पहाटेची चादणी उगवली तेव्हा न्हाव्याची म्हातारी जागी झाली. अंथरुणावर उठून बसली आणि शेजारी झोपलेल्या आपल्या नातीला जागी करू लागली, उठ ग माझ्या बाई. पायलीभर दळायच हाय! " नात वयांत आली होती. न्हाती धुती झाली होती. त्यामुळं तिला अलीकडे झोंप फार येई. जेव्हा तेव्हा ती अंगाचं मुटकुळं करून कुटल्यातरी कोपऱ्यात झोपून राही. अंगावरच्या लुगड्याचं भानदेखील तिला त्या झोपेत रहात नसे. त्याबद्दल आजी आणि आई तिला बोल बोल बोलत. पण तिला काही झोप आवरत नसे. म्हातारीनं आपल्या जीर्ण हातानं गदगदा हलवल, तेव्हा कोडीची झोप थोडीफार चाळवली. तिच्या छातीवरचा पदर नीट करीत म्हातारी पुन्हां म्हणाली, ऊठ ऊट. मला जात ओढू लाग. पुरं झाली झोप !" अंगाला आळोखेपिळोखे देत कोंडी जागी झाली. उठून बसली. झोपेची धुंदी डोळ्यावरून उतरली तशी तिला जाणवल की, आपल डोक फार हलकं हलकं वाटतय. आणि साहजिकच तिचा हात आपल्या केसाकडे गेला. तर जागेवर अंबाडा नव्हता! त्यासरशी ती गोधळली. म्हातारीनं दिवा लावला होता आणि ती जात्याशेजारी गेली होती. तिला ओरडून म्हणाली, " आजे, माझा अंबाडा कुठाय ? नातीच्या प्रश्नाचा अर्थच म्हातारीला लागेना. अंबाडा कुठाय म्हणजे काय ? हातांतला दिवा वर करून तिन आश्चर्यानं कोंडीकडे बघितल. या वेळपर्यत पोरीन डोकं चाचपून बघितल होत. ते भुंड आढळलं तेव्हा ती किंचाळली, आजे, माझं केस कुणी कापलं ग ?"

हातात दिवा घेऊन वाकलेल्या पाठीनं म्हातारी नातीच्या अंथरुणापाशों आली. आणि तिच्या पायाला केसांचा थंडगार, मऊसूत जुडगा लागला. ती खाली बसली आणि थरथरत्या हातान तो उचलून न्याहळू लागली. नातीचे केस तिच्या हातांत होते ! अंबाड्याचा वेढा तसाच होता. आदल्या दिवशी लावलेलं तेल तसच होतं, खोचलेलं फूलहि होतं. सफाईदार हातानं कात्रीचा छाट मारावा तसे केस डोक्यापासून वेगळे झाले होते. तो जुडगा हातात गच धरून म्हातारीनं पोरीचं डोकं बघितलं. सोवळ्या बामणिणीच्या वाढलेल्या डोक्यासारखं तें दिसत होतं. असे केस रात्रीतून कसे कापले गेले ? कुणी दुष्टानं पोरीला विद्रूप केली ? रागानं लटलट कापत म्हातारी उठली. भिंतीच्या पलीकडे वेगळी चूल करून राहिलेल्या आपल्या धाकट्या लेकाच्या घरात शिरली. बंद खोलीवर थाप टाकून ओरडली, बापू, बापू , ऊठ. तुझ्या बायकोची कसाबकरणी बघ ! " बापू उठला. धोतर आवळीत बाहेर आला. म्हणाला, 'काय झालं ग आये?" "अरं तुझ्या बायकोला विहरीत कां ढकलून देत न्हाईस ? तिचा जीव का घेत न्हाईस ?" अग पर का झालं?” ह्या तुझ्या बायकोनं एकाच्या दोन चुली केल्या. मधी भिंत घातली. आन् आज रात्री येऊन दावा साधला. माझ्या नातीच केस कात्रीनं कापून तिला हेगाडी केली. का ग अस? हा ?" "कुनाचं? कोंडीचं केस कापलं, माझ्या बायकोनं ?" दरम्यान कोंडीहि येऊन उभी गहिली होती. तिला पुढं करून म्हातारी म्हणाली, 'बघ बघ, कशी दशा केली पोरीची. आईयेगळ्या पोरीला अशी केली. का ग? का म्हणते मी? गरीब लेकरानं तुझं काय केलंय् ?" तोंडाला पदर लावून कोंडी बारीक रडू लागली. बापू तिला समजावू लागला.

२७ इतका वेळ अंथरुणाच्या गळाठ्यात लोळत असलेली बापूची बायको बाहेर आली. बुटकी, काळी आणि दात पुढे असलेली. लोळण्यामुळे तिचे केस विस्कटले होते. रात्री झोपताना काढून ठेवलेली चोळी न घालताच, आडव लावलेलं लुगड्याच फडक अंगावर तसच ठेवून ती वसकन बाहेर आली. कर्कश आवाजांत बोलली,

२८  " 66 " " का झालं व सासुबाय?" बापूनं तिच्या पेकाटांत पक्कन् एक लाथ घातली. राड, पोरीचं केस तू रातीतून कापलंस. तुला का म्हणावं ? लाथेसरशी तडमडलेल्या बापूच्या बायकोनं स्वतःला सावरलं आणि गहिंवर घातला, " मेले मेले रं देवा ! अवं मी का केलया ? मला का मारता ?" म्हातारी तिच्या पुढे होऊन म्हणाली, "कशी वरडतीया बघ गत्काळी ! हाण हाण बापू. मारुन कुट्टा केल्या- शिवाय तिची खोड जिरणार न्हाई ! " पण बापून हात उगारायच्या आतच ती सटक्यान खाली बसली. खाबाच्या तळखड्यावर तिनं आपलं डोक ताडताड आपटून घेतलं. रक्तबबाळ करून घेतलं. आणि रडरडून ती म्हणू लागली, " मी माझ्या लेकराच्या डोक्यावर हात मारुन सागते, मी खडोबाची पायरी शिवून सागते, कोडीच्या केसाना मी हात लावला न्हाई. माझ्यावर आळ काय म्हणून घेता ? मला फुकाफुकी का मारता ?" आईच्या आरडाओरडीन बापूची पोरं जागी झाली आणि गळा काढून रडूं लागली. घाबरून किचाळू लागली. त्याना समजावीत म्हातारी सुनेवर ओरडली, गप. वरडू नगस गुगवाणी. पोरं भ्याली. बाईचा आवाज तरी काय हलका हाय ? सगळ गाव जमा करल. गत्काळी राड ! " हा गोंधळ चालला आहे तोच आतल्या माळींतून धडधड आवाज आला. म्हातारी म्हणाली, "बापू, माळीत जा. काय पडलं बघ. मांजर उलथलं असेल!" बापू गेला आणि बघू लागला. कोपऱ्यात रचलेल्या सगळ्या उतरंडी ढास- ळल्या होत्या. फुटक्या गाडग्यांचे तुकडे चौफेर झाले होते. धान्यधुन्य, मीट, आणि साठवणीचं सटरफटर चहुकडे उधळल गेलं होतं. उतरंडी कशा ढांस- ळल्या ? माजर नाही का घूस नाही. आणि जडशीळ राजण कसे कलंडले ? बापू

गोंधळला. त्याला काही उमज पडेना. म्हातारी स्वतः आली आणि तो सत्या- नाश बघून कळवळली. बापूला म्हणाली, " बघतोस काय ? हे गोळा कर!" तोवर माचोळीवर एकावर एक रचलेल्या पोत्यातील मधलंच पोतं पेटल. जळलेल्या जोंधळ्याचा करपा वास आणि धूर घरात पसरू लागला. मधलंच पोतं कसं पेटल? हा काय चमत्कार झाला? धूर बघून लोक पळत आले आणि पाणी मारून पोतं विझवू लागले. पण तोपर्यंत कापड भरून ठेवलेल्या बद ट्रंकेंतून धूर निघू लागला. सारे भारी कपडे पेटले. नकीची धोतर, जरीचे फेटे, खण, लुगडी आणि रेशमी कुच्या आणि विझवायच्या आत जळूनहि गेले ! ही विलक्षण बातमी तोंडातोडी साऱ्या गावात झाली. रानामाळात जायचं सोडून लोक न्हाव्याच्या घराभोवती जमा झाले. हवालदिल होऊन बापू न्हावी ओसरीवर बसला होता. घरात पाणी साडल होतं. जळके कपडे, धान्य, खापराचे तुकडे याचा खच झाला होता. न्हाव्याच्या घरावर मोठा कठीण प्रसंग आला होता. आणि अशा वेळी सहानुभूती दाख- विणं हे गावकऱ्याचं एक आवश्यक कर्तव्य होतं. जी ती आईबाई येई आणि कोडीचं भुड डोकं बघून हळहळे, अग आई आई ! पोरीच्या रुपाच बेरुप झाल. कुणी द्वाडानं करणी केली काय वं?" जो तो दादाआप्पा येई आणि फुटलेल्या उतरडी, जळकी पोतीं, कपडे बघून चुकचुके, "अरारा, सगळा इस्कूट झाला की हो घरात ! च्या बायलीला ! कुणी करणीबिरणी केली काय बर !" दिवस बराच वर आला तरी न्हाव्याच्या घरी रोजचे व्यवहार घडले नाहीत. डोकी करायला आलेले लोक तसेच परत गेले. दावणीची म्हैस वैरणीवाचून, धारेची राहिली. शेरड करड नाचून ओरडू लागली. चूल पेटली गेली नाही की केर काढला गेला नाही. सारी मडळी हवालदिल होऊन गेली. दुपारच्या सुमारास काखेत धोकटी अडकवून बापूचा थोरला भाऊ बडा

३०  गांवाहून माघारी आला. म्हातारीनं रडरडून त्याला तपशीलवार हकिगत सांगितली. घरांत झालेला सत्यानाश दाखविला. " बघ, बघ. लोक बोलत्यात कुणी करणी केली. आता काय करायचं रं माझ्या बाबा ? आता व्हायाचं कसं ?" बंडा मोठा धीराचा माणूस होता. जवानीत असताना त्यानं कुस्त्या हाणल्या होत्या. सगळ्या तालुक्यांत तो म्हाजूर होता. गावात आणि गांवाखाली असलेल्या वाड्यावस्त्यांवर मिळून त्याची हजारबागशेची सावकारी होती. न्हावी मोठा गबर होता. त्याची दोन जाणती पोर मुबईला सलूनांत काम करीत होती. बंडा घरातला कर्ता माणूस होता. तें सहन न होऊन बापूची बायको त्याच्या नावानं सदोदित जळत होती. भाडून भाडून तिन वेगळी चूल मांडली होती. तरी प्रपंच अद्याप एकच होता. पाऊणशेंच्या घरांत आलेली म्हातारीच सगळा घरप्रपच संभाळीत होती. सुनाना आपल्या हातानं रोजचा शिधा देत होती. दूधदुभत्याचा हिशेबठिशेब ठेवीत होती. आणि पोराना स्वतः भाकरी वाढत होती. " धोकटी खुटीला अडकवून बंडा शातपणानं आईला म्हणाला, बरं है. आवर. पसारा का पडलाय घरात ? दिवस डोईवर आला तरी चूल पेटली नाही घरात ? कोडे, म्हस सोड. हिंडवून आण जा रानातन. उठ र बापू. कां बसलास टकुरं धरुन ? पोरखेळ सगळा ! आंवर पसारा. बंडाच्या या बोलण्यानं सगळ्याना धीर आला. फुटलेल्या उतरंडीच्या खापऱ्या गोळा झाल्या. जळकं पोतं, राख उकीरड्यावर पडली. चूल पेटली. धार निघाली. न्हाव्याच्या घरांतले सगळे व्यवहार पूर्वीसारखे चालू झाले. सुनेला उगीच दोष दिल्याबद्दल म्हातारीनं स्वतःला बोल लावून घेतले. घरांतून आंत बाहेर करता करता ती स्वतःशी बडबडूं लागली, काय बाई तरी तव्हा. मला कळतय् असं घरीं असली पीडा झाली नव्हती. मी उगीचच सुनंला बोलले. उगीचच. तिच्याकडं काय न्हाई. कुणी तरी करणी केली. दावा साधला !" ती अशी बडबडते आहे, बापू गिन्हाईकाची दाढी करतो आहे, बंडा घरां- तली प्रॉमेसरी नोटाची पुडकी बंदोबस्तानं ठेवण्याच्या नादांत आहे, बापूची

बायको पोर पाजीत बसली आहे, तोच घराच्या अंगणांत एक बचकेसारखा दगड येऊन दाणकन पडला. पडला आणि त्याच्या मागोमाग भिरीरी दगड येऊ लागले. दारावर, भिंतीवर थडाथड थडकू लागले. अंगणांत बांधलेलं रेडकू एका दगडासरशी पटकन् खाली पडल आणि पाय झाडूं लागलं. आडो- शाला ठेवलेल्या हंड्यावर एक धबका बसला. ठाण्कन् आवाज झाला. आत बसलेली म्हातारी भीतीनं वीतभर उडाली. आणि हड्याला केवढा तरी पोचा आला. मग म्हातारी रडू लागली. घाबरून थरथर कापू लागली. बापूच्या पोराना कवटाळू लागली. एकच रडारड झाली. बंडा सर्वावर ओरडला, रडायला का बा मेला का तुमचा ? गप् बसा आत जाऊन. खबरदार कुणी तोंडातनं आवाज काढला तर !" म्हातारी रड आवरून म्हणाली, " बंडा, माझ्या लेकरा, आता धडगत न्हाई रं! आतां सगळा सत्यानास होतुया रं ! अर माझ्या देवा, अग आई ग !" काय होत न्हाई आन जात न्हाई-" आवाज चढवून बंडानं म्हातारीला दटावल, तूं निवांत बस. आमचं आम्ही बघून घेतो!" घरातल्या सगळ्या माणसाना माळीत बंद करून बंडा एकटा सोप्यात राहिला. आणि येणारे धोंडे लक्षपूर्वक बघू लागला. पण ते कसे आणि कुठून येतात हे त्याला कळलं नाही. तिसरा प्रहरपर्यंत हा प्रकार चालला. न्हाव्याच्या घरात तोपर्यत कुणाच्या पोटांत अन्नाचा कण गेला नाही. अखेर जेव्हां धोंडेफेक बंद झाली, तेव्हा मंडळी भाकरी खायला बसली. बंडानं भाकरीचा तुकडा मोडून तोंडात घातला आणि तो संतापला, " भाकरी पिठाच्या केल्यात का राखंच्या ?" पण बंडाखेरीज सगळ्यांना भाकरीची चव वेगळी लागली नाही. तेव्हां बापूच्या पानातला तुकडा घेऊन बंडानं तोंडात घातला. थू थू थू, त्यालाहि तीच चव ! तोंडांत घास न घालतांच बंडा उठला आणि म्हातारीला म्हणाला, " मी जाऊन येतो. बापू, भिऊ नकोस. मी बदोबस्त करून येतो.” आणि धोतर खाकेला मारून तो चार पांच मैलांवर असलेल्या वाडीकडे निघाला. त्याला आतां या प्रकाराची शहानिशा करायची होती. हा चावटपणा "

३२  " " 66 कुणी केलाय, हे त्यानं बरोबर ताडलं होतं. तरतरा रस्ता चालून तो वाडीत आला. आला तसा धोंडी लेंगऱ्याच्या घरांत शिरला. भिंतीला टेकून बसून धोडी गाजा ओढत होता. त्याला बोलला, "धोंडी, हा तमाशा बंद कर !" कसला तमाशा ?" तुझ्याजवळ पित्रं हायेत, ती तू माझ्या घरावर सोडलीस !" काय कारन ?" " माझं देण तूं लागत होतास. त्याच्या व्याजात मी तुझी जिमिन घेतली. तो राग तुझ्या पोटात हाय ! न्हाव्या, तुला उशीरा कळलं. पन्नास रुपयाच्या कर्जापायी तूं माझी हजार रुपयाची जिमिन बळकावलीस !" तूं वेळेवर मुद्दल दिल न्हाईस. व्याज वाढलं. जिमिन गेल्यावर का बोंबलतोस ?" " मी न्हाई. बोंबलायची पाळी आता तुला आलीया ! " धोंड्या, बऱ्या बोलानं पित्रं माघारी बोलाव !" " ती आतां माझं ऐकणार न्हाईत. ती आता खवळलीत ! तांबारलेल्या डोळ्यानीं लेंगरा बंडाकडे रखारखा बघू लागला. त्याच्या निबर अंगावरच्या शिरा टरारून फुगल्या होत्या. भिंतीला टेकून बसल्यामुळं उघडी पाठ आणि हाताचं दोपर पाढऱ्या मातीनं मळलं होतं. केसाचं जजाळ अंगावर असलेला धोंडी एखाद्या जगली जनावरासारखा न्हाव्याकडे बघत होता. मग न्हावीहि रागान हिरवापिवळा झाला. म्हणाला, " लेंगऱ्या, मी तुझा जीव घीन. फासावर गेलो तरी बेहत्तर ! " त्या अगुटर माझी पित्रं तुझा जीव घेतील. गुर्मीत मरुं नगंस. माझी जिमिन माघारी दे !" "न्हाई देणार. तुला का करायच हाय ते कर ! निर्वाणीच उत्तर देऊन बडा बाहेर पडला आणि गावाकडच्या वाटेनं चालू " " 66 "

लागला. दिवस मावळत चालला होता. आभाळ गढूळलं होतं. आजुबाजूला माणूसकाणूस नव्हतं. बंडा न्हावी एकटाच सपासप पाय उचलीत होता. धोंडी लेंगऱ्यापाशी पितरं होती ही गोष्ट सगळीकडे म्हाजूर होती. ती त्यानं कोंकणांतून जबर रक्कम देऊन आणली होती. आणि शिकारी कुत्र्यासारखी पाळली होती. ती कशी आहेत, काय आहेत हे कुणी प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं. पण अशी बोलवा होती की, शेंदूर फासलेले ते बचकेएवढे गोटे आहेत आणि धोंडी लेंगऱ्यानं ते आपल्या झोपायच्या जागी खोलवर पुरून ठेवले आहेत. त्याना नेहमी काही तरी कामगिरी हवी असते. त्यासाठी ती सारखीं लेंगऱ्याला छळत असतात. त्याना राबवून घेण्यासाठी लागणारे सारे मंत्रतंत्र लेंगऱ्याला माहीत आहेत. त्यासाठी तो कडक पथ्यपाणी करतो. ग्रहणा दिवशी कमरेइतक्या पाण्यांत उभा राहून मत्र जपतो आणि कधी स्मशानात मध्यरात्री जाऊन बसतो... चालता चालता बंडा न्हाव्यासारखा जवान माणूसदेखील भीतीनं घामाघूम झाला. वरचेवर मागं पाहूं लागला. न जाणो, अंगठ्याएवढे हातपाय असलेले ते ताबडे गोटे अकस्मात् मागून येतील आणि आपल्याला अलगंत उचलून निवडुंगाच्या काटेरी बनांत फेकून देतील. नाहीतर छातीवर थयाथया नाचतील आणि रक्ताच्या गुळण्या होऊन आपण मरूं. मग आपली पोरं वनवाशी होतील आणि आपली सर्व इस्टेट बापूची बायको बळकावील. म्हातारी शोकानं गपकन मरेल आणि बिचारी कोंडी काकूनं अन्नपाणी न दिल्यामुळं दारोदार भिक्षा मागत हिंडेल...छे, ही पितर आपला सत्यानाश करतील... बंडा न्हावी थोडाफार टरकला. आणि मागं न बघतां सटक्यानं पाय उचलं लागला. आता दिवस मावळून गेला होता. सगळीकडे अंधार कालवला होता. किडे कचकचत होते. शेजारच्या ओढ्याचं पाणी खळखळ करीत होतं. बंडा न्हावी मनांत टरकला होता. पण टरकून भागणार नव्हतं. काहीतरी इलाज करा- यला पाहिजे होता. पैशाच्या बळावर धोंड्याला वाकवणं अशक्य नव्हतं. त्यांच्या- इतकाच एखादा जबर पित्र्या शोधून आणून त्याच्यावर सोडणं अवघड नव्हतं. पण असा बहाद्दर कुठे मिळणार ? आणि जरी मिळाला तरी त्यालाहि धोंड्यानं हटवला म्हणजे मग ? खवळून गेलेली पित्रं काय करतील ? त्यापेक्षा काही गां. गो. ३

३४  " " वेगळा, धोंडयाचा एकदम मटका बसविणारा उपाय शोधून काढणं आवश्यक होतं. विचाराच्या नादांत घोर कमी झाला आणि पायाखालची वाटहि ओसरली. बंडा न्हावी आपल्या गावात आला. घरात शिरला. दिवे लागले होते आणि न बोलता सवरता न्हाव्याची माणसं घरांत वावरत होती. मनातून भ्यालेली, हबकलेली. भुतानं पछाडल्यासारखी. बापू न्हावी गुढचे उभे करून उगीच बसला होता. त्याचं पागोटं त्याच्या गुढघ्यावर होतं आणि दोन्ही हातानी तो आपल टक्कल पडलेलं डोक गोजारीत होता. बंडान विचारलं, का रं, माझ्या माघारी काय घडल का ? " काय न्हाई. पर म्हशीन धार दिली न्हाई:! का बरं ?" राम जाणं. पर दुधाचा थेव न्हाई तिच्या कामत ! " " आटलीच म्हणावी का ?" " हा !" पारडूं सुटून पेल होत का ? "न्हाई !" "ठीक !" बंडानं जाणलं की हाहि धोंड्याच्या करणीपैकीच एक प्रकार आहे. हत्ती- सारखी म्हैस दूध देईनाशी झाली. उत्पन्न बुडालं. दुधातुपाची बाजू बंद झाली ! रात्रींहि भाकरीची चव विलक्षण लागल्यामुळं बंडानं काही खालं नाही. मुलबाळं जेवली. कोंडी आणि जाणती पोरं घरात झोपायला भिऊ लागली, तेव्हां त्याना शेजारच्या घरी नेऊन झोपवलं. रात्री धोंडे पडले. म्हशीची वैरण आग लागून जळली. रात्रभर न्हाव्याच्या घरांत दिवा तेवत होता. सकाळी बंडा जागा झाला तेव्हां अंगावर असलेल्या धोतरावर बिब्याच्या काळ्या फुल्या पडल्या होत्या. अगदी खडी काढल्यासारख्या. पण आतां "

कोणत्याच गोष्टीचं नवल करण्यासारखं नव्हतं. करणीचे खेळ काय करतील आणि काय नाही याचा नेम नव्हता. मनांत काही निश्चय करून बंडा तालुक्याला जायला निघाला. जातांना त्यानं पैशाची पिशवी कमरेला लावली. गांवांतून जातांना लोकानी विचारलं, काय बंडा, काय तयारी ? तालुक्याला जाऊन येतो!" घरातला खेळ थाबला का ? " न्हाई !” काय भानगड असावी बर ही? तुमच्या वाईटावर कुणी होतं का ? कर- णीचा खेळ आहे हा. एखादा मंत्र्या बघून बंदोबस्त करा.!" 'हा." " म्हैस आटली म्हणं तुमची ?" 'हा.” "कडबाबि जळला म्हण, खर का?" 66 "खरं." " 'अस रोज होऊ लागल तर गावात रहाण कठीण झाल-पण गाव सोडून जाव तरी कुठ ?" " होय की!" बराय . जा मग. ऊन होतया ! " 66 " अशी घुम्यासारखी उत्तरं देऊन बडा गावाबाहेर पडला आणि तालुक्याच्या वाटेला लागला. गावात चहुंकडे हा विषय चालला आहे आणि लोक आपली दया करत आहेत याची जाणीव होऊन त्याला वाईट वाटलं. बंडा न्हावी कधी लोकाच्या दयेचा विषय झाला नव्हता. लेंगऱ्याचा मटका बसवलाच पाहिजे ! तालुक्याला आल्याबरोबर गावच्या एका माणसाच्या ओळखीनं न्हावी फौजदाराच्या घरी जाऊन त्याला भेटला. बैठकीच्या खाली बसून त्यानं घरांत

३६  " 66 5 " " चाललेल्या गोंधळाची तपशीलवार हकिगत फौजदाराला सांगितली, आणि आरामखुर्चीवर तंगड्या पसरून पाढरी विडी ओढीत फौजदारानं ती ऐकली शेवटीं न्हावी कळवळून म्हणाला, म्हाराज, हे शंभर रुपयं घ्या आन् त्या घोड्याचा काय तरी बंदोबस्त करा." फौजदाराला सगळी मजाच वाटली. तो हसला आणि म्हणाला, "अरे, काय करणीच्या गोष्टी सागतोस पोरासारख्या ? खोटं आहे सगळ !" "न्हाई म्हाराज, खोटं म्हणूं नका. सगळा गाव साक्षीला आहे. तुम्ही डोळ्यानी बघा!' काय बघू ? ती पितर मला दाखवशील ? ती दिसत न्हाईत साहेब, पन त्यानी केलेला गोधळ बघा ! अरे, पोरीचे केस रोगानं गळले असतील. डॉक्टरला दाखव." अक अक्षी कात्रीनं कापावंत अस ? पोरगीला रोगबीग काय न्हाई !" मग फौजदारानं थोडा विचार केला आणि आपल्या सातवीती घोड्यावर टांग टाकुन तो म्हणाला, चल, बबूं दे मला तुझीं पितर. " फौजदाराच्या घोड्याबरोबर धावपळ करीत बंडा न्हावी वाटेनं जाऊ लागला. त्याची दमछाट झाली. तो मागं पडला की फौजदार घोडा आवरी आणि ओरडे, " रे न्हाव्या, दमलास का लेका ? अरे, तुझ्यासारख्या जवानान घोड्याला मागं टाकलं पाहिजे! मग श्वास रोखून आणि धोतर आवरून न्हावी रपाट पळे, पण फौजदाराच्या घोड्याला चार पाय होते. आणि न्हाव्याला दोन. अखेर दोवेहि गावात आले. न्हाव्याच्या घरापाशी, घोड्याखाली उडी मारून फौजदार सोप्यात चढला आणि मोठ्यानं गरजला, "रेन्हाव्या, कुठायत पितरं ? दाखव मला. मी कुस्ती खेळतो त्याच्याबरोबर." फौजदार असा बोलला मात्र, कुठूनसा एक धोंडा आला आणि दाणकन् त्याच्या पायाच्या टोकापाशी पडला. अगे मा गे!"

" दोन्ही हातानी उचलणार नाही असा तो धोंडा फौजदाराच्या डोक्यात जर पडला असता तर एका फौजदाराचे चार फौजदार झाले असते. सुपारी फुटावी तसा तो जवान अधिकारी त्याखाली फुटला असता. न्हावी म्हणाला, बघा सायेब, आली परचीती ?" साहेबानं आरडाओरडा केला. धोडा कुणी फेकला ? हा पाजीपणा आहे. पितरबितर सब झूट आहे. आणि बघता बघता न्हाव्याच्या घरानं पेट घेतला. एकाएकी, आकस्मिक ! रॉकेल ओतून काडी लावावी तसा. लोकाची धावाधाव झाली. मुग्यासारखी ओळ लावून लाबच्या विहिरीच पाणी आणून शिपल, विहिरीचा तळ दिसेपर्यंत शिपल, तेव्हा आग बसली. साहेब स्वतः पाण्याच्या कळशा देत ओळीत उभा होता. त्याचा भारी ड्रेस भिजून चित्र झाला. त्याला लोक म्हणाले, " साहेब, खोट म्हणूं नका. ही करणी आहे. कुणी तरी न्हाव्यावर पित्र सोडली आहेत." काही एक न बोलता, गावातील चार दणकट रामोशी घेऊन साहेब घोड्यावरून दौडत वाडीला गेला आणि हातात पिस्तूल घेऊन अकस्मात् धोडी लगऱ्याच्या घरात शिरला. मुळीच वासपूस न करता त्यान त्याला बाहेर काढला. वाडीपासून दूर ओढ्याच्या काटाला नेला. आणि निरगुडीच्या लांब, लवचिक फोका काढल्या. चारी रामोशाच्या हाती दिल्या. आणि ऑर्डर दिली की. या साल्याला ठीक करा ! लेगऱ्याला झाडाला पाटमोग उभा करून रामोशांनी फोका ओढल्या. त्याच्या पाठीवर सपासप् ओढल्या. एक दमला की दुसरा पुढे होई, नवी फोक घेई आणि भिर्रकन् लेगऱ्याच्या कुल्ल्यावर ओढी. पण लेगरा ओरडला नाही. त्यान हूं का चू केलं नाही. फोकाचे वळहि त्याच्या अंगावर उठले नाहीत. तोंडांत तंबारव धरून तो गप उभा राहिला होता. माराला पाठ देत होता. सारे रामोशी दमले. त्याचे हात काम देईनात, तेव्हा झाडाखाली बसून हा विलक्षण प्रकार बघत राहिलेल्या फौजदाराला, एक डोळा बारीक करून लेंगऱ्या म्हणाला, सायबा, तुझ्या बंदुकीची गोळी मारलीस तरी ह्या धोंडीच्या अंगाला भोक पडणार न्हाई ! का उगीच रामोशी दमवतोस ? न्हाव्यानं लबाडीनं माझी

३८  जिमिन बळकावलीय. ती माघारी घेतल्याचगार मी सोडणार न्हाई. तूं मधीं पडूं नगंस!" साहेब शहाणा माणूस. त्यानं लेंगऱ्याला सोडून दिल, एक पाढरी विडी ओढायला दिली. न्हाव्याला त्याचे शंभर रुपये माघारी देऊन सागितलं, 'गड्या, माझं काही चालत नाही. लेंगरा माणूस नाही, सैतान आहे. हिंमत असली तर त्याच्याशी खेळ. नाहीतर जमीन देऊन मोकळा हो!' आणि घोडा उडवीत तो तालुक्याला निघून गेला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel