कोकणात सुधागडच्या डोंगराळ पायथ्याशी एक टेकडी होती, ज्याच्या डाव्या बाजूला घनदाट जंगल होते.जंगलाच्या मधोमध वाहणारी नदी टेकडीच्या कडेनी वाहत असे. नदीच्या काठी वेताळाचे मंदिर होते. मंदिर खूप जुने होते. मंदिरात मूर्ती नव्हती वेताळ म्हणून तिकडे एक तेल आणि शेंदूर फसलेला धोंडा होता. असे ऐकले होते की वर्षातून एकदा वेताळाची जत्राही तिथे भरते. दूरदूरवरून लोक तेथे त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी येतात. नवस मागतात. बोकडाचा, कोंबडीचा बळी देतात आणि काहीजण दारू सुद्धा देतात.
मंदिरापासून काही अंतरावर एक मजली पक्के घरही होते. ते खूप जर्जर आणि जुनाट होते. त्याच्या भिंती पडल्या होत्या. सर्वत्र तण वाढले होते. गवत माजले होते.
उत्खननाचे काम थांबल्याने मला चैन पडत नव्हते. जेव्हा मी माझे सहकारी डॉ. शेजवळ यांच्यासोबत उत्खननस्थळी पोहोचलो, तेव्हा तेथे महादूची भेट झाली.
मला पाहून तो हसला आणि म्हणाला- "साहेब मी आधीच सांगितलं न ती भुताची टेकडी आहे. तिकडे खणू नका... "
मी महादूच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही, शांतपणे शेजवळ यांच्याबरोबर कामाच्या साईटकडे निघालो.
हे तीन सांगाडे सुमारे १६ ते २० फूट खाली इमारतीच्या पक्क्या पायाच्या आत सापडले. मी काळजीपूर्वक पाहिले, तिन्ही शाबूत होते. जसेच्या तसे होते. जराही मोडलेले नव्हते. त्यापैकी दोन सांगाडे पुरुषाचे आणि तिसरा स्त्रीचा होता. परीक्षण केलं असता दोघे मयत वयाने लहान असल्याचे निष्पन्न झाले.
पुढील परीक्षणासाठी, मी सांगाड्यांच्या कवट्या वेगळ्या केल्या आणि त्या माझ्याबरोबर घेतल्या आणि माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले.
त्या दिवशी संध्याकाळची वेळ होती. आकाश ढगाळ होते. पश्चिमेकडून वारे वाहत होते. वातावरणात एक निरव शांतता होती. मी हळूहळू चालत गेलो आणि वेताळ मंदिराच्या मोडक्या कट्ट्यावर बसलो.
मला त्याच दिवशी श्वेताचे पत्र मिळाले होते. ती लवकरच इंग्लंडहून परतणार होती. त्यावेळी मला खूप आनंद झाला. बरोब्बर चार वर्षांनी मी तीला भेटणार. तिचे माझ्यावर खूप प्रेम आहे. इतक्या दूर देशात गेल्यावरही श्वेता मला विसरली नाही. मी किती वेळ व कट्ट्यावर बसलो होतो मला माहित नाही.
अचानक त्या भग्न अवस्थेतील घराच्या आतून कोणीतरी ओरडण्याचा आवाज आला. माझ्या अंगावर भीतीने सर्रकन काटा आला. ती खूप वेदनादायक किंचाळी होती. मी एक मिनिट सुद्धा तिथे थांबलो नाही. लगेचच आपल्या छावणीत परतलो. मला रात्रभर झोप आली नाही. मला ती किंचाळी सारखी कानात ऐकू येत होती.