फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे .ज्यावेळी रेल्वे नव्हती .मोटारी तर नव्हत्याच नव्हत्या.रस्ते फारच थोडे व कच्चे होते .जहाजे शिडाची व  वल्हवण्याची होती .एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जलमार्ग बैलगाडी व बऱ्यापैकी रस्ता असल्यास घोडागाडी नाहीतर घोडा यांचा वापर केला जाई.अर्थात पायी,मेणा,डोली,पालखी,इत्यादी साधनांनी  प्रवास हा आणखी एक नेहमीच उपलब्ध असणारा पर्याय होताच .

राजा व त्याची शासकीय यंत्रणा ही तर नेहमी होतीच .राजाच्या ताब्यातील प्रदेश कमी किंवा जास्त असे.वतनदार, सरदार, मांडलिक राजा, महाराज/बादशहा ,अशी शासकीय शिडी असे.आपल्या गोष्टींसाठी शासकीय यंत्रणेची माहिती असणे काही विशेष गरजेचे नाही .

पूर्वी काय आणि हल्लीं काय ,आपल्या देशांत काय, आणि आणखी कुठल्या देशात काय, प्रामाणिक, अप्रमाणिक, चोर, दरोडेखोर,लबाड,असे सर्व प्रकारचे लोक नेहमी व सर्वत्र   असतातच .पूर्वी काय आणि हल्ली काय खजिना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याची गरज नेहमीच भासते.तो चोरीला जाण्याचा त्यावर दरोडा पडण्याचा संभवही नेहमीच असतो. त्या काळी पैसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवावयाचे असल्यास, अंतर कमी असल्यास पायी,  किंवा घोडेस्वार, याचा वापर केला जाई.कागदी चलन नव्हतेच केवळ सुवर्ण रौप्य ताम्र मुद्रा वापरल्या जात.त्याचे वजन भरपूर असे.

खजिना पुढीलप्रमाणे पाठविला जात असे. खजिन्याच्या आकाराप्रमाणे लहान किंवा मोठी मजबूत लोखंडी पेटी घेतली जाई.पैटीला अंगची व बाहेरची अनेक कुलुपे असत. त्या कुलपांच्या दोन दोन किल्ल्या असत. एक संच खजिना पाठवणार्‍याकडे असे व दुसरा संच खजिना घेणाऱ्याकडे असे. .कुलुपें लावून त्याला सील केले जाई .नंतर बरोबर रक्षक देऊन बग्गीतून ती पेटी पाठविली जाई.रस्ता नसल्यास वाहकांच्या खांद्यावरून ती पाठविली जाई.

तर असाच एक खजिना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात होता .कररूपाने गोळा केलेले पैसे एक सरदार प्रतापगडला राजाकडे पाठवीत होता. खजिना बग्गीतून  जात होता .सशस्त्र चार रक्षक खजिन्याच्या रक्षणासाठी होते .एक रक्षक खजिन्या बरोबर बग्गीत बसलेला होता .दुसरा बग्गी हाकत होता.दोन बाजूंनी दोन रक्षक  घोड्यावर होते.गाडीला चिकाचे पडदे लावलेले होते .कुणी तरी खानदानी स्त्री गाडीतून जात असावी असा एकूण माहोल होता . खजिना जात आहे असा  संशय येऊ नये अशी ही मुद्दाम केलेली व्यवस्था होती 

यापैकी दोन रक्षक रामसिंग व लक्ष्मण सिंग  प्रामाणिक होते .राजनिष्ठ होते.तर प्रतापसिंग व भवानीसिंग या दोघांच्या मनात काही निराळेच विचार चालले होते. दरोडेखोरांनी हल्ला केला .त्यांमध्ये आम्ही जखमी झालो .खजिन्याची पेटी दरोडेखोरांनी पळविली असा आभास निर्माण करावा, पैसे चौघांनी आपसात वाटून घ्यावेत आणि आपण सर्वानी मालामाल व्हावे ,असा त्या दोघांचा विचार होता .दुपारच्या वेळी जेवायला बसलेले असताना त्या दोघांनी आपला विचार रामसिंग व लक्ष्मणसिंग यांना बोलून दाखविला. हा विचार दोघांना पटला नाही .त्यावरून वादावादी झाली .बोलता बोलता तलवारी बाहेर निघाल्या .मनात काळेबेरे असलेल्या प्रतापसिंग व भवानीसिंग यांनी रामसिंग व लक्ष्मणसिंग  या प्रामाणिक असलेल्या दोघांचा शिरच्छेद  केला.

ती खजिन्याची पेटी जवळच असलेल्या कब्रस्तानात नेऊन खोलवर पुरली.त्या कब्रस्तानातच शिरच्छेद  झालेल्या दोघा प्रामाणिक रक्षकांचे शव पुरण्यात आले.आपल्यावर संशय घेतला जाईल याची दोघांनाही कल्पना होती .सर्व काही स्थिरस्थावर झाल्यावर दीर्घ काळाने कदाचित एक वर्षानेही आपण येथे येऊ शकू म्हणून त्यांनी खजिना व प्रेते पुरताना पुरेपूर काळजी घेतली होती.

कब्रस्तान मोठे होते त्यात प्रेते व खजिना कुठे पुरला आहे हे लक्षात राहणे आवश्यक होते.तेथे असलेले वृक्ष व कबरीवर लिहिलेला मजकूर इत्यादी गोष्टी लक्षात ठेवण्यात आल्या.   

प्रतापसिंग व भवानीसिंग या दोघाना हाणामारीमध्ये  काही जखमा झाल्या होत्या .कपडे मळले होते .दोघेही रक्तबंबाळ झाले होते.

बग्गी जोरात पळवीत दोघेही राजधानीला पोचले.तिथे राजदरबारात गेल्यावर त्यानी पुढीलप्रमाणे आपली जबानी दिली .रामसिंग व लक्ष्मण सिंग या दोघांनी आमच्यावर अकस्मात हल्ला केला .लढता लढता आम्ही बेशुद्ध झालो .आम्ही शुद्धीवर येऊन पाहातो तो ते दोघेही खजिना व घोडे घेऊन पसार झाले होते.आम्ही तुरंत बग्गी घेऊन येथे तुम्हाला सर्व काही सांगण्यासाठी आलो.

तुम्ही आम्हाला आज्ञा केली तर आम्ही त्यांचा शोध घेऊ आणि त्यांना काढण्या लावून आपल्यासमोर हजर करू .आमच्याबरोबर काही सैनिक मदतीला द्यावेत .राजाने त्यांना पूर्ण बरे होण्यासाठी आराम करावा म्हणून सांगितले.वैद्याला बोलवून त्यांच्या उपचाराची व्यवस्था केली .ज्या सरदाराकडून कररूपाने पैसे पाठविले जात होते त्याच्याकडे काय झाले त्याचा अहवाल पाठविला. राजाने ताज्या दमाची एक सैनिकांची तुकडी त्या दोघांचा रामसिंग व लक्ष्मणसिंग यांचा खजिन्यासह शोध घेण्यासाठी पाठविली .सरदारानेही खजिन्याचा शोध घेण्यासाठी, रामसिंग व लक्ष्मण सिंग यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केले

प्रधानाला या दोघांचा प्रतापसिंग व भवानीसिंग यांचा संशय आला.दोघेही काहीतरी बनवेगिरी करीत असावेत असा तो संशय होता .सैन्यात भरती करण्यापूर्वी या दोघांच्या पूर्वायुष्याची चौकशी करण्यात आली होती .त्या छाननीमध्ये दोघेही लबाडी करण्यात वाकबगार आहेत असा अहवाल होता .दोघेही शूर, धष्टपुष्ट, तलवारबाजीमध्ये वाकबगार, असल्यामुळे त्यांची सैन्यात भरती करण्यात आली होती .

*रामसिंग व लक्ष्मणसिंग या दोघांची हत्या झालेली असल्यामुळे व ते कब्रस्तानात पुरलेले  असल्यामुळे ते सापडणे शक्यच नव्हते .*

*त्यांचा शोध पंधरा दिवस घेऊनही  ते सापडले नाहीत तेव्हा शेवटी तो नाद सोडून देण्यात आला.*

*फक्त प्रत्येक गावात रामसिंग व लक्ष्मणसिंग यांची वर्णने सांगून ते फरार झालेले आहेत त्यांना पकडून चावडीवर हजर केल्यास पाचशे मोहरा बक्षीस म्हणून देण्यात येतील अशी दवंडी पिटण्यात आली .*

(क्रमशः)

३०/७/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel