हसन मोमिनाची दोन पोर मुबईला राहून अंड्याचा व्यापार करीत होती. गांवांत मोमिनाचं तेवढं एकच घर होतं. हसन नुकताच मेला होता आणि त्याची म्हातारी आई तिसऱ्या पोराच्या हातीं घर सोपवून निवात रहात होती. मुंबईला कमावलेल्या पैक्यावर पोरानी जमिनी घेऊन टाकल्या होत्या. त्यातली एक जमीन बाबू म्हातऱ्याच्या रंडक्या भावजयीची होती. भावजयीनं आपली जमीन मोमिनाला विकली, आपल्याला दिली नाही, हा राग बाबूच्या पोटात फार दिवसापासून होता. वयानं थकलेला हा माणूस अंगापिंडानं बैलासारखा बाधला गेला होता. त्याचं डोकं, तोंड शरीराच्या मानानं लहान होतं. खादे गाडीच्या जुवासारखे रुंद होते आणि माडीखाली पाय बारीक होते. त्याचं वागणं वरून दिसायला शाळामास्तरासारखं मवाळ, नम्रतेचं असे. पण तें सगळं खोट ! बिघडला म्हणजे तो भारी उर्मट आणि लागीट बोले. त्याच्या जबड्यातले खालचे दांत जीभ थटवली की जागचे हलत. त्यांची मुळं सुटली असावीत; पण ते धड पडलेहि नव्हते. त्यामुळं बाबूचं बोलणं बोबडं येई ! सगळ्या गावात मारकी म्हणून म्हाजूर असलेली त्याची बैलं मालकाचं रागीट बोलणं ऐकतांच थरथर कापत आणि भीतीनं तोंडं वासत. बंडा नावाच्या आपल्या धाकट्या पोराला बाबूनं खारीकखोबरं चारून आणि रतीबाचं दूध पाजून चांगला तयार केला होता. आपल्या माघारी या पोरानं गावात वचक बसविला पाहिजे, त्याला बघताच वाघानं लेंडी टाकायला पाहिजे, अशी बाबूची इच्छा होती. पोलादाच्या काबीसारखा देह कमावलेला हा पोरगा सुरेख झोबी खेळे. गावात त्याला जोड नव्हती. शेतीभातीचं काम करून तो तालीम हाणी. गेरूनं अंग रगवून तांबडं भडक करी आणि संध्या- काळी गावओढ्याच्या वाळूत बरोबरीच्या पोरावर भुजा ठोकी !
१९ एकदा हसनची पोरं मुंबईहून गावाकडे आली तेव्हा लासगांवचा मेहमान त्यांना आढळायला आला. मोमिनाच्या पोराची बहीण त्याला दिली होती. संध्याकाळच्या वेळी मेहमानाला घेऊन दोन्ही पोरं मळ्याला गेली. आणि परत येतांना ओढ्याच्या वाळूत उभा राहून भुजा ठोकतांना त्यांनी बाबूच्या
२० बंडाला बघितला. मावळत्या दिवसाच्या उजेडान बडाचं अंग तापल्या लोखंडा- सारखं दिसत होत. मेहमान म्हणाला, " रमूल, किसका छोकरा रे ओ?" "बाबू पटेलका." " " "अच्छा लढनेवाला हाय क्या ?" "हा तो! अरे यार, गावमे जोड नही उसको ! " हे ऐकून मेहमानाच्या भुजा स्फुरू लागल्या. तोहि खेळणारा होता. बकऱ्याचं घोस खाऊन त्यानंहि ताकत कमावली होती. वाळूत उतरून तो बड्यापाशी आला आणि त्यान शब्द टाकला, हमारे साथ लढेंगे क्या पटेल ? कपाळावरचा घाम बोटान निरपून बंडानं या नव्या वस्तादाला पायापासून डोक्यापर्यंत न्याहाळला. चौकट्याचौकट्याची लुंगी, अंगात पातळ मल्मली खमीस, वर झोकदार पटका. कान मुडपलेले. गळ्यात ताईत. मनगटात गडा. कमरेला रुतणारी लाग बोटानं सैल करीत बंडानं दमात विचारलं, "अरं कोन रं ह्यो?" मुंबईचा पोरगा पुढ झाला आणि म्हणाला, " मेहमान हाय लासगावचा. आमाघरी आलाय आढळायला. आमची भन दिलीया हेला !" पुन्हा एकवार बडानं पाव्हण्याचा अदमाम घेतला आणि वाळू उचलून घेत तो म्हणाला, " काढ कापड. खेळू दोन डाव!" पाव्हण्यान लुंगी सोडली. खमीस काढला. खोबरेल तेल जिरवलेलं त्याचं अंग शिसवी लाकडासारख होत. दंडाच्या बेडक्या टरारून आल्या होत्या आणि माडीला पट पडले होते. गावची पोरं चौफेर जमा झाली. झोबी जिद्दीची होती. गडी सारख्याला
२१ " वारखा घावला होता. आणि ही कुस्ती मारतांच बंडाचं नाव लासगावच्या तालिमीपर्यंत जाणार होतं. आपली उतरून ठेवलेली कापडं घेऊन बसलेल्या पोराच्या कानात बंडा म्हणाला, हाड मोडून हातात देतो पाव्हण्याच्या !" पण सलामी झाली आणि सटक्यामरशी पाव्हणा बंडाच्या पाठीशी आला. मुग्गळा मारून त्यानं बंडाला खाली गुडघ्यावर आणला. जमिनीबरोबर चेपला. ताकतीनं भारी असलेल्या पाव्हण्यान बडाला नुसता चेपूनच गार केला. वाळूत बेदम घोळमला. केसात, तोडात, नाकात वाळू जाऊन बडा घाबरा झाला. वाळूचे जाडे खडे बोचून त्याच्या गुढघ्याची साल निघाली. तरी तो नेटानं उठून गुढघ्यावर आला आणि पाठीवर ज्वारीच्या पोत्यासारखा बसलेल्या लास- गावच्या पाव्हण्याला बाजूला फेकण्यासाठी धडपडूं लागला. पण त्यानं वाळूत टेकलेल्या बंडाच्या हाताला खुब्यापाशी दणका दिला आणि काय झाल कळा- यच्या आतच बडाची पाट लागली ! पाव्हणा उटला आणि काकन् भुजा ठोकून ओरडला, " अल्लेक ! चीत हो गया साला !" त्यामरशी बडा चवताळून उटला आणि पाव्हण्याच्या अंगावर झेप घेऊन म्हणाला, " कुणाला माला म्हणतोस र भडव्या ?" मोमिनाच्या दोन्ही पोगनी त्याला दाबून धरला आणि ते म्हणाले, " पटेल, मारामारी करायची न्हाई. जितीच्या कैफात पाव्हणा बोलू नये ते बोलला. त्यापायी आमी तुमची माफी मागतो." पण बडा जाळ्यातल्या माशासारखा उसळ्या घेऊ लागला. तेव्हा मोमिनाचा पोरगा पाव्हण्यावर ओरडला, "तुम भागो यार घरको. देखते किव् ? बस हो गया मिजाशी!' आणि लुंगी खमीस उचलून पाव्हणा घराकडे गेला. बंडा रागान वेडा झाला. परगावच्या एका पाव्हण्यानं आपल्याला पालथा घालावं म्हणजे गोष्ट काय ? आणि वर पुन्हा शिवी हासडावी ? त्याची जीभ उपटून हातात देईन! "
२२ मोमिनाची पोरं हातापायां पडली तेव्हां बंडानं कपडे काखोटीला मारले आणि खाली मान घालून तो रानात गेला. लिबाच्या सावलीला उगीच बसला आणि डोकं निवाल्यावर परत आपल्या रानातल्या वस्तीवर आला. दरम्यान बाबूला हा प्रकार समजला होता. आपल्या पोरानं मोमिनाच्या पाव्हण्याकडून माती खाल्ली ही गोष्ट त्याला बहुत शरमेची वाटली. रात्री उघडावाघडा, रानातल्या कामान शिणलेला असा तो घरी आला, तेव्हां शरमलेला पोरगा बैलाना वैरण घालत असलेला त्यानं बघितला. बाबू पोरापाशी जाऊन ताठ उभा राहिला आणि कणखर शब्दात बोलला, 'लेका, बापाला मान खाली घालायला लावलीस. मोमिनाखाली पडलास. आजपतूरचं माझं खारिकखोबरं अन् दूध फुकट फुकट गेलं. थूत् तुज्या तोंडावर!" पोराला असं बोलून झाल्यावर, न जेवतां खातां बाबू गांवांत आला. अंधारातून हातातला कंदील हलवीत आला आणि मारुतीच्या देवळाच्या पायरीवर येऊन बसला. येणाऱ्याजाणाऱ्यांनी त्याला तसा बसलेला बघितला आणि वासपुस केली, का बसलाय बाबूराव ?" तेव्हा बाबू नीट बोललाच नाही. नेहमीं लीनतेनं देवा, महाराजा अस गांवकऱ्याना संबोधणारा, हात जोडून घवघवीत रामराम घालणारा बाबू चेहरा निबर करून बोललाच नाही. उघडी छाती चोळीत बसून राहिला. तेव्हां त्याच बिनसलं आहे हे गावकऱ्यानी ताडलं आणि मोमिनाच्यात येऊन वर्दी दिली, "संबाळा रं मोमिनानू, बाबू म्हाताऱ्या विघडलाय. तुमची काय धडगत न्हाई आता लेकानूं !" बाबू म्हातय बिघडलाय म्हणजे सगळं गावच बिघडलय् ! कारण त्याचा गोतावळा बक्कळ होता. तरणी आणि हिरवट टाळक्याची पाचपंचवीस पोरं एका दिलान बाबूच्या मागं होती. त्याच्या हाकेला ओ देणारी होती. गांवकऱ्यांनी सांगितलेली ही बातमी ऐकून लासगांवचा मेहमान मग्रुरीनं " बोलला,
२३ " बिघड गया तो क्या होगा? हमारा घर तो गांवमेसे नही निकलता ?" पाव्हण्याचे हे मग्रुरीचे बोल ऐकून मोमिनाची म्हातारी थरथर कांपत पोरावर ओरडली, " अरं जा तो. उसका पाव पड. अब क्या होगा गे मेरी मा ? अब क्या हो रे अल्ला !' गावात अनेक वर्षे राहिलेली, स्वतः रचलेली रामायणावरील गाणी म्हणत मराठ्यांच्या बायकांतून फेर धरून नाचणारी ती म्हातारी इतकी काकुळती आली, घाबरली की तिला रडूंच आल! वरचेवर ऊर बडवीत ती या दारा- पासून त्या दारापर्यंत येरझाऱ्या मारू लागली. पोरांना प्रसंगाची गंभीरता कळली. मुंबईला राहून ती थोडी फार धीट झाली होती. तरी एकुलतं एकच मोमिनाचं घर असलेल्या या गांवातले मराठे जर बिघडले तर कोंबडी- सारख्या आपल्या माना मुरगळतील अशी त्याची खात्री होती. तरी त्यांतला थोरला पोरगा म्हातारीवर खेकसला, 'तू चूप बठ गे! हम देखेगे क्या होता है !" आणि बाबू म्हातऱ्याची समजूत घालण्यासाठी तो देवळाकडे निघाला. म्हातारीनं त्याला पुन्हा पुन्हां बजावल, कुछ उलटा सबूद ना कर मेरे बाबा. उसके पाव पकड. बोल, हमारी गलती दुई. हा बाबा, ख्याल मे आया क्या ? म्हातारीचे शब्द ध्यानात घेऊन हसन मोमिनाचा थोरला पोरगा जलदीनं देवळापुढं आला. तिथ दुसरं कोणी नव्हत. कंदील पायरीवर ठेवून बाबू म्हाताऱ्या गप बसला होता. मोमिनाचा पोरगा पुढं झाला आणि ओठावरून जीभ फिरवीत बोलला, " पटेल, मी पाया पडतो -" पण त्याचं पुढचं बोलणं बाबून ऐकूनच घेतलं नाही. तो सटक्यानं पाया- तली जाड वहाण उपसून उठला आणि मोमिनाच्या पोराला त्यानं रानात निघालेल्या काळ्या विचवासारखा ठेचला. वहाणेचे खिळे, नाल नाकावर, तोंडावर, डोक्यात बसून तो फुलल्या पळसासारखा दिसू लागला, खाटकाच्या " "
हातांतल्या कोंबड्यासारखा तडफडून केकाटूं लागला, तरी बाबूचं हाणणं थांबलं नाही. शेवटी हिकमतीनं सुटका करून ते पोरगं केकाटत धूम पळालं तेव्हा, 'थूत् तुज्या मोमिनाच्या हो!" अस म्हणून तो पचकन् थुकला आणि पालथ्या हातान ओठावरची थुकी पुसून चालू लागला. मळ्याच्या निर्जन वाटेनं तो दूर गेला तेव्हा त्याच अंग काळोखात दिसेनासं झालं आणि हातातला कंदीलच तेवढा भुताच्या दिवटीसारखा अंधांतरी जात राहिला. त्या दिवशी मोमिनाच्या घरात रडारड झाली. मोमिनाचा धाकटा पोरगा पाव्हण्याला वाटेल तसं टाकून बोलला तेव्हा तो सासुरवाडीतलं पाणीसुद्धा तोंडात न घालतां पायींपायींच लासगांवला चालता झाला. जावई असा रागेजून निघून गेला, आता माझ्या पोरीची धडगत नाही, म्हणून म्हातारी पोरावर कावली. कडदरली. बाबू म्हातऱ्याच्या मारानं पोरानी अशी भीति घेतली की शेतीभाती, घर- दार विकून ती मुबईला जायची तयारी करूं लागली आहेत. पण त्याची इस्टेट विकत घ्यायला गावातल कुत्रदेखील तयार नाही! बाबू म्हणतो, "कोन त्या हलकटाच्या जिमिनीला पैका मोजतय ? जाऊ दे की बोंबलत गाव सोडून. ती इस्टेट आपलीच हाय. वाईट मोमिन! तसलं बीज नको आपल्या गावात!" आता मोमिनाच्या पोरानी काय करावं?