(ही कथा काल्पनिक आहे कुठे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
दीपकसिंगला पकडले ही बातमी पेपरमध्ये आली आणि सर्वानी समाधानाचा सुस्कारा टाकला . त्याने सर्वांना नको नकोसे करून टाकले होते .असा एकही गुन्हा नव्हता की जो त्याने केला नव्हता .असे करूनही त्यापासून नामानिराळे राहण्याचे कौशल्य त्याच्याजवळ होते .त्याचे साथीदार त्याने केलेला गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी नेहमीच तयार असत.तो नेहमीच गुन्हा करताना पूर्ण काळजी घेत असे .त्यामुळे सहसा तो किंवा त्याचे साथीदार सापडत नसत.पोलिस व इतरही ओळखून असत की त्यामागे दीपक सिंगच आहे परंतु पुराव्याअभावी ते काहीही करू शकत नसत .करून सवरून नामानिराळे राहण्याचे त्याचे कौशल्य वादातीत होते .आपल्या साथीदारांना तो नेहमीच भरपूर पैसे देत असे .त्यामुळे जिवाला जीव देण्यासाठी ते नेहमी तयार असत.एखादा पकडला गेला तर त्याला सोडवण्यासाठी त्याचे वकील नेहमी तयार असत . एका तासाला लाख लाख रुपये घेणारे वकील तो आपल्या साथीदारांना गुन्ह्यातून सोडवण्यासाठी नेमीत असे.एखादा साथीदार पकडला गेल्यास त्याला जामीन देऊन त्याची सुटका तो लगेच करीत असे .यदाकदाचित एखाद्याला शिक्षा झाली तर त्याच्या कुटुंबीयांना तुरुंगात गेलेल्या साथीदाराला नेहमी मिळणारा मेहनताना बिनबोभाट घरपोच होत असे .
प्रत्येक राजकीय पक्षांशी तो आपले संधान ठेवू असे .कुणाचा केव्हा कसा उपयोग होईल ते सांगता येत नाही. प्रत्येक राजकीय पक्षाला तो भक्कम देणगी देत असे .प्रशासनातील प्रत्येक शाखेत त्याचे हात वरपर्यंत पोचलेले होते.पैसे देऊन तो सर्वांना मिंधा करून ठेवीत असे .त्यामुळे त्यांची कुठलीही कामे सर्वत्र पटापट होत असत .कोणत्याही राजकीय पक्षाला सभेसाठी लोक जमविणे,पोस्टर्स लावणे,मतदानासाठी लोक जमविणे , इत्यादी कामांसाठी दीपकसिंगची आठवण होत असे.
बिल्डर्स लॉबी मध्येही दीपकसिंगचे चांगल्यापैकी वजन होते.जमीन मिळविणे ,प्लॅन मान्य करून घेणे ,पूर्णत्वाचा दाखला मिळविणे , किंवा आणखी कुठली अडचण आल्यास,बिल्डर्सना दीपक सिंगची नेहमीच मदत होत असे .अर्थात प्रत्येक वेळी त्याला त्याचे कमिशन द्यावे लागत असे .
बेकायदेशीर दारू उत्पादन असो ,जुगार अड्डा असो, बार असो,प्रत्येक ठिकाणी, त्याचे पंटर असत.बेकायदेशीर आयात निर्यात, मानवी व्यापार यामध्येही तो होता.थोडक्यात परमेश्वर जसा सर्वव्यापी असतो त्याप्रमाणेच दीपकसिंग किंवा त्यांचे पंटर हस्तक गुन्हा जगतात सर्वत्र अस्तित्वात होते.
लहान मुलांना पळवून आणून त्यांना भीक मागायला लावणे ,मुली पळवून आणून त्यांना अनैतिक व्यवसायाला लावणे,व्यापारी बिल्डर्स धनिक इत्यादिकांना संरक्षणाची हमी देवून म्हणजे अप्रत्यक्षरित्या धमकी देवून प्रोटेक्शन मनी गोळा करणे,इत्यादी त्याचे अनेक धंदे होते.
शहराचे निरनिराळे विभाग करून त्यावरती त्याने प्रमुख नेमले होते.ते आपापल्या विभागाचे सर्व काम बघत असत. काही अडचण आल्यास ती अडचण दीपक सिंग सोडवीत असे .त्याच्या जिवाला, त्याचे प्रत्येक धंद्यातील प्रतिस्पर्धी,त्याशिवाय त्याच्या हाताखालील प्रमुख,भाई बनण्याची आकांक्षा असलेले हस्तक, पोलिस ,इत्यादींकडून धोका असल्यामुळे त्याने आपल्या संरक्षणासाठी बाऊन्सर्स नेमले होते .
त्याला भेटण्यासाठी कडक चाळणीमधून प्रत्येकाला जावे लागे.प्रत्येकाची कडक तपासणी करून, त्याच्याजवळ हत्यार नाही असे पाहून,दीपक सिंगजवळच त्याचे काम आहे अशी खात्री करून घेऊन, दीपक सिंगने परवानगी दिल्यानंतरच त्या अभ्यागताला दीपक सिंगला भेटता येत असे .
त्याचे जाळे सर्वत्र पसरलेले असल्यामुळे पोलिसांना तो एक डोकेदुखी झाला होता .कुठेही काहीही गुन्हा झाला की बऱ्याच वेळा त्याचा उगम दीपक सिंग आहे असे आढळून येत असे.त्याला गुंतविण्यासाठी कांही पोलीस उत्सुक होते.पोलिसांनाही नियमित हप्ते देऊन त्याने, त्यांना बांधून ठेवले होते. बरेच पोलीस व पोलीस ऑफिसर त्याच्या गुन्ह्याकडे कानाडोळा करीत असत .काही वेळा काम केले असे दाखविण्यासाठी चोर सोडून सावालाही पकडत असत.
त्याला पकडण्यासाठी इन्स्पेक्टर हेरंबराव अत्यंत उत्सुक होते.हेरंबराव म्हणजे कडक शिस्तीचा माणूस .त्यांना विकत घेण्याचा दीपक सिंगने खूप प्रयत्न केला परंतु हेरंबराव अत्यंत प्रामाणिक असल्यामुळे त्यात तो सफल झाला नाही.हेरंबराव आपल्याला पकडण्यासाठी उत्सुक आहेत, प्रयत्न करीत आहेत, याची दीपक सिंगला पूर्ण कल्पना होती .साम दाम दंड भेद इत्यादी मार्गांनी हेरंबराव अनुकूल होत नाहीत हे पाहिल्यावर त्याने त्यांना संपविण्याचाही प्रयत्न केला होता .परंतु हेरंबरावांच्या सुदैवाने व दीपक सिंगच्या दुर्दैवाने तो सफल झाला नव्हता .
हेरंबरावानी दीपकसिंगला कायद्याच्या कचाट्यात पकडण्यासाठी खूप प्रयत्न केले.राजकीय प्रभाव ,पैसे ,यांच्या जोरावर तो अनेकदा सुटत असे . त्याने त्याच्या प्रभावाचा उपयोग करून हेरंबरावांची बदली करण्याचाही प्रयत्न केला.सुदैवाने तो त्यात सफल होऊ शकला नाही .याचे कारण नुकत्याच झालेल्या निवडणुका .नवीन पक्ष बहुमताने निवडून आल्यामुळे त्या पक्षाने सरकार स्थापन केले. या सरकारमधील गृहमंत्र्यांनी हेरंबरावाना पूर्ण सूट दिली.हेरंबरावांची बदली करण्याचा प्रशासकीय स्तरातील काही जणांचा डाव हाणून पाडला.हेरंबरावांना सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या .
प्रत्येकाचे चांगले दिवस कधी ना कधी संपत असतात .अश्या इसमाला उघड आणि छुपे असे अनेक शत्रू असतात.त्यांना हेरून, त्यांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने वश करून त्यांचा हेरंबरावानी योग्य उपयोग करून घेतला.
शेवटी दीपकसिंग कायद्याच्या कचाट्यात सापडला.त्याला जामीनावर सोडण्याचा बराच प्रयत्न झाला .तो साक्षीदार फितवील. साक्षीदारांवर दबाव आणील आणि खटल्याला वेगळे अनिष्ट वळण मिळेल यासाठी त्याला कोर्टाने जामीन नाकारला .त्यासाठी सरकारी वकीलाने केलेले प्रयत्न यशस्वी झाले .त्याने दीपकसिंगला जामीन देऊ नये यासाठी दिलेली कारणे कोर्टाने स्वीकारली.दीपक सिंग तुरुंगातच राहिला तो जामिनावर सुटू शकला नाही .
दीपक सिंगला कचाट्यात पकडण्यासाठी व जबरदस्त शिक्षा करण्यासाठी हेरंबरावानी फार मोठे जाळे टाकले होते .त्यांच्या हस्तकांपैकी काही जण माफीचे साक्षीदार झाले .दीपक सिंगच्या प्रतिस्पर्धींनी हेरंबरावाना दीपक सिंग विरुद्ध अनेक पुरावे उपलब्ध करून दिले.दीपक सिंगची खुर्ची मिळविण्यासाठीही त्याच्या हस्तकांपैकी काही हस्तक प्रयत्नशील होते .त्यांच्याकडूनही अनेक पुरावे मिळाले .
कोर्टात खटला उभा राहिला .दीपक सिंगला बहुधा फाशी होईल किंवा निदान लाइफ इंप्रझेनमेंट मरेपर्यंत सश्रम कारावासात तरी मिळेल अशी सगळ्यांची कल्पना होती .त्याला फक्त दहा वर्षांची कैद मिळाली .
*हेरंबराव निराश झाले.एवढी खटपट करून शेवटी प्रयत्नाना मनासारखे यश मिळाले नाही.*
*हा दीपक सिंग काही काळ आजारपणाच्या बहाण्याने हॉस्पिटलमध्ये काढील.*
*काही पॅरोलवर काढील .*
*चांगल्या वर्तणुकीसाठी काही माफी मिळवील.*
*तुरुंगातूनही आपले राज्य अबाधित रहावे यासाठी प्रयत्न करील.*
*मोबाइल मिळवून त्याच्या आधारे किंवा अन्य मार्गाने सर्व बेकायदेशीर अनैतिक धंदे चालू ठेवील याची हेरंबरावांना खात्री होती.*
*दहा वर्षांनी सुटून आल्यावर पुन्हा आपले सर्व धंदे जोमाने सुरू करील .*
*समाजाला लागलेल्या अश्या किडी कायदेशीर किंवा बेकायदेशीर कोणत्याही मार्गाने नष्ट केल्या पाहिजेत असे हेरंबरावांचे स्पष्ट मत होते .*
(क्रमशः)
२/११/२०१९©प्रभाकर पटवर्धन