गाडीला विशेष गर्दी नव्हती .गर्दीच्या प्रवाहाच्या उलट दिशेने तो प्रवास करीत होता. जरी बसायला जागा असली तरीही तो दरवाज्यात दांड्याला धरून उभा होता .डबा प्रथम श्रेणीचा होता, तरीही आत उकडत होते.दरवाज्यात दांडा पकडून वारा घेत उभ्याने प्रवास करणे त्याला आवडत असे.गाडी लोकल होती.किंचित काळ स्टेशनमध्ये थांबून तिने लगेच गती घेतली .एक मुलगी धावत धावत गाडी पकडण्याचा प्रयत्न करीत होती .तिला दांडा चटकन पकडून चढता यावे म्हणून तो दांडा सोडून किंचित मागे झाला.ती दांडा पकडून गाडीत उडी मारणार एवढ्यात तिची चप्पल खड्यावरून सरकली. तिचा अकस्मात तोल गेल्यामुळे ती प्लॅटफॉमवर तोंडावर आपटली असती किंवा कदाचित गाडी खाली आली असती .त्याने पटकन पुन्हा दांडा पकडून हात लांब केला व तिचा हात पकडून तिला गाडीत खेचून घेतले.हे सर्व प्रतिक्षिप्त क्रियेने त्याने इतक्या जलदीने केले होते की त्याचे त्यालाच आपण असे कसे करू शकलो याचेच आश्चर्य वाटत होते .ती इतकी घाबरली होती की तिने अनवधानाने त्याला घट्ट मिठी मारली .आपण काय केले हे लक्षात येताच ती त्याच्यापासून दूर झाली .
अशी त्याची व तिची पहिली भेट झाली. जरा स्थिरस्थावर झाल्यावर तिने त्याला थँक्यू म्हटले. त्यानेही यू अार वेलकम,असे उत्तर दिले.बोलता बोलता दोघानाही रोज दादरहून बोरीवलीला जायचे असते, अनेक वेळा याच गाडीने आपण प्रवास करीत असतो,असे त्यांच्या लक्षात आले. ती बँकेत होती तर तो कुठल्यातरी ऑफिसमध्ये काम करीत होता.आतापर्यंत कित्येक महिने किंवा कदाचित वर्ष दोन वर्ष त्यांनी एकाच वेळी एकाच गाडीने असाच प्रवास येताना जाताना केला असेल परंतु त्यांची ओळख झाली नव्हती .मुंबईच्या गर्दीत त्यांना परस्परांना कधी पाहिल्याचेही आठवत नव्हते .
त्याच्यामुळे तिचा जीव वाचला होता .त्यासाठी ती त्याची जन्मभर उतराई राहणार होती. एकमेकांशी बोलताना अजून आपण परस्परांना कसे पाहिले नाही असे त्यांना आश्चर्य वाटले .तेव्हापासून दोघेही जाताना व येताना एकाच गाडीतून व एकाच डब्यातून प्रवास करू लागले .स्टेशनवर आल्यावर शक्य असेल तर एक दुसऱ्यासाठी थांबू लागला .दोघांचेही स्वभाव जुळले .सुटीच्या दिवशीही दोघेही भेटू लागली .दादर चौपाटी किंवा शिवाजी पार्क ही त्यांची आवडती भेटण्याची ठिकाणे होती.अर्थात नेहमी भेट होत असेच असे नाही.तिला बऱ्याच वेळा काही ना काही काम असेआणि ती दादर चौपाटीवर येत नसे.
दोघांचेही प्रथम श्रेणीचे पास होते.कधी दरवाज्यात उभे राहून वारा घेत घेत तर कधी डब्यात आरामात बसून त्यांच्या गप्पा चालत .एकमेकांच्या घरची,नातेवाईकांची हळूहळू गप्पातून ओळख होत गेली. आपल्या आवडी निवडी समान आहेत .आपले स्वभाव जुळतात असा त्यांना साक्षात्कार झाला .तो ठरवून तिच्या घरी गेला .तिने तिचा मित्र येणार आहे म्हणून घरी सांगितले होते .तिच्या आई वडिलांनी त्याचे चांगले स्वागत केले.एक दिवस ठरवून तीही त्याच्या घरी गेली .त्यानेही घरी त्याची मैत्रीण येणार आहे म्हणून सांगितले होते.तिथेही तिचे स्वागत त्याच्या आईने मनापासून केले.वडील घरी नव्हते .त्याचे वडील घरी आल्यावर त्याच्या आईने मुलाची मैत्रीण भेटायला आल्याचे सांगितले .त्याच्या आईने त्याच्या वडिलांना अालेली मुलगी सून म्हणून पसंत आहे असेही सांगितले .तशीच गोष्ट तिच्याही घरी घडली .दोघांनीही जावयाला पसंत केले .मुलीने चांगला जावई निवडून आणल्याबद्दल दोघांनीही समाधान व्यक्त केले .
सुटीच्या दिवशी तिला भेटण्यासाठी तो आसुसलेला असे .त्याला तिला रोज भेटल्याशिवाय करमत नसे.तो तिला सिनेमाला चलण्याचा आग्रह करीत असे .ती कधी कधी त्याच्याबरोबर सिनेमाला येत असे .केव्हां केव्हां चौपाटीवर फिरायला येत असे.परंतु बऱ्याच वेळा तिला काही ना काही काम असे .आणि त्यांची भेट होत नसे . सुटीच्या दिवशी एवढे हिला कसले काम असते असा प्रश्न त्याला पडे.एकदा त्याने तिला तसे स्पष्ट विचारलेही .त्यावर हसून तिने तो प्रश्न टाळला . आपल्याला जसे काही ऐकायला आलेच नाही असे तिने दाखविले.
ती जशी होती तशी त्याला आवडली होती .ती सावळी होती .फार सुंदर नव्हती.बेताची उंची, मध्यम बांधा ,अशी तिची आकृती होती.कुणाला काय आवडावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.तिची त्वचा अतिशय स्मूथ होती.त्यामुळे ती होती त्यापेक्षा जास्त उजळ वाटत असे.तिचा आवाज अतिशय मधुर होता .स्वभाव लाघवी होता .ती गप्पिष्ट होती.या गोष्टी सहवासाने लक्षात येत .प्रथमदर्शनी ती दिसायला आकर्षकही नाही आणि अनाकर्षकही नाही अशी होती.
एवढे खरे की दिवसेंदिवस तो तिच्यात गुंतत चालला होता.तीही आपल्या गुंतत आहे असे त्याला वाटत होते .जवळजवळ दररोजच्या गाडीतील भेटी, गप्पा ,यामुळे दोघांच्याही कौटुंबिक पार्श्वभूमी परस्परांना माहीत झाल्या होत्या. त्यांची मैत्री सर्वांना माहीत झाली होती.ते दोघे काही दिवसांनी लग्न करणार असे सर्व समजून चालले होते .
ती त्याच्याकडे केवळ एक चांगला मित्र म्हणून पाहात होती .त्याच्याशी लग्न करावे या दृष्टीने ती त्याच्याकडे कधीही पहात नव्हती .तिच्या मोकळेपणाचा त्याने व इतरांनीही चुकीचा अर्थ घेतला होता .दोन स्त्री पुरुष एकत्र आले की तसेच नाते त्यांच्यात असले पाहिजे असे काही लोक समजू लागतात .आपल्या समाजात बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांची तशी कल्पना असते .
तिचे दुसऱ्याच एका मुलावर प्रेम होते.त्यानी लग्नाच्या आणाभाकाही घेतलेल्या होत्या .तो एक वर्षाच्या कोर्ससाठी परदेशी गेलेला होता. खरे म्हणजे तिने हे सर्व काही त्याला एवढ्या गप्पा मारल्या त्यात सांगून टाकायला हवे होते .म्हणजे त्याचा गैरसमज झाला नसता .त्याने त्या दृष्टीने तिच्याकडे पाहिले नसते .परंतु कां कोण जाणे परंतु ही गोष्ट तिने त्याच्याजवळ बोलणे टाळले होते . कदाचित तो आपल्याला दुरावेल असे तिला वाटले असावे .त्याची मैत्री तिला अनमोल होती .
तिच्या मैत्रीणींचे वर्तुळ फार मोठे होते .सुटी असताना ती त्यांच्याबरोबर असे.भिशी , खरेदी, सिनेमा ,भटकणे, हे सर्व मैत्रिणींबरोबर होत असे .
शेवटी एक दिवस त्याने तिला स्पष्टपणे विचारायचे ठरविले .तिला घेऊन तो हॉटेलमध्ये गेला .नंतर दोघेही चौपाटीवर फिरायला गेले.विषय कसा काढावा, आपले प्रेम कसे उघड करावे, हे त्याच्या लक्षात येत नव्हते .ती नेहमीप्रमाणेच मोकळेपणाने गप्पा मारीत होती .तो मात्र आज नेहमीसारखा मोकळेपणाने गप्पा मारीत नव्हता.ती गोष्ट तिच्या गावीच नव्हती.
शेवटी त्याने तो प्रश्न तिला विचारला .मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो तू माझ्याशी लग्न करशील का ?
प्रश्न ऐकून ती चमकली .ती त्याच्याकडे मित्र म्हणून पाहत होती. या दृष्टीने तिने त्याच्याकडे कधी पाहिलेच नव्हते .तो आपला तसा विचार करीत असेल असे तिला कधीही वाटले नव्हते .खरे म्हणजे ही गोष्ट तिच्या केव्हाच लक्षात यायला हवी होती.अश्या गोष्टी स्त्रियांच्या चटकन लक्षात येतात .परंतु ती आगळीवेगळी होती .तिच्या लक्षात ही गोष्ट आली नव्हती एवढे मात्र खरे.
कदाचित तिचा मित्र तिचा प्रियकर जो परदेशी गेला होता त्याची उणीव तिला भासत असावी.तिच्या नकळत ती उणीव तिने याच्या मार्फत भरून काढली असावी.मनोव्यापार गूढ असतात. अगम्य असतात.
ती त्याच्या प्रश्नावर गंभीर झाली .प्रथम तिने त्याची माफी मागितली. मी इतक्या गप्पा मारल्या परंतु हे तुला सांगायचे का कोण जाणे राहूनच गेले.तू माझ्याकडे त्या दृष्टीने पाहात असशील हे माझ्या केव्हाच लक्षात यायला पाहिजे होते .माझ्या मोकळेपणाचा तू कधीच गैरफायदा घेतला नाहीस .मी नेहमीच तुझ्याशी एक अंतर राखून वागत आले होते .तसाच तूही नेहमी वागत आलास.
तू भेटण्या अगोदर मला प्रतीक भेटला होता .आम्ही दोघेही एकाच शाळेत व नंतर एका कॉलेजात होतो. आमचे भावबंध केव्हा जुळले ते आमचे आम्हालाच कळले नाही.तो दुसऱ्या जातीचा आहे.एकमेकांचे आईवडील अश्या लग्नाला मान्यता देणार नाहीत याची आम्हाला कल्पना होती .त्यामुळे मी कधीही त्याला घरी घेऊन गेले नाही .तोही मला त्याच्या घरी कधीही घेऊन गेला नाही.आमच्या भेटीगाठी कॉलेजात किंवा दादरपासून दूर ठिकाणी त्याही चोरून मारून होत असत. तो परदेशातून शिक्षण पुरे करून आला की मगच आम्ही आपापल्या घरी सांगायचे ठरविले आहे.
मला तू आवडतोस.तुझी निखळ मैत्री अजूनही मला हवी आहे.तुझ्याकडे तश्या दृष्टीने मी कधी पाहिलेच नाही.आपली दोघांची जात एकच असल्यामुळे मी तुला माझ्या घरी मोकळेपणाने घेऊन गेले.मित्र म्हणून तुझी ओळख करून दिली .तसेच तूही मला तुझ्या घरी घेऊन गेलास. आपल्या दोघांच्याही घरचे आपल्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहात असणार हे माझ्या आता लक्षात येत आहे . सर्वच अशुद्ध आणि अवघड होऊन बसले आहे .
हे सर्व ऐकून त्याचा चेहरा कसनुसा झाला .तरीही आपल्या भावनांना बांध घालून, आवर घालून,त्याने तिचा नेहमीप्रमाणे निरोप घेतला.परंतु अंतर्यामी तो पार मोडून गेला होता.आपण उगीचच भलताच अर्थ काढला .उद्यासुद्धा नेहमीप्रमाणेच तिच्याशी मोकळेपणाने वागायचे असे त्याने मनाशी निश्चित केले.
विचारांच्या आवर्तात तो आपल्या घराकडे जात होता .तिला तिचे आयुष्य आहे .आपण तिच्यावर मनापासून प्रेम करतो .तिच्या सुखात आपले सुख असले पाहिजे . असले पाहिजे नव्हे तर आहेच.तिचा प्रियकर परदेशातून सु्खरूप परत येवो.त्यांच्या लग्नाला त्यांच्या घरातून संमती मिळू दे.कुठेही ताणतणाव न येता त्यांचे लग्न पार पडू दे.गरज पडल्यास आपण त्यांचे लग्न लावण्यासाठी लागेल ती मदत करू.आपल्याला जीवनात काहीही अर्थ वाटत नसला तरी हे बरोबर नाही .जीवन जगण्यासाठी आहे .आत्महत्या म्हणजे जीवनापासून पळण्यासारखे आहे.आपण पळपुटे नाही .धैर्य शौर्य मरण्यात नाही, तर जगण्यात आहे.प्रेमभंगामुळे आत्महत्या अश्या बातम्या जेव्हां जेव्हां आपण वाचत होतो तेव्हा आपण हसत होतो.हा पळपुटेपणा आहे असे म्हणत होतो.आणि आता तेच विचार आपल्या मनात कसे काय येऊ शकतात ?प्रेम म्हणजे सर्व काही नव्हे . प्रेमभंग म्हणजे शेवट नव्हे.जीवनात अजूनही खूप काही करण्यासारखे, मिळविण्यासारखे, आनंद घेण्यासारखे आहे.नकारात्मक विचार योग्य नाहीत,नेहमी सकारात्मक विचार केले पाहिजेत,केले पाहिजेत नव्हे तर ते आपोआपच आले पाहिजेत , असे आपण नेहमीच म्हणत आलो .मग आता हे मनात काय वादळ चालले आहे ?
उद्या तिला जसे काही झालेच नाही अश्या प्रकारे भेटले पाहिजे.तिला तिचे मन खात असेल .तिला आपल्याला भेटण्यामध्ये संकोच वाटत असेल.तो संकोच आपण दूर केला पाहिजे .आलेली अभ्रे दूर केली पाहिजेत .पुन्हा निखळ मैत्रीचा स्वच्छ सूर्यप्रकाश पडला पाहिजे.
अश्या विचारात गुंग होऊन भरकटल्यासारखा तो चालत होता.
त्याचे विचार भरकटले होते .तोही भरकटला होता.उलट सुलट नकारात्मक सकारात्मक असंख्य विचार त्याच्या मनात घोंघावत होते.
या विचारातच तो रस्ता क्रॉस करत होता .वस्तुतः पादचाऱ्यांसाठी सिग्नल पडलेला होता .वाहनांनी थांबणे अपेक्षित होते .परंतु एक मोटारसायकल वेडीवाकडी होत वेगात आली.बहुधा तिचा चालक प्यायलेला असावा .कदाचित काही तांत्रिक समस्येमुळे मोटारसायकल नियंत्रित होत नसावी .काय झाले माहीत नाही .त्याला पंधरा वीस फूट उंच उडवून ती मोटारसायकल निघून गेली. खाली पडताना रस्त्यावर त्याचे डोके एखाद्या नारळासारखे आपटले.
*तो आडवा झाला तो पुन्हा कधीही न उठण्यासाठी.*
* त्याचे विचारांचे सर्व मोहोळ आता संपले होते .*
२९/११/२०१९©प्रभाकर पटवर्धन