(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे . कुठेही साम्य आढळणार नाहीच.यदाकदाचित  आढळल्यास तो योगायोग समजावा)

पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट आहे .सन एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये गोव्यातील मांडवी नदीच्या मुखापासून सुमारे दहा किलोमीटरवर होड्या गलबते जहाजे यांचे वारंवार अपघात होऊ लागले.एखाद्या खडकावर आपटल्याप्रमाणे या होड्या फुटत असत. समुद्रातील इतर होड्या काही जणांना वाचवीत असत तर काही जण मृत्युमुखी पडत . बर्म्युडा ट्रँगल प्रमाणे तर इथे काही नाही ना असे बरेचजण म्हणू लागले.वर्तमानपत्रातही अश्या प्रकारच्या बातम्या छापून आल्या . होड्या कां फुटतात याचे कारण बरेच दिवस कुणालाही कळत नव्हते. 

समुद्राच्या त्या भागात काहीतरी भुताटकी आहे.काहीतरी गूढ आहे.अश्या बातम्या प्रसृत होऊ लागल्या .काहींनी तर आपला शेजारचा देश आपले नुकसान व्हावे म्हणून या गोष्टी घडवून आणत आहे अश्याही बातम्या पसरविल्या .

थोड्याच  दिवसांत असे अपघात का होतात याचे कारण लक्षात आले.भूगर्भात काही ना काही हालचाल होतच असते.अशाच एका हालचालींमधून समुद्रात खोलवर असलेले एक टेकाड हळूहळू वर आले होते .आता ते सर्वसाधारण समुद्रपातळीच्या चार फूट  खाली होते.जी जहाजे मच्छीमारीसाठी बाहेर पडत किंवा इतर कारणाने खोलवर समुद्रात जात असत .त्याना तो खडक दिसत नसे आणि ती जहाजे त्यावर आपटत व फुटत.त्यामुळे प्राणहानी होत असे.ज्या जहाजांवर रडार सिस्टीम बसविलेली असे त्यांना ते खडक लक्षात येत.ते त्या खडकाला टाळून प्रवास करीत .परंतु लहान होड्या व छोटी जहाजे यावर ती सिस्टीम त्याकाळी नव्हती.अजूनही बर्‍याच होडय़ांवर ती सिस्टीम नाही . त्या बुडालेल्या बेटाचे क्षेत्रफळ सुमारे एक चौरस किलोमीटर एवढेच होते .

ज्या जागेला पूर्वी भुताटकीची जागा असे म्हणत असत त्याच जागेवर असलेल्या बेटाला आता भुताटकीचे बेट म्हणून म्हणण्याला सुरुवात झाली .

या खडकावर एखादा दीपस्तंभ उभा करावा असे सरकारच्या मनात आले .त्या दृष्टीने प्रयत्नांना सुरुवात झाली .दीपस्तंभ कुठे उभा करावा याची पहाणी करीत असताना  हा खडक अजून सुस्थिर झाला नाही असे लक्षात आले .त्याचा समुद्रसपाटीशी असलेला कोन त्याप्रमाणे त्याचा आकार व सरासरी समुद्रपातळीपासून असलेले अंतर बदलत होते .अश्या स्थितीत तिथे दीपस्तंभ उभारता येणे शक्य नाही.तो तिरका होईल.गुरुत्वाकर्षणामुळे कोसळेल असा अहवाल देण्यात आला . लहान मोठे अपघात होत होते . काही लोकांचे प्राण जात होते .दीपस्तंभ उभारता येण्याला अनुकूल परिस्थिती होईपर्यंत तिथे एखादे कायमस्वरूपी जहाज नांगर टाकून उभे करावे . त्यावर एक  दीपस्तंभ उभा करावा .तो दीपस्तंभ व जहाजावर लावलेले दिवे यांच्या पश्चिमेकडून किमान चार किलोमीटर अंतर ठेवून जहाजानी  जावे असे ठरविण्यात आले.जर या मार्गदर्शक जहाजाच्या पूर्वेकडून जायचे असेल तर जहाजापासून सुरक्षित अंतर ठेवून गेले तरी चालेल असेही जाहीर करण्यात आले .

समुद्रातून वर येणारा तो खडक साधारण एक चौरस किलोमीटर आकाराचा होता .ठरल्याप्रमाणे एक छोटेसे जहाज खडकाच्या पूर्वेला नांगर टाकून उभे करण्यात आले .हा जहाज दीपस्तंभ वाटाड्या उभा केल्यापासून जहाज फुटण्याचे प्रमाण बरेच कमी झाले . परंतु काही लहान मोठ्या होड्या व जहाजे  फुटतच होती.जहाज फुटून अपघातात सापडलेले त्यातून वाचलेले लोक त्यांचा अनुभव पुढील प्रमाणे सांगत .आम्ही समुद्रात तसे दूर होतो परंतु एकाएकी आमची होडी खडकाकडे खेचली जाऊ लागली.आणि होडी खडकावर जाऊन जोरात आपटली व तिच्या चिंधड्या झाल्या . होड्या खडकावर येऊन वारंवार आपटू लागल्या आणि प्राणहानी होऊ लागली.

कुणीतरी बातमी छापली  की या खडकावर भुताटकी आहे असे आम्ही म्हणत होतो ते आता सिद्ध झाले आहे .  ते महाभूत लहान होड्यांना खेचून घेते आणि त्याना आपटून फोडून टाकते .त्या अपघातातून वाचलेले काही लोक तर त्या महाभुताने आमच्या होडीला एखाद्या खेळण्यासारखे धरून उंच उचलले आणि कपडा खडकावर आपटावा त्याप्रमाणे आपटले असा आपला अनुभव सांगू लागले .हळूहळू खडक वर येत होता .तो इतका वर आला की आता तो ओहोटीच्या वेळी मोकळा पडत असे.आणि भरतीच्यावेळी पाण्याने झाकला जाई. सुमारे दहा वर्षांत त्याचे वर येणे थांबले होते .तो आता तिथे कायमचा  तसाच स्थिर राहील असे वाटू लागले होते.जे छोटेसे जहाज दीपस्तंभासारखे काम करीत होते त्यावरील खलाशांनाही भुताटकीचा अनुभव येऊ लागला.रात्रीच्या वेळी जेव्हा ओहोटी असे आणि खडक मोकळा पडे त्या वेळी खडकावरील पाणी दिवे लावल्याप्रमाणे चमकत असे . ते दिवे नृत्य करीत आहेत असे वाटे.त्याचप्रमाणे खडकावर काही धूसर तर काही स्पष्ट आकृत्या फिरताना दिसत.विशेषतः अमावस्या व पौर्णिमा या वेळी रात्री असे प्रकार जास्त होतं .एक दिवस तर त्या अनेक धूसर आकृतीपैकी एक आकृती दीपस्तंभ जहाजावर येऊन नाचू लागली .ज्यांनी ज्यांनी ती आकृती पाहिली त्यांचे धाबे दणाणले .काही जण तापाने आजारी पडले. तर काही जण बेशुद्ध झाले.जबरदस्त भुताटकीच्या अफवेमुळे त्या दीपस्तंभ जहाजावर काम करण्यासाठी खलाशी मिळत नाहीसे झाले.

वेळोवेळी लहान मोठी जहाजे व होड्या फुटल्यामुळे जी प्राणहानी झाली ते सर्व  आत्मे भूतयोनीत गेले आहेत आणि त्यांचे त्या खडकावर वास्तव्य आहे असे सर्वजण म्हणू लागले .

काही जणांनी भूत वगेरे सर्व झूट आहे असे म्हणून असे का होते त्याची शास्त्रीय कारणे शोधण्याचा प्रयत्न केला .      

ज्या होड्या लाकडापासून बनविलेल्या होत्या किंवा ज्यात लाकडांचे प्रमाण जास्त होते अश्या होड्या खडकापासून जरी थोड्या अंतरावर असल्या तरी त्या सुखरूप रहात. त्यांच्या प्रवासात अडथळा येत नसे .त्या खेचल्या जात नसत .परंतु ज्यात लोखंडाचे प्रमाण जास्त असे त्या होड्या खडकाकडे आकर्षिल्या जात आणि जोरात येउन  खडकांवर आपटत.हे सर्व लहान होड्यांच्या किंवा जहाजांच्या बाबतीत होत असे.मोठी गलबते जहाजे यांवर काहीही परिणाम होत नसे. संशोधनात ही गोष्ट लक्षात आल्यावर खडकांमध्ये मोठ्या प्रमाणात चुंबकत्व आहे आणि त्यामुळे लोखंडाच्या होड्या खेचल्या जातात असे मत मांडण्यात आले .काही शास्त्रज्ञ खडकावर जाऊन त्यावरील नमुना घेऊन आले आणि त्यांनी ते प्रयोगांती सिद्धही  केले .

खडकावरील कमीजास्त तीव्रतेने चमकणारे दिवे व नाचणाऱ्या आकृती याचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे देण्यात आले .बेटवजा खडक खडबडीत आहे .त्यामध्ये अनेक लहान मोठे खळगे आहेत .त्यामध्ये पाणी साठते .समुद्राच्या पाण्यात अशी काही द्रव्ये आहेत की ती रात्रीच्या वेळी  कमी जास्त चमकतात .ओहोटीच्या वेळी हे साचलेले पाणी त्या विशिष्ट द्रव्यामुळे चमकते व त्यामुळे दिव्यांचा नजारा दृष्टीस पडतो.दिवे नाचताना दिसले हा दृष्टीभ्रमाचा प्रकार आहे.

खडकावर ज्या नाचणाऱ्या आकृत्या दिसतात तोही दृष्टिभ्रमाचा प्रकार आहे.पाण्याची कमी जास्त प्रमाणात वाफ होत असते.त्या वाफेमुळे चमकणार्‍या जलकणांकडे जे दिव्यासारखे दिसतात त्यांच्याकडे  पाहताना आपल्याला मनुष्य आकृत्या नाचत आहेत असा भास होतो .

भूत नाही दृष्टिभ्रम आहे असे कितीही समजून सांगण्याचा शास्त्रज्ञानी प्रयत्न  केला तरी बेटावर भुताटकी आहे ही समज दूर होऊ शकली नाही .

हळू हळू भुताटकीच्या कथा फैलावत चालल्या.प्रत्येक जण स्वतःची त्यात काही भर घालून कथा खुलवून सांगू लागला .

कुणी जवळून जहाज जाताना एक स्त्री त्यांच्या जहाजावर आली . ती फार सुंदर होती.तिने सुंदर नृत्य केले .असे सांगू लागला .

तर एकाने जहाज दूरवरून जात असतानाही आम्हाला खडकावर एक उंच पुरुष आकृती दिसली बहुधा तो समंध असावा .अशी एक लोणकढी ठेवून दिली.

आणखी एकाने आम्हाला खडकावर एक कुणीतरी भव्य पुरुष बसलेला दिसला.त्याच्या शेजारी दरबारातील मानकरी बसलेले होते .समोर पसरलेल्या गालिच्यावर नृत्यांगना थिरकत नृत्य करीत होत्या .बहुधा  खडकाला धडकून एखादे राजाचे जहाज फुटले असावे .अशी एक  थाप ठेवून दिली .

खडकात असलेले चुंबकत्व वगैरे सर्व थापा आहेत .भुते जहाजाचा ताबा घेतात आणि ते खडकांवर आदळतात .त्यामुळे त्यांच्या संख्येत भर पडते .त्यांची ताकद वाढते इत्यादी गोष्टी खुलवून सांगितल्या जाऊ लागल्या .दर्यावर्दी लोकांमध्ये त्या बेटावरील भुतांचे अनुभव सांगण्यामध्ये अहमहिका लागली. 

एकंदरीत त्या खडकाची भुताटकीचा खडक किंवा भुताटकीचे बेट म्हणून नामकरण झाले .नकाशात ते बेट दाखविताना भुताटकीचे बेट असेच  नकाशा तयार करणारे छापणारे दाखवू लागले .

जर तुम्ही गुगलवर जावून भुताटकीचे बेट असे सर्च कराल तर तुम्हाला ते बेट गोव्यातील मांडवी नदीच्या मुखापासून सरळरेषेत पश्चिमेला दहा किलोमीटरवर एक ठिपका या स्वरूपात आढळेल .

विकिपीडियामध्ये जर तुम्ही वाचाल तर वर दिलेली सर्व माहिती तिथे तुम्हाला थोड्या फार फरकाने अशीच दिलेली आढळेल .त्याचबरोबर त्यावरती एक दीपस्तंभ आहे तो सर्वांना मार्गदर्शन करतो अशीही माहिती आढळेल. 

हा दीपस्तंभ एकोणिसशे पंचाएेशी साली उभारण्यात आला अशी माहिती दिलेली आढळेल .

हा दीपस्तंभ उभारताना आलेल्या अडचणी व त्यावर केलेली मात यासंबंधी मला लिहावेसे वाटते.भुताटकीचे बेट या नावाला अनुरूप अश्या अडचणी, असे प्रकार, या बेटावर त्या काळात घडले परंतु हार न मानता इंजिनिअर्सनी त्यावर दीपस्तंभ उभा केला.दीपस्तंभ उभारल्यावर त्याची देखभाल करताना अनेक अडचणीना तोंड द्यावे लागले त्या संबंधीही सुरस अफवा पसरविल्या गेल्या .तर काही गोष्टी अशा घडल्या की त्याचे स्पष्टीकरण देता येणे कुणालाही शक्य नव्हते 

(क्रमशः)

१२/९/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel