( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)  

दादरच्या मध्य रेल्वे स्टेशनच्या क्लोकरूममध्ये आज तीन दिवस एक लोखंडी पेटी तशीच पडलेली होती.क्लोकरूममधील क्लार्क त्या अवाढव्य पेटीकडे काम करताना मधूनमधून पाहात होता. तो ड्युटीवर नसताना कुणीतरी ती पेटी क्लोकरूममध्ये जमा केली होती.सामान्यतः क्लोकरूममध्ये एखादा दिवस फार तर दोन दिवस सामान ठेवले जाते.पावती दाखवून सामान नेले जाते.कांही वेळेला रेल्वे गाडय़ांच्या वेळा मध्यरात्रीनंतर असतात.त्यावेळी टॅक्सी मिळणे कठीण जाते.पैसेही भरपूर द्यावे लागतात.जड सामान क्लोकरूममध्ये ठेवावे.आपण हातात सहज राहील एवढे सामान घेऊन यावे.क्लोकरुममधील सामान घेऊन गाडी पकडावी.असे बरेच जण करीत असतात.तर सोयीसाठी  एखाद्या स्टेशनात क्लोकरूममध्ये  सामान ठेवून शहरातील काम करून , शहर पाहून, क्लोकरूममधील सामान घेऊन प्रवासी पुढील प्रवास सुरू करतो.अशाप्रकारे हॉटेल टॅक्सी हमाल इत्यादी खर्च वाचतो.सोयही होते.सुटसुटीतपणे फिरता येते.

ती लोखंडी पेटी क्लोकरूममध्ये आल्याला आज तीन दिवस होऊन गेले होते.तिसर्‍या  दिवशीच किंचित घाणेरडा वास येऊ लागला होता.चौथ्या दिवशी त्याची तीव्रता वाढली होती.तिथे बसून काम करणे अशक्य होऊ लागले होते.फिनेलचा स्प्रे सुगंधित स्प्रे मारून पाहिले होते .काम करणे अशक्य होत होते.कुठेतरी एखादा उंदीर मेला असण्याची शक्यता होती.क्लोकरुमची झाडफेड करणार्‍याला सर्वत्र पाहण्यास सांगितले.क्लोकरूममधील कारकून मंडळीही वासाच्या उगमाचा शोध घेऊ लागली.तो शोध शेवटी त्या अजस्त्र पेटीजवळ येऊन थांबला .पेटी चांगलीच लांब रुंद होती.पेटी कुणी ठेवली केव्हां ठेवली याचा शोध घेता अमर खन्ना नावाच्या एका इसमाने ती  तीन दिवसांपूर्वी  ठेवलेली आढळून आली.अजूनही तो ती नेण्यासाठी आला नव्हता.  

पेटीला कुठेही लहान छिद्र नव्हते.एखादा उंदीर आत शिरला असेल, त्याला बाहेर पडता आले नसेल आणि तो गुदमरून मेला असेल,अशी शक्यता एकाने वर्तवली.परंतु पेटीला कुठेही लहान छिद्रही नव्हते.आत उंदीर जाणे तर दूरचीच बात होती.

क्लोकरूममधील एका क्लार्कला भलतीच शंका आली.त्याने आपली शंका स्टेशन मास्तरजवळ बोलून दाखविली.स्टेशन मास्तरनी येऊन ती पेटी पाहिली.त्यांनी लगेच रेल्वे पोलिस स्टेशनला फोन लावला.रेल्वेचे पोलीस आले.त्यांनी किल्लीवाला आणून पेटी उघडली.पेटी उघडताच भयानक घाणेरडा वास आला.सगळ्यांनी नाकावर घट्ट रुमाल लावला.सर्व पाच दहा फूट मागे झाले.पेटीचे झाकण घाईघाईने लावण्यात आले.आंत बहुधा माणसाचे प्रेत होते.रेल्वे पोलिसांनी दादर पोलिस स्टेशनला फोन लावला.त्यांना बोलवून ते आल्यावर त्यांना सर्व परिस्थिती दाखविली.ऑफिशियली ती केस स्थानिक पोलिसांकडे सोपविण्यात आली.पोलीस व रेल्वे पोलिस यांनी संयुक्तपणे काम करण्याचे ठरविले.

प्रथम पंचनामा करण्यात आला.आंत एका स्त्रीचे प्रेत होते.शवविच्छेदन अहवालासाठी ते प्रेत प्लॅस्टीक अवगुंठित करून  पाठविण्यात आले.पेटी पोलिस स्टेशनमध्ये पाठवण्यात आली  ती पेटी क्लोकरूममध्ये केव्हां ठेवण्यात आली ती वेळ पाहण्यात आली.जंक्शन व मोठे स्टेशन असल्यामुळे त्यावेळेच्या आगेमागे  अनेक गाड्या आल्या होत्या.कोणत्या गाडीतून आलेल्या उतारूंने ती पेटी क्लोकरूममध्ये ठेवली ते माहीत करून घेणे अशक्यप्राय होते.एखादवेळी मुंबईमधील व्यक्तीनेच ती पेटी तिथे ठेवली असण्याचा संभव नाकारता येत नव्हता.रेल्वेगाडी कोणती, ती कुठून निघाली, वाटेतील स्टेशने, यावर आधारित  कांही तपास करणे अशक्य होते.

शवविच्छेदन अहवाल आला.स्त्रीची उंची पांच फूट चार इंच.वय सुमारे चौवीस.अंगावर एकही दागिना नाही.डाव्या गालावर तीळ.लांब केस.उजव्या भिवईवर जखमेची खूण.श्वास गुदमरून मृत्यू.बहुधा तोंडावर उशी दाबून श्वास कोंडला मृत्यू झाला.वर्ण उजळ.तिची कांही हाडे मोडली होती .पेटीमध्ये तिला कोंबून बसवताना हाडांची मोडतोड झाली असावी.तिची खूण पटेल अशी एकही वस्तू पेटीत सापडली नाही. शवविच्छेदन करण्याअगोदर अनेक कोनातून फोटो काढण्यात आले होते.सर्व अंग भप्प सुजल्यामुळे ओळख पटविण्यापलिकडे फोटो होते.ते फोटो एका संगणक तज्ज्ञाकडे देण्यात आले.त्याला मुळात ही स्त्री कशी असेल त्याच्या प्रतिमा तयार करण्यास सांगितल्या. त्याने संभाव्य तीन निरनिराळ्या  प्रतिमा करून दिल्या.त्या स्त्रीची ओळख पटवण्यासाठी त्याचा उपयोग होणार होता.

त्या स्त्रीची ओळख पटवावी  कशी ही मोठी समस्या होती.महामुंबईपासून संपूर्ण भारतातील कोणत्याही शहरातील किंवा खेडेगावातील ती स्त्री असण्याचा संभव होता. पोलिसांना त्या स्त्रीच्या  शोधासाठी कोणताही धागा, संकेत,(क्लू)मिळत नव्हता. किंवा समोर असलेला धागा त्यांना दिसत नव्हता.त्यांनी संगणकावर हरविलेल्या व पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आलेल्या व्यक्तींचे फोटो पाहिले.पोलीस व रेल्वे पोलीस ती केस फाईल करण्याच्या विचारात होते. 

त्याच वेळी दादर पोलीस स्टेशनला एक हुषार व उत्साही इन्स्पेक्टर बदलून आला.त्याने त्या केसची संपूर्ण फाईल व्यवस्थित वाचली.शवविच्छेदन अहवाल,संगणकतज्ज्ञाने आपल्या कल्पनेने व अॅपचा उपयोग करून तयार केलेले फोटो पाहिले.त्यालाही शोध कसा घ्यावा ते लक्षात येत नव्हते.

अकस्मात त्याच्या डोक्यात एक कल्पना आली.त्याने हाताखालील पोलिसाला ती लोखंडी पेटी(ट्रंक)कुठे ठेवलेली आहे असे विचारले.पोलिस स्टेशनमध्ये आंतल्या खोलीत अडगळीच्या सामानात ती पडली होती.सुदैवाने भंगार म्हणून ती अजूनही विकण्यात आली नव्हती.त्याने ती पेटी पोलिसाला बाहेर काढण्यास सांगितले.पेटी आणून त्याच्या टेबलावर ठेवण्यास सांगितले.दोघांनी ती लांबलचक पेटी त्याच्या टेबलावर आणून ठेवली.पेटी एवढी मोठी होती की ती त्याचे टेबल संपूर्ण व्यापून थोडी बाहेर राहात होती.पेटीवरील  धूळ झटकण्यात झाली. ओले फडके घेऊ पेटी आंतून बाहेरून स्वच्छ पुसण्यास सांगितले.

सामान्यपणे वस्तूचा निर्माता त्यावर आपली कोणती ना कोणती खूण ठेवीत असतो.नाव असेल, कंपनी असेल,आद्याक्षरे असतील,लोगो असेल,कांहीतरी असे सापडेल की ही पेटी कुठे निर्माण झाली ते आपल्याला कळू शकेल.ते कळल्यावर त्या कंपनीत,जिथे  पेटीची निर्मिती झाली तेथे जाता येईल.ती पेटी विक्रीसाठी कुठे पाठविण्यात आली ते कदाचित कळू शकेल.त्या विक्रेत्याकडून ती खरेदी कुणी केली ते कदाचित कळू शकेल.अशा प्रकारे ती पेटी खरेदी कुणी केली तिथपर्यंत पोचता येईल.एकदा त्या पेटीचा अंतिम खरेदीदार ग्राहक मिळाला की नंतर पुढच्या गोष्टी सोप्या होतील.

अशा मोठय़ा लोखंडी पेट्यांचे निर्माते ठिकठिकाणी पसरलेले असतात.मोठी पेटी निर्माण करून ती दूरवर विक्रीसाठी पाठविण्याचा खर्च त्या पेटीच्या उत्पादन खर्चापेक्षा जास्त येतो.शहर, तालुका, कांही तालुके,जिल्हा, कांही  जिल्हे याच्यापलीकडे ती सामान्यतः  पाठविली जात नाही.दूरवर नेऊन स्पर्धात्मक विक्री करणे शक्य होत नाही.प्रथम उगमस्थान, नंतर विक्रीचा बिंदू,नंतर खरेदीदार,अशा साखळी मार्फत शेवटी ज्याने त्या पेटीचा वापर त्या स्त्रीला मारून आंत तिला अक्षरशः कोंबून नंतर दादर स्टेशनच्या क्लोकरूममध्ये ठेवले त्याच्यापर्यंत पोचता येईल.असा साधा सरळ त्या इन्स्पेक्टरचा सुधाकरचा तर्कशुद्ध प्रवास होता. 

तो पेटीच्या आंतील भाग, बाहेरील भाग,तळ, काळजीपूर्वक पाहात होता.सुधाकरला लोखंडी पेटीच्या आंत बाजूच्या भागावर एक अस्पष्टसा शिक्का मिळाला.त्याचा फोटो घेण्यात आला.तो मोठा (एनलार्ज) करण्यात आला.कंपनीचे अस्पष्ट नाव मिळाले.गावाचे शहराचे नाव घर्षणामुळे नाहीसे झाले होते.आता कंपनीच्या नावावरून ती  कंपनी  कुठल्या शहरात उत्पादन करते ते पाहावे लागणार होते.तिथे जाऊन पेट्यांचे घाऊक व किरकोळ विक्रेते पाहावे लागणार होते.नंतर ती पेटी कुणी विकत घेतली तिथपर्यंत पोचता आले तर पोहोचावे लागणार होते.प्रवास कष्टमय होता.खाचखळगे यांनी भरलेला होता.वेळ काढू होता.वरिष्ठांची परवानगी आवश्यक होती.खुनी इसम सापडेलच अशी खात्री नव्हती.खुनी जिवावर उदार झाला असण्याचा संभव होता. कदाचित शोध घेणाऱ्याच्या जिवाला धोका निर्माण झाला असता.परंतु तो प्रवास करण्याचे, खुनी इसमाला शोधून काढण्याचे आणि त्याला शिक्षा करण्याचे, सुधाकरने ठरविले होते.

* सुधाकरची डिपार्टमेंटमध्ये बेधडक(डेअर डेव्हील) इन्स्पेक्टर म्हणून ख्याती होती.*

*एकदा त्यांनी ठरविले की ठरविले.त्यांचा निश्चय दृढ  होता.*

*त्या निश्चयाचा मागे बुद्धिमत्ता, तर्कशुद्ध विचारसरणी,अनुभव, साहस,कठोर परिश्रम सर्व कांही होते.*

*सुधाकरची वज्रमूठ आता खुनी इसमावर निश्चित पडणार होती.* 

(क्रमशः)

२९/५/२०२१©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel