल्यातील अनेक जण अनभिज्ञ आहेत त्यांच्या या कार्याविषयी, त्यांनी अनेक तरुण मुलींपुढे उभ्या केलेल्या आदर्शविषयी. पण त्यांनी मात्र निश्चयाने, संयमाने आपले कार्य केले, परदेशातही आपला तिरंगा फडकवला आणि वयाच्या अवघ्या साठीत आपला निरोप घेतला. त्यांचे कार्य भारताच्या आधुनिक इतिहासात खुप मोलाचे काम करत आहे. कधीकाळी प्रवाहाविरुद्ध जाण्याचे धाडस ए ललिथा यांनी दाखवले म्हणून आता दर वर्षी इंजिनिअर होणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांमध्ये आज हजारो मुलीदेखील आहेत. पण असे असतानाही किती मुलींना माहिती आहे देशातील पहिल्या महिला इंजिनीअरचे नाव? फेमिनीजमच्या गप्पा मारणाऱ्या किती जणांना जाणीव आहे या गोष्टीची की इतके वेगळे कार्य करणाऱ्या स्त्रीच्या कामाची फारशी नोंद घेतली गेलेली नाही. प्रश्न अनेक आहेत पण अनुत्तरित!! पण एक गोष्ट मात्र सत्य आहे ती म्हणजे पुत्र प्रेमासाठी माता कोणतेही आव्हान समर्थपणे पेलू शकते याचे ज्वलंत उदाहरण देणाऱ्या हिरकणी होत्या ए ललिथा, म्हणूनच तर त्या आहेत दुर्गा भरतभूमीच्या!!

~ मैत्रेयी पंडित

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to दुर्गा भारतभूमीच्या


सावित्रीबाई फुले मराठी भाषण
सावित्रीबाई फुले
दुर्गा भारतभूमीच्या
पुरुषही छळले जातात तेव्हां