(ही कथा काल्पनिक आहे कुठेही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

~ मधुकर~

त्या दिवशी मी मॉलमध्ये काही खरेदीसाठी गेलो होतो .दूरवर एक मुलगी काही वस्तू ट्रॉलीमध्ये टाकीत होती .मला संशय आल्यामुळे मी पुढे गेलो .ती पाठीमागून हुबेहुब मधूप्रमाणे दिसत होती. एकदा तर मी तिला मधू म्हणून हाक मारणार होतो .एवढ्या तिने मागे वळून पाहिले . कसे कोण जाणे परंतु मी तिच्याकडे पाहात आहे हे तिला जाणवले होते .तिने वळून पाहिल्यावर ती मधू नाही हे माझ्या लक्षात आले .ती कितीतरी मधू सारखी दिसत होती.तीच मध्यम उंची तोच अटकर बांधा तोच गौर वर्ण तेच भावस्पर्शी डोळे.केसांचा वर्णही पिंगट काळा होता. मधूजचे केस दाट व लांबसडक होते तर हिने शोल्डर कट केलेला होता .जर मधूने शोल्डर कट केला असता तर ती अशीच दिसली असती .मधूचे गाल गोबरे होते, तर हिचे गाल किंचीत बसके होते. मधूचे नाक किंचित अपरे होते.हिचे नाक किंचित  लांब व शेंडा टोकदार होता .

त्यानंतर ती मला अनेकदा ठिकठिकाणी दिसली .दरवेळी मी तिच्याकडे ओळखीच्या नजरेने पाहतो हे तिच्या लक्षात आले होते .माझी कुणीतरी जिवलगा हुबेहूब तिच्या सारखी दिसत असावी हेही तिच्या लक्षात आले होते .हे सर्व मला कसे कळले तेवढे मात्र विचारू नका .अंतरीची खूण अंतरी उमटली असे काहीतरी असावे.

एक दिवस मी माझ्या मोटारीने फोर्टकडे जात असताना ती मला बस स्टॅंडवर दिसली.मी काही ठरविण्याच्या अगोदर माझ्या हातांनी गाडी स्टॅंडजवळ घेतली गेली.  ब्रेक मारले गेले .मी किंचित वाकून दरवाजा उघडला .ओळखीचे स्मित केले .तिला तुम्ही कुठे जाणार असे विचारले.तिने काय सांगितले ते माझ्या कानावर आले नाही परंतु चला मी तिकडेच जात आहे  असे शब्द माझ्या तोंडातून केव्हा गेले ते माझे मलाच कळले नाही .तिनेही ओळखीचे स्मित केले .खरेतर आम्ही ओळखीचे स्मित पूर्वीच करण्याला सुरुवात केली होती .जातांना मी तिला तिचे नाव विचारले.तिचे नाव माधवी होते . ती तिच्या मैत्रिणीकडे राहात होती .आम्ही बऱ्याच गप्पा मारल्या .शेवटी तिला जिथे जायचे होते तिथे मी तिला सोडले.

त्यानंतर काहींना काही कारणाने ठरवून आमच्या भेटी होत राहिल्या .ती माझ्याजवळ असताना का कोण जाणे पण मला माझी मधूच माझ्याजवळ आहे असे वाटत होते .आमचे संबंध जास्त जवळ येऊ लागल्यावर मला मी माझ्या मधूबरोबर  प्रतारणा तर करीत नाही ना असे वाटू लागले .ती मला आवडत होती .परंतु माझ्या हृदयातून मधू जाण्याला तयार नव्हती .ती जावी असेही मला वाटत नव्हते .

एक दिवशी मला एक अनोळखी फोन आला .माधवीची मैत्रीण सुहास हिचा तो फोन होता.तिला माझ्याशी काहीतरी महत्त्वाच्या गोष्टींवर बोलायचे आहे असे तिने सांगितले .

ठरल्याप्रमाणे एका रेस्टॉरंटमध्ये आमची भेट झाली .

~ सुहास~  

मी नुकतीच ऑस्ट्रेलियाहून आले होते . त्या दिवशी सहज मी काही कामानिमित्त ठाण्याला गेले होते .रस्त्यावरून एक जखमी मुलगी जाताना दिसली .तिच्या चेहऱ्याच्या एका बाजूला खूप मार लागला होता . रक्ताचे ओघळ सुकले होते.तिच्या चेहऱ्यावर संपूर्णपणे हरवल्याचे भाव होते .मी तिला तू कोण? तुला कुठे जायचे आहे? वगैरे विचारले.तिला काहीच उत्तर देता येत नव्हते .मी तिला प्रथम एका दवाखान्यात नेले .  तिच्यावर प्रथमोपचार केल्यावर मला तिची ओळख पटू लागली होती .मी पुण्याला शिकत असताना ती माझ्या वर्गात होती .आमची तशी विशेष दोस्ती कधीच नव्हती.फक्त ओळख होती .स्मरणाला ताण दिल्यावर तिथे नाव मला आठवले . ते मधू,मधुमती, माधवी, असे काही तरी होते.मी तिला तिचे नाव विचारले .तिला तिचे नाव आठवत नव्हते . तिची स्मृती पूर्णपणे गेली होती .कुणाही स्मृती हरवलेल्या सुंदर मुलीला मी कधीही  रस्त्यांवर तसेच सोडून दिले नसते .ही तर माझी एके काळची वर्गमैत्रिण होती .ती एखाद्या लहान बालकाप्रमाणे माझ्याबरोबर घरी आली . मी तिचे नाव माधवी ठेवले .तेही नाव तिला आवडले तिच्या चेहऱ्याची उजवी बाजू अपघातात मार पडल्यामुळे बरीच वेडी वाकडी झाली होती . माझ्या वडिलांनी खूप पैसा माझ्यासाठी मागे ठेवला होता .मी तिच्यावर प्लॅस्टिक सर्जरी करायचे ठरविले .दोन तीन सर्जरीनंतर तिचे रूप पहिल्यासारखे झाले असावे .तिचा फोटो नसल्यामुळे बरोबर तसेच रूप तिला सर्जनला देता आली नाही .मला एक मैत्रीण मिळाली होती.

आम्ही दिलखुलास गप्पा मारीत होतो.जसे काही आम्ही अनेक वर्षे एकमेकांजवळ राहत आहोत असे मला वाटू लागले होते.

आज ना उद्या तिला तिचा भूतकाळ आठवेल आणि ती आपल्या घरी जाईल असे मला वाटत होते .चार सहा महिने झाले तरी तसे काही चिन्ह दिसेना .मी माझ्या डॉक्टरांना कन्सल्ट केले .त्यांच्या म्हणण्यानुसार जर तिला तिच्या पूर्व आयुष्यातील काही व्यक्ती, दिसल्या भेटल्या त्यांनी तिच्याशी संबंध प्रस्थापित केले तर कदाचित पूर्वस्मृती येईल.एखादा प्रसंग एखादी घटना एखादी व्यक्ती एखादी जागा तिच्या पूर्व स्मृतीला जागवील.

हल्ली मधुकर नावाची कुणीतरी व्यक्ती तिच्या आयुष्यात आली आहे असे तिच्या बोलण्यात आले .तो तिला ओळखीचा वाटत आहे .परंतु कोण ?ते तिच्या लक्षात येत नाही.तो तिला वारंवार दिसत आहे .एके दिवशी तो तिला प्रत्यक्ष भेटला .त्यांच्या गप्पा झाल्या .तो तिला आवडला असे तिच्या बोलण्यातून समजले. त्यांच्या भेटी वारंवार होतात असेही मला समजले .कदाचित तो तिचे पूर्वायुष्य ओळखत असेल असे मला वाटले.म्हणून मी त्याला भेटून माधवी मला ठाण्याला मिळाल्यापासून घडलेल्या सर्व घटना सांगायचे ठरविले .त्याप्रमाणे त्याला फोन केला . आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये भेटण्याचे ठरविले .

~ मधुकर~

ठरल्याप्रमाणे सुहास रेस्टॉरंटमध्ये आली .माधवी भेटल्यापासूनची सर्व हकिगत तिने सांगितली.ठाण्याला रात्री नऊ वाजता स्टेशन बाहेरील रस्त्यावर जखमी अवस्थेत माधवी तिला पूर्णपणे स्मृती गेलेल्या अवस्थेत मिळाली होती . सुहासला माधवी भेटली तो दिवस ज्या दिवशी रेल्वेचा अपघात झाला तोच होता. सुहासची ती बालमैत्रीण निघाली.तिने तिला आपल्या घरी नेले .सर्व प्रकारच्या  वैद्यकीय सुविधा दिल्या.दोनतीनदा प्लॅस्टिक सर्जरी करून तिचा विकृत झालेला चेहरा ठाकठीक  केला .  वगैरे सर्व गोष्टी तिने सांगितल्या.

मी तिला तिच्या शाळेचे नाव विचारले .ती आमचीच शाळा होती.सुहास केव्हातरी माझ्या बाकावर माझी जोडीदार म्हणून आली होती.बोलता बोलता पूर्वीच्या आठवणी निघाल्या . त्या वेळचे  निरनिराळ्या विषयांचे शिक्षक त्यांच्या लकबी इत्यादीवर आम्ही भरपूर गप्पा मारल्या .ही सुहास चांगलेच गप्पिष्ट दिसत होती .श्रीमंतही होती.अविवाहितही होती. तिच्या मनात नक्की काय आहे ते मला कळेना . थोड्याच वेळात तिच्या बोलण्यातून तो उलगडा झाला .माधवीच्या पूर्वआयुष्यातील कुणीतरी तिला पाहिजे होते .त्यातून तिच्या स्मृती जागृत होण्याचा संभव होता .माधवी हीच मधू आहे याची खात्री पटत चालली होती .तिला तिच्या पूर्वायुष्यातील व्यक्ती भेटल्यानंतर तिच्या स्मृती जागृत होतील असे डॉक्टर म्हणाले होते .

मी तिला भेटलो होतो .मी तिला आवडत होतो .तीही मला आवडत होती .ती मधूच आहे अशी खात्री पटल्यानंतर तर मला तिला केव्हा भेटतो असे झाले होते.

तिच्या स्मृती जागृत करण्यासाठी आम्ही एक योजना आखली .मला हे मात्र कळत नव्हते की त्या दिवशी आम्ही शवागारात जी पाहिली आणि मधू म्हणून सर्वानी ओळखली ती कोण होती .बहुधा मधूशी साम्य असणारी  ती दुसरी कुणी तरी असावी.  

~माधवी~  

त्या दिवशी सुहास मला आपल्याला एका मित्राकडे जायचे आहे असे म्हणाली .तू तुझ्या मित्राकडे जा ,मी उगीच मध्ये कशाला असे मी तिला म्हणाले .त्यावर तिने तो आपला दोघांचाही मित्र आहे असे सांगितले .एवढेच नव्हे तर तो तुझा जास्त जवळचा मित्र आहे असे सांगितले .आम्ही सुमंगल सोसायटीमध्ये गेलो .सोसायटी एरियात शिरल्याबरोबर मला इथे मी केव्हातरी आलेली आहे असे वाटू लागले.सुहास माझ्याकडे निरखून पाहात होती .ती मुद्दामच मागे राहिली होती .मी सराईतासारखी बिल्डिंग नंबर पांचकडे चालत गेले.इथे मला सर्व ओळखीचे वाटत होते .मी सरळ लिफ्टकडे गेले.बिल्डिंगच्या दोन विभागाना दोन लिफ्ट होते.मी बरोबर ए विभागाच्या लिफ्टकडे गेले.इथेही मी बरोबर मजला नंबर पाचचे बटण दाबले.  पाचव्या मजल्यावर गेल्यावर मी ब्लॉक नंबर पाचशे सातच्या पुढे जावून उभी राहिले.हे सर्व कसे झाले ते माझे मलाच कळत नव्हते .मी बेल दाबली .कुणीही दरवाजा उघडला नाही .मी माझ्या पर्समध्ये हात घातला . तिथे ब्लॉकची किल्ली होती.सुहास माझ्या पाठोपाठ माझ्या बरोबर होती .विस्फारीत नजरेने ती माझ्याकडे पाहात होती .सराइतपणे  दरवाजा उघडून मी आत गेले.मी सरळ आमच्या बेडरूमकडे चालत गेले . वार्डरोब उघडून त्यात पाहिले .नंतर मी किचनमध्ये गेले.हॉल चार बेडरूम्स किचन गॅलरी सर्वत्र मी भिरभिर हिंडत होते.अकस्मात मला माझ्या स्मृती जागृत होत आहेत असे लक्षात आले .आतापर्यंत मी पुन्हा पुन्हा ताण देऊन मी कोण त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत होते . मला तो शोध लागत नव्हता.अकस्मात तो शोध मला लागला .कुणीतरी मला हलवून जागे करीत आहे असे मला वाटत होते .पुणे,माझे आईवडील, माझी धाकटी बहीण, तिचे ठरलेले लग्न, त्यासाठी मी पुण्याला जाण्यासाठी दादरला गाडीत बसले होते. मला सोडण्यासाठी मधुकर आला होता.  मी बाबांना निघाले असा मेसेजही केला होता .आणि केव्हातरी जोरात मी कशावर तरी आपटले आणि माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरला.मला सर्व सर्व काही आठवले .मी सुहासला आपल्याला लगेच पुण्याला गेले पाहिजे असे सांगितले .तिने का असे विचारता वासंतीचे लग्न आहे बरीच तयारी करायची आहे असे मी तिला म्हणाले.

मी तिला माझे नाव माधवी नाही तर मी मधू आहे असे सांगितले.माझे लग्न झाले आहे.हा माझा ब्लॉक आहे. मधुकर माझा नवरा, एवढ्यात ऑफिसमधून येईल असेही तिला म्हणाले .

एवढ्यात दरवाज्यावरची बेल वाजली.मी धावत जाऊन दरवाजा उघडला .

समोर मधुकर उभा होता. मी ज्याला आज दोन तीन महिने सतत निरनिराळ्या ठिकाणी भेटत होते. 

जो मला आवडत होता . ज्याला मी आवडत होते .

त्याचे कारण अकस्मात माझ्या लक्षात आले.

त्याने दरवाजा आपल्या मागे बंद केला .

*मधू मधू म्हणत आम्ही दोघेही एकमेकांच्या मिठीमध्ये केव्हा शिरलो ते आमच्या लक्षात आले नाही.*

*हॉलच्या दरवाज्यात टाळ्या वाजवीत सुहास उभी होती तिकडे आमचे लक्ष नव्हते *  

(समाप्त)

१८/११/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel