(ही कथा काल्पनिक आहे कुठे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)

आपल्या धर्माचे श्रेष्ठत्व, फादर जॉनला पटवून देण्यासाठी मौलवी मोहम्मदच्या  मनात एक विचार आला.

फादर जॉन व मौलवी मोहम्मद यांच्या देवाबद्दलच्या कल्पना सर्वस्वी भिन्न होत्या .फादर जॉनच्या मतानुसार परमेश्वराने एकदा ही सृष्टी निर्माण केली त्यानंतर तो यात ढवळाढवळ करीत नाही. कोणताही हस्तक्षेप करीत नाही.  चमत्कारांवर फादर जॉनचा विश्वास नव्हता.निसर्गनियमानुसार, परमेश्वराने आखलेल्या रचनेनुसार, जग चालत असते.नियम निश्चित केल्यावर नंतर त्या सूत्रानुसार जग चालत असताना ,गोष्टी घडत असताना,विधाता त्यामध्ये फेरफार करत नाही. कोणताही बदल करत नाही.जो आपल्याला  चमत्कार वाटतो त्याच्या मागे एक विशिष्ट कार्यकारण भाव असतो . प्रत्येक घटनेमागे सूत्रबद्धता असते .सर्व कार्यकारण परंपरा आपल्याला कळत नाही म्हणून आपण त्याला चमत्कार म्हणतो .

या उलट मौलवी मोहम्मदच्या मतानुसार चमत्कार अस्तित्वात आहेत. असतात. नेहमी चमत्कार घडत असतात आणि ते अल्ला घडवून आणतो .जर अल्लाच्या मनात आले तर तो तथाकथित निसर्गनियम बदलू शकतो . खुदाच्या बंद्यांच्या, परमेश्वराच्या भक्तांच्या हितासाठी,काही काही वेळा स्वतःचे अस्तित्व जाणवून देण्यासाठी तो चमत्कार घडवतो.

या विषयावर दोघांचा नेहमी वाद होत असे .प्रत्येक जण आपआपल्या मतांवर ठाम होता.विचारातून वादविवादातून कुणीही दुसऱ्याला बदलू शकत नव्हता.एकदा असाच वाद चालू असताना मौलवी मोहम्मद म्हणाला,समजा खुदाने चमत्कार दाखवला तर आपण काय कराल? मी त्याचा कार्यकारणभाव शोधून काढण्याचा प्रयत्न करीन.जर कार्यकारण भाव मला कळला नाही तरी कार्यकारणभाव आहे परंतु तो आपल्याला समजत नाही असे मी म्हणेन.

शेवटी बोलता बोलता एकदा फादर जॉन म्हणाला, खरोखरच चमत्कार दिसला तर हे पाडे सोडून मी दुसरीकडे निघून जाईन. मौलवी मोहम्मदला बरोबर हेच पाहिजे होते.आपला चांगला सुहृद  दूर गेल्याबद्दल मौलवी मोहम्मदला  वाईट जरूर वाटले असते.परंतु त्याला त्याचा इलाज नव्हता. धर्म महत्त्वाचा होता .धर्मप्रसार आवश्यक होता. 

जर आपण चमत्कार घडवून दाखविला .चमत्कार घडवून आणला . खुदाने चमत्कार केला .तर पैगंबराचे श्रेष्ठत्व, मुस्लिम धर्माचा मोठेपणा ,मुस्लिम धर्माची सत्यता, फादर जॉनच्या मनावर ठसेल .

तेव्हा येनकेन प्रकारेण खुदाचे महत्त्व फादर जॉनच्या मनावर ठसविण्यासाठी चमत्कार झाला पाहिजे .अल्ला खुदा परवरदिगार आपल्यावर रहेम करून चमत्कार कसा घडवून आणील त्याचा विचार मौलवी मोहम्मद करू लागला .एकदा चमत्कार पाहिला की कबूल केल्याप्रमाणे फादर हे आदिवासी पाडे सोडून दुसरीकडे कुठे तरी जाईल.फादर जॉन वचनाला पक्का आहे.आपल्याला धर्म प्रसारासाठी रान मोकळे मिळेल .कुणी सांगावे एखादवेळ जॉन फादर, मुस्लिम धर्म स्वीकारण्याला तयार होईल.तसे झाले तर दुधात साखर पडेल .

असेच काही दिवस गेले .बरेच दिवसात दोघांत वाद झाला नव्हता .महिन्याभराने एक दिवस सकाळी मौलवी मोहम्मद जरा घाईघाईनेच फादर जॉनकडे आला . त्याचा आनंदीत चेहरा पाहून फादरने विचारले ,आज तू एवढा आनंदीत कां दिसतोस ? एवढ्या दिवसांच्या मैत्रीने दोघांतील औपचारिकपणा संपला होता.दोघेही परस्परांना अरे तुरे करीत असत.

मौलवी उत्तरला .काल एक आश्चर्य घडले .रोज रात्री झोपताना मी मनोभावे अल्लाची प्रार्थना करीत असतो .माझ्यावर  दया कर म्हणून मी त्याला विनवीत असतो.काल रात्री पैगंबर माझ्या स्वप्नात आले.आपल्या दोघांमधील वाद त्याना माहीत होता .ते म्हणाले तुझ्या उजव्या हाताच्या तर्जनी मध्ये अशी शक्ती देतो कि उद्यापासून ज्या जिवंत प्राण्याला स्पर्श करशील त्याची तुझ्या इच्छेनुसार वाढ किंवा घट होत जाईल . ही शक्ती फक्त पंधरा दिवस तुझ्या बोटात असेल.जा तुझ्या त्या नास्तिक फादरला अल्ला चमत्कार  घडवितो हे पटवून दे.मला कुठचाही प्राणी दाखवा त्याला स्पर्श करून त्याची वाढ किंवा घट घडवून आणतो.दोघेही बागेत बसून हे बोलत होते .त्यांच्या पुढ्यात टेबलावर फादर जॉनचे आवडते कासव होते .हे कासव त्यांच्याकडे अनेक वर्षे होते .त्याची वाढ  पूर्ण झालेली होती .त्याच्याकडे बोट दाखवून फादर म्हणाले याला स्पर्श कर आणि याचा आकार  लहान करून दाखव.सात दिवस तू रोज सकाळी याला स्पर्श करावयाचा आणि याचा आकार लहान झाला पाहिजे . नंतर पुढील सात दिवस तू याला स्पर्श करून त्याचा आकार मोठा करावयाचा म्हणजे हे कासव आता जेवढे आहे तेवढेच राहील .असे जर तू करू शकलास तर चमत्कार आहे आणि तो खुदा अल्ला पैगंबर घडवून आणतो यावर मी विश्वास ठेवीन. आणि तुला दिलेल्या वचनानुसार हे आदिवासी पाडे सोडून मी दुसरीकडे कुठे तरी जाईन.

मौलवी साहेबांनी हात पुढे करून आपली तर्जनी कासवाला लावली.उद्या हे कासव थोडे लहान झालेले असेल असे शब्द उच्चारले .कासव पाळलेले होते. ते नेहमी बागेत फिरत असे . बागेतील छोट्या तलावामध्ये  पोहत असे.तरीही फादरनी ते कासव उचलून घरात नेले आणि एका काचेच्या पेटीमध्ये ठेवले.कासव गुदमरू नये म्हणून पेटीचे झाकण उघडे ठेवले .कासवाला पकडल्या बरोबर कासवाने आपले डोके व पाय आंत घेतले. कासवाची लांबी मोजण्यात आली ती बरोबर आठ इंच होती .

दुसऱ्या दिवशी मौलवी आले. कासवाची लांबी मोजण्यात आली.ती बरोबर सव्वासात इंच होती.फादर आश्चर्यचकित झाले .त्यांनी पुन्हा पुन्हा लांबी मोजली ती तेवढीच होती .मौलवी  साहेबांनी म्हटल्याप्रमाणे कासव लहान झाले होते.याच्या पाठीमागे काहीतरी कार्यकारण भाव नक्की असणार . परंतु तो कोणता ते लक्षात येत नव्हते .ते एवढेच म्हणाले तू पुन्हा स्पर्श कर.उद्या आपण पुन्हा मोजू .

आश्चर्याची गोष्ट म्हणजे कासव क्रमशः रोज लहान होत गेले .फादरना याचे कारण लक्षात येईना. लहानश्या जेवणाच्या ताटली एवढे असणारे कासव हळूहळू  लहान होत गेले.जेवणाची ताटली, नाष्ट्याची ताटली, बशी, छोटी ताटली,रुपया, अधेली, पावली, इत्यादी.

फादर रोज विस्मयचकित होत होते .ते कारण शोधून काढण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते परंतु त्यांना काहीही कारण कळत नव्हते .

रोज मौलवी  येत होते. रोज लांबी मोजली जात होती. रोज ते तर्जनीचा स्पर्श करीत होते.उद्या कासव लहान होईल असे वाक्य उच्चारीत होते. रोज फादर कारण शोधण्याचा प्रयत्न करीत होते.

असे सात दिवस गेले नंतर मौलवीनी स्पर्श करून कासव मोठे होईल असे शब्द उच्चारले.कासव मोठे होऊ लागले .फादरच्या मनात एक दिवस विचार आला कुणीतरी कासव बदलत तर नसेल .पेटीला कुलूप लावून ठेवले पाहिजे .तरीही जर कासवाची लांबी वाढली तर चमत्कार मान्य केला पाहिजे .कासव गुदमरू नये म्हणून पेटीची एक बाजू लाकडी होती. त्याला अनेक छिद्रे पाडली .  झाकण लावून त्याला भक्कम कुलूप लावले.किल्ली आपल्या गळ्यातील क्रॉसमध्ये ठेवली .

दुसऱ्या दिवशी मौलवी आले. त्यानी कासवाची लांबी मोजली.लांबी तेवढीच होती.याचाच अर्थ कुणीतरी रोज दुसरे कासव पेटीत ठेवीत होते .कासव बदलले जात होते .

रोज अंडी देण्यासाठी जो पोर्‍या येत असे तो त्याच्या पिशवीमधून कासव लपवून आणीत असे.ते कासव पेटीत ठेवून पहिले कासव तो पिशवीतून घेऊन जात असे.त्याचा मोबदला म्हणून मौलवी  त्याला रोज शंभर रुपये देत असत.त्या पोर्‍याला दम  दिल्याबरोबर त्याने लगेच सगळे कबूल केले .मौलवी साहेबांकडून घेतलेले पैसे फादरच्या पायावर ठेवले आणि त्यांच्या पायावर मला क्षमा करा म्हणून लोटांगण घातले . 

चमत्कार वगेरे काही नव्हता .स्वप्न पैगंबर वगैरे सर्व थापा होत्या . मौलवीनी फादरला फसविण्याचा प्रयत्न केला होता .निरनिराळया  आकाराची सात कासवे त्यांनी अगोदरच आणून ठेवली होती.मोजून मापून काळजीपूर्वक  योजना बनविण्यात आली होती.  फादर जॉन जवळजवळ फसले होतेच .

पुन्हा पुन्हा मौलवी मोहम्मदने,  फादर जॉनची क्षमा मागितली .फादरनेही आपल्या मित्राला उदार मनाने क्षमा केली .

*फादर अर्थातच आदिवासी भाग सोडून गेले नाहीत.*

*मौलवी साहेबही त्यांच्या विभागात काम करीत राहिले .*

* दोघांची मैत्री अबाधित राहिली .*

* पूर्वी प्रमाणेच ते परस्परांकडे येत जात राहिले.*

* फादर जॉनना टोपी घालण्याचा मौलवी मोहम्मदसाहेबांचा प्रयत्न विफल गेला.*

(समाप्त)

६/११/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel