(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
दिशा एमबीबीएस झाली आणि आई बाबांना अत्यानंद झाला. दिशा आई बाबांची एकुलती एक मुलगी होती.तिला दोन भाऊ होते .मुलगी एकच म्हणून एकुलती एक.तिचे वडील नेहमी म्हणत घरात कुणीतरी डॉक्टर पाहिजे.डॉक्टर घरात असला म्हणजे लहान सहान तक्रारीसाठी बाहेर कुठे जावे लागत नाही.जरी स्पेशालिस्टकडे जायची वेळ आली तरी आपल्याला प्रत्येक ठिकाणी अग्रक्रम मिळतो.तिचे दोन्ही भाऊ शिकले परंतु कुणीही डॉक्टर झाला नाही.एक सीए झाला तर दुसरा आर्किटेक झाला .
दिशाला अजून डिग्री मिळायची होती.तिची इंटर्नशिप पूर्ण झाल्यावर नंतर तिला डिग्री मिळाली असती. नंतरच ती प्रॅक्टिस करू शकली असती .तिला कार्यानुभवासाठी( इंटर्नशिप)जागा एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये मिळाली.
हे हॉस्पिटल नामांकीत होते . अनेक मजले, अनेक प्रकारच्या आयसीयू,अनेक ऑपरेशन थिएटर्स , असा सर्व पसारा होता.प्रत्येक मजल्यावर ओपीडी विभाग होता .लहान मुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत सर्व प्रकारचे पेशंट व विकार यांचा अनुभव तिला मिळणार होता .वर्षभराने जेव्हा ती या हॉस्पिटलमधून बाहेर पडली असती तेव्हा ती अनुभव संपन्न झाली असती .अॅक्सिडेंट विभाग व इमर्जन्सी विभाग स्वतंत्र होते.
या हॉस्पिटलमध्ये तिला इंटर्नशिप मिळाल्याबद्दल तिचे अनेकजणांनी अभिनंदन केले होते.तिचे पुस्तकी व प्रायोगिक ज्ञान अनुभवाने पक्के व्हायला मदत होणार होती.
या हॉस्पिटलची आणखी एक खासियत होती .येथे मनोरुग्ण विभागही होता .जे मनोरुग्ण आक्रमक असत,बेकाबू व्हायलंट होण्याचा संभव असे, किंवा बरे होण्याचा कधीही संभव नसे, असे रुग्ण मनोरुग्णालयात स्वाभाविकपणे पाठविले जात असत.येथील मनोरूग्ण विभागात कित्येक रुग्ण घरी पाठविले जात असत. उपचारांसाठी फक्त ते येथे येत असत.शांत परंतु ज्यांना हॉस्पिटलायझेशन आवश्यक आहे असे रुग्ण या विभागात अॅडमिट करून घेतले जात .फक्त चार खोल्या या विभागात होत्या .
दिशाने एमडी करायचे निश्चित केले होते.परंतु कोणत्या विषयात एमडी करावे ते अजून तिने ठरविले नव्हते.हॉस्पिटलच्या निरनिराळया मजल्यावर निरनिराळया विभागात ती जात होती .योजनेनुसार काही दिवस,कांही आठवडे त्या विभागात राहत होती .तिचे कार्यानुभव शिक्षण चालू होते .मनोचिकित्सेमध्ये तिला विशेष रुची होती.मनोव्यापार किती विस्तृत असतात, खोल असतात, आणि गूढही असतात, त्याचा तिने अभ्यास केला होता .मनोचिकित्सेसाठी मनोरुग्ण तिला विशेष पहायला मिळाले नव्हते .
एक दिवस तिची नेमणूक मनोरुग्ण विभागात झाली.ओपीडीमध्ये,त्याचप्रमाणे ज्यांना प्रत्यक्ष काही ना काही ट्रीटमेंट हॉस्पिटलमध्ये केली जात होती असे रुग्ण,त्याचप्रमाणे हॉस्पिटलाइझ केलेले रुग्ण तिला पाहायला मिळणार होते .ती जास्त अनुभव संपन्न होणार होती .
तिला रोग्याचे संमोहन कसे करतात,संमोहनामध्ये सूचना कशा देतात,रुग्णांशी संवाद कसा प्रस्थापित करतात,इत्यादी गोष्टी प्रत्यक्ष पाहण्याची उत्सुकता होती .ती उत्सुकता आता पूर्ण होणार होती .
कित्येक व्यक्ती मनोरुग्ण वाटत नाहीत, दिसत नाहीत,नेहमीच्या व्यवहारात त्या नॉर्मल वाटतात . परंतु एखादे चित्र, एखादी वस्तू,एखादा शब्द, एखादी व्यक्ती,त्यांचा समतोल नष्ट करते .ते त्यांचे स्वत:चे रहात नाहीत.त्यांचे रूपांतर दुसऱ्याच एका मनुष्यात होते वगैरे गोष्टी तिने पुस्तकात वाचल्या होत्या.असे असू शकेल यावर वाचताना कित्येक वेळा तिचा विश्वास बसत नसे.वाचलेल्या गोष्टींचा कदाचित तिला अनुभव येणार होता .
तिच्याबरोबर हॉस्पिटलचे मोठे डॉक्टर होते .ते तिला वैद्यकीय परिभाषेमध्ये निरनिराळया गोष्टी सांगत होते.फिरता फिरता ते एका खोलीमध्ये आले .येथे कॉटवर एक तरुण मनुष्य एखाद्या पुतळ्यासारखा बसून होता.त्याच्या चेहऱ्यावर जिवंतपणाचे कुठलेही लक्षण दिसत नव्हते.त्याच्या चेहऱ्याचे स्नायू हलत नव्हते .डोळे स्थिर होते. त्याची छाती खालीवर होत होती त्यावरून तो जिवंत असावा .त्याच्या जिवंतपणाचा हा एकमेव पुरावा होता .
डॉक्टर त्या खोलीत काहीच बोलले नाहीत .खोलीतून बाहेर पडल्यावर त्यांनी बोलायला सुरुवात केली .ते म्हणाले हा तरुण उच्चशिक्षित आहे .त्याला इंग्रजी उत्तम येते .हा चांगल्या पगाराच्या नोकरीवर होता .ऑफिसात हा प्रमुख होता.एका दुर्घटनेने त्याचे असे झाले आहे .त्याच्याशी तुम्ही कितीही बोला तुमचे बोलणे त्याच्या आतपर्यंत बहुधा जात असते. त्याला तुमच्या बोलण्याचा आशय समजतही असावा,असे मला माझ्या दीर्घानुभवावरून वाटते. तुम्ही काही करा त्याच्या चेहऱ्यावरील एकही रेषा हलत नाही.त्याला बोलता करण्याचा आम्ही कितीतरी प्रयत्न केला आहे .त्याला औषधे चालू आहेत .संमोहन प्रयोग करण्याचा आम्ही प्रयत्न केला .तो संमोहित होत नाही .तो अचल असतो.तो संमोहित होत नसल्यामुळे त्याला सूचना देणे शक्य होत नाही .आहे अशा स्थितीत आम्ही त्याला सूचना देऊन बघितल्या.विशेष उपयोग झाला नाही.त्याला भेटायला त्याचे वडील, भाऊ, बहिणी,मित्र, नातेवाईक येतात.त्याला बोलते करण्याचा त्यांच्या परीने प्रयत्न करतात .अजूनपर्यंत तरी काही उपयोग झाला नाही .
येथे येऊन त्याला एक महिना झाला .आणखी एखाद्या महिन्यात जर त्याच्यात काही फरक पडेल असे वाटले नाही तर त्याला आम्हाला नाईलाजाने मनोरुग्णालयात पाठवावे लागेल. तो भानावर येत असल्याच्या खुणा कुठे ना कुठे दिसल्या पाहिजेत .एक दोन इंच कां होईना,तो जर त्याच्या पूर्वीच्या जगाकडे वाटचाल करू लागला,असे आम्हाला दिसेल तर आमच्या तो बरे होण्याच्या आशा प्रज्वलित होतील .तुमचा मानशास्त्राचा अभ्यास दांडगा आहे असे माझ्या लक्षात आले आहे .ही आव्हानात्मक केस आहे असे मला वाटते .तुम्ही तुमचे सर्व कौशल्य व वैद्यकीय ज्ञान वापरून हा जर भानावर येऊ शकला,तर ते एक मोठे यश ठरेल.पुढचा महिनाभर तुम्ही या विभागात आहात.तुमच्या प्रयत्नांना यश येत आहे असे आढळले तर तुम्हाला या विभागात आणखी एखादा महिना आम्ही आनंदाने ठेवू.हा पूर्ण बरा होऊन त्याच्या कुटुंबात जावा असे आम्हाला वाटते. आमची अशी इच्छा व प्रयत्न सर्वच रुग्णांच्या बाबतीत असतात .हा रुग्ण जास्त आव्हानात्मक असल्यामुळे इथे आमच्या प्रयत्नांना यश यावे असे आम्हाला तीव्रतेने वाटते .
मोठ्या डॉक्टरांच्या अशा लांबलचक भाषणावर दिशाने त्यांना विचारले .हा पेशंट उच्च शिक्षित आहे,उच्च पदावर होता, उच्च घराण्यातील आहे,त्याचे कुटुंब आर्थिक दृष्ट्या संपन्न आहे,हा आव्हानात्मक आहे,हा बरा होऊन घरी जावा असे तुम्हाला वाटते, वगैरे गोष्टी तुम्ही मला सांगितल्या.परंतु याचे असे होण्याचे,असा नि:स्तब्ध पुतळा होण्याचे कारण काय ते तुम्ही सांगितले नाही .तुमच्या प्रदीर्घ भाषणामुळे मला उत्सुकता वाटत आहे .त्याला ट्रिटमेंट कशाप्रकारे द्यावी ते ठरविण्यासाठी सुद्धा मला तो असा पुतळा कां झाला त्या पार्श्वभूमीचा उपयोग होईल.किंबहुना ती पार्श्वभूमी माहीत असल्याशिवाय योग्य उपाययोजना करता येणार नाही .
हॉस्पिटलच्या डीननी, मोठ्या डॉक्टरांनी, त्या पेशंटबद्दल सांगण्यास सुरुवात केली .
मगाशी बोलताना मी महेशबद्दल ,त्या पेशंटचे नाव महेश, त्याच्याबद्दल बोलताना त्याचे वडील, भाऊ, बहिणी,मित्र, नातेवाईक, त्याला भेटायला येतात असा उल्लेख केला .त्याच्या आईचा उल्लेख मी केला नाही .ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेलच.~त्याच्या आईमुळेच त्याचे असे झाले आहे.~दिशाला मोठे डॉक्टर नक्की काय सांगत आहेत ते लक्षात येत नव्हते .एखाद्याची आई कशीही असली तरी तिच्यामुळे त्या व्यक्तीचा निस्तब्ध पुतळा कसा काय होऊ शकतो ते दिशाच्या लक्षात येत नव्हते .
मोठ्या डॉक्टरांना तिच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह दिसले .तिने प्रश्न विचारण्याअगोदरच त्यांनी बोलण्याला सुरुवात केली.
महेशचे त्याच्या आईवर नितांत प्रेम होते.लहानपणापासून तो थोडासा आई वेडा होता .याने हौशीने नवीन मोटारसायकल घेतली होती .मोटारसायकलला साडी दुप्पटा पर्स चाकांमध्ये गुंडाळली जावू नये म्हणून,माती चिखल पाणी लहान मोठे खडे उडून मागे बसणाऱ्याला लागू नयेत म्हणून, गार्ड्स लावलेले नव्हते.दुसऱ्या दिवशी तो मोटारसायकलच्या शोरूममध्ये जाऊन गार्ड्स बसवून घेणार होता. संध्याकाळी हौशीने त्याने आईला गाडीवरून फिरविण्यासाठी नेले.त्यांना अमुक अशा ठिकाणी कुठेही जायचे नव्हते .केवळ पाच दहा किलोमीटरची आईला घेऊन गाडी दाखवण्यासाठी राऊंड मारायची होती.
गावाबाहेरचा रस्ता होता .रस्ता तसा सरळ रिकामा होता .वारा जोरात वहात होता .एकाएकी काय झाले माहीत नाही.आईचा पदर मागच्या चाकांमध्ये अडकला आणि गुंडाळला गेला.आई साडीबरोबर खेचली गेली . धावत्या मोटारसायकलवरून जोरात रस्त्यावर आपटली.लक्षात येऊन महेशने मोटारसायकल थांबवीपर्यंत पंचवीस तीस फूट ती आपटत खरचटत ओढली गेली.तिचे डोके रस्त्यावर जोरात आपटल्यामुळे तिथेच कवटी फुटून ब्रेन हॅमरेज होऊन तिचा मृत्यू झाला होता.महेशने मोटारसायकल थांबवून उभी करून उतरल्यावर तो पाहतो तो आई रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडलेली होती .त्याची प्रिय आई त्याला कायमची सोडून गेली होती .तत्क्षणी मानसिक धक्क्यामुळे त्याची वाचा गेली.त्याचा एक निस्तब्ध पुतळा झाला.
तेव्हापासून हा हॉस्पिटलमध्ये आहे .आईच्या अंत्यसंस्काराला और्ध्वदेहिकालाही तो हजर राहू शकला नाही.
आम्ही महिनाभर त्याला माणसात आणण्याचा प्रयत्न करीत आहोत.आम्हाला अजून तरी यश आलेले नाही .तुम्ही तुमचे कौशल्य वापरून, काही नवीन कल्पना अंमलात आणून, नवीन प्रयोग करून,जर महेशला पूर्वीसारखा करू शकलात तर ते एक मोठे यश ठरेल .
एवढे प्रदीर्घ बोलून मोठे डॉक्टर बोलायचे थांबले.
ही केस कशी हाताळावी, कसे प्रयत्न करावेत, यावर तिचे विचारचक्र चालू झाले होते.
*कांही दिवसांपूर्वी चॅनेल सर्फिंग करताना तिने जुना "खामोशी" हा धर्मेंद्र व राजेश खन्ना यांचा सिनेमा पाहिला होता .त्याची तिला आठवण झाली.*
*आपली वहिदा रहमान होणार तर नाही ना असाही एक विचार तिच्या मनात आला .*
*त्या विचारांबरोबर एक हास्य रेखा तिच्या चेहऱ्यावर उमटली .*
*भविष्यकाळच काय ते ठरवणार होता.*
(क्रमशः)
१७/७/२०२०©प्रभाकर पटवर्धन