( ही कथा काल्पनिक आहे.हे सांगण्याची आवश्यकता नाही.कथेत लिहिले आहे तसे काही असेलच असे नाही. नसेलच असेही नाही .)
काही वर्षांपूर्वी आम्ही मित्र मित्र ट्रेकिंगसाठी मनाली येथे गेलो होतो .परतीच्या प्रवासात दोनतीन दिवस आमचा मनाली येथे मुक्काम होता . मनालीतील प्रेक्षणीय स्थळे पाहात फिरत होतो .हिडिंबा मंदिर व सभोवतीचा परिसर पाहून आम्ही मनालीच्या जुन्या बाजारात आलो. मनालीच्या बाजारात फिरत असताना आम्हाला एके ठिकाणी गर्दी दिसली .हॉन्टेड बोर्ड, हॉन्टेड बोर्ड खरेदी करा आणि तुमचे भविष्य पहा, अश्या अर्थाचे काहीतरी हिंदीमध्ये कुणी विक्रेता ओरडत होता .कुतूहल वाटल्यामुळे आम्ही तेथे गेलो .सुमारे अडीच फूट चौरस आकाराचे देवदारी बोर्ड एकजण विकत होता.हौशे, गवशे, नवशे, सर्वच तिथे उपस्थित होते.तिथे बऱ्यापैकी गर्दी होती .बहुतेक बघे होते .क्वचित एखादा खरेदीही करीत होता .बघ्यांची गर्दी थोडीशी कमी झाल्यावर आम्ही विक्रेत्यापर्यंत पोचू शकलो .बोर्ड घडी करता येईल असा होता . प्रवासात बॅगेतून नेणे सोयीस्कर होते.पर्यटकांनी बोर्ड विकत घ्यावेत म्हणून मुद्दाम ते घडी करता येतील असे सुटसुटीत केले होते . आम्ही विक्रेत्याजवळ चौकशी करता त्याने आम्हाला पुढील माहिती दिली .
हा बोर्ड हलका आहे घडीचा आहे. तुम्ही आपल्या सामानातून सहज घरी नेऊ शकता .हा तुम्हाला तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देईल.जर त्याला उत्तर देता येणार नसेल तर तो काहीही उत्तर देणार नाही .परंतु चुकीची उत्तरे देणार नाही .हा बोर्ड वापरण्याची एक विशिष्ट पद्धत आहे .त्याप्रमाणेच हा बोर्ड वापरला पाहिजे .हा विकत घेतल्यावर तुम्हाला मी एक माहितीची पुस्तिका देईन .याच्या वापरासंबंधीची संपूर्ण प्रक्रिया त्यावरती लिहिलेली अाहे.
जर हा बोर्ड तुम्ही घेतला नाही तर एका मोठ्या अत्यंत महत्त्वाच्या उपयोगी पडणार्या वस्तूला तुम्ही वंचित व्हाल .खेळ माहिती व भविष्य अशा तिन्ही गोष्टी यामध्ये आहेत .थ्री इन वन असा हा बोर्ड आहे.
तुम्ही सोंगट्या ,फासे वापरून यावर खेळू शकता .
सोंगट्या व स्ट्रायकर घेऊन याचा वापर कॅरम बोर्ड प्रमाणे करू शकता.
भविष्यदर्शी प्रश्न न विचारता केवळ माहिती विचारली तरीही ती तुम्हाला या बोर्डच्या साह्याने मिळू शकेल.आमचा गुगलच आहे असे म्हणाना, असे तो विक्रेता हसून म्हणाला .
भविष्यदर्शी प्रश्नाचे उत्तर तर हा बोर्ड बऱ्याच वेळा देऊ शकेल.
लोकांना बनविण्यासाठी नाना युक्त्या विक्रेते करत असतात .त्यातीलच ही एक युक्ती असावी असे आम्हाला स्वाभाविकपणे वाटले .आमच्यातील एकाने सहज जिज्ञासा म्हणून किंमत विचारली त्याने पांच हजार रुपये सांगितले .आम्ही हसून पुढे निघालो. त्या विक्रेत्याने हाक मारून तुम्ही मोठी संधी गमावत आहात म्हणून सांगितले.घासाघीस घालून आम्ही तो बोर्ड हजार रुपयांना विकत घेतला . त्याने आम्हाला कोणती भाषा म्हणून विचारले .मराठी असे म्हणताच त्याने त्याच्याजवळील गठ्यातून एक बोर्ड काढून आम्हाला दिला.त्यावर मराठी अक्षरे स्वर व्यंजने बाराखड्या व्यवस्थित लिहिलेल्या होत्या .तसेच तो बोर्ड वापरताना कोणती काळजी घ्यावी यासंबंधीची एक छोटीशी पुस्तिकाही दिली .
कॅरम बोर्ड किंवा सोंगटीपट म्हणून वापरताना तो केव्हाही दिवसा किंवा रात्री वापरला तरी चालणार होता .भविष्य वाचनासाठी मात्र एक कठोर विशिष्ट विशेष पद्धत होती .
तो फळा पुढीलप्रमाणे वापरावयाचा होता.फळा फक्त रात्री वापरायचा होता.मध्यरात्री वापरला तर जास्त चांगले असेही तो म्हणाला . खोलीचे सर्व दरवाजे व खिडक्या लावून घ्यायच्या होत्या .फळ्याला प्रश्न विचारीत असताना एकांत भंग होता कामा नये. ज्यांचा विश्वास असेल, ज्यांची श्रद्धा असेल ,अशा लोकांनी खोलीत थांबायचे होते.कुतूहल म्हणूनही एखादा खोलीत थांबू शकतो .मात्र तो पाहू शकेल त्याच्या प्रश्नाला उत्तर मिळेलच असे नाही .श्रद्धा विश्वास एकाग्रता अत्यंत महत्त्वाची आहे. संपूर्ण शांतता पाहिजे .खोलीतील सर्व दिवे मालविलेले पाहिजेत.त्या बोर्डवर मध्यभागी एक चौकोन आहे .त्यावर चांदीच्या नाण्यावर तुपात भिजविलेली फुलवात ठेवावी. नंतर ती प्रज्वलित करावी.
बोर्डाभोवती जे बसतील त्यांनी पुढील प्रार्थना करायची होती .हे अतिंद्रिय शक्ती, आम्ही तुझ्या पुढे क्षुद्र आहोत. तुझी शक्ती अफाट आहे .आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली तर आम्हाला आनंद होईल .आम्हाला आमचे जीवन जास्त चांगल्या प्रकारे जगता येईल . हे सर्व उच्चारताना मनापासून उच्चारले पाहिजे .भाविकतेने उच्चारले पाहिजे .जर तुमच्यामध्ये योग्य प्रमाणात भाविकता नाही असे त्या शक्तीला आढळून येईल तर ती प्रकट होणार नाही .नम्रता लीनता भाविकता श्रद्धा यांची गरज आहे .मनापासून प्रार्थना केली पाहिजे .
या प्रार्थनेनंतर खोलीतील वातावरणात एक सुगंध पसरेल.ज्योत स्वतःभोवती गिरक्या मारीत आहे असा भास निर्माण होईल. हा सुगंध, या ज्योतीच्या गिरक्या, म्हणजे ती अतिंद्रिय शक्ती तिथे आल्याचा पुरावा आहे .नंतर कुणीही काहीही प्रश्न विचारावा.जर उत्तर देण्यासारखे असेल तर उत्तर दिले जाईल .जर उत्तर दिले नाही तर पुढचा प्रश्न विचारावा .प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले जाईलच असे नाही .प्रश्न विचारल्यावर बोर्डवरील काही अक्षरे प्रकाशमान होतील.ते तुमचे उत्तर असेल .उदाहरणार्थ आज वार कोणता असा प्रश्न असल्यास रविवार ही अक्षरे त्या दिवशी रविवार असेल तर प्रकाशमान होतील .
त्या अतिंद्रिय शक्तीला तुम्ही जास्त त्रास देऊ नये अशी अपेक्षा आहे .त्याचप्रमाणे उगीचच फालतू प्रश्न विचारू नयेत .ज्याची उत्तरे तुम्हाला माहित आहेत असे प्रश्न शक्यतो नसावेत .
प्रज्वलित केलेली तुपाची फुलवात कितीही वेळ प्रकाशमान राहू शकेल. एरवीच्या परिस्थितीत जी फुलवात सुमारे दहा मिनिटे प्रज्वलित राहील ती एकदा या बोर्डच्या मध्यभागी आल्यावर आणि ती अतिंद्रिय शक्ती उपस्थित झाल्यावर कित्येक तास प्रज्वलित राहू शकेल .सुमारे एक तासात तुम्ही प्रश्न विचारावेत आणि या प्रक्रियेला पूर्णविराम द्यावा अशी अपेक्षा आहे .त्या शक्तीला तुम्ही जास्त त्रास देऊ नये .
तुमचे प्रश्न शक्यतो अगोदरच तयार ठेवावेत.आयत्या वेळी सुचलेले प्रश्नही विचारायला हरकत नाही.प्रश्न विचारून झाल्यावर पुन्हा त्या शक्तीची मनोभावे प्रार्थना करावी .तिचे आभार मानावेत आणि तू आपल्या जागी आता पुन्हा जा आणि आम्ही जेव्हा तुझी प्रार्थना करू तेव्हा पुन्हा ये असे सांगावे . ज्याप्रमाणे आपण गजाननाला पुनरागमनायच असे म्हणतो तसे म्हणावे.
हे सर्व वाचून आणि तो बोर्ड पाहून आम्हाला हसावे की रडावे तेच कळत नव्हते .हजार रुपये अक्कल खाती गेले. त्या विक्रेत्याने आम्हाला संमोहित करून बोर्ड गळ्यात बांधला .असे सर्वांना वाटत होते .आमचा कशावरही विश्वास बसत नव्हता .हे सर्व थोतांड आहे .आपले हजार रुपये फुकट गेले. असा आम्हा सर्वांचा ग्रह झाला होता .त्यातच मला एक नंतर वेगळा विचार सुचला .मी म्हणालो,या जगात आपल्याला अज्ञात अशा अनेक गोष्टी आहेत .एवढे तरी तुम्ही मान्य कराल.आपल्याला एखादी गोष्ट अज्ञात आहे म्हणजे ती अस्तित्वातच नाही असे नाही .आपण प्रयोग करून बघायला काय हरकत आहे .सांगितल्याप्रमाणे मनोभावे प्रार्थना करू. सर्व प्रयोग करू. अगोदरच प्रश्नावली तयार ठेवू.काय उत्तरे येतात ते पाहू .त्याची सत्यता अजमावू आणि नंतरच या बोर्डसंबंधी आपले मत निश्चित करू. असे करण्याला काय हरकत आहे.असे करण्यात अशास्त्रीय असे काहीही नाही .बोर्डाला अगोदरच दूषणे देण्याऐवजी आपण भाविकतेने प्रयोग करून पाहू.
माझे बोलणे सर्वांना पटले . आम्ही चांदीचे एक नाणे मनालीतील सराफ बाजारात जाउन विकत घेतले .साजूक तूप व फुलवात याचीही व्यवस्था केली.रात्री जेवण झाल्यावर बारा वाजता आम्ही एका मित्राच्या खोलीत जमलो.पुस्तिकेत लिहिल्याप्रमाणे दरवाजे खिडक्या शटर्स सर्व बंद केले . त्या बोर्डच्या मध्यभागी असलेल्या चौकोनात एक चांदीचे नाणे तुपात भिजविलेल्या फुलवातीसकट ठेविले .काडी ओढून ते प्रज्वलित करण्यात आले .आम्ही सर्वांनी हात जोडून पुस्तिकेत सांगितल्याप्रमाणे त्या अनामिक, अज्ञात, अतिंद्रिय शक्तीची मनोभावे प्रार्थना केली .
.प्रश्न असे विचारायचे की उत्तराची सत्यता आपल्याला पुढच्या दोन चार दिवसांत कळू शकेल .असे प्रश्न आम्ही अगोदरच निवडले होते .
पुस्तिकेत लिहल्याप्रमाणे बोर्डवरील अक्षरे प्रज्वलित होतात का ?
मिळालेले उत्तर खरोखरच सत्यदर्शी असते का ?
हा बोर्ड जादूचा आहे? भारित आहे? झपाटलेला आहे ?भुताटकीचा आहे? दैवी आहे?अमानवी आहे ?की बंडल आहे ?
बोर्ड कदाचित योग्य असेलही परंतु आम्ही नास्तिक त्याला पचनी पडणार नाही असे तर होणार नाही ना ?
आमच्या प्रार्थनेला मान देऊन ती शक्ती प्रकट होईल का ?
*असंख्य प्रश्नांचे काहूर मनात असताना, आम्ही काळोखात, रात्री दहा वाजता, मनालीच्या त्या हॉटेलमधील खोलीत,चांदीच्या नाण्यावरील प्रज्वलीत केलेली फुलवात त्या बोर्डच्या मध्यभागी असलेल्या विशिष्ट चौकोनावर ठेवून , सभोवताली सर्वजण कोंडाळे करून, मनोभावे प्रार्थना करून तणावग्रस्त स्थितीमध्ये, बसलो होतो.*
*आम्हा सर्वांना वातावरण भारल्यासारखे वाटले.*
*आमच्याशिवाय खोलीत आणखी कुणीतरी आहे अशी जाणीव झाली .*
*पुस्तिकेत लिहिल्याप्रमाणे सर्वत्र दैवी सुगंध पसरला .*
*ज्योत स्वतःभोवती एखाद्या नर्तकी सारखी गिरक्या घेऊ लागली .*
*आम्ही पहिला प्रश्न विचारण्यासाठी तयार झालो.*
( क्रमशः)
३/२/२०२०©प्रभाकर पटवर्धन