कशाला आम्हाला हा वाडा दिसला? उगीचच आम्ही येथे आश्रयाला आलो .आता पश्चाताप करून काही उपयोग नव्हता . सकाळशिवाय वाड्यातून बाहेर पडणे शक्य नव्हते. 

आम्ही मुकाट्याने त्या वयस्क गृहस्थाचे बोलणे ऐकू लागलो.

आम्हा सर्वांना अश्या  अवस्थेत बघून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल . कुठेही काहीही संकटाची छाया नसताना आम्ही सर्व, कुणी तरी आमच्यावर हल्ला करणार आहे, आणि आपल्याला त्याच्यापासून आपले संरक्षण करायचे आहे, अश्या  तयारीत बघून आश्चर्यचकित झाला असाल .कदाचित तुम्हाला आम्ही वेडसर वाटलो असू .कदाचित तुम्हीही घाबरले असाल . 

दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे .आम्ही या वाड्यात सर्वजण सुखासमाधानाने राहत होतो.गावापासून दूर रानात असे एकटे राहताना आम्हाला काहीही भीती वाटत नव्हती .आमची शेती व फळांची बाग इथे जवळ आहे .गावात लांब राहून तिथून येथे ये जा करण्यापेक्षा इथेच राहणे आमच्या वाडवडिलांनी पसंत केले आणि हा वाडा बांधला.मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे दहा वर्षांपूर्वी सर्व काही ठीक होते .

त्यावेळी ही माझी दोन मुले लहान होती .माझा लहान भाऊ आई वडील सर्वजण आम्ही येथे सुखासमाधानाने राहत होतो .आमच्या जमिनीला लागून आणखी एकाची जमीन आहे .हद्दीवरून आम्हा दोघांमध्ये थोडा वाद होता .परस्पर संमतीने तो सोडवावा असे मला वाटत होते .उगीच कोर्ट कचेरी करण्यात पैशाचा अपव्यय, वेळेचा अपव्यय ,असे आमचे मत होते .त्या दिवशी काही क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांचे व आमचे मी मी व तू तू झाले .

त्या दिवशी रात्री अकस्मात तो शेजारी आमच्या वाड्यावर आला .समायुक्तीने वाद सोडवावा म्हणून तो आला असेल असे आम्हाला वाटत होते .परंतु त्याचा इरादा काही वेगळाच होता .बोलता बोलता त्याने आमच्यावर हल्ला चढवला .आम्ही सावध होतो म्हणून बचावलो .त्या भाऊगर्दीमध्ये माझ्याकडून आमच्या शेजाऱ्याचा खून झाला .उगीच झंजट  नको म्हणून आम्ही त्याला आमच्या कुंपणाबाहेर खोल खड्डा खणून त्यात पुरून टाकले .

त्यानंतर दोन तीन वर्षातच माझ्या  आईवडिलांचा  मृत्यू झाला  .  माझा भाऊ व त्याची मंडळी घाबरून शहरात निघून गेली.आम्ही निश्चयाने येथेच राहिलो .शेजारी नाहींसा झाल्याबद्दलची बरीच चर्चा झाली .पोलीस चौकशीही झाली .काही महिन्यांनंतर तपास लागत नाही म्हणून फाईल बंद करण्यात आली .

आणि नंतर तो दिवस उजाडला .शेजाऱ्याच्या मृत्यूला बरोबर एक वर्ष झाले होते . रात्रीचे बारा वाजले होते .आम्ही सर्व गाढ झोपेत होतो.त्यावेळी आमचे हे दोन वाघ नव्हते .त्यावेळी त्याने त्याच्या कुत्र्यांकडे हात केला .दुसरे दोन वाघ होते .आमच्या कंपाउंडमध्ये ते मोकळे सोडलेले असत .त्या कुत्र्यांनी एकाएकी  हलकल्लोळ केला.आम्ही दचकून जागे झालो .कुत्रे भुंकत होते .रडत होते. विव्हळत होते.कोण आले ते बघण्यासाठी आमची बाहेर जाण्याची हिम्मत नव्हती .खिडकीतून बाहेर पाहण्याचा आम्ही प्रयत्न केला परंतु विजेरीच्या प्रकाशातही  काही दिसत नव्हते. थोड्या वेळाने सर्व काही शांत झाले.बाहेर भयाण स्मशान शांतता पसरली .ती शांतता आम्हाला असह्य झाली .ही मुले त्यावेळी लहान होती .दरवाजा उघडून बाहेर जाण्याची आमची हिम्मत नव्हती . आम्ही बाहेर गेलो नाही ते बरेच झाले.जर बाहेर जातो तर त्याच्या तडाख्यात सापडलो असतो .  थोड्याच वेळात एक भयानक आकृती खिडकीबाहेर दिसू लागली.तो चेहरा भयानक किळसवाणा होता .डोळे बाहेर आले होते.नाकाचा पत्ता नव्हता .दात पुढे आलेले होते .नख्या वाढलेल्या होत्या .जीभ कुत्र्यासारखी बाहेर लोंबत होती.ती भयानक आकृती वाड्याभोवती फेऱ्या मारीत होती.तिच्या वाढलेल्या नख्यानी दरवाज्यावर, खिडकीच्या काचेवर, ओरखडे काढत होती .ती आकृती मुठीनी दरवाजावर, खिडकीच्या  काचेवर, ठोकत होती.त्या आकृतीला आत यायचे होते .जराशी फट मिळती तर ती आत आली असती.त्या आकृतीला आम्हाला ठार मारायचे होते .माझ्या हातून ज्याचा खून झाला तो,तो होता.आम्ही जर बाहेर गेलो असतो तर त्याने आम्हाला कच्चा खावून टाकला असता .संपूर्ण रात्रभर तो वाड्याभवती फिरत होता .सूर्याच्या पहिल्या  किरणांबरोबर ती आकृती नाहीशी झाली.

सकाळी आम्ही बाहेर जाऊन पाहतो तो आमचे कुत्रे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते.त्या आकृतीने आपल्या नख्यानी त्या कुत्र्यांना फाडून त्यांचे कोथळे बाहेर काढले होते.

त्याच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही सहालाच आम्हाला घरात बंद करून घेतले .आजही कालचाच धिंगाणा सुरू झाला तर तो वाडा शेतीवाडी सोडून दूर निघून जायचे असे  आम्ही ठरविले होते .दुसऱ्या तिसऱ्या किंवा त्यापुढच्या कुठच्याही रात्री काहीही झाले नाही .आम्ही हळूहळू  ती गोष्ट विसरून गेलो.

त्या शेजार्‍याच्या मृत्यूला दोन वर्षें पुरी झाली. आणि पुन्हा त्या रात्री  तो उगवला आणि त्याने तोच  धिंगाणा केला.

पहिल्या वर्षी तो बरोबर रात्री बाराला त्याला गाडलेल्या  जागेवरून उठून आला .दर वर्षी हळूहळू त्याची ताकद वाढत जात होती.तो लवकर लवकर जागृत होऊ लागला होता .आम्ही संध्याकाळी सहालाच सर्व दरवाजे खिडक्या बंद करून घेतो .तो आंत आलाच तर त्याला मारण्यासाठी सशस्त्र असतो.

जर बरोबर वर्षाने तो दरवर्षी येतो तर तुम्ही या दिवशी बाहेर कुठेतरी कां जात नाही?मी विचारले .

आम्ही तसा विचार केला होता .आमच्या गुरुजीना आम्ही त्याबाबत विचारले. त्यांनी आम्हाला तसे करू नका म्हणून सांगितले.आम्ही बाहेर निघून गेल्यास तो संपूर्ण वाडय़ाचा ताबा घेईल असे त्यांचे सांगणे आहे.त्याने एकदा ताबा घेतला तर आम्हाला वाड्यात येता येणार नाही.त्यामुळे आम्ही कितीही भीती वाटली त्रास झाला तरी या दिवशी वाड्यात असतो .गुरुजींनी आम्हाला पुढे असेही सांगितले की जर तो आत आला तर तुम्ही त्याला ठार मारू शकाल .बाहेर जाऊन मात्र तुम्ही त्याला ठार मारू शकणार नाही .अर्थात तो अगोदरच मेलेला आहे परंतु तुम्ही त्याला असे माराल कि तो कायमचा तुमच्या जीवनातून दूर जाईल . बाहेर त्याची ताकद प्रचंड असते .तो तुम्हाला बाहेर बोलावीत असतो .तुम्ही कोणत्याही परिस्थितीत बाहेर जाऊ नका .

त्यामुळे आम्ही दरवर्षी या तिथीला बाहेर जात नाही .वाड्यातच स्वतःला बंदिस्त करून राहतो .दरवर्षी त्याची ताकद वाढत आहे असे आम्हाला वाटते .तो लवकर लवकर जागृत होऊ लागला आहे .एक दिवस म्हणजे एक रात्री, एक वर्षाने, केव्हातरी तो वाड्यात येईल .आम्ही त्याला कायमचा ठार मारू .त्याचा कायमचा बंदोबस्त होईल .या आशेवर आम्ही येथे राहात आहोत. त्याचे आमच्याशी वैर आहे .तुमच्याशी नाही .तो तुम्हाला काहीही करणार नाही .इथे अश्या  भीतीग्रस्त वातावरणात राहण्याऐवजी तुम्ही बाहेर जाऊ शकता . आम्ही दरवाजा पटकन उघडून तुम्हाला बाहेर काढू शकतो .त्याने तसे सांगितले तरी हे सर्व ऐकल्यावर आमची बाहेर जाण्याची हिंमत नव्हती.बाहेर जंगलात जंगली श्वापदांचीही भीती होती.रस्ता सापडणे तर शक्यच नव्हते .काय होईल ते होऊदे आम्ही सकाळपर्यंत तेथेच राहण्याचे ठरविले.

ती रात्र भयानक गेली . थोड्याच वेळात तो आपल्या थडग्यातून उठून बाहेर आला .वाडय़ाभोवती त्याच्या चकरा सुरू झाल्या .प्रत्यक्षात वर्णन केल्यापेक्षाही तो जास्त भयानक होता .खिडकीच्या काचेला नसलेले नाक लावून ,बाहेर आलेले डोळे वटारून, तो पाहात होता .दात विचकीत होता.नख्यांनी अंगावर शहारा येईल असे सातत्याने मोठे आवाज करीत होता. दरवाजांवर जोराजोराने थापा मारीत होता .हे सर्वच भीतीदायक अस्वस्थ करणारे होते .दोन्ही कुत्री जागच्या जागी अंगात आल्यासारखी उड्या मारीत होती .भुंकत होती.रडत होती. विव्हळत होती.त्यांच्या भुंकण्याचा आवाज वाड्यात शतपटीने घुमत होता .ती तरुण मुले तरवारी सातत्याने परजत होती .तो मध्यमवयीन गृहस्थ  मधूनमधून बंदुकीत गोळ्या आहेत ना हे तपासत होता .स्त्रिया थरथर कापत होत्या .घाबरून दोन्ही गुडघ्यांत डोके घालून बसल्या होत्या .

आम्हीही भीतीने कापत होतो .कुठून हा वाडा आम्हाला दिसला असे आम्हाला झाले होते .कुठून येथे येण्याची दुर्बुद्धी झाली यासाठी आम्ही मनातल्या मनात पश्चाताप करीत होतो .आता कशालाच कशाचा इलाज नव्हता.रात्रभर हा धिंगाणा चालला होता .

त्या गृहस्थाने सांगितलेली एकही गोष्ट आम्हाला पटली नव्हती.

उदाहरणार्थ वर्षांनेच तो जागृत कां होतो?दर अमावास्येला कां नाही ?दररोज कां नाही ?समजा तो आंत आलाच तर त्या वेगळ्या योनीतील  आत्म्याला हे कसे काय कायमचे ठार करणार?तो बाहेर फिरतो तर आत कां येऊ शकत नाही?हे सर्व विचार आम्हाला दुसऱ्या दिवशी त्या वाड्यातून बाहेर पडल्यावर हॉटेलवर येत असताना मनात आले.

त्या वाड्यात असताना आम्ही सुन्न झालो होतो .आम्हाला तहानभूक काहीही जाणीव होत नव्हती .कुत्र्यांचे भुंकणे,रडणे ओरडणे विव्हळणे ,त्याचे दरवाज्यावर खिडक्यांवर नख्यांनी ओरबाडणे,  सगळ्या आवाजाची आम्हाला दहशत बसली होती .आमची विचारशक्ती आम्हाला सोडून गेली होती .

शेवटी एकदाचे उजाडले .कुत्री भुंकण्याचे रडण्याचे थांबली .मोठ्या संकटातून सुटल्यासारखे सर्व जण जमिनीवर बसले .आम्हाला त्या वाड्यापासून शक्य तितक्या  लवकर दूर जायचे होते .वाड्याच्या मालकाची परवानगी घेऊन आम्ही बाहेर पडलो .बाहेर सर्व शांत व थंड होते .पक्षी निरनिराळे आवाज करीत होते .सूर्याची किरणे झाडीतून पडू लागली होती. जणू काही रात्री काहीही घडलेच नव्हते .आम्ही भरभर चालत येऊन आमची वाट पकडली .

*त्या अद्भुत वाड्याकडे एकदा नजर टाकावी म्हणून आम्ही मागे वळून पाहिले .तेथे काहीही नव्हते .सर्व जागा सपाट होती .स्त्रिया तरुण तो गृहस्थ कुत्री सर्व गायब होती.

*आम्ही डोळे चोळून त्या जागेकडे पुन्हा पाहिले .

*तिथे काहीही नव्हते .

*कसलाही मागमूस तिथे नव्हता .

*आम्ही रात्री जे पाहिले ते स्वप्न की सत्य अशा संभ्रमात आम्ही पडलो .*

* तरी बरे माझ्याबरोबर माझा मित्र होता. त्यानेही सर्व अनुभव घेतला होता.नाहीतर मी थापा मारीत आहे असे सर्वजण म्हणाले असते * 

* आम्ही हॉटेलवर आल्यावर याबाबत मॅनेजरकडे विचारणा केली.

* त्यांच्या म्हणण्यानुसार ती जागा भारित आहे .

* दर वर्षी या तिथीला हे नाटक तिथे घडते.आमच्यासारखा एखादा चुकलेला वाटसरू त्यामध्ये सापडतो. 

* काल ती तिथी होती ते त्याच्या लक्षात आले नाही .

* नाहीतर त्याने आम्हाला सावध केले असते .  

* तुमचा विश्वास मी जे सांगितले त्यावर बसत नसेल तर माझ्याबरोबर तुम्ही भीमाशंकरला या.त्या तिथीला संध्याकाळी आपण त्या मोकळ्या जागेवर जाऊ.

* सांजवेळी तुम्हाला तो वाडा दिसेल.

*  आत जाऊन तुम्हाला सर्व अनुभव घेता येईल याची मला खात्री आहे.

*  मी मात्र प्राण गेला तरी आत पुन्हा येणार नाही .

*  मग कधी जायचे भीमाशंकरला ?

(समाप्त)

१३/१०/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel