गजानन हाइट्स हा एक मोठा रेसिडेंशिअल कॉम्प्लेक्स(निवास संकुल) होता.लहान मोठे अडीचशे फ्लॅट्स(घरकुल) होते.जॉगिंग ट्रॅक(धावपट्टी) स्विमिंग टँक(तरणतलाव )  रिक्रिएशन हॉल(मनोरंजन स्थान) सीनियर सिटिझन्स क्लब रूम(ज्येष्ठ नागरिक संघ स्थान) यंग मेंबर्स क्लब रूम(तरुण सभासद संघ स्थान) योगा रूम(योग स्थान) गार्डन(बाग) अश्या अनेक सुविधा तेथे होत्या.ज्येष्ठ मंडळी ज्येष्ठ नागरिक संघ स्थानामध्ये किंवा बागेमध्ये बसून  सकाळ संध्याकाळ गप्पा मारीत असत. उद्योग कारखाने व्यवसाय सरकारी खाती अश्या  अनेक ठिकाणांहून ज्येष्ठ नागरिक  आलेले असल्यामुळे त्यांच्याजवळ अनुभवाचा अनेक गोष्टी व किस्से यांचा मोठा साठा होता.

ज्येष्ठ नागरिक संघाचे सदाशिवराव हे एक अविभाज्य घटक होते .नोकरीनिमित्त अनेक ठिकाणी शहर व ग्रामीण विभागात ते फिरलेले असल्यामुळे त्यांच्याजवळ निरनिराळ्या गमतीशीर अनुभवांचा मोठा साठा होता .निवृत्तीनंतर ते येथे आपल्या मुलाकडे राहायला आले होते .त्यांचा स्वभाव निरहंकारी, समंजस, गमतीशीर ,मनमिळावू, प्रेमळ व गप्पिष्ट  असल्यामुळे त्यांचे सर्वांजवळ पटत असे.गोष्ट सांगण्याची त्यांची एक खास शैली होती. ते एखादा किस्सा गोष्ट हकीगत सांगत आहेत असे म्हटल्यावर सर्व ज्येष्ठ मंडळी त्यांच्या भोवती कोंडाळे करून बसत असत . ज्येष्ठ मंडळीच काय तर तरुण व लहान मुलांनाही त्यांच्या गोष्टी केव्हा केव्हा आवडत. 

आजही बागेमध्ये सर्वजण गप्पा मारीत स्वतःची करमणूक करीत बसले होते .कुणीतरी भुते असतात की नाही असा विषय काढला .त्यावर तावातावाने मंडळींनी अस्तिपक्षी किंवा नास्ती पक्षी निरनिराळी मते मांडण्याला सुरुवात केली .सदाशिवराव शांतपणे कोपऱ्यात बसून सर्व मते मतांतरे ऐकत होते .सदाशिवराव काहीच बोलत नाहीत हे काही जणांच्या लक्षात आले .त्यातील एकाने सदाशिवरावांकडे वळून तुम्हाला काय वाटते? तुमचे काय मत आहे? असा प्रश्न विचारला. त्यावर सदाशिवरावांनी एक ठेवणीतले स्मित केले.त्यावर दुसऱ्या एकाने पुन्हा तोच प्रश्न त्यांना विचारला .

सदाशिवराव एवढेच म्हणाले की हा वाटण्याचा किंवा मतांचा प्रश्न नसून अनुभवाचा प्रश्न आहे .अनुभवाचा असे म्हटल्यावर काहीजणांनी सदाशिवरावाना तुम्ही भुते पाहिली आहेत का असा सरळसरळ प्रश्न विचारला .

त्यावर सदाशिवराव म्हणाले मला प्रत्यक्ष आलेले अनुभव मी तुम्हाला सांगतो त्यावर तुम्ही भुते आहेत की नाहीत ते स्वतःच ठरवा . सदाशिवराव गोष्ट सांगत आहेत असे म्हटल्याबरोबर सर्वजण त्यांच्या सभोवती कोंडाळे करून बसले .सदाशिवरावांनी खाकरून एकदा सर्वांकडे बघितले व बोलण्याला सुरुवात केली .

मी दोन हजार दहामध्ये सदाशिवनगर येथे इंजिनिअर म्हणून एका प्रकल्पावर काम करीत होतो .आम्हाला कंपनीने राहण्यासाठी बंगले दिले होते .मला एक स्वतंत्र बंगला मिळाला होता.त्या बंगल्यात मी व माझी पत्नी दोघेच राहत होतो .तुम्हाला माहीतच आहे की माझा मुलगा इथे नोकरी करतो आणि मुलगी व जावई दिल्लीला असतात.ऑक्टोबर मे या महिन्यात  मुलांना सुट्या असल्यामुळे नातवंडे किंवा काही नातेवाईक मंडळी आमच्याकडे येत असत .आम्हाला सहा महिने त्या बंगल्यात काहीही नेहमीपेक्षा वेगळी गोष्ट ,असामान्य गोष्ट ,आढळली नव्हती .

माझी पत्नी काही दिवस मुलीकडे दिल्लीला गेली होती .मी बंगल्यात एकटाच राहात होतो.कंपनीच्या कॅन्टीनमधील जेवण मला मानवत नसे त्यामुळे मी स्वतंत्र आचारी ठेवला होता .सकाळ सध्याकाळ येऊन तो माझे जेवण करून जात असे.

एके दिवशी रात्री मी झोपलो असताना कसा कोण जाणे परंतु जागा झालो .माझ्या खोलीत दोन आकृती उभ्या राहून काहीतरी गप्पा मारताना ऐकू येत होत्या.त्यांची चर्चा  गॅस बदल चालली होती.

त्यातील एक जण म्हणत होता याला उठविलाच पाहिजे .

दुसऱ्याने विचारले कां? 

पहिला : याचा गॅस सुटा राहिला आहे जर याने सकाळी उठल्यावर गॅस उघडा राहिल्याचे लक्षात न आल्यामुळे गॅस लायटर पेटविला  तर भडका उडेल. आग लागेल आणि हा त्यात जळून खाक होईल.

दुसरा : मग मेला तर मेला आपल्याला काय करायचे आहे ?

पहिला :असे कसे आपल्या जर लक्षात आले आहे तर आपली काही जबाबदारी आहे की नाही ?

दुसरा : आपली कसली जबाबदारी  याने रात्री झोपताना कॉफी करून घेतली. कॉफी उकळण्यासाठी गॅस दोन वर लहान करून ठेवला परंतु नंतर कॉफी गाळल्यावर त्याने गॅस बंद  केला नाही .केवढा बेजबाबदार आहे हा .

पहिला : होते केव्हातरी माणसाच्या हातून चूक म्हणून त्याला बेजबाबदार म्हणता येत नाही 

दुसरा :चूक ती चूक त्याने रात्री गॅस खालून बंद करायला हवा होता.त्याला त्याच्या हलगर्जीपणाबद्दल शिक्षा ही व्हायलाच पाहिजे .

पहिला :आपण एवढे याच्या बंगल्यात राहतो तेव्हा त्याला लक्षात आणून द्यायची आपली जबाबदारी आहेच.

दुसरा :आपण एवढ्या मोठ्या मोठ्याने येथे बोलत आहोत परंतु बघा हा कसा अजून झोपला आहे.

पहिला : लागते एखाद्याला गाढ झोप आपण त्याला उठवला पाहिजे .

दुसरा : मग काय करायचे ?

पहिला : हे असे करायचे 

काहीतरी जड वस्तू उचलून ती फरशीवर जोरात आपटल्याचा आवाज आला.बहुधा टेबलावरील पेपरवेट उचलून त्यांनी खाली जोरात आपटले असावे .नंतर खुर्ची फराफरा सरकविण्याचा आवाज आला .

मला स्वप्न पडत आहे असे पहिल्याादा वाटत होते.परंतु फरशीवर पेपरवेट आपटण्याचा आवाज, खुर्ची सरकविण्याचा आवाज, हा मी जागेपणीच ऐकत आहे याची मला खात्री पटली .माझ्या हितासाठी त्या दोन आकृतीना त्याला तुम्ही काहीही नाव द्या मला उठवायचे होते .परंतु मला हलवून ते उठवू शकत नव्हते .का कोण जाणे ते मला हाकही मारू शकत नव्हते . त्यांनाही त्यांच्या काही मर्यादा असाव्यात .

मोठ्या मोठ्याने आवाज करून मला उठविण्याचा त्यांचा प्रयत्न होता हे माझ्या लक्षात आले .माझे हित व्हावे असे त्यांना वाटत असले तरी  ते गॅस बंद करू शकत नव्हते. त्यांच्यामध्ये ते सामर्थ्य नव्हते .आत्तापर्यंत मी पूर्ण जागा झालो होतो .

*झोपताना मी कॉफी करून घेतली होती .*

*कॉफी गॅसवरच केली होती .कॉफी उकळावी म्हणून मी गॅस दोन वर केला होता .*

*या सगळ्या गोष्टी मला आठवल्या .मी ताडकन उठून सैपाकघरात गेलो.*

*अशा वेळी विजेचे बटण सुरू करायचे नसते हे मला आठवले .*

*जास्त गॅस जमला असल्यास स्पार्किंगमुळे भडका उडतो .*

(क्रमशः)

१/७/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel