( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
इन्स्पेक्टर सुधाकर यांची या शहरात नुकतीच नेमणूक झाली होती.शहर तसे लहान व टुमदार होते.शहरातील लोकसंख्या जेमतेम एक लाखांपर्यंत होती.समुद्रकाठचे दंगा धोपे नसलेले शांत शहर म्हणून त्याची ख्याती होती.एवढ्याच लोकसंख्येच्या कितीतरी शहरांशी तुलना करता या शहरात गुन्ह्यांचे प्रमाण फारच कमी होते.मोठ्या शहरात निरनिराळ्या गुन्ह्यांचे प्रमाणही मोठे असते.चेन स्नॅचिंग,घरफोडी, दरोडा, टूव्हीलर फोर व्हीलर चोरी, बँक रॉबरी, एटीएम फोडणे,खून मारामारी अत्याचार इथपासून लहानमोठ्या चोर्यापर्यंत सर्व गुन्हे होत असतात.येथे सर्व काही शांत शांत होते.मुंबई ते कन्याकुमारी हायवे आज कित्येक दशके तयार होत आहे.अजूनही हायवे संपूर्ण तयार झालेला नाही.या हायवेवर लहानमोठय़ा खाड्या आहेत.या खाड्यांवर टिकाऊ पूल बांधणे खर्चिक काम आहे.बराच रस्ता तयार झाला आहे.त्या रस्त्याचा या शहराजवळील दोन्ही बाजूचा कित्येक किलोमीटरचा भाग पूर्ण झालेला होता.एका बाजूला समुद्र किनारा व समुद्र आणि दुसर्या बाजूला शेते, नारळी पोफळीच्या बागा, डोंगर सुरूची झाडे पाहत प्रवास करताना मन आनंदाने उचंबळून येत असे.
समुद्रकिनाऱ्यावरच्या शहरात इन्स्पेक्टर सुधाकरांची ही पहिलीच पोस्टिंग होती.शहर व आजूबाजूच्या कांही खेड्यांचे सुधाकर, पोलीस प्रमुख होते.तीस पस्तीस पोलिस स्टेशन्स त्यांच्या हाताखाली हाेती.हल्ली संगणकामुळे एक फार छान सोय झाली आहे.कागद फायली यांचा वापर कमी झाला आहे.सर्व पोलीस चौक्या संगणकामार्फत जोडल्या गेल्या असल्यामुळे कुठेही घडणारी लहान मोठी घटना लगेच सर्वांना माहीत होते.वाहतूक, दळणवळण सुलभता जशी झाली आहे त्याचप्रमाणे माहितीचेही दळणवळण सुलभरित्या होते.निरनिराळ्या प्रकारची माहिती आपण पाहावी तशी कोसळत असते.केवळ जवळपासचेच गुन्हे नव्हेत तर दूरदूरचे गुन्हे सुद्धा नेट व संगणक यामार्फत कळतात.
इन्स्पेक्टर सुधाकर ऑफिसमध्ये बसून संगणकावर पूर्वीं झालेले गुन्हे पाहत होते.त्याचप्रमाणे गेल्या कांही आठवड्यांत झालेले गुन्हेही पाहत होते.गुन्ह्यांची जंत्री पाहत असताना एका विशिष्ट प्रकारच्या गुन्ह्य़ाने म्हणा किंवा बातमीने त्यांचे लक्ष वेधून घेतले.निरनिराळ्या पोलिस स्टेशन्समध्ये मुली हरवल्याच्या तक्रारी केलेल्या होत्या.लहान मुलींपासून ते तरुण मुलींपर्यंत अशा तक्रारी नेहमीच सर्व पोलिस स्टेशन्समध्ये येत असतात.पळवून नेणे,रागावून घरातून निघून जाणे,मैत्रिणींबरोबर केवळ साहस म्हणून निघून जाणे,तरुणाबरोबर मैत्री आणि तारुण्यातील साहसी प्रवृत्ती व तरुणपणीच्या आकर्षणापायी मित्राबरोबर पळून जाणे,अशा विविध कारणांनी मुली नाहीशा होत असतात.कांही वेळा अल्पवयीन मुलींना वाईट हेतूनेही पळविले जाते.त्यांचा वाईट हेतूसाठी वापर केला जातो.त्यांनी नाव सांगू नये,आपल्याला ओळखू नये म्हणून किंवा घाबरून अशा मुलींचा खूनही केला जातो.
आसपासच्या खेडेगावांतून,जवळजवळ पंधरा वीस मुली नाहीशा झाल्याच्या तक्रारी होत्या.वीस पैकी अकरा मुली परत आल्या होत्या.नऊ मुलींचा अजुनही कांही पत्ता लागला नव्हता.परदेशात चांगली नोकरी देण्याच्या आमिषाने कांहीवेळा मुलीना नेले जाते.त्यांचा पासपोर्ट व्हिसा काढला जातो.परदेशात गेल्यावर त्यांचा व्हिसा पासपोर्ट काढून घेण्यात येतो.त्यांचे निकाह लावून देण्यात येतात.लैंगिक पिळवणुकीच्या त्या बळी ठरतात.कित्येकवेळा त्याना वेश्या व्यवसायालाही लावले जाते.सुखाच्या, उच्च आर्थिक पातळीच्या आकर्षणाला बळी पडून अशा गोष्टी होतात.केवळ दारिद्रय़ यामुळेही अशा गोष्टी घडतात. ज्याप्रमाणे परदेशात मुली नेल्या जातात त्याप्रमाणेच देशांतर्गतही हा प्रकार चालतो.कोकणातील मुलगी कलकत्ता, चंदीगड,मणिपूर शिलांग अशा शहरात दूरवर नेली जाते.तर तिकडच्या मुली मुंबई हैदराबाद कोचीन अशा ठिकाणी आणून व्यवसायाला लावल्या जातात.
मुलीच्या संमतीने तिला जसे नेले जाते त्याप्रमाणेच बळजबरीनेही तिला नेले जाते.गुंगीचे औषध देऊन,इतरांच्या लक्षात येऊ नये म्हणून तिला बुरखा घालून,दूरवरच्या शहरात नेण्यात येते.कांहीवेळा बेशुद्ध करूनही पळविण्यात येते.कांही वेळा तर बळजबरीने जहाजात बसवून कोणत्याही कागदपत्रांशिवाय तिला परदेशात नेण्यात येते.असे काम करणार्या टोळ्या सक्रिय आहेत.त्यांचे परस्पर लागेबांधे असतात.एका टोळीकडून मुलीचे दुसऱ्या टोळीकडे हस्तांतर केले जाते.पैशांची देवाणघेवाण केली जाते.काही वेळा एखादी बडी हस्ती, आर्थिक किंवा सामाजिकदृष्टय़ा मोठा मनुष्य याचा प्रमुख असतो.
घरातून पळून गेलेल्या हरवलेल्या ज्या मुली परत आल्या नाहीत अशा मुलींची वये इन्स्पेक्टर सुधाकर तपासत होते.सर्व मुली बारा ते एकोणीस या वयोगटातील होत्या.त्या त्या पोलिस स्टेशनकडून या मुलींची जास्त माहिती गोळा केली पाहिजे असे इन्स्पेक्टर सुधाकरनी ठरविले.अशा गोळा केलेल्या माहितीच्या आधारे पुढे काही निर्णय घेता आला असता.तपासाला कांही दिशा प्राप्त झाली असती.घडणार्या निरनिराळ्या असंख्य प्रकारच्या गुन्ह्यांपैकी जरी इतर गुन्हे इथे कमी प्रमाणात आढळत असले तरी मुलींच्या संदर्भातील गुन्ह्य़ांचे प्रमाण लक्षणीय आहे असे त्यांच्या लक्षात आले. दारिद्र्य, शिक्षणाचा अभाव, शहरातील तथाकथित सुखसोयींचे आकर्षण,आंधळे प्रेम,मित्रावर टाकलेला अनाठायी विश्वास,घरातील वातावरण,अशा अनेक कारणांपैकी या मुली हरवण्यामागे कोणते कारण प्रामुख्याने असले पाहिजे असा विचार त्यांच्या मनात आला.हा प्रदेश भयमुक्त आहे, गुन्हे मुक्त आहे, शांत आहे,अशी आपली समजूत एका अर्थाने चुकीची होती असे त्यांच्या लक्षात आले.
पुढ्यात संगणक, त्यावरील माहिती व आकडेवारी,पाहत असताना इन्स्पेक्टर सुधाकर विचारमग्न झाले होते.एवढ्यात शिपायाने येऊन त्याना बाहेर कुणीतरी भेटायला आले असल्याचे कळविले.बाहेर पोलिस इन्स्पेक्टर बसले होते.त्यांनी त्या इसमाचे काय काम आहे ते पाहायला हवे होते.असे असताना त्या गृहस्थाचे आपल्याकडे काम काय असावे असा विचार सुधाकर यांच्या मनात आला.त्यांनी शिपायाला पोलिस सब इन्स्पेक्टरला बोलवून आणण्यास सांगितले.सबइन्स्पेक्टर मोहिते लगेच आंत आले.सुधाकरनी मोहिते यांना त्या गृहस्थांचे काय काम आहे असे विचारले.त्यांची तरुण मुलगी घरातून निघून गेली आहे.आज चार दिवस झाले.तिचा कांहीही पत्ता नाही.ती हरवल्याची तक्रार त्यांना नोंदवायची आहे.परंतु ते तुम्हाला भेटायचा हट्ट धरून बसले आहेत.नेहमीच्या प्रोसिजर प्रमाणे ते तक्रार नोंदवायला तयार नाहीत.अशी माहिती मोहिते यांनी दिली.आणखी चौकशी करता,रावसाहेब चव्हाण हे शहरातील बडे प्रस्थ आहे असेही त्यांना सांगण्यात आले.रावसाहेब ही पदवी नसून त्यांचे नाव आहे असे समजले.
आसपासच्या मुली हरवल्याबद्दलच्या गुन्ह्यांचा विचार करीत असतानाच मुलगी हरवल्याची केस घेऊन हे रावसाहेब चव्हाण आले होते.त्यात ते शहरातील बडे प्रस्थ आहे असे मोहिते यांनी सांगितले.त्यांची भेट घेण्याचे सुधाकरानी ठरविले. सुधाकरने मोहितेना रावसाहेब चव्हाणाना आंत पाठविण्यास सांगितले.
रावसाहेब चव्हाण मध्यम उंचीचे, डोक्यावर टक्कल पडलेले,रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचे, सुमारे पन्नास वय असलेले गृहस्थ होते.या बसा झाल्यावर,सुधाकरनी ते येथे येण्याचे कारण त्यांची समस्या विचारली.रावसाहेबांनी बोलण्यास सुरुवात केली.
त्यांची एकुलती एक मुलगी वासंती तीन दिवसांपूर्वी अकस्मात घरातून निघून गेली. मी ट्रिपला जात आहे असा तिचा फोन आला. ट्रिपला कुठे जातेस असे विचारता तिने मालवणचे नाव सांगितले. तिने बरोबर कपडेही घेतले नव्हते.आमचे घाईघाईने ठरल्यामुळे मी मैत्रिणीचे कपडे वापरणार आहे असे तिने सांगितले. आतापर्यंत वासंती कधीही खोटे बोलली नाही.मी तिला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे.अजूनपर्यंतरी तिने त्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग केलेला नाही.ती मला अधून मधून फोन करीत होती.रोज एकदा तरी फोन झालाच पाहिजे असे मी तिला बजावून सांगितले होते.मीही तिला फोन करीत असे.वासंती मालवणला ट्रिपला गेली आहे असे मी व सौ समजत होतो.तिची ट्रिप सहा दिवसांची होती.तीन दिवसांनी ती येईल असे आम्ही समजत होतो.
काल आमची सौभाग्यवती महिला मंडळात गेली होती.तिथे तिच्या मैत्रिणींशी बोलताना तिने वासंती ट्रिपला गेल्याचे सांगितले.त्यांची मुलगी मुक्ताही ट्रिपला गेली असेल असे सौभाग्यवती म्हणाली.त्यावर मुक्ताच्या आईने मुक्ता घरीच आहे कुठेही गेलेली नाही असे सांगितले.कदाचित मुक्ता ट्रिपला गेली नसेल.इतर मैत्रिणी गेल्या असतील.तरीही चौकशी करावी म्हणून आम्ही वासंतीच्या मैत्रिणींजवळ चौकशी केली.त्यांची कोणतीही ट्रिप कुठेही गेलेली नाही असे त्यांच्याकडून कळले.मी वासंतीला फोन केला.तिने आम्ही मैत्रिणी मजा करीत आहोत असे सांगितले.तिला केव्हा येणार असे विचारता दोन दिवसांनी परत येऊ असेही तिने सांगितले.
ती आम्हाला खोटे सांगून तिच्या मित्राबरोबर गेली असावी असा आमचा एक अंदाज आहे.तिच्या अशा एखाद्या मित्राबद्दल आम्हाला कांहीही माहिती नाही.
तिच्या मैत्रिणींना विचारता त्यांनीही तिचा एखादा मित्र असल्याबद्दल सांगितले नाही.तिचा एखादा मित्र असता तर तो आम्हाला तिने मोकळेपणाने सांगितला असता.
या सर्वच गोष्टी आम्हाला संशयास्पद वाटतात.
वासंती खरेच मालवणला गेली आहे का?
तिथे ती कोणत्या हॉटेलात उतरली आहे?
तिला कुणी पळविले नाही ना?
*फोनवर बोलताना ती दबावाखाली असल्यासारखी वाटली.कुणीतरी तिच्याकडून जबरदस्तीने तिला फोनवर बोलते करून ती सुखरूप आहे असे आम्हाला भासवण्याचा प्रयत्न करीत नाही ना?*
*ती सुखरूप आहे का ?*
*अशा आम्हाला अनेक शंका येत आहेत .तुम्ही पोलिस खात्यामार्फत चौकशी करावी अशी इच्छा आहे.*
*वासंती सुखरूप असावी.तिची व आमची लवकरात लवकर भेट व्हावी.त्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा अशी विनंती मी करीत आहे .*
(क्रमशः)
४/८/२०२१©प्रभाकर पटवर्धन