एक होती सासू आणि एक होती सून.
सून कित्येक दिवसांत माहेरी गेलेली नसल्यामुळे फार कंटाळली होती.
एके दिवशी तिला बोलवायाला माहेराहून माघारी आला. मग काय विचारतां ?
सुनेने ताबडतोब निघायची तयारी केली.
तेव्हां सासू म्हणाली “मुली गुरांना तेवढे पाणी दाखव आणि मग जा.”
पण सून काय उतावळी झालेली! तिने कोठिब्यांत शेण कालवलें तें गुरांपुढे ठेवले .
सासूला येऊन म्हणते । “दाखवले हो पाणी गुरांना!”
पण सासूला नवल वाटले की इतक्या लवकर कसें पाणी दाखवून झाले? म्हणून ती स्वतः पहायला गेली.
पहाते तो पाण्यांत शेण कालविलेले. तेव्हां तिने रागाने कोठींबा सुनेच्या डोकीत मारला.
तिला शाप दिला की तुला पाणी म्हणून प्यावयाला मिळणार नाही.
फक्त हस्त नक्षत्रांत एक थेंब पाणी मिळेल.
पुढे सून मेली आणि आतां ती पाखरूं होऊन 'पावशे गो' असें ओरडत असते.
पण तिला काही पाणी मिळत नाही. फक्त हस्त नक्षत्रांत एक थेंब मिळतो.