(ही गोष्ट काल्पनिक आहे कुठेही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
रोजच्या कटकटीला, रोजच्या भांडणांना, रोजच्या तू तू मी मीला सुधांशू कंटाळला होता.यावर उपाय काय ते त्यांच्या लक्षात येत नव्हते .आजही सकाळी दोघांचे तसेच कडाक्याचे भांडण झाले होते .रविवार होता. घराच्या साफसफाई वरून विषय निघाला होता.घर छान आहे. साफसफाईची गरज नाही.असे सुधांशूचे मत होते. तर साफसफाईची तातडी सुधाला जाणवत होती.
साफसफाई झाली नाहीच . दोघांचेही कडाक्याचे भांडण मात्र झाले .दोघेही बाहेर जेवायला रागारागातच गेले.दुपारी एकमेकांकडे पाठ करून झोपले .संध्याकाळी चहा झाल्यावर एक अक्षरही न बोलता सुधांशू रागारागात तसाच बाहेर पडला.
तो इथे येऊन कड्याच्या टोकावर बसला होता.असे दिवस किती काढायचे असा त्याच्यापुढे प्रश्न होता .रोजच्या भांडणाना तो कंटाळला होता. लग्नापूर्वी जे सर्व छान छान गोड गोड वाटले होते तेच आता कटू वाटत होते .घटस्फोट घटस्फोट असा आवाज त्याच्या डोक्यात येत होता .एकदा तर या कड्यावरून उडी मारून सर्व त्रास संपवावा असा अतिरेकी विचार त्याच्या मनात आला.
तिकडे सुधाच्याही डोक्यात तसेच अतिरेकी विचार घोळत होते .बॅग भरावी आणि सरळ माहेरी निघून जावे असे एकदा तिला वाटत होते . तिकडूनच घटस्फोटाची नोटीस पाठवून द्यावी असा एक आततायी विचारही तिच्या मनात येऊन गेला. एकदा तर अंगावर रॉकेल ओतून काडी लावावी एवढ्या टोकाला तिचे विचार गेले होते .
सुधाकर आपल्या डोक्यातील सर्व विचार दूर करण्याचा प्रयत्न करीत होता .असा आतताईपणा बरोबर नाही हे त्याला कुठेतरी जाणवत होते .
*मुळात आपण दुसऱ्याला जसा तो आहे तसा स्वीकारीत नाही इथेच सर्व गोंधळ निर्माण होतो.*
*आपण बरोबर व दुसरा चूक अशी आपली धारणा असते . दुसऱ्याला बदलण्याचा आपण आटोकाट प्रयत्न करीत असतो.*
*असा दृष्टिकोन असा प्रयत्न हीच मुख्य समस्या असते.*
सुधांशू विचारी होता. विचार करता करता त्याला आपली चूक लक्षात आली. आपण काय चांगले आहे त्याकडे लक्ष दिले पाहिजे .दोष शोधून काढण्याची प्रवृत्ती सोडून दिली पाहिजे .सुधाला बदलण्याचा प्रयत्न सोडून दिला पाहिजे .मीच हे का करायचे?तिने का नाही? असा दृष्टीकोन ठेवता कामा नये.
खरे प्रेम जे जसे आहे तसा त्याचा स्वीकार करते.असा स्वीकार व्यक्तीला समस्यामुक्त करतो .समस्या आपणच निर्माण केली आहे आणि ती आपणच समजातून सोडविली पाहिजे .अश्या प्रकारचे विचार सुधांशूंच्या मनात गर्दी करू लागले होते .
तो त्यांचे पूर्वीचे प्रेमाचे दिवस आठवत होता .त्यावेळी सगळे सोनेरी वाटत होते .सुधावर अपरंपार कुणीही केले नाही असे प्रेम आपण करतो असे त्याला वाटत होते.अजूनही अापण तसेच प्रेम करतो असा साक्षात्कार त्याला झाला.सुधामध्ये कितीतरी चांगले गुण आहेत . आपण नेहमी वाईट गोष्टींवरच,म्हणजे आपल्याला न पटणाऱ्या गोष्टींवर बोट ठेवीत आलो.हा दृष्टिकोन चुकीचा आहे .सुधाचा आपण ती जशी आहे तसा स्वीकार करायचा .आपल्या साच्यात तिला घालण्याचा प्रयत्न करायचा नाही .तिनेही तिच्या साच्यात मला घालण्याचा प्रयत्न करू नये यासाठी सुद्धा प्रयत्न करायचा नाही .सर्व समस्यांवर प्रेम हाच एक उतारा आहे .
अश्या प्रकारचे विचार करीत, डोळे मिटून, सुधांशू एखाद्या ध्यानस्थ योग्यासारखा बसला होता.
सुधांशू रागारागाने बाहेर निघून गेल्यावर सुधाही स्वतःशीच विचार करीत बसली होती.घटस्फोट आत्महत्या हा उपाय नव्हे .आपले सुधांशूवर अपरंपार प्रेम आहे.आपण त्याचा गुणदोषांसहित स्वीकार केला पाहिजे.तिलाही त्यांचे पूर्वीचे प्रेमाचे दिवस आठवत होते .दोघांनीही परस्परांवर केलेले अपरंपार प्रेम आठवत होते .एकमेकांना बदलण्याच्या नादात ते प्रेम विसरले गेले होते.चकचकीत भांड्यावर जसा एखाद्या मळाचा थर बसावा तसे झाले होते.सूर्यप्रकाश होताच तो कुठे गेला नव्हता.त्यावर फक्त अभ्रे आली होती.अभ्रे दूर झाली की प्रकाश आहेच.
सुधांशू रागारागाने कुठे निघून गेला असेल त्याची सुधाला कल्पना होती.तिच्या हृदयाने ते जाणले होते.तिने स्कूटर काढली . लग्नापूर्वी जिथे त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण घालवले होते तिथे ती आली.सुधांशू एखाद्या योग्यासारखा ध्यानस्थ बसला होता.त्याच्याकडे पाहिल्याबरोबर तो काय विचार करीत असेल ते सुधाला जाणवले.खर्या प्रेमातच असा मूक संवाद होऊ शकतो.
सुधांशू आपला आहे हे महत्त्वाचे आहे .आपले त्याच्यावर अपरिमित प्रेम आहे हे महत्त्वाचे आहे .तो कसा आहे ते महत्त्वाचे नाही .आता त्याच्याशी अजिबात भांडायचे नाही.त्याला बदलण्याचा प्रयत्न मुळीच करायचा नाही .अश्या विचाराने तिचे हृदय दाटून आले. त्याला आपल्या हृदयाशी घट्ट धरावा असे तिला वाटले.
त्याच्याकडे एकटक पाहात त्याने डोळे उघडण्याची ती वाट पाहत राहिली .
सुधांशूलाही साक्षात्कार झाल्यासारखे वाटत होते.
*आहे त्याचा जसे आहे तसा स्वीकार समस्यामुक्त करतो हा संदेश त्यांच्या विचलीत मनाला पूर्णपणे शांत करीत होता.*
त्याला सुधावरील प्रेम आठवत होते.आपण असे रागारागाने निघून आल्यावर तिचे काय झाले असेल हाच विचार त्याच्या मनात येत होता .
असेच उठावे घरी जावे आणि सुधाला हृदयाशी घट्ट धरावे अशी तीव्र उर्मी त्याच्या मनात आली .
तो डोळे उघडून पाहतो तो समोर त्याची प्रिय सुधा त्याच्याकडे टक लावून पाहात होती .तिचा त्याच्या अंतरंगाशी मूक संवाद चालू होता.मी सर्व जाणले असा भाव तिच्या चेहऱ्यावर व डोळ्यात दाटून आला होता .
सूर्य मावळतीला गेला होता .मगाशी दाटून आलेली अभ्रे दूर झाली होती . स्वच्छ सोनेरी शांत सूर्यप्रकाश पडला होता .
* मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून,आपण परस्परांचा जसा आहे तसा स्वीकार करायचा, अश्या भावनेने, प्रेमाने ,दोघेही एकमेकांच्या आलिंगनात सामावली होती.*
( समाप्त)