(ही गोष्ट काल्पनीक आहे कुठेही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
आता मागे फिरायचे विवाह करीत नाही म्हणून सांगायचे ही गोष्ट कठीण होती.
काय करावे ते साक्षीला कळत नाहीसे झाले होते .
तिने स्वतः मुंबईला जाऊन पाहण्याचे ठरविले.
आत्तापर्यंत ती मुंबईला अविनाशला भेटण्यासाठी त्याच्या स्टुडिओवर अनेक वेळा गेली होती . अविनाश जसा पुण्याला येत असे तशीच ती अधून मधून मुंबईला जात असे .परंतु त्या भेटी पूर्वनियोजित होत्या. ती नेहमीच त्याला फोन करून, त्याला वेळ उपलब्ध आहे असे पाहून नंतर जात असे. आज ती अकस्मात भेट देणार होती.ती त्याच्या फोटो स्टुडिओवर गेली . तिला अविनाशच्या ऑफिसमधील लोकांनी अर्थातच ओळखले.तिला आत शूटिंग चालू आहे कुणालाही आत पाठवू नका असा साहेबांचा हुकूम आहे .असे सांगण्यात आले .ऑफिसमधील मंडळी आपापसात हसत आहेत असा तिला भास झाला .त्यांच्या हसण्याचा तिने काही वेगळाच अर्थ काढला .बऱ्याच वेळा मनातील भावभावनानुसार दुसऱ्याच्या वर्तनाचे अर्थ काढले जातात.
जरा वेळाने आतून एक सुंदर मुलगी बाहेर आली .
नंतर तिला आत जा म्हणून सांगण्यात आले .ती आत गेल्यावर तिला अविनाश चमकला असे उगीचच वाटले.साक्षी अविनाशच्या चेहऱ्याकडे निरखून बघत होती .तिला त्याचा चेहरा पूर्णपणे नॉर्मल वाटला .तरीही तिला आपण या वेळेला यायला नको होते असे वाटले.त्याला कळविल्याशिवाय आपण आलो हे बरोबर केले नाही असे तिला कुठेतरी वाटत होते . तिच्या चेहऱ्यावर त्याला गोंधळ दिसला असावा .आज अशी कशी अकस्मात तू कळविल्याशिवाय मुंबईला आली असे त्याने विचारले .तिने सहज असे म्हणून वेळ मारून नेली.अर्थात सरप्राइज हे मला नेहमीच आवडते असेही तो पुढे म्हणाला .
तुला माझ्याबद्दल कुणीतरी काहीतरी सांगून कान भरलेले दिसतात.तू बहुधा खात्री करून घेण्यासाठी आली असावी असे मला वाटते असेही तो म्हणाला. त्याला तिचा चेहरा सहज वाचता येत होता.इतका तिचा चेहरा आरसपानी होता .हृदयाच्या तारा जुळलेल्या असतील तर एकाचा झंकार दुसऱ्याला सहज जाणवतो.
त्याने विषय बदलला आणि दोघेही फिरण्यासाठी बाहेर पडली.
तेव्हापासून तिच्या मनात सतत द्वंद्व चालले होते .तिचे एक मन जे ऐकले ते सर्व खोटे असे सांगत होते. तर दुसरे मन पिकल्याशिवाय विकत नाही काहीतरी तथ्य असलेच पाहिजे असे म्हणत होते.फोटोग्राफीचा धंदा, मॉडेल्सचे फोटो काढण्याचा धंदा,नट नट्यांचे फोटो काढण्याचा व्यवसाय, यामध्ये तरुण मुली स्त्रिया यांच्याशी सतत संबंध येणारच .त्यात काही वाह्यात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.अविनाश तसा नसेल परंतु जर कुणी त्याला मोहात पाडले तर तो मोहात पडणार नाही असे सांगता येत नाही .असा विचार आपल्याला लग्न झाल्यानंतर सतत खात राहील .
अशा वेळी विश्वासाचे काय ?अापण त्याच्यावर विश्वास ठेवू शकू काय? जर आपले मन विचलित होत असेल तर आपल्याला त्याच्याशी लग्न करण्याचा अधिकार आहे काय ?दोन व्यक्ती विवाहाने एकत्र येतात.त्यांचा परस्परांवर गाढ विश्वास असला पाहिजे .तसा नसेल तर काय उपयोग ?
त्या दिवसापासून साक्षीचा अविनाशकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.अविनाशच्या ती गोष्ट लक्षात आली .साक्षी पूर्वीसारखी राहिली नाही .तिचा आपल्यावर विश्वास नाही .तिचा तिच्यावर विश्वास नाही .ती संभ्रमित अवस्थेत आहे. तिचा हॅम्लेट झाला आहे. हे त्याने बरोबर ओळखले. त्याने तिला माझ्या व्यवसायात स्त्रियांशी संबंध येणारच वगैरे समजून सांगितले.आपण खंबीर असणे महत्त्वाचे .जे तिला अगोदरच समजले होते, माहीत होते ,कळले होते,जे ती तिच्या मनाला पटवत होती,आणि तिच्या एका मनाला पटत नव्हते ,तेच तो तिला सांगत होता.
एकीकडे अविनाशवरचे प्रेम व विश्वास तर दुसरीकडे त्याच्या बद्दलचा वाटणारा संशय याच्या कात्रीत तिचे मन सापडले होते .
तिचा तिच्या आईवर गाढ विश्वास होता .ती आपल्याला योग्य सल्ला देईल याची तिला खात्री होती .तिने आपल्या मनातील द्वंद्व तिला सांगितले.आई तिला म्हणाली अश्या गोष्टींमध्ये दुसऱ्याचा सल्ला उपयोगी पडत नाही.हा निर्णय ज्याचा त्यानेच घ्यायचा आहे .आपल्या हृदयाला काय वाटते ते महत्त्वाचे .त्याचे ऐकावे हे उत्तम .शेवटी तिने हृदयाचे ऐकण्याऐवजी डोक्याचे ऐकण्याचे ठरविले.
लग्न झाल्यावर आपल्या मनात सतत त्याच्याविषयी संशय राहील.अश्या परिस्थितीत संसार सुखाचा होणार नाही .आपण त्याच्याशी पूर्णपणे समरस होऊ शकणार नाही .तेव्हा शेवटी लग्न न केलेलेच बरे अशा निर्णयावर ती आली.
अक्षरश: काळजावर दगड ठेवून तिने आपला निर्णय त्याला कळविला.अापण त्याच्याशी प्रत्यक्ष बोलू शकणार नाही. आपल्याला रडू कोसळेल. शब्द तोंडातून बाहेर येणार नाहीत म्हणून तिने त्याला पत्राने मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही असे कळविले .
जर प्रेम असेल तर दुसऱ्याच्या मनातील भाव आपल्याला सहज कळतात.शब्दांची गरज भासत नाही .तिच्या मनाची होणारी घुसमट त्याला लगेच कळली .
त्याने तिला तुझ्या आंतरिक इच्छेप्रमाणे सर्व काही होईल. काळजी करू नकोस .मी तुझ्या शब्दाबाहेर नाही ,असे कळविले . साक्षीला त्याच्या पत्राचा अर्थच समजला नाही .तो आपली समजूत घालायला येईल अशी तिची कल्पना होती . त्याने तर ठीक आहे मी दुसरा विचार करीन असे अप्रत्यक्षरीत्या सुचविले.
अविनाश आपल्याला विसरणार . तो पुन्हा आपल्याला भेटणार नाही .मी त्याच्याशी लग्न करायला तयार नाही हीच माझी इच्छा प्रमाण मानून तो सर्व काही करणार .तिला काहीच उमजत नाहीसे झाले होते .आईचा सल्ला मानला असता तर बरे झाले असते असे तिला वाटू लागले होते .परंतू आता मागे फिरता येत नव्हते.
दोघांच्याही आई वडिलांनी मुलांना जसे वाटेल तसे वागू देत. करू देत.ती शहाणी आहेतच.योग्य निर्णय घेतील. आपण त्यांच्यावर कुठलाही निर्णय लादला असे होता कामा नये .असे ठरविले होते .आपण विचारल्यास सल्ला द्यावा, नाहीतर गप्प बसावे ,यासारखा योग्य उपाय नाही असे त्यांचे मत होते .
एक दिवस टपालाने अविनाशच्या लग्नाची पत्रिका आली .नेहमीच्या पत्रिके प्रमाणेच ती पत्रिका होती .लग्न पुण्याला होणार होते .खाली त्याच्या हस्ताक्षरात तिला आवर्जून बोलाविले होते .पत्रिका पाहिल्यानंतर ती पूर्णपणे कोसळून पडली .कुठे तरी तिला अविनाशशी आपले लग्न होणारच असा विश्वास वाटत होता. तो आता लयाला गेला होता.तिला आपले अविनाशवर किती प्रेम आहे ते लक्षात आले .त्याच्याशिवाय आयुष्य काढणे कठीण आहे हेही लक्षात आले .कुणाचे कुणाशिवाय शेवटी अडत नाही हेच खरे!आयुष्य जातच असते एका पद्धतीने जाण्याऐवजी ते दुसऱ्या पद्धतीने जाते एवढेच!अशी ती आपल्या मनाची समजूत करून घेत होती .
तिच्या डोक्यात घण घातल्या सारखे आवाज येत होते . लग्नाची तिथी जशी जवळ येत होती तसतशी तिची चलबिचल वाढत होती .तिची ती अवस्था तिच्या आई वडिलांना पाहावत नव्हती .शेवटी पुण्यात राहणे तिला असह्य झाले . ती सरळ रत्नागिरीला जाणाऱ्या बसमध्ये बसली .मैत्रीणीला मी येत आहे म्हणून तिने कळविले होते.ती तिची जिवाभावाची मैत्रीण होती . तिला सर्व काही माहीत होते .
तू माझ्या येथे आठ पंधरा दिवस, तुला वाटेल तितके दिवस रहा .हेही दिवस जातील असे सांगून तिने तिला आश्वस्त केले होते .
लग्नाच्या दिवशी ती फारच अस्वस्थ झाली .बाहेर जाते असे सांगून ती बाहेर पडली . तिची पावले तिला नकळत थिबा पॉइंटकडे नेत होती . एखादे वेळी भावनेच्या भरात ती काही कमी जास्त करील म्हणून तिची मैत्रीण तिच्या पाठोपाठ तिला कळू न देता जात होती.
ती मागे जेव्हा रत्नागिरीला आली होती त्या वेळी जिथे बसली होती तिथे जाऊन बसली .यावेळी तिची परिस्थिती वेगळी होती .समोरचे सौंदर्य ,समोर होणारी रंगांची उधळण, काहीही तिला दिसत नव्हते . तिने पर्समधून पत्रिका काढली.तिचे डोळे पाण्याने डबडबले होते .तिला समोरील काहीही दिसत नव्हते .ती सरळ कडय़ाच्या दिशेने चालू लागली .ती कड्यावरून पुढे पाऊल टाकणार एवढ्यात तिला मागून कुणीतरी ओढले .तिला तो स्पर्श ओळखीचा वाटला . ती पाहते तो तिला अविनाशने दोन्ही हातांनी मागे ओढले होते .आज तर लग्नतिथी या वेळी हा लग्न समारंभात त्याच्या होणाऱ्या पत्नीबरोबर असला पाहिजे .हा इथे कसा असा प्रश्न तिच्या मनात निर्माण झाला.
* तो तिचा प्रश्न तिने न उच्चारता ओळखून अविनाश म्हणाला , *
*अग वेडाबाई ती पत्रिका खोटी होती.*
*मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाबरोबर लग्न कसे करीन?*
*तुला कितीही समजावून सांगून तुला पटले नसते*
* तुझ्या मनातील द्वंद्व तसेच चालू राहिले असते*
*तुझी तुलाच ओळख पटवून देण्याचा हाच एक मार्ग होता*
(समाप्त)
१७/१२/२०१९©प्रभाकर पटवर्धन