पंधरा दिवसांनंतर ताजातवाना होऊन मुकुंदा परत आला.दार्जिलिंगला असताना त्याला एकदाही कुठलाही भास झाला नव्हता .परत आल्यावर सर्वजण गढीवर आले.पंधरा दिवसांनंतर सुट्या संपल्यामुळे सर्वजण शहरात गेले.मुकुंदा चांगलाच ताजातवाना झाला होता .आता आपल्याला काहीही भास होणार नाहीत याची त्याला खात्री वाटत होती .सर्व मंडळी शहरात गेल्यावर  चार दिवसांनी रात्री पुन्हा त्याची पाण्याची बाटली कुणीतरी रिकामी केली.दुधाची बाटली संपविणे, पाण्याची बाटली संपूर्ण किंवा थोडी बहुत पिणे,रात्री खोलीत कुणीतरी फिरत असल्याचा भास होणे ,बागेतून कुणीतरी फुले चोरत आहे असे वाटणे.इत्यादी गोष्टी पुन्हा सुरू झाल्या . या गोष्टी सवयीच्या झाल्यामुळे पूर्वीइतका मुकुंदा आता अस्वस्थ होत नसे .

एके दिवशी रात्री तर कमालच झाली .मुकुंदा जेवून नुकताच आपल्या खोलीत आला होता.एकीकडे तो टीव्ही सीरियल पाहत होता . एवढ्यात त्याला सोफ्यावर कुणीतरी बसलेले आहे आणि ते आपल्याकडे टक लावून पाहात आहे असे लक्षात आले .इतके दिवस आपल्याशी लपंडाव खेळणारा, पाणी पिणारा, दूध पिणारा, फुले तोडणारा तो हाच  हे त्याच्या लक्षात आले .आता याला सोडायचे नाही असे त्याने ठरविले .अकस्मात उठून त्याने त्या माणसावर झेप घेतली .त्या माणसाचे मुकुंदाकडे पूर्ण लक्ष होते.झटक्यात उठून तो खिडकीकडे झेपावला .मुकुंदा सोफ्यावर आदळला . मुकुंदा सोफ्यातून उठून त्या माणसांच्या पाठीमागे त्याला पकडण्यासाठी धावला .त्या माणसाने चपळाईने खिडकीतून बाहेर उडी घेतली .आणि हां हां म्हणता  तो पसार झाला.

मुकुंदाने रखवालदाराला बोलाविले.आत्ता खिडकीतून एक माणूस उडी मारून पसार झाला तुझे लक्ष कुठे होते म्हणून त्याला दाटले .रखवालदार म्हणाला मी तुम्ही म्हणता त्या खिडकीच्या बाजूलाच गस्त घालीत उभा होतो .खिडकीतून कुणीही उडी मारली नाही .रात्रीचे गेट कुलूपबंद असते .सर्वत्र काटेरी तारा लावलेल्या आहेत .कुणीही आत येणे शक्य नाही.तुम्हाला भास झाला असला पाहिजे .यावर बोलण्यासारखे काही शिल्लक राहिले नव्हते .

दुसर्‍या  दिवशी रात्री याच गोष्टीची पुनरावृत्ती झाली.सोफ्यामध्ये मुकुंदाकडे रोखून पाहणारा मनुष्य , त्यावर चपळाईने मुकुंदाने घातलेली झडप,त्याचे तसेच पळणे,फक्त या वेळी तो खिडक्या बंद असल्यामुळे  खिडकीतून पळण्याऐवजी दरवाजातून बाहेर पळाला. या वेळी मुकुंदा कुणाही नोकराला बोलाविण्याच्या फंदात पडला नाही.कुणालाही काहीही दिसलेले नसणार याची त्याला खात्री होती .दरवाज्यातून बाहेर पडलेला मनुष्य गढीच्या बाहेर जाऊ शकणार नाही याची त्याला खात्री होती .

शहरात जावून पूर्वी सल्ला दिलेल्या  मानसोपचारतज्ज्ञाची भेट घेण्याचे त्याने ठरवले .

मुकुंद व सरिता पतिपत्नी दोघेही त्या मानसोपचारतज्ज्ञाकडे ठरलेल्या वेळी गेले .तज्ज्ञाने मुकुंदाची सर्व हकीगत पुन्हा एकदा लक्षपूर्वक ऐकली .त्याला पुन्हा काही प्रश्न विचारले .नंतर तो म्हणाला .

मानवी मन ही एक गूढ व चमत्कारीक गोष्ट आहे .मनात केव्हां काय येईल याचा पत्ता नसतो. मनाला जे वाटते ते सत्य  अशी आपली समजूत असते .मनाला निरनिराळे भास होऊ शकतात .हे भास नाहीत तर सत्य आहे असे मनाला वाटत असते .किंबहुना सत्य म्हणजे काय? भास म्हणजे काय ?यामधील फरक कसा स्पष्ट करावा असा प्रश्न काही तत्त्वज्ञ विचारीत असतात.प्रत्येकाला जे जे वाटते ते ते त्याच्यापुरते सत्य असते.त्यामुळेच प्रत्येकजण हिरीरीने आपला मुद्दा मांडत असतो.अंतिम सत्य असे काही नाही किंबहुना मी आता म्हणालो तेच अंतिम सत्य होय. प्रत्येकाचे सत्य निराळे असणे हेच अंतिम सत्य होय. 

तज्ज्ञ जे म्हणाला ते सर्व मुकुंदाच्या व सरिताच्या डोक्यावरून गेले.तरीही त्यांना काहीतरी कळल्यासारखे वाटले.

तज्ज्ञ  पुढे म्हणाला, 

मनावर शारीरिक स्थितीचा,आरोग्याचा परिणाम होतो .शरीर सुदृढ, आरोग्य संपन्न, तर मनही तसेच राहते .तसाच मनाचाही शरीरावर इष्ट  अनिष्ट परिणाम होतो. मन उल्हसित तर शरीरही निरोगी व सामर्थ्यसंपन्न राहते  .ही दोन्ही परस्परावलंबी आहेत . मन दु:खी, सतत काळजी करणारे, कष्टी, असे असेल तर शरीरही आरोग्य संपन्न राहत नाही. सभोवतालची परिस्थिती, निसर्ग,हे प्रत्येक व्यक्ती त्याच्या पंचेंद्रियाद्वारे भोगीत असते. त्याचा परिणाम मनावर होत असतो .हवा कुंद असेल, आकाशात ढग खूप असतील,तर मनही निराश खचलेले उदास रहाते .स्वच्छ सूर्यप्रकाश, स्वच्छ चांदणे, मनाला व त्यामुळे शरीरालाही उल्हसित करते .समाजमनाचा वैयक्तिक मनावर परिणाम होत असतो .गणेशचतुर्थी नवरात्र दिवाळी  गुढीपाडवा ईद मोहरम ख्रिसमस अशा उत्सवी वातावरणामध्ये मनुष्य उल्हसित आनंदी होतो .

मन काही वेळा स्वतःचे दोन भाग करीत असते .हे भाग परस्पर संबंधित आहेत याचे त्याला भान नसते .एकाच वेळी एकाच व्यक्तीत दोन व्यक्ती राहत असतात .आणि त्यातील प्रत्येक दुसऱ्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत असतो.डॉक्टर जेकिल अँड मिस्टर हाइड यांची सुप्रसिद्ध गोष्ट तुम्हाला माहित असेलच .एकाच मनुष्यात नायक व खलनायक दोन्हीही राहात असतात .चांगले व वाईट दोन्हीही एकत्र असतात .परिस्थितीनुसार एक दुसऱ्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतो.

एखाद्याच्या मनावर दुसऱ्या एखाद्याला ताबा मिळविता येतो.याला संमोहन असे म्हणतात.अशा परिस्थितीत संमोहित मनुष्य त्याला संमोहन केलेला जशी  आज्ञा करील त्याप्रमाणे वर्तन करीत असतो.

काही वेळा एका व्यक्तीमध्ये दोन व्यक्तिमत्त्वे वास करीत असतात  .अशावेळी एक व्यक्तिमत्त्व दुसऱ्या व्यक्तिमत्त्वावर पगडा बसविण्याचा प्रयत्न करते . या सर्वांचा त्या माणसाला पत्ताही नसतो .मनाचा एक भाग दुसऱ्या भागाला जे काही दाखविते ते मनाचा दुसरा भाग पाहते.प्रगट मनाला त्या सुप्त मनाने दाखवलेल्या गोष्टी सत्य वाटतात .म्हटला तर तो भास असतो. म्हटला तर ते सत्य असते.

तज्ज्ञाचे बहुतेक बोलणे मुकुंदा व सरिता यांना आकलन झाल्यासारखे वाटले,परंतु किती कळले ते त्यांचे त्यांनाच माहीत .

मुकुंदा म्हणाला आम्ही आता काय करावे .?माझा प्रश्न कसा सुटेल ते सांगा ?  

तज्ज्ञ  म्हणाला मी तुम्हाला काही गोळ्या देतो.त्या नियमितपणे घेत जा.त्यामुळे तुमचे मन स्थिर होण्याला मदत होईल .रात्री तुम्हाला गाढ झोप लागेल . पाण्याची बाटली रिकामी होणे, दूध पिणे,हे सर्व तुम्ही स्वतःच करीत होता परंतु त्याची तुम्हाला जाणीव नव्हती.तुम्ही ते सर्व विसरून जात होता .आणि हे कुणी केले म्हणून अचंब्यात पडत होता. तुम्ही रात्री उठून केलेल्या गोष्टी ज्या तुम्हाला दुसऱ्या दिवशी आठवत नाहीत तसे काही गाढ झोपेमुळे तुम्ही करू शकणार नाही.  मी दिलेल्या औषधांमुळे तुम्हाला भास होणार नाहीत .उदाहरणार्थ फूल तोडून एखादा मनुष्य जात आहे असे वाटणे, सोफ्यामध्ये बसून एखादा  मनुष्य तुम्हाला न्यहाळीत आहे, तुमच्याकडे रोखून पाहत आहे असे वाटणार नाही.तुमचे एक मन दुसऱ्या मनाला जे काही दाखविते ते आता दाखविणार नाही .तुम्ही योग प्राणायाम अशा काही गोष्टी केल्या तर फारच उत्तम .असा सल्ला देऊन त्याने दोघांना निरोप दिला .

औषध किती लागू पडते, भास थांबतात का, हे आता  पाहावयाचे होते.

काही दिवस मुकुंदा शहरातील बंगल्यात राहिला .त्याला देखरेखीसाठी,सर्व व्यवहार सांभाळण्यासाठी , खेडेगावात जाणे भाग होते . तो जेव्हा गावी जात असे त्या वेळी सरिताही त्याच्या बरोबर जात असे.मुकुंदाला एकटे सोडायचे नाही अशी खूणगाठ  सरिताने मनाशी बांधली होती.त्या मानसोपचार तज्ञाने सरिताला बाजूला घेऊन जाडे  जाडे शब्द वापरून मुकुंदाला एकटे सोडू नका असे बजावून सांगितले होते . त्याच्या सर्व सांगण्याचा मतीतार्थ मुकुंदा संभ्रमित अवस्थेत आहे तो त्या अवस्थेत काहीही करू शकतो असा होता .

एरवी शहाणासुरता असलेला मुकुंदा ,शेती उत्कृष्ट प्रकारे करणारा मुकुंदा ,शेतीच्या दृष्टीने व्यवसायाच्या दृष्टीने अचूक निर्णय घेणारा मुकुंदा , नेहमी बोलताना तर्कशुद्ध बोलणारा मुकुंदा , अशा एखाद्या मानसिक विकाराचा बळी असेल हे सांगून कुणालाही पटणारे नव्हते .सरिता बरोबर असताना, शहरात राहात असताना, काहीही घडले नाही.कोणतेही भास न होता काही महिने गेले.मुकुंदा पूर्ण बरा झाला असे सरिताला वाटले . ती दोघे एकदा मानसोपचारतज्ज्ञाकडे जावूनही आले. सर्व काही ठीक आलबेल आहे असे वाटले .

.मुकुंदा आता पूर्ण बरा झाला असे सरिता  समजत होती .गढीवर आता मुकुंदा एकटा राहू शकत होता .असेच काही महिने गेले .सरिताच्या बहिणीचे लग्न होते म्हणून ती माहेरी गेली होती .सर्व काही ठीकठाक चालले होते .शेती, प्रक्रिया उद्योग, दुकान ,सर्वत्र मुकुंदाचे व्यवस्थित लक्ष होते .

आणि तो वाईट दिवस उजाडला .अमावास्या होती .अकस्मात वादळी पाऊस येईल अशी चिन्हे दिसत होती .आकाश ढगांनी काळवंडून गेले होते .दुपारीच सर्वत्र काळोख पसरला होता .विजा चमकत होत्या .अशा वेळी मानसिक विकारांचे रोगी बेफाम होतात असे म्हणतात.पर्यावरणाचा पंचेंद्रियांमार्फत मनावर काहीतरी अनिष्ट परिणाम होत असावा .

मुकुंदा जेवला. नेहमीप्रमाणे झोपण्यासाठी तो आपल्या खोलीत आला .खिडक्या बंद करणे ,दरवाज्याला लॉक लावणे, वगैरे गोष्टी त्याने नेहमीप्रमाणे केल्या .टीव्ही चालू केला .मोबाईलवर सर्फिंग करीत होता .तेवढ्यात त्याला सोफ्यावर कुणीतरी बसले असल्याची जाणीव झाली .त्याने सोफ्याकडे रागाने पाहिले.तोच नेहमीच्या मनुष्य तिथे बसलेला होता .तो रोखून एकटक मुकुंदा कडे बघत होता . स्वसंरक्षणासाठी उशीखाली ठेवलेले पिस्तुल मुकुंदाने काढले .त्या व्यक्तीकडे रोखून त्याने ट्रिगर दाबला.

दुसर्‍या  दिवशी आकाश स्वच्छ झाले होते.कालच्या कुंद वातावरणाचा कुठेही मागमूस नव्हता. स्वच्छ  सूर्यप्रकाश पडला होता .सूर्य वर आला होता.नऊ वाजले तरी साहेब उठले नव्हते .साहेब नेहमी सातलाच उठत असत.त्यांना लगेच गरम चहा लागत असे.खानसाम्याने जाऊन दरवाजा ठोठावला.आतून काहीही हालचाल होत नव्हती .पुन्हा जोरजोरात दरवाजा ठोठावण्यात आला .पुन्हा पुन्हा बेलही वाजविण्यात आली.कुणीही  दरवाजा उघडला नाही.पोलिसांना बोलविण्यात आले . त्यांनी बळजबरीने दरवाजा उघडला .कॉटवर रक्ताच्या थारोळ्यात मुकुंदा पडला होता.त्याच्या हातात पिस्तूल तसेच होते .आतून कड्या लावलेल्या असताना, कुलूप लावलेले असताना, खिडक्या बंद असताना, कपाळात गोळी लागल्यामुळे  झालेल्या मृत्यूची, आत्महत्या म्हणून नोंद करण्यात आली .मानसोपचारतज्ज्ञाची ट्रीटमेंट मुकुंदाला चालू होती असे सरिताने सांगितले.त्याचे मत विचारण्यात आले .तो म्हणाला ,

त्याक्षणी काय झाले ते सांगणे मोठे कठीण आहे .माझी त्याला ट्रीटमेंट चालू असल्यामुळे मी अंदाज करू शकतो .

सोफ्यात कुणीतरी बसून आपल्याकडे रोखून पाहात आहे असे मुकुंदाला वाटले असले पाहिजे.

त्याला मारण्यासाठी त्याने पिस्तुल रोखले असावे .

त्याचवेळी स्वसंरक्षणासाठी त्या दुसऱ्या माणसाने प्रयत्न केला असावा .

त्या झटापटीत पिस्तुलाची गोळी लागून मुकुंदाचा मृत्यू झाला असावा.

स्प्लिट पर्सनॅलिटीमुळे दुभंग व्यक्तिमत्त्वामुळे दोन्ही भूमिका मुकुंदा बजावीत होता.

एका मुकुंदाने दुसऱ्या मुकुंदावर रागात गोळी झाडण्याचा प्रयत्न केला .

स्वसंरक्षणासाठी दुसर्‍या  मुकुंदाने प्रयत्न केला.

त्या झटापटीत गोळी लागून मुकुंदाचा मृत्यू झाला .

*एका मुकुंदाच्या हातून दुसऱ्या मुकुंदाचा खून झाला असेही म्हणता येईल .*

* एका मुकुंदाकडून स्वसंरक्षणाच्या प्रयत्नात दुसर्‍या मुकुंदाचा अपघाती मृत्यू झाला  असेही म्हणता येईल .*

*पोलीस व कायदा म्हणतो त्याप्रमाणे मुकुंदाने आत्महत्या केली असेही म्हणता येईल.*

*काही जण हा सर्व भुताटकीमुळे झालेला खेळखंडोबा आहे असे म्हणतील .वेळीच भुताचा बंदोबस्त केला असता तर यातील काहीच घडले नसते असे त्यांचे सांगणे असेल*

* हा प्रत्येकाच्या दृष्टिकोनाचा भाग आहे .*

*मी मात्र मुकुंदाने मुकुंदाचा केलेला हा खून आहे असे म्हणेन.*

(समाप्त)

३१/१०/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel