सकळाआधीं पूजा करिती जन ज्याची ।
ज्याच्या नामें नासति विघ्ने सकळांचीं ॥
भजतां वारी जो भक्तांचे भवओझें ।
त्याच्या चरणीं निश्चळ राहो मन माझें ॥ १ ॥
शुंडादडे करितो खंडण दैत्यांचें ।
दंताघाती दळ संहारी कुजनांचें ॥
माथा शेंदुर वरि दूर्वांकुर साजे ।
त्याच्या चरणीं निश्चळ राहो मन माझे ॥ २ ॥
ज्याचें आखू वाहन शोभे रणरंगीं ।
देवासाठी जो असुरांचे बळ भंगी॥
येवो वाचे चवदा भुवनें जो गाजे
त्याच्या चरणीं निश्चळ राहो मन माझें ॥ ३ ॥
ज्याच्या कानीं नंचळतेचा बहु चाळा ।
ज्याचे कंठीं शोभति मुक्ताफळमाळा ॥
हातीं पाशांकुशवैभव साजे ।
त्याच्या चरणी निश्चळ राहो मन माझें ॥ ४ ॥
ज्याच्या पोटी चवदा भुवनें ही वसती ।
वेदी शास्त्री ज्याला लंबोदर म्हणती॥
मांदे कांसे पीत पीतांबर साजे ।
त्याच्या चरणीं निश्चळ राहो मन माझें ॥५॥
ज्याच्या उरू जानू वर्तुळ पाटरिया ।
ज्याच्या चरणी पुष्कळ धुळघुळ घागरिया ॥
थयथय शब्दं नाचतसे जो निजबोधे ।
त्याच्या चरणी निश्चळ राहो मन माझें ॥ ६ ॥
ज्याच्या सत्ते शंकर जाले त्रिपुरारि ॥
ज्याच्या सत्तें विष्णु भवभंजनकारी ॥
ज्याच्या सत्तें ब्रह्मा भुवनें ही करितो ।
ज्याच्या सत्तें शेष शिरिं धरणी धरितो ॥ ७॥
ज्याच्या सत्तें गिरिजा महिषासुर मारी।
ज्याच्या सत्तें मन मुक्तिसि अधिकारी ।
ज्याच्या सत्तेवांचुनि कांहीही नुमजे ।
त्याच्या चरणीं निश्चळ राहे मन माझें ॥८॥
विघ्नईशा, विघ्नविनाशा, विबुधेशा ।
शेंदुर वाढे हेरंबा तू जगदीशा ॥
भक्ताधीना भक्तवत्सला, गणराया ।
सिद्धीबुद्धीप्राणनाथ, वंदू पाया॥९॥
आज्ञा द्यावी मध्वमुनीश्वर कविवीरे ।
हेरंबस्तोत्र जपाया मत्तमयूरे ।
अर्चन करितां सिद्धीसह जो गण नाचे ।
त्याच्या चरणीं निश्चळ राहो मन माझें॥१०॥