सकाळी मी कचरूशी या विषयी बोललो. कचरू माझा स्थानिक नोकर होता.
माझे ऐकून तो म्हणाला - "साहेब! जोशी सायबाचे भूत त्या घरात राहते. कधीकधी तो रडतो आणि ओरडतो "
मग त्याने पुढे जे काही सांगितले मला ते खूप विचित्र वाटले. त्याने सांगितले की सुमारे चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी चंद्रकांत जोशी नावाचा एक तरुण त्या घरात राहत होता. तो सुशिक्षित होता.
एका निर्जन ठिकाणी राहून त्याला दर्शनशास्त्राचे पुस्तक लिहायचे होते आणि याच उद्देशाने तो त्या निर्जन ठिकाणी बांधलेल्या घरात राहायला आला होता.
तो क्वचितच बाहेर पडत असे. तो संपूर्ण दिवस अभ्यास, चिंतन आणि लेखनात घालवत असे. एक दिवस तो अचानक कुठे गेला माहित नाही आणि मग आज पर्यंत तो परत आला नाही.
मला कचरू कडून असेही कळले की चंद्रकांत जोशीचे लग्न गावचे सरपंच दत्ताराम खोत यांची एकुलती एक मुलगी सारिकाशी होणार होते.
खोतानीच चंद्रकांत जोशी यांना बोलावून त्यांचा जुना वडिलोपार्जित वाडा त्यांना राहण्यासाठी दिला होता.
सारिका एक अतिशय आकर्षक आणि सुंदर मुलगी होती. ती सुशिक्षितही होती. पहिल्या भेटीतच ती चंद्रकांत जोशीच्या प्रेमात पडली.
चंद्रकांत जोशीही सारिकावर प्रेम करू लागले. कधी कधी दोघेही संध्याकाळी या टेकडीवर फिरायला जायचे. ते तासन् तास बसून बोलत असत.
पण ज्या दिवशी चंद्रकांत जोशी बेपत्ता झाले, त्या दिवशी सारिकाचा मृतदेह त्याच्या घराबाहेर व्हरांड्यात सापडला, तिचा अचानक मृत्यू कसा झाला हे कोणालाही माहित नव्हते. डॉक्टरांनी सांगितले की सारिकाचा मृत्यू कार्डियाक अरेस्टमुळे म्हणजे हृदय बंद पडल्यामुळे झाला होता. खरं खोट देवच जाणो.
या भयानक घटनेने दत्ताराम खोत यांना इतका धक्का बसला की ते वेडे झाले आणि त्याच अवस्थेत काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबात त्यांच्यापेक्षा लहान मुलीशिवाय दुसरे कोणी नव्हते, म्हणून सरकारने त्यांची सर्व बेवारस मालमत्ता ताब्यात घेतली.
"तुला या सगळ्या गोष्टी कशा कळल्या?" मी कचरूला विचारले.
“साहेब माझी आई खोताच्या घरी भांडी धुवायची आणि मीही गड्याचे काम करायचो. त्यावेळी मी पंधरा ते सोळा वर्षांचा होतो. त्या वेळी तो टेकडी नव्हती. त्याच्या जागी एक मोठे मंदिर होते. मंदिर तीन मजल्यांचे होते. दोन मजले भूमिगत आणि तिसरा मजला वर होता. माझ्या मते हे बौद्ध मंदिर होते, कारण कधीकधी अनेक बौद्ध भिक्षु मंदिरात जमून त्यांचा पूजापाठ करायचे."
कचरू बरोबर म्हणत होता. एका शिलालेखाच्या आधारे आमच्या विभागाला तेथे एक अतिशय प्राचीन बौद्ध मठ सापडला होता. बौद्ध ग्रंथांच्या आधारे हे देखील वाचनात आले की काही वेळा भगवान तथागत यांनी त्यांचे शिष्य आनंद यांच्यासह त्या बौद्ध मठात काही काळ घालवला होता. सरकारला तेथे प्राचीन आणि दुर्मिळ बौद्ध वस्तू सापडतील अशी आशा होती. म्हणूनच उत्खनन केले जात होते.
कचरूचे शब्द ऐकून चंद्रकांत आणि सारिकाची काल्पनिक रूपे रात्रभर माझ्या डोळ्यांसमोर येत राहिली आणि अदृश्य होत राहिली.
ते तीन सांगाडे चंद्रकांत, सारिका आणि खोत यांचे आहेत का काय असा विचार करू लागलो.