जम्मू व पाकिस्तान यांची सीमारेषा. त्याच्या अलीकडे दहा पंधरा किलोमीटरवर भारतीय प्रदेशात तीन दहशतवादी पाकिस्तानी सीमारेषेकडे प्रवास करीत होते .सलीम,युसुफ आणि कमर ,अशी त्यांची नावे होती .त्यातील सलीम युसूफ यांना  प्रयाग येथील कुंभमेळय़ामध्ये बॉम्ब ठेवल्याच्या आरोपावरून पकडण्यात आले होते.बॉम्बस्फोट  करून कित्येक लोकांचे प्राण जावेत अशी ती योजना होती .बॉम्बस्फोटानंतर कुंभमेळ्यात गर्दीमधे चेंगराचेंगरी मोठ्या प्रमाणात झाली असती .त्यात कित्येक लोक मेले असते .अशाप्रकारे हजारो लोकांना मारण्याचा कट होता. सीबीआयला त्याचा सुगावा लागला.त्या दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील नियंत्रकांबरोबर चाललेले संभाषण सायबर सेलने पकडले. मोबाइलवरून ते कुठून बोलताहेत याचा बरोबर सुगावा लागला .त्यांना त्यांच्या हॉटेलमध्येच पकडण्यात आले .सलीम व युसुफ अशी त्यांची नावे होती .त्यांना कच्च्या कैदेत ठेवले होते .तिथेच कमर नावाचा आणखी एक कैदी अगोदरपासून होता .त्याच्यावर रेल्वे घातपाताचा आरोप होता .तो स्थानिक उत्तर प्रदेशीय मुसलमान होता .कैदेत असताना त्याच्याशी या दोघांची चांगली मैत्री जमली .कमरला हिंदुस्थानात मुळीच रहायचे नव्हते . रेल्वे घातपात प्रकरणी त्याला निदान पाच वर्षांची तरी शिक्षा झाली असती .

त्या तिघांनी पळून जायचा प्लॅन आखला .त्यांना कोर्टामध्ये नेत असताना कमरच्या स्थानिक  सहकाऱ्यांनी रस्त्यावर अडथळे निर्माण केले.अडथळे दूर करण्यात पोलिस गुंतलेले आहेत असे पाहून या तिघांनी हळूच पळ काढला .त्यांना अलाहाबादमधून शक्य तितक्या लवकर दूर जायचे होते. पाकिस्तानपेक्षा बांगलादेश किंवा नेपाळ जवळ असल्यामुळे तिकडे जावे असे त्यांना एकदा वाटत होते परंतु तिथे दोन्ही बाजूनी धोका होता त्यापेक्षा प्रवास लांबचा असला तरी  पाकिस्तानातच सरळ जावे असा विचार त्यांनी केला. आपल्याला पकडण्यासाठी पोलीस आकाश पाताळ एक करतील याची त्यांना कल्पना होती .

प्रथम त्यांना कपडे बदलणे आवश्यक होते .त्याचबरोबर वेषांतर करण्याची गरज होती .कमर स्थानिक मनुष्य असल्यामुळे त्याच्या अनेक ठिकाणी ओळखी होत्या .एका कपड्यांच्या दुकानात जावून त्यांनी कपडे बदलले .नंतर सलूनमध्ये जाऊन त्यानी आपला संपूर्ण गेटअप बदलून टाकला .बरोबर कमर असल्यामुळे हे त्यांना सहज शक्य झाले.अन्यथा त्यांना काही प्रमाणात हाणामारी दमबाजी वगैरे करावी लागली असती . त्यामुळे त्यांचा सुगावा सीबीआय किंवा पोलिसांना लवकर लागला असता.जम्मूमधील सीमारेषेपर्यंत पोचण्यासाठी त्यांना बराच वेळ लागणार होता .प्रथम ट्रेनने अलाहाबाद दिल्ली ,नंतर दुसऱ्या ट्रेनने दिल्ली जम्मू ,नंतर पुढे जसा जमेल तसा प्रवास त्यांना करायचा होता .

कमर अस्खलित पंजाबी उर्दूत त्यांच्याशी बोलत होता .तिघांचे मेतकूट चांगले जमले होते .आयएसआयचे येथील खबरे.आयएसआयच्या योजना वगैरे संबंधी त्या दोघाना असलेली माहिती सहज गप्पा मारता मारता कमरला कळत होती. कमरवर त्यांचा पूर्ण विश्वास बसला होता.सीमेवरील घनदाट जंगलातून ते जात होते .दिल्लीपर्यंत त्यांचा प्रवास व्यवस्थित झाला . तीन आतंकवादी पळालेले होते.त्यांना पकडण्यासाठी ठिकठिकाणचे पोलीस प्रयत्न करीत होते.त्यांचे फोटो तिघांचेही वर्णन सर्वत्र प्रसारित झालेले होते .दिल्ली स्टेशनवर ते पकडले जाणार होते परंतु त्यांच्या सुदैवाने साध्या वेशातील पोलिस ठिकठिकाणी गेटवर उभे आहेत असे  लक्षात आल्यामुळे ते वेगळ्याच मार्गाने बाहेर पडले .त्यांच्या जवळ पैसा नव्हता. खोट्या नावाने त्यांना दिल्लीत जम्मूपर्यंतचे तिकीट एका खबऱ्याने  दिले.जम्मूपासून पुढचा प्रवास बिकट होता .पोलिस ,बीएसएफ ,भारतीय सैनिक ,अश्या निरनिराळया संकटांना  तोंड देत त्यांना यशस्वीपणे बॉर्डर क्रॉस करावयाची होती .जवळ ना पैसा ना कुठले हत्यार त्यामुळे कौशल्याने त्यांना मार्गक्रमणा करायची होती .केव्हाही पकडले जाण्याची शक्यता होती त्याचबरोबर कुठून केव्हा गोळी येईल व आपला वेध घेईल त्याचाहि नेम नव्हता .

थंडीचे दिवस होते .मधून मधून उंचावर बर्फही पडत होते.एकदा तर पाऊस पडण्याला सुरुवात झाली .बर्फ पाऊस गार वारे दलदल काटेकुटे त्यातून सैन्याने पेरलेले भूसुरूंग यातून वाट काढावी लागत होती .कुठे तरी आपल्याला निवारा मिळेल आणि या बर्फ पाऊस वार्‍यापासून सुटका होईल असे ते पाहात होते.एवढ्यात त्यांना एक लाकडाची झोपडी दिसली .जर त्यात कुणी नसेल तर उत्तमच आणि असेल तर त्याला बंदिवान करून किंवा ठार मारून  परंतु आश्रय हा घ्यायचाच असे त्यांनी निश्चित केले .दिवसभर ते चालत होते त्याना खायलाही काही मिळाले नव्हते .बाहेरून उब ,आतून अन्नाची उबआणि थोडीशी विश्रांती  ही त्यांची सर्वात महत्त्वाची  गरज होती.झोपडीत आपल्याला अन्न मिळेल आसरा मिळेल विश्रांती मिळेल आणि नंतर आपण उरलेला प्रवास करू असा त्यांचा विचार होता .

सुदैवाने झोपडी रिकामी होती .झोपडीमध्ये अन्नपाणीही होते .मालक कुठेतरी जवळच गेलेला असावा असे वाटत होते .तो जेव्हा येईल त्यावेळी त्याचा बाहेरच्या बाहेर बंदोबस्त करणे गरजेचे होते. झोपडी मध्ये दोघांनी आराम करावा व एकाने  बाहेर लक्ष ठेवावे असे ठरले.प्रथम सलीम व युसूफ यांनी आराम करण्याचे ठरविले .कमर बाहेर लक्ष ठेवून होता .एक दोन दिवस तरी कुणी इकडे फिरकणार नाही असा अंदाज होता .बर्फ पाऊस यामुळे घरातील व्यक्ती जिथे गेल्या होत्या तिथे अडकलेल्या असाव्यात असा अंदाज होता .सहा तासानंतर कमर आराम करण्यासाठी झोपडीमध्ये गेला .दोघेही ठार मेल्यासारखे झोपले होते .त्याने सलीमला हलवून उठविले.सलीम बाहेर पहारा करू लागला आणि कमर त्याच्या जागी झोपी गेला .

कमर प्रत्यक्षात झोपला नव्हता .तो नुसता पडून होता.त्याच्या डोक्यात काही चक्र चालले होते . त्याने रुमाल काढला पूर्वीचे ठग ज्याप्रमाणे रुमालाला गाठ मारून नंतर प्रवाशाचा प्राण घेत असत त्याप्रमाणे त्याने झोपलेल्या युसुफच्या गळ्याभोवती रुमाल टाकून एका झटक्यात त्याचा प्राण घेतला .गाढ झोपेत असल्यामुळे त्याने किंचित हातापायाची तडफड केली व तो शांत झाला .कमरने हे इतक्या सफाईने केले की बाहेर उभ्या असलेल्या सलीमला काहीही कळू शकले नाही .सलीम जरा उंच आणि आडदांड होता .जर तो सावध होता तर त्याला आवरणे शस्त्राशिवाय कमरला कठीण गेले असते .त्याच्या गळ्याभोवती फास टाकणे कठीण होते .कमर जवळ योग्य लांबीचा दुसरा रुमालही नव्हता .

कमरने कॉटेजमध्ये इकडे तिकडे पाहिले .त्याला एक लोखंडी पळी आढळली .तिचा शस्त्र म्हणून वापर करण्याचे त्याने ठरविले .दरवाजा उघडून तो हळूच बाहेर आला .सावध सलीमने लगेच मागे वळून पाहिले.कमरच्या हातातील पळी पाहून त्याला अंदाज आला .चित्यासारखी त्याने कमरच्या अंगावर झेप घेतली . कमरने डूब घेऊन पळी त्याच्या कपाळावर जोरात मारली .सलीमच्या डोक्यात क्षणभर झिणझिण्या  आल्या .तेवढ्या क्षणात त्याच्यावर काबू मिळविणे कमरला शक्य झाले. त्याने पेच टाकून त्याला आडवा केला व त्याचे हातपाय  दोरीने बांधले. त्याला ओढीत ओढीत त्याने झोपडीमध्ये आणले .युसूफ गतप्राण झालेला पाहून तो आपल्या मदतीला धावून येईल ही  सलीमची आशा मावळली .

अकस्मात कमरचे असे स्वरूप पाहून सलीम गोंधळात पडला .कमरने त्याच्या पुढ्यात आरामशीर बसून खुलासा करण्यास सुरुवात केली .कमर गुप्तहेर खात्यात काम करीत होता .सलीम व युसूफला पकडल्यावर त्यांच्याकडून गुप्त माहिती काढून घेण्याचे काम  त्याच्यावर सोपवलेले होते .त्यासाठी अगोदरच तो कैदी म्हणून कोठडीमध्ये होता .तिघाना पळून जाण्यासाठी अप्रत्यक्ष मदत पोलिसांनीच केली होती .कपडे बदलणे  वेषांतर करणे इत्यादी त्यामुळेच सहज शक्य झाले होते.पोलिसांचे त्यांच्यावर सुरुवातीपासून  लक्ष होते .कमरच्या हातामध्ये ऑपरेशन करून एक चिप बसवलेली होती .त्यातून बाहेर पडणार्‍या  सिग्नल्समुळे त्यांचा ठावठिकाणा पोलिसांना सहज कळत होता .दिल्ली स्टेशनमधून त्यांची सहज सुटका हाही एक बनाव होता .कमरने त्यांच्याकडून भारतातील एजंट्स आणि इतर माहिती गोळा केली होती .यांना पुन्हा अटक करण्यासाठी तो पोलिसांची वाट पाहात होता .परंतु अज्ञात कारणामुळे पोलीस तिथे पोचू शकले नाहीत .येथून पुढे थोड्याच वेळात पाकिस्तानची हद्द सुरू होणार होती .त्याने मुद्दामच आपल्याजवळ शस्त्र ठेवले नव्हते .कारण जर शस्त्र त्यांच्या दृष्टीस पडले असते तर त्यांना संशय आला असता .दोघे जागे असताना त्यांच्यावर काबू मिळविणे कठीण होते .ही झोपडी सुद्धा पोलिसांनी बांधून ठेविली होती .एकाचा तर खेळ संपला होता .दुसऱ्याचा संपण्याच्या मार्गावर होता .कमरने त्याला सांगितले मी भारतीय नागरिक आहे .भारत ही आमची मातृभूमी आहे .तिच्याशी आम्ही बेइमान होऊ  असे तुला वाटले तरी कसे ?आम्ही धर्मावर तुम्ही व आम्ही अशी विभागणी करीत नाही .आम्ही प्रथम भारतीय हा धर्म पाळतो .नंतर हिंदू मुसलमान ख्रिश्चन शीख बौद्ध वगैरे .तुमच्या सारख्या सापांना आम्ही आमच्या भूमीतून जिवंत जाऊ कसे काय देऊ ?

सलीम कमरकडे हताशपणे पाहात होता.सलीमची मान पकडून कमरने त्याला एकच झटका मारला आणि सर्व खेळ संपला .

२/२/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel