त्याचा पलंग झोपाळ्यासारखा हालत होता.जणू काही त्याच्या पलंगाला झोपाळ्यासारख्या कड्या लावलेल्या होत्या.आणि तो झोपाळा कुणीतरी जोरात हलवीत होता .मधुकर जोरात नको नको म्हणून ओरडत होता .मधुकर जसा ओरडत होता तसा त्या कुणातरी झोपाळा हलविणार्‍याला चेव चढून तो आणखी जोराजोरात हलवीत होता.  

केवळ पलंग हालत नव्हता तर छताला टांगलेला पंखाही झोपाळ्यासारखा मागे पुढे होत होता.बघता बघता छताला टांगलेले झुंबरही डोलू हलू लागले. जरा वेळाने घर हाच एक मोठा झोपाळा झाला .घर काय त्याचे संपूर्ण गाव हेच एक झोपाळा झाले होते .त्याला आकाशात कुणीतरी अदृश्य कड्या लावलेल्या होत्या  .आणि कुणी तरी तो घररूपी गावरूपी झोपाळा जोरजोरात हलवीत होता .हलताहलता भिंती भराभर कोसळू लागल्या.घरातील भांडीकुंडी फर्निचर आणि मधुकर व मधूही त्याखाली गाडले गेले.मधूला वाचविण्यासाठी त्याने तिला मिठी मारली परंतु दोघेही विटा व इतर सामानाखाली गाडले गेले.गावातील प्रत्येक घरात कमी जास्त फरकाने अशीच परिस्थिती झाली .घरे टॉवर्स देऊळ मशीद चर्च शाळा सर्व काही कोसळत होते .जिकडे तिकडे एकच हाहा:कार उडाला होता.जो तो सामानाखालून बाहेर येण्याचा प्रयत्न करीत होता .जो तो घरापासून गावापासून दूर पळण्याचा प्रयत्न करीत होता .गावावर अस्मानी संकट कोसळले होते .त्यातच पाऊस सुरू झाला.सर्वत्र चिखल झाला .गावातील नदीला पूर आला .पुराचे पाणी गावात शिरले .प्रत्येक घरातील चीजवस्तू पाण्याबरोबर वाहत जावू लागली . एक भयानक किंकाळी मारून मधुकर जागा झाला.  

त्याचे अंग घामाने निथळत होते .त्यांच्या हातापायात काहीही ताकद शिल्लक उरली नव्हती . आपण स्वप्नात आहोत की जागे तेच त्याला कळत नव्हते .तो भिंतीकडे पंख्याकडे वर टांगलेल्या झुंबराकडे पाहात होता.एकदा त्याने आपल्या शेजारी झोपलेल्या मधूकडे पाहिले .सर्व काही जागच्या जागी आहे असे पाहून त्याच्या जिवात जीव आला . स्वप्नात त्याने जे काही अनुभवले ते इतके भयानक होते की हार्टफेल होऊन आपण मेलो कसे नाही याचे त्याला आश्चर्य वाटत होते.

डोक्यावर पंखा गरगर फिरत होता.हळूहळू त्याच्या हातापायात ताकद येत होती. तो उठून बसला राहिला .हळूहळू त्याचा घाम सुकत होता.

आपल्याला पडलेले स्वप्न कसला संकेत असावा याचा तो विचार करीत होता .

त्याला वाटेल तेव्हा वाटेल तशी वाटेल ती स्वप्ने पडत नसत .

आणि जी स्वप्ने पडत ती खरी होत असत .

किंबहुना त्याची स्वप्ने म्हणजे  भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत असत.त्याचा त्याला अनेकदा प्रत्ययही आला होता .तो होणारी घटना थांबवू शकत नव्हता परंतु होणारे नुकसान काही प्रमाणात कमी करू शकत होता.तेवढीच गोष्ट त्यांच्या हातात होती .

त्याला लहानपणापासून आत्तापर्यंत पडलेली काही स्वप्ने आठवू लागली .

त्याची दहावीची परीक्षा झाल्यावर सर्वजण रेल्वेने हिमाचल प्रदेशमध्ये जाणार होते .प्रवासाला निघण्याच्या अगोदर दोन दिवस त्या रेल्वेला अपघात झालेला त्याने स्वप्नात पाहिला .स्वप्नातील अपघात पाहून तो एवढा घाबरून गेला होता की त्याने आपण ट्रिपला जाणे रद्द करू या असे म्हटले .त्याला का म्हणून विचारता त्याने त्याला पडलेले स्वप्न सांगितले .घरातील सर्वांनी त्याची टर उडविली .

* सर्वजण त्याच रेल्वेने प्रवासाला निघाले .त्या रेल्वेला अपघात झाला .मथुरेजवळ गाडी रुळावरून घसरली .सुदैवाने यांच्या डब्याला काही झाले नाही .सर्वजण बालंबाल बचावले .अपघात झाल्यावर तो बाबांना म्हणाला मी म्हणत नव्हतो का ?तुम्ही माझे ऐकले नाही.सर्व जण त्याच्याकडे किंचित गंभीरपणे पाहात होते .तरीही बोला फुलाला गाठ पडली असेल म्हणून त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले .

* त्यानंतर कॉलेजात शिकत असताना त्याला त्याची आजी मेल्याचे स्वप्न पडले .आजी व आजोबा कोकणात त्यांच्या गावी धाकट्या मुलाजवळ राहात असत .मुंबईची लहान जागा व तेथील हवा त्यांना मानवत नसे .मुंबईला आले तरी ते आठ पंधरा दिवसांपेक्षा जास्त रहात नसत.सुटीची मुले मात्र कोकणात जाऊन नेहमी राहत असत . कोकणात राहण्याचा तेथील आंबे गरे खाण्याचा नदीत पोहण्याचा आनंद काही वेगळाच असे.तो दुसऱ्या दिवशी आईला म्हणाला की मला असेअसे वाईट स्वप्न पडले .त्याची आई म्हणाली अरे असे कुणी मेल्याचे स्वप्न पडले की त्यांचे आयुष्य दुप्पट होते .आणि दोन दिवसांतच कोकणातून आजी वारल्याचा फोन आला .आईची तथाकथित समजूत चूक ठरली .

* आता मात्र मधुकरला गंभीरपणे घ्यायला सर्वांनी सुरुवात केली होती.त्याच्या बाबांनी त्याला विचारले अरे तुला नेहमी अशी वाईट स्वप्ने का पडतात ?तो म्हणाला मला कधी कधी चांगलीही स्वप्ने पडतात .फक्त मी ती तुमच्याजवळ बोललो नाही.तुम्ही त्या वेळी माझी टर उडविली म्हणून मी गप्पच राहात होतो .

* तुम्हाला प्रमोशन मिळाले त्याच्या अगोदर दोन दिवस तुम्ही ऑफिस प्रमुख झाल्याचे मला  स्वप्न पडले होते .

* माझा बारावीचा रिझल्ट लागला त्यावेळी मी पहिल्या दहात आल्याचे स्वप्न मला पडले होते .

* आपली पाकिस्तान बरोबर क्रिकेट मॅच झाली तेव्हा आपण जिंकल्याचे मला स्वप्न पडले होते .

* आपण जुनी जागा सोडून या नवीन जागेत आल्याचे स्वप्नही मला पडले होते .

* परंतु विशफुल थिंकिंग म्हणून कदाचित तुम्ही हेटाळणी कराल म्हणून मी काही बोललो नव्हतो

यावेळी वाईट स्वप्न पडले म्हणून मला बोलल्याशिवाय राहवले नाही .

एकदा सर्वजण बसने प्रवास करणार होते.मुंबईहून कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनाला जाण्याचा विचार होता .प्रवासाच्या आदल्या दिवशी त्याला त्या बसला अपघात झाल्याचे स्वप्न पडले .त्याने ते इतरांना सांगितले .बसने प्रवास करण्याचे त्यांनी रद्द केले .

*दुर्दैवाने त्या बसला अपघात झाला *

तेव्हापासून त्याने मला स्वप्न पडले असे म्हटले तरी सर्वजण दचकत असत.प्रत्येक कुटुंबात प्रत्येक देशात काही ना काही चांगले किंवा वाईट घडतच असते .प्रत्येक वेळी मधुकरला स्वप्न पडत असे असे नाही .चांगल्या वाईट घटना घडतच असतात .त्या घटना घडल्यावरच मधुकरला त्याचा पत्ता लागे.परंतु जेव्हा जेव्हा त्याला चांगले किंवा वाईट स्वप्न पडे तेव्हा तेव्हा ते खरे होत असे एवढे मात्र खरे .

मधुकर कामानिमित्त हल्ली या लहानश्या गावात राहत होता."उत्तम कन्स्ट्रक्शन कंपनी"त तो इंजिनिअर म्हणून काम करीत होता .येथील नदीवर धरण बांधण्याचे काम त्याच्या कंपनीला मिळाले होते .त्यानिमित्ताने गेली सहा महिने त्याचे येथे वास्तव्य होते .मुलांच्या शिक्षणात बदलीच्या जागी वारंवार गेल्यामुळे व्यत्यय येऊ नये म्हणून मुले नेहमी मुंबईला असत .मधुकरची पत्नी मधू कधी साइटवर तर कधी मुंबईला असे.

मधुकर आता गंभीरपणे विचार करू लागला होता .त्याला त्याच्या पूर्वीच्या स्वप्नांच्या हकीगती आठवत होत्या .

चांगली किंवा वाईट दोन्ही प्रकारची स्वप्ने खरी झालेली त्याला माहीत होती .त्याला उगीचच्या उगीच स्वप्ने पडत नसत .स्वप्नाप्रमाणे घटना कधी लगेचच दोन तीन दिवसांत किंवा एखाद्या आठवड्याने घडत असत.त्याला त्याचे स्वप्न स्पष्टपणे आठवत होते.

येथे भूकंप होणार . ढगफुटीसारखा प्रचंड पाऊस पडणार. आपण धरण बांधत असलेल्या नदीला महापूर येणार.गावातील चीज वस्तू वाहून जाणार .घरे कोसळणार .धरणावरील बांधकामासाठी येथे उभारलेल्या वस्तीची वाताहात होणार .त्याला स्पष्टपणे भविष्यात घडणाऱ्या घटना दिसत होत्या .

(क्रमशः)

१४/७/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel