(ही गोष्ट काल्पनीक आहे कुठेही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा) 

वेळ रात्रीची होती .बस खाजगी ट्रॅव्हल कंपनीची होती.पुण्याहून  रत्नागिरीला कोल्हापूर मार्गे जात होती.बसमध्ये एका बाकावर साक्षी व अविनाश बसले होते .साक्षी कडेच्या खिडकीजवळच्या सीटवर बसली होती . ती आपल्या मैत्रिणीच्या लग्नाला चालली होती .अविनाशही  त्याच्या मित्राच्या लग्नाला चालला होता .अविनाश मुंबईला राहात असे .त्याचे आईवडील पुण्यात रहात होते.पुण्याला काही कामानिमित्त तो आला होता .त्यामुळे तो पुणे रत्नागिरी कोल्हापूर मार्गे बसने जात होता.नाहीतर तो मुंबई रत्नागिरी बसने गेला असता . अविनाशचा मुंबईला फोटो स्टुडिओ होता. अविनाश बीएससी पुण्याहून   झाला होता .फोटोग्राफीचा कोर्स त्याने मुंबईत केला नंतर तिथेच आपला स्टुडिओ सुरू केला.

तो सर्वसाधारण फोटो तर काढत असेच परंतु वैशिष्टय़पूर्ण फोटो काढण्यात त्याचा हातखंडा होता .त्याच्या फोटोतून अंगभूत सौंदर्याला उठाव मिळत असे. मॉडेल्स नट्या त्याच्याकडे फोटो काढण्यासाठी नेहमी येत असत.  ज्यांना सिनेमांमध्ये काम करायचे आहे अशा होतकरू मुलीही फोटोसेशनसाठी त्याच्याकडे येत असत . त्याचा धंदा जोरात चालला होता .त्याच्याकडे फोटो काढण्यासाठी अगोदर वेळ निश्चित करावी लागत असे.तो जाहिरातीचेही शूटिंग करीत असे .अविनाश दिसायला स्मार्ट देखणा होता .त्याची जाणीवही त्याला होती .एक नूर आदमी तर दस नूर कपडा ही म्हण त्याला पूर्णपणे माहिती होती. त्याचे कपडेही तसेच असत.त्याच्या व्यवसायाची एकाअर्थी ती गरजही होती.त्याच्या ग्राहकांवर छाप पाडण्यासाठी तसे राहणे त्याला आवश्यकच होते . त्याची चटकन् कुणावरही छाप पडत असे. 

साक्षी पुण्याची होती.ती एका इंग्लिश शाळेमध्ये शिक्षिका होती.मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली, शांत, सोज्वळ ,थोडीशी काकुबाई स्वरूपाची, बुद्धिमान, अशी ती होती .आपण बरे की आपले काम बरे असा तिचा स्वभाव होता .कुणाच्या अध्यात नाही मध्यात नाही असा तिचा थोडासा एकलकोंडा  स्वभाव होता.एसपी कॉलेजमध्ये तिने बीए केले होते .साक्षी दिसायला मध्यम स्वरूपाची होती .जर तिने आपल्याकडे जास्त लक्ष दिले असते तर ती चारचौघींत उठूनही दिसली असती .परंतु तिचा तो स्वभव नव्हता. 

तर जवळजवळ विरुद्ध स्वरूपाची व्यक्तिमत्त्वे असलेली व व्यवसाय असलेली ही दोघे  एकाच सीटवरून रत्नागिरीला जात होती . अविनाशने साक्षीजवळ  बोलण्याचा प्रयत्न केला .तिच्याकडून विशेष प्रतिसाद नाही असे म्हटल्यावर तो गप्प बसला .

समोर कुठचा तरी सिनेमा लागला होता .तो पाहण्यात दोघांनाही रस नव्हता .थोड्याच वेळात दोघेही निद्राधीन झाली.कोल्हापूरला गाडी थोडा वेळ थांबली होती .गाडी थांबल्यावर दोघांनाही जाग आली .दोघेही बाहेर जावून थोडे पाय मोकळे करून आली.एवढ्यात चहावाला चहा चहा करीत गाडीजवळ आला.अविनाशने साक्षीला न विचारता दोन चहा सांगितला .चहावाल्याने एक कप अविनाशला तर दुसरा साक्षीला दिला . साक्षी प्रथम नको नको म्हणाली त्यावर अविनाश म्हणाला घ्या हो कुणी पाहत नाही .त्याच्या बोलण्यातील सहजता तिला आवडली . मंदस्मित करीत साक्षीने न कुरकुरता कप घेतला .

चार पाच तास छान झोप झाल्यामुळे दोघेही थोडी तरतरीत झाली होती .आता व्हिडीओही बंद होता . बसचा एक वैशिष्टय़पूर्ण आवाज,अधिक एसीचा आवाज ,असा संमिश्र आवाज फक्त येत होता.पुढे काहीही न बोलता दोघेही आपापल्या जागेवर गप्प होती .बसच्या लयबद्ध गतीमध्ये त्यांना पुन्हा केव्हा झोप लागली ते कळले नाही.आता उजाडले होते .रत्नागिरी जवळ आली होती.दोघांनाही जाग आली .  साक्षी शिवाजीनगरला उतरली तिला आपल्या मैत्रिणीकडे जायचे होते. ती लग्न घरी न जाता तिच्या दुसऱ्या मैत्रिणीकडे जाणार होती .अविनाश तसाच बसबरोबर पुढे गेला .

बऱ्याच वेळा तरुण एखादी मुलगी बघितल्याबरोबर तिच्याशी काही ना काही संबंध जोडू पाहतात .काही लघळपणा करण्याचा प्रयत्न करतात. काही तिच्यावर इंप्रेशन मारण्याचा प्रयत्न करतात .काही शेजारी शेजारी सीट आली तर आपण त्या गावचेच नाही असे दर्शवित स्पर्श सुख अनुभवण्याचा प्रयत्न करतात .स्त्रिया अश्या  तरुणांना लगेच बरोबर ओळखतात .अविनाशने तसा कुठलाही प्रयत्न केला नव्हता .स्पर्श झाला तर तो चोरण्याचा प्रयत्न केला नव्हता .मुद्दाम सहज झाला असे दर्शवित स्पर्श करण्याचाही प्रयत्न केला नव्हता .तुम्ही कुठे जाणार तुमचे नाव काय इत्यादी प्रश्नही विचारले नव्हते .सहज बोलण्याचा प्रयत्न केला होता परंतु तिची मर्जी नाही असे पाहिल्यावर तो सहज सोडूनही दिला होता.ज्यावेळी चहा मागितला त्यावेळी सहजरित्या दोन चहा सांगितला .त्यामध्येही एक प्रकारचा रुबाब व सहजता होती.

रॅकवरील बॅग काढताना तिला त्रास होत आहे असे पाहिल्यावर त्याने उठून सहज बॅग काढून तिच्या हातात दिली होती . बॅग घेऊन जाताना तिला त्रास होत आहे असे पाहिल्यावर अधिकारवाणीने बॅग हातात घेतली होती.तुम्ही खाली उतरा मी खिडकीतून बॅग देतो असे सांगितले होते.ती आज्ञाधारकपणे उतरून खिडकीजवळ आली होती.त्याने खिडकीतून बॅग तिच्या हातात दिली होती .तिला पुसटता बायही केला होता.

मैत्रिणीकडे जाताना या सर्व गोष्टी साक्षीच्या मनात घोळत होत्या .तिला त्या तरुणाची वर्तणूक सहज तशीच सभ्य वाटली होती.त्याच्या वर्तणुकीतील सहजता आणि आश्वासकता तिला कुठेतरी आत भावली होती.तिची मैत्रीण तिला वाटेत भेटली .दोघीही गप्पा मारीत तिच्या घराकडे निघाल्या .मैत्रिणीशी गप्पा मारताना, तिच्या घरी गेल्यावर तिच्या आई वडिलांजवळ बोलताना, आत कुठे तरी तो तरुण तिच्या मनात रेंगाळत होता .याचे तिचे तिलाच आश्चर्य वाटत होते.आजपर्यंत असे कधीच झाले नव्हते . त्याने आपले नाव विचारले नाही. आपणही त्याला त्याचे नाव विचारले नाही.तो पुण्याचाच आहे की आणखी कुठचा काही माहित नाही.तो रत्नागिरीचा तर नाही ?तो आपल्याला पुन्हा केव्हा भेटेल का ?त्या वेळी आपली प्रतिक्रिया काय असेल ? अश्या प्रकारच्या विचारात ती बुडाली होती.मैत्रीण तिला काहीतरी प्रश्न विचारीत होती आणि तिचे त्याकडे लक्षही नव्हते .मैत्रिणीने हलवून तिला विचारले तुझ्या मनात काय चालले आहे? तुझे लक्ष कुठे आहे?मी एकच प्रश्न तुला पुन्हा पुन्हा विचारत आहे आणि तू आपल्याच विचारात गुंतलेली दिसतेस . तुला काय झाले आहे ?या हलवून विचारलेल्या प्रश्नावर ती हास्य करीत म्हणाली अगं विशेष काही नाही .मी विचारात गुंतले होती खरी .बोल आता मी तुझीच आहे .यानंतर दोघांच्या निरनिराळ्या विषयांवर गप्पा सुरू झाल्या . 

लग्न तीन चार   दिवसांनी होते .ती रत्नागिरीला प्रथमच येत होती .रत्नागिरीत ते पाहण्यासारखे काय असणार परंतु तिला जे काही आहे ते पाहायचे होते .पावस स्वामी स्वरूपानंद, रत्नागिरीचा किल्ला, काळा समुद्र, पांढरा समुद्र,फिशरीज, इत्यादी पाहात असताना तिला तो तरुण कुठे दिसेल का? भेटेल का? असा विचार  तिच्या मनात नकळत डोकावत होता .

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मैत्रिणीने तिला थिबा पॉइंटवर नेले.सूर्य अस्ताला चालला होता .बाहेर कितीतरी खाण्यापिण्याच्या गाडय़ा लागल्या होत्या .स्थानिक व पर्यटक दोघांनीही गर्दी केली होती .तेथील बाग,खेळणी, लहान मुलांचा विभाग, उतारावर पायऱ्या पायर्‍यांची केलेली रचना,इत्यादीकडे लक्ष जाण्याऐवजी तिचे लक्ष समोरील नैसर्गिक व मानवनिर्मित सौंदर्याकडे लागले होते.

सूर्य हळूहळू अस्ताला जात होता .आकाशातील तुरळक ढगांवर सूर्य निरनिराळ्या रंगांची रांगोळी काढीत होता .तिकडे पाहावे की समोरून वाहणारी काजळी नदी, तिचे मोठे वळण,नदीच्या मध्यभागी निर्माण झालेले एक बेट ,तिचा समुद्राशी झालेला संगम ,थिबा पॉईंटच्या डोंगरांच्या उताराखाली नदीकाठी वसलेले राजीवडा गाव,(हा एक रत्नागिरीचाच भाग होता.) उजवीकडे दिसणारा रत्नागिरीचा किल्ला व  दीपस्तंभ ,समोर समुद्र ,भाट्ये गावाला  जोडणारा पूल,किंचित डावीकडे झाडीमध्ये लपलेले कोळंबे गाव,कुठे पाहावे आणि कुठे पाहू नये असे तिला झाले होते .एक प्रकारच्या सौंदर्यसमाधीमध्ये ती होती . तिची समाधी भंग व्हावी असे तिच्या मैत्रिणीलाही वाटत नव्हते .मैत्रिणीला हे रोजचेच दृश्य असले तरी तिला नवीन होते .

सूर्य हळूहळू अस्ताला जात होता .त्याची तीव्रता आता नाहीशी झाली होती .त्याच्याकडे सहजपणे पाहता येत होते .तरीही टक लावून पाहिले तर डोळ्यातून पाणी येत होते .सुदैवाने पश्चिमेला क्षितिजाजवळ ढग नव्हते. सूर्य दोन डोंगरांच्या बरोबर मध्ये असलेल्या समुद्रात उतरताना दिसत होता . सूर्य समुद्रात बुडताना दिसत होता .समुद्रात बुडताना क्षणोक्षणी त्याचा रंग व आकार बदलत होते .विस्तारीत नजरेने पापणी न हलविता साक्षी या सर्व नजार्‍याकडे मंत्रमुग्ध होऊन पाहत होती. 

हळू हळू रात्र होत होती .सर्वत्र दिवे लुकलुकू लागले होते .दीपस्तंभावरचा दिवा फिरताना क्षणभर दिसत होता व नंतर प्रकाश लुप्त होत होता. अशी त्याची आवर्तने चालली होती .समोरच्या भाट्ये गावाच्या डोंगरावर मोटारी घाटातून चढउतार करीत असताना त्यांचे दिवे लुकलुकत होते .डोंगरावर हॉटेलचे दिवे झगमगता प्रकाश सोडीत होते.

सूर्य केव्हाच अस्ताला गेला होता .हळूहळू समोरील दृश्य काळोखात बुडत चालले होते .फक्त दिवे लुकलुकताना दिसत होते .साक्षी सृष्टीसौंदर्याची भोक्ती होती .त्यामुळे ती त्या सौंदर्यात पूर्णपणे डुबून गेली होती.तिची मैत्रीणही तिच्याशी काहीही न बोलता तिचा समाधी भंग होणार नाही हे पाहत होती .नेहमीचे असले तरी ती त्या दृश्यांचा आस्वाद नवीनपणे घेत होती. त्याचबरोबर साक्षीचाही समाधीमग्न चेहरा निरखीत होती.सूर्य मावळतीला जात होता तेव्हा मावळतीच्या सूर्यकिरणांनी तिचा चेहरा  सोनेरी सूर्यकिरणांनी न्हावून निघाला होता.

अविनाशही याच वेळी बरोबर थिबा पॉइंटला आला होता .अकस्मात त्याचे लक्ष साक्षीकडे गेले होते.साक्षीचा समाधिस्त चेहरा त्याला खूपच भावून गेला.  त्याच्या गळ्यात उंची कॅमेरा होताच.निरनिराळ्या कोनातून या सर्व नैसर्गिक सौंदर्याचे फोटो घेण्याचे त्याचे काम चालूच होते .त्याचबरोबर तो साक्षीचाही निरनिराळ्या अँगलमधून व सूर्य अस्ताला जात असताना फोटो घेत होता .निदान आठ दहा तसे सुरेख फोटो त्याने घेतले असावेत .जर शक्य झाले तर तिला ते फोटो सप्रेम भेट द्यावेत असा विचार त्याच्या मनात होता.

थोड्याच वेळात साक्षी तिच्या सौंदर्यसमाधीतून भानावर आली .मैत्रिणीजवळ तिच्या गप्पा सुरू झाल्या.रत्नागिरीला खडकाळ प्रदेशात सौंदर्याचा एवढा खजिना असेल असे मला वाटले नव्हते. असे ती मैत्रिणीजवळ म्हणाली .

साक्षीला अविनाश दूरवरून न्यहाळीत होता.झूम लेन्समधून त्याचे फोटो काढणे चालू होते.तो साक्षीचे फोटो काढीत आहे असे  सामान्य मनुष्याच्या लक्षात येणे शक्य नव्हते .फोटोग्राफरच  कदाचित ते ओळखू शकला असता.पुढे जावून तिला हाय हॅलो करावे, ओळख द्यावी, असे एकदा त्याच्या मनात आले.परंतु तिची प्रतिक्रिया काय असेल याचा अंदाज त्याला येत नव्हता .

*जर दैवात असेल तर ती पुन्हा भेटेलच असा विचार करून तो आपल्या मित्राबरोबर परतला.*

*तू त्या मुलीचे अनेक फोटो काढलेस. ती तुझ्या डोळ्यात भरली वाटते,असे त्याचा मित्र परत जाताना त्याला म्हणाला.*

*त्यावर मंद स्मित करीत त्याने होकारार्थी मान हलविली.*

*त्यावर त्याचा मित्र पुन्हा त्याला म्हणाला छायाचित्रकाराची दृष्टी, की आणखी कुठली दृष्टी !*

*त्यावरही त्याने काहीही अर्थ व्हावा असे एक गूढ स्मित केले .*

(क्रमशः)

१६/१२/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel