माझ्यासाठी तथागताची ती मूर्ती जितकी मौल्यवान होती तितकीच चंद्रकांत जोशीची जीवनगाथाही मौल्यवान होती. चरित्राचा शेवटचा भाग खालीलप्रमाणे होता.
"आणि आता मी माझ्या आयुष्यातील सर्वात दुःखी पण सर्वात आश्चर्यकारक विचित्र घटनेचा उल्लेख करतो. ज्यांना माझी ही जीवन कथा मिळाली आहे त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. या चरित्रात तुम्ही आतापर्यंत जे वाचले आहे त्यावरून तुम्हाला वाटेल की माझे डोके फिरले आहे?
मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलेल्या कथेच्या रचनेत तुम्हाला शंका नाही?
माझ्या कथेत तुम्हाला काही विचित्रपणा किंवा अवास्तवपणाची झलक सापडली नाही का?
मी तुम्हाला आत्तापर्यंत जे सांगितले आहे, ते शहाणा माणूस सांगू शकतो त्याच प्रकारे मी तुम्हाला सांगितले आहे यावर तुमचा विश्वास आहे का?
बघा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारण्याचा विचार केला आणि बरेच प्रश्न विचारले,
पण मी काय करणार? या भीतीने माझे हृदय थरथर कापते की जर लोकांनी माझी जीवन कथा वाचली तर लोक मला वेडा तर समजणार नाही ना?
म्हणूनच मी इतके प्रश्न विचारले.
माझ्या चरित्राचा हा शेवटचा भाग इतका विलक्षण आहे कि सामान्य माणसाच्या अनुभवांपासून आणि जगाच्या नियमांपासून वेगळा आहे. आणि हे चरित्र विज्ञानाच्या विरोधात आहे की काय मी स्वतः शंका घेऊ लागतो. माझे हे दु:ख कथन करण्याबरोबरच, जेव्हा मला असे वाटते कि जो हे ऐकेल त्यावर त्याचा विश्वास बसणार नाही आणि मला वेड लागलं आहे असे वाटेल कदाचित माझ्याबद्दल. करुणा दाखवण्याऐवजी तो माझी चेष्टा करू लागेल, मग मला असे वाटेल की एकाच वेळी हजारो विंचूंनी माझ्या हृदयाला डंख मारले आहेत. हा विचार येताच मग मी अपार वेदनेने रडतो.
मी तुम्हाला खात्री देतो की माझ्या कथेचे प्रत्येक अक्षर खरे आहे. माझे अत्यंत आदरणीय स्वामी विवेकानंद आणि भगवान बुद्ध यांची शपथ घेतो कि मी तुम्हाला जे काही सांगत आहे ते खरे आहे आणि त्यात कल्पनेचा थोडादेखील स्पर्श नाही."
मी चंद्रकांत जोशी याच्या चरित्राचा हा उतारा वाचत असताना मला असे वाटले की तो स्वतः माझ्या समोर बसून वाचत आहे. मी पुढे वाचू लागलो.
“माझ्याकडे पैशांची किंवा मालमत्तेची कमतरता नाही. मुंबईत माझी स्वतःची अनेक घरे आहेत. बँकेत लाखो रुपये जमा आहेत. मुंबईच्या गडबडीला कंटाळून मी कोकणच्या या सुनसान, निर्जन आणि शांत भागात आलो. एक सुशील आणि सुंदर पत्नी जी माझ्या एकाकी आयुष्याला माधुर्याने भरून काढेल ती देखील मिळणार होती. सत्य हे होते की सारिकाच्या आकर्षणानेच मला इथे खेचून आणले होते.
सारिका, मला वाटते, त्या दिवशी सकाळी जेव्हा तू माझ्याकडे इथे येण्यासाठी घर सोडले होते , तेव्हा तू तुझ्या मनात सर्व प्रकारच्या इच्छा आणि आकांक्षा निर्माण केल्या असतील. जेव्हा तू समाजाची पर्वा न करता माझ्या घराच्या दिशेने चालत होतीस तेव्हा तू तुझ्या मनात काय विचार केला असशील...... बरं जाऊदे . मी भावनांच्या भरात वाहून जातोय आणि विषयापासून भरकटतोय.
तर, सारिकासोबत माझे लग्न निश्चित झाले. पण माझ्या हट्टीपणामुळे मी लग्न करायला तयार नव्हतो. मी स्वामी विवेकानंद आणि बुद्ध यांच्या ग्रंथांचा अभ्यास केला होता. मला खात्री होती की धर्म हा केवळ वादाचा विषय नसून प्रत्यक्ष अनुभवाचा विषय आहे. जर देव खरोखर अस्तित्वात असेल, तर त्याला या जन्मात आणि या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहणे आवश्यक आहे. आणि म्हणूनच मी व्रत घेतले होते की जोपर्यंत मला भगवंताच्या साक्षात्काराच्या काही मार्गांचे ज्ञान मिळत नाही आणि या सृष्टीच्या रहस्यामागील अज्ञात शक्तीच्या स्वरूपाचे ज्ञान मिळत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही.
मी दर्शनशास्त्राचा सखोल अभ्यास केला होता, परंतु दर्शनशास्त्राची तत्त्वे ज्यांच्याशी बुद्धीची ओळख झाली होती, त्यांचा प्रकाश अजून माझ्या हृदयापर्यंत पोहोचला नव्हता आणि म्हणूनच माझे मन खूप असमाधानी होते. माझे हृदय निसर्गाच्या विविध प्रकारांच्या रूपांनी आणि विचित्र संवेदनांनी भारले जाते आणि नंतर खूपच व्याकूळ होते. मला असे वाटते की निसर्गाची ही रूपे आणि सृष्टीच्या या सर्व दृश्यांच्या आणि माझ्या दरम्यान एक अभेद्य पडदा आहे, यामुळे मी तिच्या सर्वात सुंदर स्वरूपाची प्रत्यक्ष भेट घेऊ शकत नाही. याचा विचार केल्याने माझे हृदय तीव्र दुःखाने भरते. मग मी पुन्हा विचार करतो या सर्व निर्जीव वस्तूंमध्ये आणि माझ्यामध्ये केवळ कल्पना करण्यायोग्यच नाही तर अनुभवात्मक एकरूपता आहे. पण तरीही मी त्याच्या प्रत्यक्ष भावनेपासून वंचितच आहे. सृष्टीच्या या प्रकारांसोबत माझे मन एकरूप होऊ शकत नाही आणि माझ्या दुःखाचे हेच सर्वात मोठे कारण आहे.
मी तासंतास अतिशय अस्वस्थ मनाने इकडे तिकडे येरझाऱ्या घालायचो. एक दिवस अशा विचित्र मनःस्थितीत खूप वेळ फेऱ्या मारल्यानंतर मी सारिकाच्या घरी गेलो. त्यावेळी ती एकटी होती.
मी कर्कश आवाजात म्हणालो - 'सारिका! तुला उद्या सकाळी माझ्या घरी यावे लागेल. हे सांगण्यासाठी, मी तीन मैलांचा लांब रस्ता पायी तुडवत तुझ्याकडे आलो आहे"
'हो पण , काय झालं?' आश्चर्याने तिने विचारले.
"काही विशेष नाही. असंच."
'पण तुम्ही असं काय बोलताय? लग्नापूर्वी असे भेटणे योग्य होईल का? जग काय म्हणेल? तुम्हाला काय झालंय काय ?’
'मला काही झाले नाही.' मी रागाच्या भरात म्हणालो 'पण हे लक्षात ठेव की जर तू माझ्यावर प्रेम करत असशील आणि तुला खरोखर मी पती म्हणून हवा आहे, तर उद्या सकाळी तुला काहीही कारण काढून माझ्या घरी यावे लागेल.”
सारिका काही उत्तर देण्यापूर्वीच मी तिथून निघालो. मी निघून गेलो खरा, पण नंतर माझे मन पश्चातापाच्या अग्नीत जळू लागले.
विचार केला की मी परत येऊन म्हणावे की, “सारिका! माझ्या इथे येण्याची गरज नाही.”
पण मी हे करू शकलो नाही. किती बरे झाले असते जर मी परत येऊन तिला येऊ नकोस असे सांगितले असते. पण नियतीच्या मनात आणखी काहीतरी वेगळे होते. माझ्या नशिबात, माझ्या सारिकाचा सर्वनाश लिहिला होता. ते विधिलिखित कसे पुसले जाणार होते.
वाटेत मनात विचार आला स्वामी रामकृष्ण आणि विवेकानंदांनी थेट परमात्म्याचे दर्शन घेतले होते. पण कितीतरी प्रयत्नांनंतरही मला देवाची एक साधी झलक अप्रत्यक्षपणे सुद्धा दिसली नाही किंवा त्याच्या अस्त्तीत्वाच्या पुसटशा प्रतिमेचा साक्षात्कार सुद्धा मला झाला नाही.
अचानक माझ्या मनात ही तळमळ निर्माण झाली की किती बरे झाले असते जर मला एक गुरू भेटले असते जे मला योग्य मार्ग दाखवतील. माझ्या मनात हि इच्छा खूपच प्रबळ झाली होती आणि मला खूपच अस्वस्थ करत होती.
योगायोगाने माझी ही इच्छा दुर्दैवाने घरी पोहोचण्यापूर्वी वाटेतच पूर्ण झाली. हो! हे माझे दुर्दैवच होते कि माझी इच्छा पूर्ण झाली.जर तहानेने व्याकूळ झालेल्या माणसाला पाण्यात बुडवून टाकले तर त्याला तहान शमविणे नाही म्हणू शकत.
मठाजवळ पोहोचताच अचानक माझी नजर एका संन्याशावर पडली. ते मठाच्या व्यासपीठावर ध्यानस्थ बसले होते. त्या संन्यासीचे दर्शन मोठ्या चिंतेने घेरलेल्या माझ्या मनाला अत्यंत शुभ वाटले.
ते बहुधा अघोरी साधू होते . वय अंदाजे सत्तर-ऐशी वर्षे असावे. पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर एक अद्भुत चमक होती. मला काय प्रेरणा मिळाली आणि मी वशीभूत झालो माहित नाही. मी त्यांच्या समोर बसलो.
सुमारे एक तासानंतर त्यांनी डोळे उघडले आणि माझ्याकडे आश्चर्यपुर्वक कुतूहलाने बघत विचारले,
“तू कोण आहेस बेटा?”
मी माझे नाव सांगितले.
“वय काय?”
“पंचवीस वर्षे”
संन्यासी बराच वेळ शांत बसून आकाशाकडे टक लावून पाहत होते. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर गंभीरतेचे गूढ भाव होते. नंतर त्यांचे मौन संपले.
त्यांनी माझ्याकडे स्थिर नजरेने पाहिले आणि म्हणाले,“बेटा! तू उदास आहेस असे दिसते. मला सांग तुला काय हवे आहे?”
मी लगेच माझ्या मनाची खरी अवस्था त्यांना सांगितली.
संन्यासी पुढे बोलू लागले, “जे तुला प्रत्यक्ष पाहायचे आहे त्यासाठी योगींना सुद्धा अनेक जन्म घ्यावे लागतात. अनेक जन्म रक्त आटवल्यानंतर त्याबद्दल थोडेसे ज्ञान मिळते. मी तुला देवाचे दर्शन तर घडवू शकत नाही, परंतु त्याच्या साक्षात्कारासाठी आवश्यक असलेले दीर्घायुष्य मी तुला देऊ शकतो. म्हणजे... 'इच्छा मरण शक्ति!”
त्या साधूने माझ्या डोळ्यात पाहिले. अतिशय गंभीर आणि शांत आवाजात ते म्हणाले.
“तुला ही शक्ती प्राप्त करण्याचा अधिकार आहे. बेटा, म्हणूनच मी तुला ही शक्ती देण्यास तयार आहे. पण हो! यासाठी माझी एक अट आहे. ही अलौकिक शक्ती प्राप्त केल्यानंतर, तुला तुझे शरीर, मन आणि बुद्धी वगैरे सर्व मी सांगेपर्यंत माझ्याकडे सोपवावे लागेल. इच्छामरणाची शक्ती मिळवणे सोपे नाही.”
साधूचे हे म्हणणे ऐकल्यानंतर मी ती शक्ती मिळवण्याचा निर्णय घेतला. मला कोणत्याही प्रकारे यावर पुन्हा विचार करण्याची गरज वाटली नाही. संन्यासी माझ्याकडे निश्चलपणे पाहत होते.
मी नमस्कार केला आणि नम्रपणे म्हणालो,
“तुम्ही मला ती शक्ती द्या. मी हर प्रकारे तयार आहे आणि पूर्णपणे तुमच्या अधीन राहण्यास तयार आहे.' माहित नाही पण कोणत्या अज्ञात प्रेरणेने माझ्या तोंडातून आपोआप हे शब्द निघाले.
माझ्या तोंडातून हे बाहेर पडताच साधू माझ्याकडे पाहून हसले. जर मला त्यावेळी त्या हास्याचे रहस्य समजले असते तर किती बरे झाले असते ! असो..
हसत हसत ते मला त्यांच्यासोबत या खोलीत घेऊन आले आणि मला पद्मासनात बसण्याचा आदेश दिला. मी लगेच आदेशाचे पालन केले. दुसऱ्याच क्षणी माझा श्वास आपोआप मंद होऊ लागला. मनही स्थिर होऊ लागले. माझ्या पापण्या जड झाल्या आणि मला वाटले की माझी सर्व चेतना सुप्त झाली आहे. त्या अर्ध्या जागृत अवस्थेत मी साधूंचे अधिकार वाणीचे हे शब्द ऐकले.
“मी जे काही म्हणेन ते तुला म्हणावे लागेल. म्हण, मी स्वतःला पाहू शकतो पण मी स्पर्श करू शकत नाही.”
त्यांच्या आदेशानुसार मी त्याचे हे शब्द माझ्या आवाजात पुन्हा बोललो.
ते पुन्हा म्हणाले, “पुढे म्हण, मी स्वतःला पाहू शकतो पण त्याच्याशी बोलू शकणार नाही किंवा मी त्याला काही नुकसान करू शकणार नाही.”
मी हे शब्द पुन्हा बोललो. त्या वेळी माझ्याकडे शब्दांच्या विचित्रतेकडे लक्ष देण्याची किंवा आश्चर्यचकित होण्याची शक्ती नव्हती.मी फक्त वरील शब्द उच्चारले इतक्यात पुन्हा साधू उत्तरले .
“तुला इच्छामरणाची शक्ती प्राप्त झाली आहे.” आणि मग माझी उर्वरित चेतनाही नाहीशी झाली.
आतापर्यंत रात्रीचे दोन वाजले होते. मी चंद्रकांतची रोचक आणि थरारक कथा वाचण्यात मी इतका मग्न झालो होतो की मला वेळेचे भानच नव्हते. वाचन मध्येच सोडायचे नव्हते. थोडा गरमागरम चहा प्यायल्यानंतर मी पुढे वाचायला सुरुवात केली