शूक सांगतो शौनकाप्रती ।
या कथेसि जे नित्य ऐकती।
देव देतसे त्यांसि सन्मती ।
सत्समागमें होय सद्गती ॥१॥
 
उत्तरेकडे देवतागिरी ।
दक्षिणेकडे गौतमी बरी ।
सिंदुरासुरें मेदिनीवरी ।
स्थापिली पहा दिव्य ते पुरी ॥ २॥

राज्य मांडिलें उग्र सिंदुरे ।
देवतालये पाडि सुंदरें ।
स्वर्गिच्या नपें श्रीपुरंदरें ।
त्यासि दीधलीं दिव्य मंदिरें ॥ ३ ॥
 
दानवेश्वरें शब्द अंबरीं ।
अक्षरें खरीं ऐकिली बरीं ।
शत्रु वाढतो अंबिकोदरीं ।
शंभुच्या घरी खूण हे धरी ॥ ४ ॥

सिंदुरासुरें ग्राम सांडिला ।
शंभुच्या घरी द्वेष मांडिला ।
अंबिकोदरीं गर्भ खांडिला ।
श्रीमुखेंदु तो दूर धाडिला ॥ ५॥
 
नर्मदाजळामाजि तो पडे ।
देव सर्वही तेथिचे खडे ।
त्यांचि अर्चना ज्यासि हो घडे ।
तोचि मुक्तिच्या मस्तकी चढे ॥ ६॥

पर्यळीमधे अंबिका बसे ।
कर्दळीवनीं निद्रिता असे ।
निर्दळी सुरा दुष्ट मानसें ।
गांजिली शिवा त्याचि तामेसें ॥ ७॥

निद्रिता असे अंबिका घरीं ।
वायुरूप तें दैत्य तो धरी ।
नासिकापथें जाय अंतरीं।
गर्मिच्या शिरे छेदना करी॥ ८॥

स्वस्थळाप्रति दैत्य पातला ।
घेऊनी सुरा फार मातला ।
निर्जरा स्त्रिया त्यांसि रातला ।
मूळ धर्म तो बंदि घातला ॥९॥

श्रीशिवालयीं पुत्र जन्मला ।
वक्त्रहीन तो देखिला भला।
पार्वती म्हणे बाळ चांगला ।
त्यासही कसा दोष लागला ॥ १०॥

अंबिका वदे शंकराप्रती ।
छेदिला तुम्ही भारतीपती।
दुष्ट कर्म तें भोगुनी किती ।
लेकरासि तो जाळि हे गती ॥ ११ ॥

त्या चतुर्भुजा देखतां शिवा ।
दुःख वाटले तीचिया जिवा ।
हा कसा कुळीं जन्मला दिवा ।
कायसी वर्दू श्रीरमाधवा ॥ १२॥

श्रीशिवाज्ञया नंदिकेश्वरें ।
देव बाहिले सर्व आदरें ।
वक्त्रहीन तों बाळ शंकरें।
दाविलें तया चंद्र- शेखरें ॥ १३ ॥

शंभुपार्वती पावलीं भया ।
देव सर्वही पूजिती तया ।
आमुची मुला येउं दे दया ।
दुष्ट विघ्न हे जाउं दे लया ॥ १४ ॥

सूत सांगतो शौनकाप्रती ।
या कथेसि जे नित्य ऐकती ।
देव देतसे त्यांसि सन्मती ।
सत्समागमें होय सद्गती ॥१५॥

भूतळी असे एक भूपती ।
श्रीमहेश हे त्यासि बोलती ।
शांभवामधे जो सदा व्रती ।
त्याचिया घरा ये बृहस्पती ॥ १६ ॥

पूजिला नृपें श्रीबृहस्पती ।
तोषलों म्हणे तो महामती ।
ऐक उक्त हे दिव्य भूपती ।
बंद्य होसि तूं निर्जराप्रती ॥१७॥

श्रीमदें महेशासि व्यापिलें ।
नारदें तयालागि शापिलें ।
भोगिशील तूं कर्म आपुलें ।
शंभुहस्तकें जासि कापिले ॥ १८ ॥

भूप पावला ते क्षणी मृती ।
पर्यळीवनी घेत संसृती ।
कुंजरास्य तो मानवाप्रती ।
अंतरीं करी शंकरस्मृती ॥ १९॥
 
त्या गजासुरे युद्ध मांडिलें ।
शंभुने तयालागि ताडिलें ।
छेदुनी बरें चर्म काढिलें ।
चंद्रशेखरे तेंचि वेढिलें ॥२०॥

वारणानना शंभु पूजितो ।
धूप दीप नैवेद्य योजितो ।
जो जसा मनीं भक्त भावतो ।
देवही तसा त्यासि पावतो ॥ २१॥

बाळ बोलिलें नारदाप्रती ।
शापिला तुम्ही भक्त भूपती ॥
पर्यळीमधे तो गजाकृती ।
शंभुहस्तकें पावला मृती ॥ २२ ॥

बोलिला मुखें जें बृहस्पती ।
'वैद्य होसि तूं निर्जराप्रती ।
तें करीन मी सत्य श्रीपती ।
अंगिकारि तू हेंचि सांप्रती ॥ २३ ॥

श्रीमहेश हें नाम आवडें ।
आळवा मला भक्त साबडे ।
जो वदेल तो मत्पदी चढे ।
मी वधीन त्या सिंदुरा पुढें ॥ २४ ॥

श्री- विरंचिच्या वक्त्रि जन्मला ।
त्याचिया वरें फार मातला ।
गभिं येऊनी छेदिले मला ।
मी वधीन तो दैत्य येकला ॥ २५॥

निर्विकार तो देव मी खरा ।
सांगतो तुम्हां योग हा बरा ।
मारिलें शिवें ज्या गजासुरा ।
अंगिकारितों त्याचिया शिरा ॥ २६ ॥

ज्यासि देखतां काम लाजती ।
आयुधे करीं चारि साजती ।
घागऱ्या बऱ्या पार्थि वाजती ।
दुदुभि- ध्वनी दिव्य गाजती ॥२७॥

ज्यासि चिंतितां दोष वारती ।
तो प्रगटला दिव्यसा रथी ।
श्रीउमेश त्या मुख्य भारती ।
इंदिरा करी मंगलारती ॥२८॥

सांग देखिला देव जेधवां ।
हर्षले मुनी सर्व तेधवां ।
शुक्ल- पक्षिचा मास भादवा ।
पुत्रसौख्य दे श्रीउमाधवा ॥२९॥

मध्वनाथ हे सांगतो कथा ।
श्रीचतुर्थिची नाहिं अन्यथा ।
जन्ममृत्युची नाशुनी व्यथा ।
देव देतसे मुक्ति सर्वथा ॥ ३०॥

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel