( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

अशोकला गुंतागुंत कूट कोडे (जिगसॉ पझल) सोडवण्याचे जवळजवळ व्यसनच होते .आपल्याला या कोड्याचे स्वरूप माहीत असेलच. निरनिराळ्या आकाराचे त्रिकोणी चौकोनी षटकोनी पंचकोनी गोल इत्यादी आकाराचे असंख्य तुकडे असतात .ते सपाट पृष्ठभागावर एकमेकांमध्ये चपखलपणे बसू शकतात . सर्व तुकडे असे लावल्यावर एक चित्र तयार होते.त्या चित्राचे स्वरूप कसेही असू शकेल.निसर्ग चित्र ,व्यक्तिचित्र, एखाद्या सार्वजनिक स्थळाचे चित्र,सार्वजनिक सभेचे चित्र ,पोलीस परेड ,खून लुटमार बळजोरी इत्यादी .या असंख्य लहान मोठ्या तुकड्यांतील एखादा तुकडा जरी योग्य ठिकाणी बसला नाही तरी चित्र तयार होत नाही.कांही तुकडे आपल्या जागी चपखल बसल्यासारखे वाटतात परंतु तसे नसते.त्यातील काही तुकड्यांची जागा अन्य ठिकाणी असते.तुकडे बघून चित्र काय असेल ते तुमच्या मन:चक्षूं समोर यावे लागते.तुमची कल्पनाशक्ती जितकी तीव्र असेल, कोडे सोडविण्याची प्रॅक्टिस सवय जेवढी जास्त असेल,तुमची जेवढी एकाग्रता असेल ,तितके तुम्हाला कोडे सोडवण्यात लवकर यश मिळण्याचा संभव असतो. एकदा कोडे यशस्वीपणे जोडून विस्कटल्यावर ते पुन्हा लगेच जोडता येईलच असे सांगता येत नाही .कदाचित जास्तही वेळ लागू शकतो.एकाच कोड्यात जोड व तोड यामध्ये मनुष्य कित्येक दिवस रमू शकतो.वेळ घालवण्यासाठी, स्वत:ला गुंतवून ठेवण्यासाठी, मन रमविण्यासाठी,जी अनेक साधने आहेत त्यात याचा अंतर्भाव करता येतो.पत्यातील पेशन्स या डावाप्रमाणे यासाठी दुसर्‍याची गरज लागत नाही.   

जेव्हा पहिल्यांदा अशोकने ते कूट कोडे आपल्या आजोळी पाहिले .तेव्हाच तो त्या कोड्याच्या प्रेमात पडला.मामाने लाडक्या भाचाला लगेच बाजारात नेऊन त्याच्या मनासारखे कोडे त्याला विकत घेऊन दिले . ते कोडे जोडायचे नंतर पुन्हा  विस्कटायचे , जोड तोड, जोड तोड ,पुन्हा पुन्हा तोच खेळ तो खेळत असे.कोडे जोडायचे आणि पुन्हा मोडायचे असे करता करता,जोडण्याचा वेळ क्रमशः  कमी कमी होत गेला.कोड्याचे सुटे भाग टेबलावर ठेवल्याबरोबर तो काही मिनिटात ते कोडे जोडत असे.स्वाभाविक त्याला त्या एकाच कोड्याचा कंटाळा आला .

काही दिवसांनी घरी आल्यावर त्याने बाबांजवळ आणखी एक नवीन कोडे विकत घेण्याचा लकडा लावला.बाबांनी त्याला त्याच्या मनासारखे कोडे आणून दिले.काही दिवसांनी त्याला त्याचाही कंटाळा आला .अशी कोडी निरनिराळ्या प्रकारची असतात.पहिला प्रकार सोपी, कठीण,अधिकाधिक गुंतागुंतीची , सोडविण्यासाठी लागणारा वेळ, बुद्धिमत्ता व कुशलता यावर आधारित .दुसरा प्रकार म्हणजे कोड्याचे तुकडे तयार करण्यासाठी  वापरलेली वस्तू.उदाहरणार्थ साध्या जाड कागदाचे तुकडे येथपासून संगमरवरी तुकड्यापर्यंत अनेक प्रकारच्या कमी जास्त किमतीच्या वस्तू वापरून कोड्याचे तुकडे तयार करता येतात.वापरलेल्या वस्तूप्रमाणे   किमतीतही बदल घडतो. 

बऱ्याच वेळा वाढत्या वयाबरोबर आवडी निवडी बदलत जातात .एकाच प्रकारचा खेळ खेळून कंटाळा येतो. अशोकच्या बाबतीत असे झाले नाही. त्याचा अशा कोड्यांचा नाद, अशा कोड्यांची आवड,कायम राहिली.आलेल्या पाहुण्यांकडून लहानपणी, मिळालेल्या पॉकेटमनी मधून जरा मोठा झाल्यावर , तो निरनिराळ्या प्रकारची अशी कूट कोडी खरेदी करीत असे.हळूहळू त्याच्या जवळ अशा कोड्यांचा एक छान संग्रह तयार झाला.  

तो शिकला. तो मोठा झाला.त्याचे शिक्षण पुरे झाले.तो नोकरीलाही लागला .तरी त्याच्या डोक्यातील अशा कोड्यांचे वेड काही कमी झाले नाही.आता स्वतःच्या पैशातून तो विविध प्रकारची अशी कोडी विकत घेत असे .आणि रिकाम्या वेळेत तो ती जोडीत म्हणजेच सोडवीत बसत असे.

त्याचे लग्न झाले.तो त्याच्या कौटुंबिक अाणि इतर जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडीत होताच.रिकाम्या वेळेत कोडीही सोडवीत होताच.कोड्यामध्ये रमलेला असल्यामुळे स्वाभाविकपणे पत्नीला कमी वेळ दिला जाई.

असे कोडे जुळवित असताना,एकदा त्याची पत्नी  रागावून म्हणाली, "नेहमी नेहमी  सारखे ती कोडी जोडत असता व तोडत असता.तुमच्या सारखे आणखी काही वेडेपीर असतीलच.ते तुम्हाला पैसे देऊन कोडी सोडवायला येतील .पैशापरी पैसा वर तुम्हाला कोडी सोडवण्याचे समाधान ! तुम्ही आतापर्यंत यावर केलेला पैसाही वसूल होईल .तुम्हाला असंख्य कोडीही सोडवायला मिळतील!!नोकरी सोडा आणि आता दुकान टाका!!!"

पत्नी जरी चिडून, व्याजोक्तीने आणि रागावून बोलत असली तरी अशोकला त्यामध्ये धंदा दिसू लागला .अर्थात चांगली नोकरी सोडायची आणि हा बेभरवशी धंदा सुरू करायचा म्हणजे मोठे रिस्क होते .धोका स्वीकार होता .एक प्रकारचा जुगार होता .

पत्नीने रागाने सुचविलेला धंदा त्याच्या डोक्यात घोळत रहाला.    बरेच दिवस विचार करून त्याने एक योजना आखली मोठी जागा  घ्यायची.बँकेकडून कर्ज काढायचे.एखादा प्रामाणिक नोकर नेमून सुरुवात करायची . सुरुवातीला  आपल्याला लहानपणापासून मिळालेले व आपण जमविलेले कित्येक कूट कोडी आहेत ते सुरुवातीला खेळण्यासाठी ठेवता येतील .त्यात आपण वेळोवेळी बरीच भर घालू.कल्पना यशस्वी होते का ?खर्च किती येतो ?पैसा किती मिळतो ?गुंतवलेल्या भांडवलावर योग्य परतावा मिळतो का ?धंदा म्हणून त्यातून नफा मिळतो का? आपल्याला या संदर्भात काही नवीन कल्पना सुचतात का?सर्व गोष्टींचा अंदाज घेऊ.नंतर केव्हाही नोकरी सोडून आपल्याला मालक-व्यवस्थापक म्हणून तिथे बसता येईल.

त्याने कागदावर बरीच आकडेमोड केली.सुरू करावयाच्या व्यवसायाचा (ब्ल्यू प्रिंट)आराखडा तयार केला .बँकेकडून मिळेल तेवढे कर्ज घेतले .कांही पैसे मित्रांकडून कर्ज घेतले.स्वत:जवळील काही पैसे घातले.भाड्याने भरवस्तीत जागा घेतली आणि खेळाचे दुकान सुरू केले .  दुकानांवर पुढील पाटी झळकत होती .रात्री निअॉन साइनही होती.पाटी होती .~ जिगसॉ पझल अॅकेडमी~   

खरे म्हणजे त्याने क्लब हा शब्द वापरायला हवा होता .परंतु क्लब हा शब्द उथळ वाटतो अॅकेडमी हा शब्द भारदस्त वाटतो.अर्थात कूट कोडी कशी सोडवावीत याचे मार्गदर्शन ज्याना हवे असेल त्यांच्यासाठी रात्री उशिरा  एक तास राखून ठेवला होता.ठरविल्याप्रमाणे अशोकने एक क्लार्क कम व्यवस्थापक नेमला होता .शिवाय एक सुरक्षा रक्षक होता.सुरुवातीला अशोकने त्याच्या घरी असलेल्या  सर्व कोड्यांचे खोके दुकानात आणून ठेवले.कमी जास्त गुंतागुंतीची सोडवायला कठीण असलेली अशी कांही कोडी  त्याने नवीन विकत आणली.

पंचवीस लोक आरामात स्वतंत्रपणे खेळू शकतील एवढा मोठा हॉल होता .त्या खोलीत त्याने सुरुवातीला फक्त पाच जणांची व्यवस्था केली होती . कोड्याच्या गुंतागुंतीवर अवलंबून असे खेळण्याचे दर होते.प्रत्येकाला वेळ एक तास होता .दर पन्नास शंभर दीडशे असे दर तासाला सुरुवातीला त्याने ठेवले होते .ती वेळ पूर्ण झाल्याबरोबर किंवा त्याच्या अगोदर त्याने तो खेळ परत करायचा होता . नंतर खेळत बसल्यास पुढच्या तासांसाठी पैसे भरावे लागणार होते .

खेळण्यासाठी भरपूर खेळगडी यावेत यासाठी त्याने  आणखी एक आकर्षण ठेवले होते .जो अर्ध्या तासामध्ये सर्व तुकडे बिनचूक जुळवील व चित्र  तयार करील  त्याला त्याचे पैसे परत मिळणार होते .निरनिराळया स्तरावरील कोडी अशी होती की सर्वसाधारणपणे निम्या वेळेत ती सोडवणे मुष्कील होते.  

व्यवस्थापकाने खेळणी देणे,वेळेत परत घेणे,खेळाडूंची  नावे पत्ते लिहून ठेवणे , त्यांची नोंद ठेवणे ,हे काम करायचे होते .रक्षकाने सर्वांवर लक्ष ठेवायचे होते .व्यवस्थापकाला मदत करायची होती .

अशोकला फार चांगला  अनुभव आला . जिगसॉ पझलची अावड असणारे भरपूर लोक होते.पाचही टेबले थोड्या दिवसात नेहमी वापरात राहू लागली.संध्याकाळी चार ते नऊ या वेळात जास्त गर्दी होत असे .खोलीत आणखी कांही जणांची व्यवस्था करण्यात आली .प्रत्येकाला खेळ केव्हां दिला.तो वेळेवर परत आला किं नाही .त्याने निम्म्या वेळेत तो खरेच सोडवला का ?तो वेळेवर परत करताना कोड्याचे सर्व तुकडे परत आले की नाही? या सर्वांवर लक्ष ठेवणे एका व्यक्तीला कठीण होऊ लागले .त्याने कॉम्प्युटर,सीसीटीव्ही,प्रत्येक टेबलवर कॅमेरा , इत्यादी व्यवस्था केली.निम्म्या वेळेत किंवा त्या आधी जर कोडे पूर्ण केले तर सूचना देण्यासाठी,प्रत्येक टेबलला एक बेल देण्यात आली.त्याचप्रमाणे  पूर्ण सोडविलेल्या कोड्याचा फोटो काढून तो लगेच संगणकावर दिसेल अशी व्यवस्था करण्यात आली.बटन दाबल्यावर जुळविलेल्या खेळाचा फोटो काढला जाई.संगणकावर तो बरोबर आहे की नाही ते पाहिले जाई. संगणकावरील नोंदी प्रमाणे खेळाडूला पैसे परत दिले जात.एखादा जास्त वेळ खेळत बसल्यास त्याच्याकडून पैसे वसूल केले जात. 

त्याने आणखी कांही नवीन कोडी विकत आणली .प्रत्येक कोडयाचे जास्त संच विकत घेतले.काही महिन्यांमध्ये त्याचा धंदा झकास चालू लागला.त्याची नोकरी संपल्यावर तो तिथे येऊन बसू लागला.सर्व काही एका दिवसात झाले नाही .प्रयोग,अनुभव व सुधारणा सतत चालूच होती.

त्याने आपल्यासाठी अगोदरच केबिन तयार करून ठेवली होती .दिवसा जेव्हा वेळ मिळेल  तेव्हा काही तास त्याची पत्नीही तेथे येऊन बसत असे.          

त्याच्या  पत्नीने रागारागात त्याला नोकरी सोड हा धंदा सुरू कर असे सांगितले .त्यातून त्याच्या मनात एक कल्पना आली.ती त्याने प्रत्यक्षात उतरवली.एक चांगला व्यवसाय मिळाला .हा व्यवसाय त्याला आवडणाराही होता.आपली नोकरी सोडून त्याने हा व्यवसाय पूर्णवेळ करण्याचा विचार सुरू केला होता .

अशोकने नोकरी सोडली. पूर्ण वेळ त्याने या व्यवसायाला वाहून घेतले.त्याने खोलीमध्ये अनेक टेबले टाकून जास्तीजास्त लोक बसतील अशी व्यवस्था केली.संगणकांची कॅमेर्‍यांची नोकरांची संख्या वाढविली.खेळांचे अनेक संच विकत घेतले.दरही वाढविले. संध्याकाळी चार ते नऊ दर दुप्पट केले. त्याचा धंदा झोकात चालू लागला.  

आपल्या केबिनमध्ये बसून तो सीसीटीव्हीच्या मार्फत सर्वत्र लक्ष ठेवीत असे .त्याला अशा प्रकारच्या कोड्याची सुरुवातीपासून आवड होती. आता तो आपली हौस मनसोक्त भागवू शकत होता.रोज तो निरनिराळी गुंतागुंतीची कोडी सोडवत असे .एक दिवस तो एक खोका घेऊन त्यातील कोडे सोडवीत होता .खोका जुना पुराणा होता .त्याने लहानपणापासून केलेल्या संग्रहातील तो खोका नव्हता . कोडे पूर्ण झाल्यावर त्याला जिथे त्याने आपला व्यवसाय सुरू केला होता ती इमारत व त्याचा दरवाजा तयार झालेला दिसला.त्या दरवाज्यात तो चित्रात पाठमोरा उभा असलेला दिसतो होता .ते जोडलेले चित्र बघून तो जागच्या जागीच उडाला . अशा प्रकारचे कोडे अस्तित्वातच नव्हते याची त्याला खात्री होती.समजा कोडे असलेच तर ते त्याने खरेदी केलेले  नव्हते.तो खोकाही वेगळ्या प्रकारचा दिसत होता.खोका जुनाट दिसत होता .हा प्रकार काय आहे ते त्याला कळत नव्हते.त्याने तो खोका परत जाग्यावर ठेवण्याऐवजी त्याच्या केबिनमध्ये टेबलावर ठेवून दिला .

असे कसे  हे कोडे?

हे कोडे कुठून अाले?

आपण तर विकत घेतलेले नाही .

उद्या या सर्वांचा छडा लावायचाच असेही त्याने ठरविले .

दुसऱ्या दिवशी ऑफिसात आल्यावर त्याने तो खोका पुन्हा उघडला .

निरनिराळे तुकडे तो जुळवू लागला. त्याला  आपण काल बघितलेले चित्र स्वप्न तर नव्हतेना याची खात्री करून घ्यायची होती.

*तुकडे जोडल्यावर तो पाहतो तो आजचे चित्र त्याच्या ऑफिसमधील होते.*

* चित्रामध्ये काल तो इमारतीच्या दरवाज्याजवळ उभा होता .*

*चित्रामध्ये अाज तो त्याच्या ऑफिसमध्ये आलेला दिसत होता.?*

*तो पाठमोरा न दिसता पुढुन दिसत होता.रोज चित्र बदलत होते.* 

(क्रमशः)

१२/९/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel