(ही गोष्ट काल्पनिक आहे कुठेही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
सुधांशु कड्याच्या टोकावर येऊन बसला होता .समोर अल्हादायक वनश्री होती .तो बसला होता त्या पठारावर सर्वत्र हिरवळ उगवली होती .हिरव्या मखमली गालिचावर बसल्यासारखे वाटत होते .ज्याचा तळ दिसत नाही अशी खोल विशाल दरी समोर पसरली होती . दरीच्या पलीकडे एकाहून एक उंच एकामागे एक डोंगरांच्या रांगा दिसत होत्या .डोंगरावर घनदाट वृक्षराजी पसरलेली होती . सूर्य मावळतीकडे जात होता.सुधांशूचे डोळे सर्व पहात असूनही कांही पहात नसल्यासारखे दिसत होते .आपल्याच विचारचक्रात तो गुरफटला होता .
त्याचे लग्न होऊन दोन वर्षे झाली होती .त्यांचा प्रेमविवाह होता .लग्नापूर्वी सुधाच्या सर्व गोष्टी त्याला आवडत असत.न आवडणाऱ्या गोष्टींकडे तो दुर्लक्ष करीत असे.तिचा धांदरटपणा, तिची वेळेकडे लक्ष न देण्याची खोड,तिची आळसामुळे व्यायामाकडे लक्ष न देण्याची प्रवृत्ती , सर्व काही त्याला माहीत होते.परंतू लग्नानंतर ती सुधारेल असे त्याला वाटत होते .खरं सांगायचं तर त्याने सुधाकडे या दृष्टीने पाहिलेच नव्हते.
तिचे त्याच्यावर उत्कट प्रेम होते. त्याचेही तिच्यावर उत्कट प्रेम होते.तिला त्याने पहिल्यांदा पाहिले तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडला होता .तिची बुद्धिमत्ता,तिचे भाषण चातुर्य,तिच्या आवाजातील गोडवा ,तिचे निर्मळ डोळे, तिचे मोहक हास्य,तिची मुलायम कांती, तिचे लांबसडक दाट काळेभोर केस,या सर्वांच्या प्रेमात तो पडला होता .
ती दिलेली वेळ पाळीत नाही ,नेहमी वाट पाहायला लावते,क्षुल्लक गोष्टीवरून आपलाच हेका चालवते ,साध्या साध्या गोष्टीवरून वाद घालीत बसते ,या सगळ्या गोष्टींकडे त्याने कळत नकळत दुर्लक्ष केले होते .
बर्याच वेळा प्रेमी जोडप्यांचे असे होते .अनेक गोष्टी लक्षात येत नाहीत .काही गोष्टी लक्षात येऊनही तिकडे दुर्लक्ष केले जाते.शारीरिक आकर्षणाचा,प्रेमाचा, विजय होतो .लग्नानंतर दुसरा सुधारेल अशी गोड अाशा असते.
लग्नापूर्वी प्रेमप्रकरण चालू असताना प्रत्येकातील बारीकसारीक दोष लक्षात येत नाहीत. सर्व गोड गोड असे चाललेले असते .नंतर तेच दोष मोठ्या स्वरूपात लक्षात येतात .केव्हा केव्हा लहान दोषही खूप मोठे वाटू लागतात .दोष ही एक गंभीर समस्या वाटू लागते .
अश्या प्रकारचे विस्कळीत इतस्ततः पसरलेले अनेक विचार सुधांशूंच्या मनात येत होते .लग्न झाल्यावर एक वर्ष केव्हा संपले कळले नाही .नंतर मात्र एकमेकांचे दोष हळूहळू कळू लागले.लहान सहान गोष्टीवरून खटके उडू लागले .
सुधांशूला पहाटे पाच वाजता जाग येई.नंतर त्याची धावपळ सुरू होई . चहा करणे, शौचमुखमार्जन,स्नान नंतर लगेच व्यायाम सुरू होई.कितीही शांतपणे आवाज न करता या गोष्टी केल्या तरीही काहीतरी आवाज होतच असे.किती आवाज करता ?तुम्हाला शांतपणे झोपून राहायला काय होते? आवाज केल्याशिवाय तुम्हाला काही करता येत नाही काय ?अशी नेहमी सुधाची तक्रार असे.सुधाला किमान सात व सामान्यत: आठ वाजेपर्यंत झोपून रहायची सवय होती. तिने आपल्यासारखे लवकर उठावे व्यायाम करावा, त्याने दीर्घकाळ प्रकृती चांगली राहील ,निरोगी जीवन जगता येईल, शरीरही स्लिम व ट्रिम राहील . असे सुधांशूचे आग्रहाचे सांगणे असे.आळसामुळे किंवा न पटल्यामुळे सुधा नेहमीच तिकडे दुर्लक्ष करीत असे.
सुधा रात्रीची जागते. सर्व कामे व्यवस्थित करते. इकडे तो सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत होता.तिचे उशीरापर्यंत झोपून राहणे त्याला खुपत होते.
सुधांशू वेळेच्या बाबतीत अत्यंत काटेकोर होता .दिलेली वेळ पाळली पाहिजे असा त्याचा आग्रह असे .तर थोडे बहुत मागे पुढे झाले तर काय हरकत आहे? घड्याळ आपल्यासाठी आहे की आपण घड्याळासाठी आहोत असा सुधाचा सवाल असे.
कोणताही विषय निघाला की आपलेच म्हणणे दुसऱ्याला पटवून देण्याचा सुधाचा एकांतिक आग्रह होता. थोड्याबहुत प्रमाणात प्रत्येकजण स्वतःच्या विचारांच्या बाबतीत आग्रही असतो. आपले विचार दुसऱ्याला पटवून देण्यासाठी तो नेहमी वाद घालीत असतो.आपण नेहमी बरोबर असे त्यांचे मत असते .सुधा याबाबतीत फार एकांतिक होती .दुसऱ्याचे बोलणे ऐकून घ्यायला ,त्याचा विचार लक्षात घ्यायला, ती अज्जिबात तयार नसे.
प्रत्येक बाबतीत बरोबरी करण्याची तिची प्रवृत्ती होती.मी तुझ्या इतकेच शिकलेली आहे .मीही नोकरी करते. मलाही तुझ्यापेक्षा थोडा जास्तच पगार आहे.स्त्री म्हणून मी नमते का घ्यावे?असा तिचा सवाल होता .
मीच स्वयंपाक का करायचा ?असा तिचा आणखी एक सवाल असे. अगदी बरोबरीचा निम्मे निम्मे नाही, तरीही तू मला मदत केली पाहिजे असे तिचे आग्रही मत होते.
सुधांशू थोडा गबाळा होता. कपडे हे शरीर झाकण्यासाठी आहेत एवढेच त्याचे मत होते .टिपटॉप राहिले पाहिजे असे त्याला कधी वाटलेच नाही .त्याला कलर सेन्सही मुळीच नव्हता. कोणत्याही पॅन्टवर कोणताही शर्ट त्याला चालत असे .तर त्याने व्यवस्थित राहिले पाहिजे. योग्य कलर कॉम्बिनेशन ठेविले पाहिजे असा सुधाचा आग्रह होता .
साध्या साध्या गोष्टी परंतु त्याला भांडणाचे स्वरूप येई.स्नान झाल्यावर टॉवेल दोरीवर वाळत घालावा किंवा धुण्यासाठी वॉशिंग मशिनमध्ये टाकावा असा सुधाचा आग्रह होता तर सुधांशू ओला टॉवेल गादीवर कसाही टाकीत असे.
काही खाल्ल्यानंतर ताटली हाताने चाटूनपुसून साफ करावी. जिभेने कुत्र्यासारखी चाटून नव्हे. असा तिचा आग्रह होता.
कोणतीही गोष्ट कुठेही टाकायची त्याची सवय होती.अव्यवस्थितपणाचा कळस होता .तर आपण व्यवस्थित असले पाहिजे असा सुधाचा आग्रह असे.
त्याचा विसरभोळेपणा, त्याची कोणतीच गोष्ट गंभीरपणे न घेण्याची प्रवृत्ती, त्याचा धांदरटपणा ,दिलेली वेळ पाळण्याबद्दलचा अवास्तव आग्रह,सतत मोबाइलमध्ये डोके घालून बसण्याची प्रवृत्ती ,त्याचे दांडगे मित्र वर्तुळ ,सतत मित्रात गुंतून पडण्याची प्रवृत्ती ,आपल्याच नादात असल्यामुळे दुसर्याच्या बोलण्याकडे होणारे दुर्लक्ष, त्याचा अव्यवस्थितपणा,या गोष्टी कमी जास्त प्रमाणात लक्षात येऊनही तिने त्याच्याकडे लग्नापूर्वी दुर्लक्ष केले होते .
आता मात्र साध्या साध्या गोष्टीवरून दोघांचे कडाक्याचे भांडण होत असे .
*दोघांचेही आवाज टिपेला जात असत .एकमेकांवरील राग बिचार्या भांड्यांवर काढला जाई.*
* याचा शेवट कशात होणार होता ते देवच जाणे *
(क्रमशः)
५/१२/२०१९©प्रभाकर पटवर्धन