(ही कथा काल्पनिक आहे.वस्तुस्थितीशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा ) 

शेवटी तो गब्बर होता. कुणालाही सहजासहजी संपत्तीचा लाभ होणे त्याला योग्य वाटत नव्हते. संपत्तीसाठी काहीतरी कष्ट केले पाहिजेत ,काहीतरी डोके चालवले पाहिजे ,असे त्याचे ठाम  मत होते . आपली इच्छा तर पूर्ण व्हावी. मुलांना संपत्ती मिळावी मात्र त्यासाठी त्यांनी बुद्धीचा वापर केला पाहिजे असे त्यापचे प्रामाणिक मत होते.

त्याने आपला मुलगा व मुलगी यांना एकाच मजकुराची दोन पत्रे लिहिली."मला युद्धावर असताना शत्रूच्या लपविलेल्या मोठ्या खजिन्याचा शोध लागला.ती संपत्ती मी कौशल्याने भारतात आणून निरनिराळ्या ठिकाणी लपविलेली आहे .माझ्या मृत्यूनंतर मी दिलेला सीलबंद डबा उघडावा. त्यामध्ये ती संपत्ती कुठे आहे ते लिहिलेले आहे .तुम्हाला गरज असेल तेव्हा गरज वाटल्यास त्याचा शोध तुम्ही घ्यावा .तुमच्या नशिबात ती संपत्ती असेल तर तुम्हाला मिळेल .नाहीतर ज्याच्या दैवात असेल त्याला ती मिळेल."

या पत्रासोबत त्याने दोन सीलबंद डबे आपल्या मुलांना दिले .राजा व राणी दोघांचेही छान चालले होते.योग्य मार्गाने त्याना भरपूर पैसा मिळत होता.अशा संपत्तीची त्यांना गरजही नव्हती .त्यांनी वडिलांनी दिलेला डबा कपाटात ठेवून दिला .

यथावकाश मधुकररावांचा  मृत्यू झाला.केव्हातरी वडिलांनी दिलेल्या डब्याची दोघांनाही आठवण झाली .

बघूयातरी वडिलांनी आपल्याला काय दिले आहे असे दोघांनाही वाटले.

राजाच्या डब्यामध्ये एक कागद होता त्यावर फक्त पुढील मजकूर लिहिलेला होता.~रामगढ ते भरतगढ या परिसरामध्ये शंकराची काही मंदिरे आहेत .त्यातील तीन मंदिरांच्या परिसरात मी ते धन लपविलेले आहे .त्याचा नकाशा आणि बरोबर ठावठिकाणा राणीच्या डब्यामध्ये आहे.~

राणीच्या डब्यांमध्ये एक कागद होता त्यामध्ये तीन सरळ रेषा होत्या.प्रत्येक रेषेमध्ये तीन बिंदू दाखविलेले होते.

राजा व राणी दोघांनीही आपापले कागद शेजारी शेजारी ठेवून खूप विचार केला .त्यावरून एवढाच बोध होत होता .शंकराच्या तीन मंदिरांत धन आहे.रामगढ ते भरतगढ या परिसरात ती तीन मंदिरे आहेत .व प्रत्येक मंदिरात तीन ठिकाणी ते धन लपविलेले आहे .

आता मंदिरे शोधून काढणे, ते तीन बिंदू शोधून काढणे, आणि नंतर ते धन प्राप्त करून घेणे  हे काम अर्थातच सोपे नव्हते.दोघांनाही आपल्या व्यवसायापुढे या संशोधनाला वेळ नव्हता .तरीही काम करीत असताना सुद्धा  त्यांच्या डोक्यात ते धन कुठे असेल हे विचार चालत असत.

दोघांनीही दर व विकेंडला याचा शोध घ्यायचाच असे ठरविले .त्या धनाचा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता .राजाच्या मनात एक कल्पना आली.रामगढ ते भरतगढ या टापूमध्ये जेवढी शंकराची मंदिरे येतील त्यातील मध्यावरील तीन मंदिरांमध्ये हे धन असावे.या टापूत  तेरा गावे होती .प्रत्येक गावात एखादे शंकराचे मंदिर असतेच.या तेरा मंदिराच्या मधील तीन मंदिरे म्हणजे नंबर सहा,नंबर सात व नंबर आठ ही मंदिरे असावीत असा त्यांनी अंदाज बांधला .

या मंदिरावर अापण लक्ष केंद्रित करूया .नशिबात असेल तर आपल्याला धनलाभ होईल असे दोघांनीही ठरविले.आता पुढील काम ते सरळ रेषेतील तीन बिंदू कोणते हे होते.त्यादृष्टीने ते प्रत्येक मंदिराचे निरीक्षण करीत असत.ते तीन बिंदू म्हणजे शंकराची पिंडी, नंदी व कासव होय असे त्यांच्या एकदम लक्षात आले .

देवळात जाऊन त्यांनी त्या दृष्टीनेही या तीनही गोष्टीचे निरीक्षण सुरू केले .दर वीकेंडला ती दोघे देवळात जाऊन निरीक्षण करीत असत .धन मिळाल्यास त्याचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी व्हावा असे दोघांचेही मत होते.गरजूंना मोफत सर्व प्रकारची वैद्यकीय सुविधा ,गरजूंना कोणत्याही शाखेत कोणत्याही पातळीपर्यंत मोफत शिक्षण ,केवळ फी नव्हे तर विद्यार्थ्याला सर्व प्रकारच्या सुविधा मिळणे ,ज्या गावात देवळे आहेत, जिथे धन मिळेल, त्या गावांचा सर्व दृष्टींनी विकास करणे  अशी काही उद्दिष्टे त्या दोघांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवली होती .जर ती उद्दिष्टे पूर्ण होती तर त्यांनी नकळत आपल्या वडिलांनी केलेल्या पापाचे परिमार्जन केले असते .

निरीक्षण करता करता त्यांच्या असे लक्षात आले की शंकराच्या पिंडीचा मधला उंच टोपीसारखा भाग एखाद्या फिरकीच्या झाकणासारखा फिरवता येणे शक्य आहे .प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे .या तीनही देवळातील शंकराच्या पिंडी तांब्याच्या होत्या .घासून पुसून त्या लख्ख तेजस्वी ठेवल्या जात असत.देवळात गर्दी नसताना नमस्कार करण्याच्या बहाण्याने राजाने तो टोपीसारखा भाग फिरवून पाहिला .थोडाबहुत प्रयत्न केल्यावर ताकद लावल्यावर तो फिरतो असे त्याला आढळून आले .त्याच्या खाली त्याला एक सीलबंद तांब्याचा डबा मिळाला .तीन देवळातून असे तीन सीलबंद डबे मिळाले .ते निरनिराळ्या प्रकारच्या मूल्यवान रत्नानी खचून भरलेले होते.

याच पद्धतीने त्यांनी नंदीचे निरीक्षण केले.नंदीच्या पोटात पोकळी होती.त्यातही त्यांना एक सीलबंद तांब्याचा डबा मिळाला.एखाद्या सरकत्या झकणासारखे कासव बाजूला करता येत होते. त्यामध्येही एक सीलबंद तांब्याचा डबा मिळाला .

अशा प्रकारे त्या दोघांनी दोन वर्षांच्या काळात संशोधन करून व लोकांच्या नजरा चुकवून एकूण नऊ डबे मिळविले .त्यातील रत्नांचे मूल्य कित्येक कोटी असावे.

*राजा सीए असल्यामुळे त्याने सरकारच्या डोळ्यांवर येणार नाही अशा प्रकारे या धनाचा कौशल्याने वापर केला.*

*तो सर्व खजिना त्यानी लोकोपयोगी कामासाठी वापरला.*

*नंबर सहा नंबर सात व नंबर आठ या  गावी मोफत हॉस्पिटल्स आहेत.गरजूना तिथे सर्व प्रकारच्या मोफत वैद्यकीय सुविधा मिळतात.*

*या तिन्ही ठिकाणी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत .प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च संशोधनापर्यंत सर्व सुविधा इथे आहेत.*

* सर्व कारभार ट्रस्ट मार्फत चालविला जातो .*

*गब्बरच्या पापाचे अशाप्रकारे परिमार्जन झालेले आपल्याला दिसून येते* 

*ही सर्व गोष्ट फारच थोड्या लोकांना माहित आहे *

*आपण रामगढ ते भरतगढ प्रवास केला तर या भागाची झालेली प्रगती आपल्याला दिसेल.*

(समाप्त)

२१/७/२०१९© प्रभाकर  पटवर्धन

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel