(ही कथा व पात्रे काल्पनिक आहेत साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

सर्व काही रीतीप्रमाणे व्हावे एवढेच त्याच्या वडिलांचे म्हणणे होते.त्यात काहीच गैर नव्हते .

प्रतीकला माळरानावर बसून क्षितिजाकडे  पाहताना वरील सर्व गोष्टी आठवत होत्या.त्याची स्मरणमालिका पुढे चालू झाली .

महिन्यांपूर्वी ती दोघे नेहमीप्रमाणे माळरानावर एकत्र आली होती.तिचे वडील काय म्हणाले याबद्दल त्याला उत्सुकता होती .त्यांनी होकार दिला असणार याबद्दल त्याला पूर्ण खात्री होती .तरीही त्याला ते तिच्या तोंडून ऐकायचे होते .तिचा चेहरा प्रफुल्लित दिसायला हवा होता.परंतु तो उतरलेला दिसत होता.ती मूडमध्ये दिसत नव्हती .त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली .नेहमीच्या जागी येउन  बसल्यावर त्याने तिला त्याचे वडील काय म्हणाले ते सांगितले.त्याच्या वडिलांचा होकार ऐकून तिला आनंद व्हायला हवा होता.परंतु तिच्या चेहऱ्यावरील मळभ तसेच होते.त्याने प्रश्नार्थक मुद्रेने तिच्याकडे पाहिले .ती प्रथम घळाघळा रडू लागली.त्याने तिचा आवेग ओसरण्यापर्यंत वाट पाहिली. त्याने फक्त तिचा हात हातात घट्ट धरून ठेवला होता . सहानुभूती,प्रेम, धीर, विश्वास, आधार, सर्व काही ठीक होणार आहे अशी एक आंतरिक दृढ भावना, त्या स्पर्शात होती .शब्दात मांडता न येणारे परंतु हृदयाला जाणवणारे असे बरेच काही त्या स्पर्शामध्ये होते .आवेग ओसरल्यावर डोळे पुसून ती बोलू लागली .

त्या दिवशी वडिलांना सर्व हकीगत सांगावी त्यांची संमती घ्यावी म्हणून ती आनंदाने घरी गेली होती.परंतु तिच्यापुढे अनपेक्षित ताट वाढलेले होते .ती गेली तेव्हा घरातील वातावरण गंभीर होते .तिच्या लहान दोन बहिणी इवलेसे तोंड करून गप्प बसल्या होत्या.आईचा चेहराही गंभीर होता .या  उदासीनतेचे कारण तिला थोड्याच वेळात कळले.

ज्या कंपनीत तिचे वडील काम करीत होते ती कंपनी डबघाईला आल्यामुळे दुसऱ्या एका कंपनीने ती कंपनी टेकओव्हर केली होती.या नवीन कंपनीने काटकसरीच्या  योजनेखाली एक नवीन योजना राबविली होती.सीनियर मंडळीचे पगार जास्त असतात .जर त्यांना कामावरून कमी केले तर पैशाची बरीच बचत होण्यासारखी असते.एकत्रीकरणामुळेही  काही स्टाफ सरप्लस ठरतो. सिनियर मंडळींच्या हातात नारळ देण्यात आला होता .वडिलांची नोकरी गेली होती .या वयात त्यांना नवीन नोकरी मिळणे कठीण होते .मिळणाऱ्या प्रॉव्हिडंटफंड ग्रॅच्युइटी इत्यादींमध्ये त्यांचा गुजारा होणे अशक्य होते.दोन धाकट्या बहिणींचे शिक्षण, त्यांचे लग्न,कुटुंबाचा नेहमीचा खर्च भागविणे केवळ अशक्य होते .साधना हाच त्या कुटुंबाचा एकमेव आधार व आशा होती.अशा परिस्थितीत ती तिच्या लग्नाचा विचार करू शकत नव्हती .जर तिने तिच्या लग्नाबद्दल सर्व काही सांगितले असते तर तिच्या वडिलांनी तिला संमती दिली असती.परंतु उघड्या डोळ्यांनी कुटुंबाची होणारी दुर्दशा ती पाहणे शक्य नव्हते.अशा परिस्थितीत तिने एक कठोर निर्णय घेतला होता .बहिणींचे शिक्षण पूर्ण होऊन त्यांचे लग्न होत नाही तोपर्यंत आपण लग्न करायचे नाही .त्याचबरोबर वडिलांना दुसरीकडे कुठे तरी नोकरी लागून कुटुंबाला स्थैर्य आल्याशिवाय लग्न करायचे नाही .

हे सर्व ऐकून घेतल्यावर प्रतीक तिला म्हणाला होता .आम्हाला तुझ्या पैशाची काहीही गरज नाही .लग्न झाल्यावर पूर्वीप्रमाणेच तू आपला सर्व पगार वडिलांकडे देत जा .तू मुलगा असतीस तर तुझ्या जबाबदाऱ्या जशा पार पडल्या असत्यास तशाच त्या पार पाडत जा.

यावर ती म्हणाली होती तुझा प्रेमळ, उदार ,मोकळा,समंजस स्वभाव मला माहित आहे.परंतु लग्न झाल्यावर आपल्या जबाबदाऱ्या वाढत जातील .मी संसारात जास्त जास्त  गुरफटत जाईन.एकाच वेळी दोन दोन जबाबदाऱ्या पार पाडणे मला शक्य होणार नाही .माझ्या आईवडिलांनाही लग्नानंतर माझा पगार घेणे योग्य वाटणार नाही .ते स्वाभिमानी आहेत. ते परिस्थिती समजून घेणार नाहीत.त्यांच्यातील व आपल्यातील पिढीचे अंतर दूर होवू शकत नाही.मुलगा मुलगी कितीही समान,असे आपण म्हटले तरी समाज व आपणही मानसिकदृष्टय़ा त्याचा स्वीकार करू शकणार नाही .

तेव्हां तू मला विसरून जा .मी तुझ्या जीवनात आलेच नव्हते असे समज .दुसरी योग्य मुलगी पाहून तू लग्न कर .या परिस्थितीत अापण यापुढे भेटत राहणे योग्य होणार नाही. उद्यापासून आपण केवळ एका संस्थेतील एम्प्लॉई असू.मी तुझ्याबरोबर मोटारीतून येणार जाणार नाही .आपण एकत्र लंच घेणार नाही.जसे काही आपण एकमेकांना भेटलोच नाही असे आपण राहूया .लोकांना कदाचित आपला ब्रेकअप झाला असे वाटेल. त्यांना तसे खुशाल वाटू दे .

प्रतीकला तिचा निग्रही स्वभाव, तर्कशुद्ध पद्धतीने विचार करण्याची पद्धत, माहीत होती .तिला समजावण्यात काही अर्थ नाही हे तो जाणून होता .त्याने विचार करून तिच्यापुढे एक वेगळेच प्रपोजल ठेवले .बहुधा पुढच्या पाच वर्षात तू आपल्या बहिणींबद्दलच्या जबाबदारीतून मोकळी होशील .तुझ्या वडिलांना तोपर्यंत, बहुधा अगोदरच नोकरी लागलेली असेल .अशावेळी तू पुन्हा लग्नाचा विचार करू शकशील .

मी तुझ्यासाठी वाट पाहीन.जेव्हा तुला तू आपल्या सर्व जबाबदारीतून मुक्त झालीस असे वाटेल तेव्हा माझ्याकडे ये.माझे बाहू तुझ्या स्वागताला सदैव तयार आहेत.माझ्या घराचा दरवाजा तुझ्यासाठी सदैव उघडा आहे .त्यावर ती काही बोलली नाही परंतु तिच्या चेहऱ्यावर बोलणे सोपे आहे परंतु वागणे कठीण आहे असे भाव स्पष्टपणे दिसत होते .तो तिची नसन् नस ओळखत होता .

महिन्यापूर्वी अशाप्रकारे त्यांनी एकमेकांचा निरोप घेतला होता .तिच्या निग्रही स्वभावानुसार ती आता बसने येत जात होती.त्याच्यासाठी डिश करून आणणे तिने अर्थातच थांबविले होते .तो वर्षाभरापूर्वीसारखा एकटाच कॅन्टीनमध्ये लंचला जात होता.तिने त्याच्याशी बोलणेही सोडले होते .त्यांचा बहुधा  ब्रेकअप झाला असे सर्व मित्र मैत्रिणी समजून चालत होते.त्यांना विचारल्यावर कुणीही काहीही बोलत नव्हते .

*पाच वर्षे किंवा त्याच्याहूनही जास्त काळ त्याला तिची वाट पाहायची होती .त्यानंतरही शेवट काय होईल याची त्याला कल्पना नव्हती.*

*तो  कितीही काळ वाट पाहण्यास तयार होता.*

*ती तर नक्की वाट पाहणारच होती.*

*ती त्याच्याबरोबर पूर्वीसारखी वागली असती तर त्याला आनंद झाला असता*

*परंतु तिचा निग्रही स्वभाव त्याला माहीत होता.*

* त्यांचे भविष्य  आता फक्त नियतीच्या हातात होते.*

*त्यांच्या दृढनिश्चयामुळे नियती त्यांना नक्कीच अनुकूल होणार यात शंका नव्हती*

*फक्त काही काळ त्यासाठी जावा लागणार होता.* 

(समाप्त)

७/६/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel